बलुतं..दया पवार(भाग २५)

बलुतं..

आणि तात्यात जो प्रेमाचा धागा शेवटपर्यंत होता , तेवढाही आज माझ्या चुलत भावात आणि माझ्यात नाही . आमच्यात ह्या भिंती कुणी निर्माण केल्या ?

गावच्या मराठ्याबरोबर मी एकदा मुंबईला गेलेलो . ह्याचा मुंबईत कल्हईचा धंदा होता . काय बरं नाव त्याचं ? हं , आठवलं . नाव विठोबा . गळ्यात विठोबाची माळ , कपाळाला गंध , टिळा . मुंबईला परळ इथं संगप्पाच्या चाळीत राहायचा . सारे मराठा गाववाले ह्या भागात राहात असत . हा विठोबा मला मुंबईला कावाखान्यात तात्यांकडे सोडणार असतो . पहाटेच आम्ही संगप्पाच्या चाळीत जातो . तो मला महाराचं पोर म्हणून घरात घेतच नाही . बाहेरच्या नळावरच मी तोंड धुतो . बाहेर चाळीच्या आडोशाला मी बसतो . हळुहळू अंगाला ऊन चटचटा लागत असतं . तिथंच मला ताटात जेवण दिलं जातं . मनात विचार येतो , आता विठोबाची बायको मी वापरलेलं ताट घरात विस्तवानं पोळवील , बाटलं होतं ना ताठ ! खालच्या मानेनं मी जेवत असतो . केव्हा एकदा कावाखान्यात जाईन , असं होतं . मुंबईच्या वाकड्या नळाच्या पाण्यानंही विठोबा बदललेला नसतो , याचं मला नवल वाटत असतं .

कावाखाना तसा खूपच बदललेला. लहानपणी मनावर कोरलेला कावाखाना आठवतो . कावाखान्यात पूर्वी एक मोठा लाकडी दरवाजा होता . एखाद्या किल्ल्यासारखा . दरवाज्याला लोखंडी सुळे . रात्री बंद व्हायचा . आत जाण्या – येण्यासाठी छोटा दरवाजा . ह्या दरवाज्याचा कावाखान्याला खूपच उपयोग व्हायचा . मी लहान असताना हिंदू – मुसलमानांचे अनेक दंगे पाहिलेले . केव्हा केव्हा कर्फ्यू जारी असायची . कुणी बाहेर पडलंच तर कुठून अंधारातून गोळी येईल याचा नेम नसायचा . दंगा झाला की हा दरवाजा सतत बंद . आम्ही लहान मुलं मात्र सारखं आत – बाहेर व्हायचो . आम्हाला सटकन् बाहेर जाता येई . ह्या छोट्या दरवाज्यातून आम्ही टेरिफिक मारामाऱ्या पाहिलेल्या . समोरच्या इराणी हॉटेलातील खुर्च्यांची फेकाफे, बरण्या, सोडा – वॉटरच्या बाटल्यांचा पाऊस . रक्तांचं शिंपण सहज खेळत .

एक ‘ थ्रिल ‘ मारामारी आजही आठवतेय . एका किरकोळ शरीराच्या तरुणाभोवती पाच – सहा गुंडांनी घेराव केलेला . त्यांच्या हाती उघड्या चाकूची लखलखती पाती . वाटलं , आता याचं सहज टेंढाळ फुटेल . क्षणभर सर्वांनीच श्वास रोखून धरलेले . विजेच्या चपळाईनं तो तरुण त्यांची कोंडी फोडतो आणि समोरच उभ्या असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाडीवरील वेताचा लांबसडक चाबूक हाती घेतो आणि सटासट चार – पाच जणांना तो चाबकानं फोडून काढतो . त्यांचे गाल फाटलेले . रक्ताचा सडा खाली शिंपलेला . त्यांच्या हातांतले चाकू जागच्या जागीच राहतात .

