बलुतं..दया पवार(भाग २४)

बलुतं..

खरूज झालेली . ” घरातली देवी कोपल म्हणून तुला खरूज झालीय ” असं गावकरी त्याला चिडवीत . मुठीएवढं ते पोरगं . काय मनात आलं कुणास ठाऊक , घेतली कुदळ आणि देवी खणून काढली . शेंदूर लावलेला दगड खोलवर जमिनीत पुरलेला . त्यानं बेभान होऊन तो बाहेर काढला आणि समोरच्या उकिरड्यावर फेकून दिला ! सारा गाव तोंडात बोट घालून हा प्रकार पाहत होतं . राणूजी मात्र गालातल्या गालात हसत होता . आता देवी ह्यांच्या घराचं वाटोळं करणार , असं गावकरी कुजबुजत होते . पण आज एवढ्या वर्षांनीही बघतोय , त्या घराची भरभराटच होते आहे , भौतिक नाही , पण ज्ञानवृक्षाची शाखा बहरलीय .

औरंगपुरात माझ्यावर चांगलीच बेतली होती . त्याचं काय झालं , असाच मी सुट्टीत मामाकडे आलेलो . मारुतीच्या देवळापुढं खूपच गर्दी दिसली . म्हणून देवळाकडे गेलो . तिथं पाहतो तो एक माणूस हातात वहाण घेऊन मारुतीवर धावून जातो आहे ; त्याला आईमाईवरून शिव्या देतो आहे . ” तू जर जागती ज्योत देव असशील , तर प्रचीती दाखवशील ! ” असं देवाशी जोराजोराने भांडतो आहे . साऱ्या मंडळींनी त्याला वेड्यात काढलेलं असतं . त्याचा मेंदूचा थोडासा तोल गेलेला दिसत असतो . पण तो जे बोलत असतो , ते मात्र मला पटत असतं . क्षणभर मी विचार करतो : गावकरी जर एवढं सहन करतात , तर आपण देवळात गेल्यामुळं असं काय आकाश कोसळणार आहे ? मी देवळातील गर्दीत मिसळतो . तसं मी काही आतपर्यंत गेलो नव्हतो . काही पायऱ्या चढून चौथऱ्यावर बसलेलो असतो . एका माणसाला माझा संशय येतो . विचारतो , ‘ कुणाचं रं तू ? ‘ मी उत्तर देतो , ‘ कसबेकडे आलोय . ते माझे मामा आहेत . मराठा सणसणीत शिवी देतो . ‘ तुझ्या आयला ! देव बाटला ना ! ‘ माझ्याकडं साऱ्यांचं लक्ष जातं . देवाला वहाण दाखवणाऱ्या वेड्याला सोडून दिलं जातं आणि सारे माझ्याभोवती धक्काबुक्की करतात . एक सणकन् कानामागं जाळ काढतो . मघाशी देवाला शिव्या देणारा माणूस मी शोधत असतो . तो तरी आपल्याला ह्यातून सोडवील , असं वाटत असतं . आजी येते , सर्वांच्या पुढे पदर पसरते ; तेव्हा कुठं माझी सुटका होते .

पुढे बऱ्याच काळानं समजलं , की देवाला शिव्या देणारा माणूस हा सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता होता . मारुतीच्या देवळाला खरं म्हणजे जमीन महारवाड्यातील मुकादमानंच दिलेली असते . देऊळ बांधण्याकरिता महारवाड्यातील लोकांनीही कष्ट उपसलेले असतात . पण देवळात मारुतीची प्रतिष्ठापना होते आणि त्या दिवसापासूनच महार – मांगांना देवापासून दूर ठेवलं जातं .

