बलुतं…
विठाबाईच्या प्रेतावर त्यांनी अधिकार सांगितला . त्यांपैकी एक तरुण मुसलमान विठाबाईला आई समजत होता . आपल्या बापाबरोबर विठाबाईनं निका लावला होता , ही खळबळजनक माहिती त्यानं वस्तीला दिली . विठाबाई मुसलमान झालीय , हे कावाखान्यात कुणालाच माहीत नव्हतं . विठाबाईचा पेहेराव शेवटपर्यंत तसा हिंदू बाईसारखाच होता . तिनं कधी गोशा वापरला नाही किंवा विजार घातली नाही . बहुधा विठाबाईच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता , त्या काळात विठाबाईनं ही तडजोड तर केली नव्हती ना ? आपल्या बापापाठीमागे आपल्या मानलेल्या आईचा जनाजा उचलणारा तो मुसलमान तरुणही ग्रेट वाटला . विठाबाईचा जनाजा उचलताना माझ्या डोळ्यांच्या कडा मात्र ओलावल्या . विठाबाईनं लहानपणी केलेली माया मी विसरू शकत नव्हतो .
गल्लीच्या एका बाजूला पोलीसचौकी , तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा . तिथं सुंदर गल्लीजवळ महारांची तालीम होती . हा सर्व भाग खूपच बकाल . सुंदर गल्ली तर नावालाच सुंदर . कचऱ्याचे ढीग पडलेले , तर रस्त्यावर सांडपाणी आलेले . तालमीत काही मुले काठ्या – लाठ्या खेळत . सखाराम वस्तादची तालीम म्हणून ती ओळखली जायची . सखाराम वस्ताद तसा काकूचा नातेवाईक . त्याचा ह्या भागात खूपच दबदबा . त्या वेळचं आंबेडकरी चळवळीचं राजकारण चालायचं , ते शाळा – मास्तर आणि ह्या वस्ताद मंडळीवरच . नायगावचा दाजी , कुलाब्याचा बादशहा , तर नागपाड्याचा सखाराम . ही वस्ताद मंडळी तरुणांना संघटित करीत . समता सैनिक – दल काढीत . वादाला कुठूनही तोंड फुटे . कधी सवर्ण विरुद्ध अस्पृश्य झगडा पेटे , तर कधी मुसलमान विरुद्ध अस्पृश्य , असंही स्वरूप यायचं . पण हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दंगल झाली , म्हणजे मुसलमान अस्पृश्यांना हात लावत नसत . ‘ जयभीमवाला ‘ हा परवलीचा शब्द असे .
कामाठीपुऱ्यात झालेली महार – मुसलमानांची दंगल आठवतेय . कशामुळे ही दंगल उसळली ते मात्र आज सांगता येत नाही . पण दंगलीच्या वेळी पाहिलेला सखाराम वस्ताद आठवतोय . डोक्याची गंजी केलेला , उघडाबंब , धिप्पाड शरीरयष्टीचा , हातात शीग घेऊन मुसलमानांच्या मागे लागलेला ; आणि मुसलमान गल्लीतून भेदरून पुढं पळत आहेत , गुरं फाडण्याच्या तळपत्या सुऱ्या त्यांच्या हातातच आहेत , असं दृश्य दिसतं आहे . ह्या तालमीमुळं एक मात्र झालं . मुसलमान मंडळींना दलित स्त्रिया ज्या भाजीपाला वाटत , ते यापुढं थांबलं . ते वचकून राहू लागले .
एकदा तर तालमीतल्या तरुण पोरांनी चक्क पोलिसांबरोबर तुंबळ लढाई केलेली . पोलिसांच्या हाती काठ्या , तर पोरांच्या हाती दगड . पोलिस पुढं आणि पोरं मागं , असं विनोदी दृश्य दिसत असतं . थोड्याच वेळात पिसाळलेले पोलिस गाडी घेऊन येतात . त्यांनी रायफलची फळी सोबत आणलेली . त्यांनी हवेत गोळीबार केला . त्याआधीच पोर वस्तीतून गायब झाली . निःशस्त्र पोरंही पोलिसांशी मुकाबला करू शकतात , हे नवं दर्शन असतं . माझेही बाहू त्या दिवशी फुरफुरले होते .