अशीच एक घटना , लहानपणाची मनावर कोरलेली . पोटात सुरा भोसकलेला एक माणूस मी पाहिलेला . तो छोट्या दरवाज्यात आत घुसण्याचा प्रयत्न करीत असतानाच कुणी तरी झपाट्यानं येऊन त्याचा कोथळा बाहेर काढलेला . मी तसा खूपच लहान , कुतूहलानं हे सनसनाटी दृश्य पाहत उभा राहिलेलो . एखादी दोरीची गुंडाळी फेकावी तशी त्याची आतडी बाहेर पडताना मी पाहिलेली . मागून कुणी तरी टपली मारली , तेव्हा कुठं मी आत पळालो .

तर काय सांगत होतो ? बदललेला कावाखाना . आता तो दरवाजा नामशेष झालेला , चौकट तेवढी बाकी असते . यहुदी – गोरे गाजरासारखे साहेब आता कावाखान्यात कावा पिताना दिसत नव्हते . इंडियन काळ्या साहेबांनी त्यांची जागा घेतलेली दिसते . ताश किंवा बिलिअर्ड खेळणे हा साहेबांचा हुन्नरी खेळ , म्हणून पूर्वी विलिअर्डचा खेळ चिरीतून पाहणे हा आमचा उद्योग- रंगीबेरंगी गुळगुळीत चेंडू मोठ्या स्टिकनं कसे बाजूला होलमध्ये अलगद सरकवतात , ह्याचं आम्हांला कौतुक वाटायचं . आता ह्या खेळात कुणालाही चान्स मिळे . कावाखान्यात हा जसा वैशिष्ट्यपूर्ण बदल होता , तसा तिथं दारूचा अड्डा , सट्टा – बेटिंग ह्यांनाही ऊत आला होता .

सट्टा – बेटिंगवरून चंदरची आठवण आली . हा चंदर माझ्यापेक्षा वयानं दोन वर्षांनी मोठा असावा . आईच्याच माहेराचा . चवथी – पाचवी शिकलेला ; पण ह्याचं व्यवहारजान अफलातून . घरी विधवा आई , दोन लहान भावंडं . आई बंगल्यात धुणं – भांडी करी ; पण ह्यात कसं भागणार ? परिस्थितीमुळं चंदर सट्टा – बेटिंग घेई . एका मोठ्या बुकीकडे हा कामाला . चंदरच्या हातात सतत पैसा खेळत असायचा . मी मुंबईला आलो म्हणजे तासन् तास ह्याच्याबरोबर फिरायचो . हा स्वत : च्या पैशानं सिनेमा दाखवायचा. हॉटलातील चमचमीत जेवण चारायचा. मी शिकतो आहे म्हणून त्याच्या नजरेत कौतुक तरळायचं .

सट्टा – बेटिंग विशेष कळायचं नाही . पण त्या काळी अमेरिकेतील कॉटन मार्केटमधला भाव फुटला म्हणजे इकडे तो आकडा फुटे , असं काहीसं बोलत . ओपन , क्लोज , मेंढी असे शब्द सारखे कानांवर पडायचे . एका रुपयाला नऊ रुपये मिळत . तोच ओपनचा आकडा क्लोजला फिरवला, तर बरंच घबाड हातात पडे . म्हातारीकोतारी ह्या खेळानं दीनवारलेली .

एकदा चंदर बेटिंग घेताना पकडला जातो . पंचनाम्याच्या वेळी त्यानं पेन्सिल सफाईनं बदलली . कॉपिंग पेन्सिलच्या ऐवजी साधी पेन्सिल पंचनामा करताना ठेवली . कोर्टात त्यानंच स्वत : चा बचाव केला . बेटिंगचे कागद लिहिलेला मजकूर हा त्याने लिहिला नाही हे सिद्ध झालं . असा चलाख डोक्याचा चंदर . आम्हाला त्याच्या बुद्धिमत्तेचं खूपच कौतुक वाटायचं . पुढे हा भिंतीवर आकडे लिहू लागला . भिंत काही कोर्टात नेणं शक्य नव्हतं !