औरंगपूरच्या महार मंडळींनी पाण्याकरता दिलेला संघर्ष मात्र खूपच रोमहर्षक . त्या काळी काही ‘ एक गाव , एक पाणवठा ‘ अशी चळवळ नव्हती . पण महाडच्या पाण्याचा संघर्ष कानावरून नक्कीच गेला असावा . शिवाय त्यांच्या गरजेतूनही हा वाद छेडला . महार मंडळी पावसाळ्यात ओहळाचं पाणी पीत . तेही अर्ध्या मैलावर . उन्हाळ्यात ओहळ आटे . त्यावेळी त्यांचे खूपच हाल होत . मारुतीच्या देवळापाशी गावची गार पाण्याची मोठी विहीर होती . तिच्यावर सारखं चाक गरगरायचं . महार – मांग स्त्रिया तासन् तास पोहराभर पाण्यासाठी ताटकळत बसत . कुणाला दया आलीच तर एकादा पोहरा ओतला जाई . कायदा तसा महारांच्या बाजूला होता . त्यांनी कचेरीत अर्ज – विनंत्या करून पाहिलं ; पण गच्च शासन जरासंही ढळेना . शेवटी त्यांनी एक दिवशी संघटित होऊन विहिरीत पोहरा टाकला . खिया कंबर कसून सर्वांच्या पुढं . गावात खळबळ माजली . सर्व गावाकरता वेगळ्या हौदाची कल्पना पुढे आली ; पण ‘ आम्हाला वेगळ्या तोट्या नकोत . आम्ही गावच्याच विहिरीवर पाणी भरू ‘ हा हेका महार मंडळींनी सोडला नाही . शेवटी पंचायत भरली . महार मंडळींना त्याच विहिरीवर वेगळं चाक लावण्याची परवानगी दिली . आहे की नाही गंमत ? खाली विहिरीत मराठ्यांच्या आणि महारांच्या पोहऱ्याची सलगी होते ; पण एकच चाक असू देण्यात त्यांचा जातीचा अहंकार दुखावतो . आजही तिथं गेलात तर हे वेगळं चाक दिसेल .

आयुष्यात प्रथम मी बोहडा पाहिला तो तिथंच . होळी पेटली म्हणजे हा खेळ खेळला जायचा . हा एक नाचाचा प्रकार . रामायण महाभारतातील सोंगं सजून आलेली . तोंडापुढं अक्राळविक्राळ मुखवटे , पाठीला मोराच्या पिसाऱ्यासारखी भलीमोठी ताटी . नाचणाराचे हात ताटीला बांधलेले , तर कधी हातात आयुध . नाचणाराच्या पायात चाळ . ‘ नाच गणपती , मागुन सारजा येती ‘ हे गाण्याचं पालुपद . सोबतीला वाजंत्र्यांचा तापा किंवा मांगाचं डफडं – सनई . गाण्याचा एकच हिदम . रावणाचं सोंग नाचवणं हा गावात मोठा मान . कारण त्याची दहा तोंडं घेऊन नाचावं लागे . ह्याकरता मोठी देणगी द्यावी लागे . महारापोरांना मात्र ह्या खेळात प्रवेश नसायचा . अक्राळविक्राळ लाल रक्ताच्या रंगाच्या लवलवत्या जिभा , अजस्त्र तोंड आणि लखलखती आयुधं हे बोहड्याचं प्रतिबिंब मनावर उमटलेलं . दक्षिणेत अलिकडे कालिकतला गेलो . तेव्हा ह्याच बोहड्यांची सुधारलेली आवृत्ती पाहावयास मिळाली . हा सारा आर्यांच्या दिग्विजयाचा इतिहास . जमीन पादाक्रांत करणारांचा . विसाव्या शतकातही त्याचे असे अवशेष मागे राहिलेले .