अस्पृश्य आणि सवर्ण ह्यांच्या दंगलीला काहीही कारण पुरत असे . गणपती विसर्जनाच्या वेळी महारांचा गणपती पुढे जाऊ नये , म्हणूनही मारामाऱ्या होत . असंच दुसरं निमित्त म्हणजे , ‘ पांडवप्रताप ‘ ह्या ग्रंथाची मिरवणूक महार मंडळी काढत . हा प्रकाराला सवर्णाकडून आक्षेप घेतला जायचा . ‘ पांडवप्रताप ‘ ह्या ग्रंथाची पारायणं होतं . आपण पाडवांचे वंशज आहोत , अशा दंतकथाही कानावर पडत . दिल्लीला पांडवांचे सिंहासन आहे -त्यावर जोधळे फेकले तर त्यांच्या लाह्या होतात . एवढं ते इंगळासारखं तापलेलं सिंहासन- त्या सिंहासनावर फक्त बाबासाहेब बसू शकतात , ही अशीच एक दंतकथा मी लहानपणी अनेकदा ऐकलेली .
तर काय सांगत होतो ? सखाराम वस्तादाची तालीम . ह्या वस्तादाची मात्र काकू तात्यांना सतत भीती दाखवायची . वस्ताद हा काकूच्या माहेराचा . तिच्या नात्यातला . पुढे तात्यांच्या वागण्याला काही धरबंदच उरला नव्हता . वडील जेव्हा जिवंत होते , तेव्हा तात्या दारूच्या थेंबाला शिवायचे नाहीत . तालमीत जायचे . काठ्या फिरवायचे . नागड्या दांडपट्ट्याने डोळे बांधून लिंबू सर्रकन् कापायचे . पण वडील वारतात आणि त्यांची ड्यूटी जणू काय ‘ हॅन्डेड ओव्हर – टेकन ओव्हर ‘ होते . पिऊन आले म्हणजे काकूला हमखास बडवायचे . एकदा तर फळीवर लटकावलेल्या कपबश्या धुतलेल्या नव्हत्या , म्हणून साऱ्या कपबश्याच तात्यांनी फोडून टाकल्या काकूला मारलं म्हणजे दोन – तीन दिवस ती रुसून माहेराला जात असे . एकदा तर काकूवरून सखाराम वस्तादाच्या पोरांनी तात्यांना चांगला मार दिला . त्यामुळे ते जादाच प्यायचे . त्यांच्या खिशात नेहमीच पैसे खुळखुळत असत , तात्या संध्याकाळी घरी यायचे तेच मुळी पिऊन . अशा वेळी त्यांच्या खिशातील पैसे काकू लंपास करीत असे . तात्या काकूला बहुधा आवडायचे नाहीत . शिवाय तिचा माहेराकडे फारच ओढा , पैस गेले म्हणजे ते काकूवर संशय घ्यायचे , पण काकू ताकास तूर लागू देत नसे .
एक वेळचा प्रसंग तर कधीच न विसरणारा . तात्या सकाळीच उठतात , बघतात तो खिशातील नोटा गायब . ते स्वत : वर खूपच कावतात , मनस्ताप करून घेतात . नवीन वुलनचा कोट टराटरा फाडतात . त्याच्या बोट – बोट चिंध्या करतात . आम्ही दुरूनच भीतीनं हे सारं पाहत असतो . त्यांना अडविण्याची छाती नसते . ते तिरीमिरीनं उठतात आणि मला चोरबाजारात घेऊन जातात .