चंदर काही नुसता सट्टा – बेटिंगकरताच प्रसिद्ध नव्हता . त्याच्या हातात जादू होती . बघता बघता हा रंगीबेरंगी खडू आणि कोळसे यांच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी सारी झोपली म्हणजे रस्त्यावर – फूटपाथवर चित्रं काढी . ह्या चित्रांचा पसारा खूपच मोठा असे . इंग्रजी भाषा कळत नव्हती , तरी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा त्याला खूपच हव्यास . त्यामुळं चित्र काढतानासुद्धा इंग्रजी चित्रपटातली हीरो आणि हिरॉईन असायची . केव्हा केव्हा सिनेमांची पोस्टर्स रंगवायला जायचा . हा मोठा चित्रकार होईल असं वाटलं होतं . मी पुढे मुंबईत नोकरीच्या निमित्तानं आलो , तेव्हाची गोष्ट . महाराष्ट्रभर त्या वेळी भीमज्योत फिरविली . ह्या भीमज्योतीच्या समवेत बाबासाहेबांचं एक मोठं तैलचित्र होतं . ते चंदरनं काढलेलं होतं . मीच त्याला पार्टी ऑफिसवर घेऊन गेलो होतो . आज चंदर भेटतो . हातात बारदानाची लांब पिशवी . तीत हातोडा , छिन्नी – करवत इत्यादी सामान असतं . दुकानांची रोलिंग शटर्स दुरुस्त करीत आता हा फिरत असतो . केव्हा केव्हा फोर्ट – कुलाब्यातही भेटतो . आजही मला प्रश्न पडलाय , खरंच चंदरच्या हातातील ‘ हुसेन ‘ हा असा कुणी मारला ? !

चंदरचं लग्न कसं झालं , ह्यालाही इतिहास आहे . कावाखान्यात आमच्याच शेजारीच राहणारी मंजुळा ही चंदरची सासू . मोठी जहांबाज . तिच्या तरुणपणातच नवरा मेलेला . कावाखान्यातील बाकीच्या बायकांबरोबर तीही कागद वेचायला जायची . ही बाई तशी खूपच आक्रमक . विजय तेंडुलकरांच्या ‘ सखाराम बाईंडर ‘ या नाटकात चंपा नावाचं एक पात्र आहे , थोडंफार तसंच व्यक्तिमत्व . बोलणं , चालणं , कुठंही पचकन धुंकणं , हा तिचा खाक्या . कावाखान्यातील पुरुषही तिला वचकून असत . कुणाच्या अंगावर केव्हा धावून जाईल आणि त्याचा शर्ट पकडेल हे सांगता यायचं नाही . तिच्या शिव्याही अफलातून . भांडणाच्या वेळेस ती पुरुषासारखी आक्रमकपणे उभी राही . पदर खोचलेला . हातवारे करीत म्हणायची , “ ये , भाडखाव ! तुझ्या आं….डा….ला धरून धरून मी झुमकुळ खेळंन ! ‘ ‘ किंवा म्हणायची , ” तुहं शे…म…..नं रबरावाणी ताणीन ! ” तिच्या शिव्यांतल्या प्रतिमा ऐकून मी थक्क व्हायचो !

मंजुळाला तीन मुली आणि एक मुलगा . मुलींपैकी एक वयात आलेली . बाकीच्या रोप्या – टोप्या . सर्वात लहान मुलगा . मोठी मुलमी मात्र खूपच गुणी . आईच्या स्वभावाची तिच्यावर सावली पडली नव्हती . ही मुलगी वेगळी होण्याचं कारणही तसं वेगळंच . मी यापूर्वी भोऱ्या विठाबाईबद्दल सांगितलं होतं . तसा हिलाही मुलांचा फारच लळा . लहानपणापासून विठाबाईनं ह्या मुलीचं सर्व काही केलं , विठाबाई तिला खूपच चैनीत ठेवी . विठाबाईच्या घराची स्वच्छता , टापटीप , राहणीमान , त्यामुळं ही पुढं पुढं मंजुळाची वाटतच नसे . रंगानेही ती आईपेक्षा उजळ . याच मुलीशी लग्न करावं अशी चंदरची इच्छा . लहानपणापासून त्यानं हे स्वप्न उरी बाळगलेलं . विठाबाईंचीही तशीच इच्छा होती . पण ती काही तिची सख्खी आई नव्हती . मुलगी वयात आली आणि मंजुळानं कायदा दाखवला . मुलीला स्वत : कडे घेऊन आली . चंदरशी लग्न व्हावं असं तिला मनापासून वाटत नव्हतं . ती म्हणायची , ” ह्याला राहाला नाही घर आन् चावडी – विहाड !