एक सांगायचं राहिलं . औरंगपूरचा मी जावई होणार होतो . हे गाव तसं सारंच मामांचं . त्यामुळं गेलो म्हणजे ” जावई आलेत ” असं वायका चिडवीत . मुकादमाची वयात आलेली एक पोरगी होती . काळीसावळी , शरीरानं ठसठशीत . मुकादमाचं तसं महारवाड्यात तालेवार घराणं . घरात दूधदुभतं , इंग्रजी कौलांचं टुमदार घर . जमीन महामूर . मुकादम गोदीत माल वाहण्याचे काँट्रॅक्टर होते . त्या काळात त्यांनी या धंद्यावर खूपच माया जमवलेली . त्यांची पठाणासारखी बायको ही तर सोन्यानं लगडलेली . मी गेलो म्हणजे ते हमखास चहाला बोलावीत . लहान असताना त्यांच्या घराच्या अंगणात मला कुत्रं चावलेलं . लहानपणी माझा किनरा आवाज . त्याची बाई नक्कल करून मला चिडवी . अशा वेळी उंची लुगड्याचा नऊवारी बोंगा सांभाळीत त्यांची मुलगी माझ्या अवतीभवती असायची . ती खुदकन हसायची . आपल्या वयाच्या मुलींना माझ्याबद्दल काहीबाही सांगायची . मी मात्र तिच्याकडे डोळे वर करून पाहतही नसे . त्यांच्या घरातही मी लग्न करावं अशी सर्वांची इच्छा . मला मात्र त्या वयातही श्रीमंत मंडळींबद्दल एक कमालीची तुच्छता असे . ते असतील तालेवार ; पण आपण काही विकले जाऊ नये, असं वाटायचं . शिवाय , आपल्याला बायको अशी काही काळी नको असते . गोऱ्या मुलीचंच स्वप्न पडायचं . मुलं कशी वाण्या – बामणासारखी व्हावीत , असं स्वप्न तरंगून जायचं . माझ्यावर त्यांच्या वैभवाची मात्रा शेवटपर्यंत चालली नाही . मुलीचा भाऊ तसा कर्ता – सवरता . तो शिक्षणाची चेष्टा करायचा . म्हणायचा , ” शिकलेला मेव्हणा काय आमच्या घरात धान्याची पोती मोजणार आहे काय ? ” ह्या सर्व गोष्टींमुळं माझ्या मनात असंतोष खदखदायचा . एकदा मुलीनं अंगणातील कुत्र्याच्या पिलाला लाथेनं उडवून दिलं . ते केकाटत लांब पळालं . मी उगाचच कळवळलो . ह्या श्रीमंतीच्या तोऱ्यात उद्या आपलीही अशीच अवस्था तर होणार नाही ना , असं क्षणभर वाटलं . माझ्या आजीला मात्र हा सोयरसंबंध मान्य नव्हता . आपल्या भाच्यानं उद्या दुसऱ्याच्या दारात उतरावं , ही कल्पना त्यांना मान्य नव्हती . आणि मामाची मुलगी तर गुडघ्याएवढी . त्यांची तशी पंचाईत झालेली . असं हे जावई प्रकरण .

मुंबईला विसरणं तसं शक्य नव्हतं . हे शहर मला माझ्या मुक्तीचं शहर वाटत होतं . वडील गेले असले , तरी मुंबईत कावाखान्यात तात्या होतेच . कधी कधी सुट्टीत त्यांना भेटायला मी जायचो , तर पाणी बदलण्यासाठी ते गावी येत . ते आले म्हणजे त्यांच्याबरोबर काकूआजीही येत असत . तात्यांचं हे दुसरं लग्न . काकू दिसायला खूपच छान . गावी आली म्हणजे तिच्या अंगावर भरजरी मोरपंखी पैठणी , वज्रटीक , नथ असे सोन्याचे दागिने . पायात चांदीचे तोडे . सारं गाव टकामका बघायचं . गावी आली म्हणजे काकू पाहुण्यासारखी बसून राही . आमची पडती बाजू होती . आई सारे कष्ट उपसायची . आईचं फाटकं जुनेर , तोंडावरची लाचारी , पांढरं कपाळ हे सारं उठून दिसायचं . का कुणास ठाऊक , माझ्या मनात मात्र कालवाकालव व्हायची . त्यात आईला गंडमाळा झालेल्या . एक गाठ फुटून बरी झाली की दुसरी फुटायची . गाठीचं सारखं ठसठसणं . तिच्या अंगाची लाही लाही व्हायची . पण मुंबईवाल्या काकूला कोण काम सांगणार ? माझा आतल्या आत संताप अनावर व्हायचा . अंगावरचं दुखणं संभाळून आई सारखी हलत राहायची .