चोरबाजारात ते त्या दिवशी फारच चमत्कारिक वागतात . त्यांच्या वागण्याला माझ्या पुस्तकी जगात उत्तर नव्हतं . चोरबाजारात कपड्यांचा व्यापार करणाऱ्या एका गृहस्थाला गाठतात . त्याच्याजवळ असलेल्या उंची वुलनच्या कोटांपैकी एक निवडतात , माझ्या हाती देतात आणि मला डोळ्यानं अशी खूण करतात , की मी सटकावं . मी कणी कातरतो . दूरवर नाक्यावर उभं राहून त्यांची गंमत पाहत असतो . आता ते हमरीतुमरीवर आलेले . आपण कोट घेतलाच नाही , असे हातवारे ते करताना दिसत आहेत . गर्दी जमते . तात्यांना सोडून दिलं जातं . तात्या त्या दिवशी चोरावर मोर झालेले असतात . तात्या खुशीत आलेले . माझ्याकडे मिस्किलपणे पाहत बोलू लागतात , ” बघ , केले की नाही पैसे वसूल ? ” मला त्यांच्या बोलण्याचं हसू येत असतं . अंगावरचा एक कोट फाडून शेवटी त्यांच्या हाती काय बरं मिळालेलं असतं ?
तात्या खूपच भाबडे . मी शिकतो आहे याचा त्यांना कोण अभिमान ! आपल्याला स्वत : ला शिक्षणाची संधी मिळाली नाही याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर तरळायची . पगाराचा दिवस असतो . तात्या नेहमीपेक्षा जादाच झिंगून आलेले . त्यांचा झोक जात असतो . मला ते घराबाहेर काढतात . ” चल , तुला नवीन कापडं घेतो- ” म्हणून सांगतात . मीही हुरळतो . त्या काळी कपड्याचा बाजारहाट करायचा म्हणजे हमखास पिलाहाऊसला जायचं . चकचकीत आयन्यांची दुकानं . डोळे विस्फारून जायचे . असेच आम्ही एका दुकानाची पायरी चढतो . दुकानदाराला भारी कपडे काढण्यास तात्या सांगतात . त्यांची भारी कपड्यांची कल्पना म्हणजे फॅशनबेल कपडे . त्या काळात बुशशर्टवर हत्ती – घोडे चितारलेले असायचे . छातीवर वेगळा रंग , तर हाताला दुसराच . ही कापडं मला आवडायची नाहीत . शिमग्याच्या सोंगासारखी वाटत . मी तसं तात्यांना सांगूनही पाहिलं . ते म्हणाले , ” हे बघ , आता पुढल्या वर्षी तू इंग्रजी शाळेत जाशील . कपडे कसे पाहिजेत ? साहेबावानी गाँटमट करायचं . रुबाबात चालायचं . ” मला हसू फुटत होतं ; पण मी ते आतल्या आत दाबत होतो . खरं म्हणजे निळी पँट आणि पांढरा शर्ट असे कपडे मला हवे असतात . पण तात्यांपुढं कोण सांगणार ? मी नाखूश होऊनच कपडे घेतो . हे कपडे घालून तालुक्याच्या गावी आपण कसे बरे दिसू , ह्या विचारानंच मी बेचैन झालेलो असतो .
कपड्यांचं बंडल काखेत मारून मी तात्यांबरोबर गोलपिठ्याच्या रस्त्यावरून चालत असतो . रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वेश्यांच्या इमारती . काही घरांच्या पहिल्या माळ्यावर नंबराचे लाल दिवे . संध्याकाळची वेळ . धंद्याला अजून सुरुवात नसते . कुणी बाया नुकत्याच झोपेतून उठलेल्या . त्यांचं दात घासणं चाललेलं . काही वेणीफणी करीत दरवाज्यात बसलेल्या . तितक्यात एक बाई तात्यांचं नाव घेऊन हाक मारते . तात्यांना वेश्यांच्या वस्तीत ओळखणारी बाई असावी , याचं मला नवल वाटतं . मी त्या बाईकडे पाहतो . ती लांबसडक केस वाळवीत असते . बाई खूपच काळीसावळी , शरीरानं धुमाळी . कानडी मुलखातली , तिच्या नाकातली चमकी उन्हाच्या तिरिपीबरोबर झळा मारत असते . तात्या तिच्याशी बोलत उभे राहतात . ” हा माझा पुतण्या . गावी शाळेत शिकतोय- ” असं म्हणून माझी ओळख ते करून देतात . बाई माझ्याकडे मायेनं बघते . मी मात्र खूपच ओशाळलेलो . ह्या वस्तीत क्षणभरही उभं राहू नये असं वाटत असतं . तात्या बाईशी बोलत असतानाच मी त्यांना न विचारताच कावाखान्यात निघून येतो .