” प्रेमभंगाचं दुःख किती जीवघेणं असतं , त्यामुळे माणूस कसा उद्ध्वस्त होतो , याचं त्या वेळी जवळून दर्शन झालं . चंदर तसा कधी स्वस्थ बसणारा नव्हता . संडासाच्या बाजूला खूपच मोठी बखळ होती . तिथं चाळीतले सर्वच कचरा टाकीत . लहान मुलं संडासाला बसवीत.चंदरनं काय करावं ? चाळीतल्या सर्व लहान – मोठ्या पोरांना कामाला लावलं. स्वत : हाती झाडू घेतला. एक – दोन दिवसांत सारं मैदान लख्ख केलं . एक – दोन महिन्यांत त्यानं तिथं सुंदर बगीचा केला . तिथं गुलाबाचे ताटवे फुलले. मला चांगलं आठवतं, दिवाळीचा दिवस होता . चंदरनं आपल्या दारापुढं दिव्याची रोशणाई केलेली . झिळमिळ्यांच्या पताका केलेल्या . मातीचा किल्ला उभारलेला . सजावटीकरता तो सात – आठ दिवस राबलेला . त्याच्या हातातील कला पाहून आम्ही सारे अचंबा करीत असतो . अशा वेळी त्याला कुठून तरी कळलं की , मंजुळाच्या मोठ्या मुलीची सुपारी फुटली . बातमी ऐकताच तो बेभान झाला . सारी सजावट त्यानं तोडून – फोडून टाकली . पिसाट झालेल्या माणसासारखा बागेत गेला आणि डोळ्यांना सुखावणारी बाग चोळामोळा केली . झाडं उपटली . क्षणात साऱ्या बागेचं मातेरं झालं . हे चंदरचं रूप मला नवं होतं . तसा चंदर स्वभावानं खूपच शांत . हसतमुख . अडल्या – नडल्यांना मदत करणारा . खरंच , त्या रात्री चंदर असा बेभान का बरं झाला ?

पुढे बराच काळ चंदर गप्प होता . विशेष कोणाशी बोलायचा नाही . माणसाच्या जखमेवर बहुधा काळच फुंकर घालत असावा . चंदरचं लक्ष मंजुळाच्या दुसऱ्या मुलीकडं गेलं . ती तशी खूपच लहान होती . असेल दहा – बारा वर्षांची . पुढं दोन – तीन वर्ष त्यानं वाट पाहिली . मंजुळाच्याच मुलीशी लग्न करायचं ही त्याच्या मनात जिद्द होती की काय , कुणास ठाऊक . पण त्यानं आपली जिद्द पुरी केली . मंजुळाच्या दुसऱ्या मुलीबरोबर लग्न झालं . मंजुळाही आता नॉर्मल झाली होती . तिनं लग्नाला विशेष विरोध केला नाही .

विठाबाईची मात्र पुढं खूपच शोकांतिका झाली . मानलेली मुलगी हिसकावून नेण्यामुळं झालेलं दु : ख ती विसरू शकत नव्हती . नवरा वारल्यामुळं पुढं तिचे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले . गाठी काहीच पुंजी नाही . हळुहळू घरातलं फर्निचर , भांडी मारवाड्याच्या दुकानात जाऊ लागली . थोड्याच दिवसांत भरलेलं घर ओकबोकं झालं . चंदर विठाबाईच्याच घरात पूर्वीपासून राहत असे . तो तिची सेवा करू लागला . घासभर अन्न देऊ लागला . विठाबाई मेल्यानंतर एक वेगळाच प्रश्न उपस्थित झाला . ती ज्या दिवशी मेली , त्याच वेळी मोहल्ल्यातील काही मुसलमान जमा झालेले .

क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या आत्मचरित्रातुन)

Leave a Reply