तात्याही गावी येत तेव्हा खूपच रुबाबात असे . अंगात वुलनचा कोट , चकचकीत चमकीचे बूट . वळणदार , मागे वळलेले केस . तात्या हीरोच दिसत . त्यांच्या संदर्भातील एक घटना आठवतेय . अगस्तीच्या यात्रेला आम्ही सर्व गेलेलो . महारकुंडापाशी सर्वांनी यात्रेत पथारी टाकलेली . अशा वेळी एक काळीसावळी बाई सारखी आम्ही बसलो होतो , तिथं चकरा मारू लागलेली . आईनं त्या बाईला ओळखलेलं असतं . ती तात्याची सोडलेली पहिली बायको असते . तात्यांना एकाएकी काय वाटतं कुणास ठाऊक , ते झटक्यानं उठतात . समोर उसाची गाडी असते . त्या गाडीतून एक लांबलचक ऊस उपसतात आणि त्या बाईला गुराढोरासारखं बडवू लागतात . यात्रेतील माणसं त्या बाईची सुटका करतात . बहुधा तात्यांचा अहंकार तिनं दुखावला असावा . सोडलेल्या बाईनं एवढं ताठ्यानं वागावं , याचा त्यांना राग आला होता . बाईची बरी खोड मोडली असाच भोवताली सूर . त्या सोडलेल्या काकूचाच मी पुढे बराच काळ विचार करतोय . काकूनं मनाचा कोपरा निश्चित हलवला . तेवढं आपलेपण सध्याच्या काकूबद्दल का वाटलं नाही ?

ही घटना सोडली , तर तात्या मनानं खूपच चांगले होते . आमच्यावर त्यांचं खूपच लक्ष . आमच्या फाटक्या संसाराला त्यांचा थोडाफार हातभार लागत असे . ते आले म्हणजे बहिणीला आणि मला नवी कापडं आणीत . एकदा तर त्यांनी नवीन चप्पल दिली आणि त्याच दिवशी मी ती हरवली . त्यांनी न रागावता मला नवीन घेऊन दिली . मुंबईचा खजूर आणि पाव हमखास मिळे . चहाबरोबर पाव – तेही कडक ब्रुन – खाणे हा कोण आनंद वाटे ! त्यांच्याबरोबर मुंबईचा बाजारहाट असे . त्यात बोंबील , सुकट , मांदल्या हमखास असत . ते आले म्हणजे घरात हटकून सागुती शिजे . तालुक्याहून बकऱ्याचं मटण आणलं जाई किंवा कोंबडीचं बरबाट मिळे . दरवर्षी तात्या गावी कधी येतात म्हणून मुंबईकडे आम्ही डोळे लावून बसत असू .

दिवाळीच्या सुट्टीत मी मुंबईला जात असे . जाताना मन मात्र कात्रीत सापडल्यासारखं . काकूला आम्ही मुंबईला आलेले आवडत नसे . द्वेष करायची . आई मात्र बळेबळेच मुंबईला ढकलीत असे . एकतर मुंबईला गेल्यामुळे वर्षभर पुरतील असे एक – दोन कपड्यांचे जोड मिळत असत . शिवाय , पुस्तकांना पैसे . मी गेलो म्हणजे काकू घालून – पाडून बोलत असे . तात्यांना सांगायची , ” हा मोठा झाला म्हणजे काय तोंडात मुतणार आहे काय ? ” मी ह्या जिव्हारी बोलण्यानं दुभंगून जायचो . एकांतात जाऊन मोठ्यानं रडावंसं वाटायचं . आज जेव्हा काकूच्या बोलण्याचा मी विचार करतो , तेव्हा मला तिचा राग येत नाही . आज मी विधवा काकूला आणि तिच्या मुलाला कितीसं बघतोय ? माझ्याच संसाराची भोकं बुजवताना नाकी नऊ येतात . मागच्या पिढ्यांना हे कसं शक्य झालं ? आज सारेच नात्याचे बंध तुटलेत . माझ्या वडिलांत

क्रमशः
स्रोत:(दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)

Leave a Reply