बऱ्याच वेळानं तात्या घरी येतात . आता त्यांनी पहिल्यापेक्षा जादा घेतलेली असते . आल्याबरोबरच माझ्या नावाचा पुकारा करतात . मला घाण शिव्या देऊ लागतात . म्हणतात , ” भोसडीच्या , तात्या श्यान खायला जातो , म्हंजी तुलाही तिथं न्हील काय ? आईसारखाच मेमटा आहेस ! ” माझ्याबरोबर आईचाही उद्धार होतो . त्यामुळे मी खूपच व्यथित . परिस्थितीनंच आम्हां माय – लेकरांना मेमट बनविलेले . आम्ही कधी भडभडून बोलतच नव्हतो . खाली मान घालून ऐकायचो . त्या दिवशी जिव्हारी लागलेली जखम पुढं बराच काळ मनात रेंगाळत राहिलेली . मुंबईला सुट्टीत येणंच सोडलं . तात्या मरेपर्यंत मी हे व्रत पाळलं . तात्या गेले तेव्हा मी त्यांच्या प्रेतयात्रेला हजर होतो , पण मनातली ठसठस तेव्हाही विसरू शकत नव्हतो .
कावाखान्यात गोलपिठ्याची एखादी वेश्या आणणं ह्यात तसं कुणालाच चमत्कारिक वाटत नसे . एक इसम तर आपल्या तरण्याताठ्या बायकोला घराबाहेर काढत असे आणि घरात वेश्येबरोबर गुलगुल बोलत असे . ही वेश्याही येताना त्याच्या मुलांना खाऊ , नवे कपडे घेऊन यायची , हा पायंडा मोडला तो तात्यांनी . त्यांनी एकदा चक्क हिजडा घरी आणला . अर्थात हा हिजडा खूपच देखणा . बाईसारखे हावभाव करायचा . निरखून पाहिल्याशिवाय कळायचं नाही की हा हिजडा आहे म्हणून ! तात्यांना काकू बरीच छळते , त्यांना रात्रीचं हात लावू देत नाही म्हणून तात्यांना सारेच सहानुभूती दाखवीत . काकू मात्र वरून खूपच शांत दिसायची . ती असं काही असलं म्हणजे सरळ फूटपाथला जाऊन बसायची .
माझाही एकदा हिजड्याशी संबंध आला , तो मात्र वेगळ्या कारणामुळं . हा माझ्या नात्यानं दूरचा तात्याच . सहादवा त्याचं नाव . माझ्याच गावचा . मुंबईला गिरणीत नोकरीला होता . धोतर – सदरा घालायचा , पण हावभाव मात्र बायकी . रंगात आला म्हणजे टाळी पिटायचा . तो एकदा पुतण्याला भेटायला कावाखान्यात आला . मारुतीचा पोरगा किती मोठा झाला म्हणून माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला ; ” सिनेमाला चल ” म्हणून हट्ट धरून बसला . मी त्याच्याबरोबर जाण्यास संकोचत होता . आजीनंही मी त्याच्याबरोबर जावं म्हणून हेका धरला . मी त्याच्याबरोबर बाहेर पडलो तेव्हा ‘ आपल्याला कुणी पाहत नाही ना ‘ ह्याचा शोध घेतला . रस्त्यानं आम्हा दोघांकडे पादचारी संशयानं पाहत होते . त्यामुळे मी ओशाळत होतो .
त्या दिवशी पिलाहाउसलाच कोणत्या तरी बकाल थेटरात आम्ही सिनेमा पाहिला . वरची तिकिटं काढली होती . पिक्चरमध्ये माझं मन रमत नव्हतं . केव्हा तात्याच्या
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)
