बलुतं.दया पवार.(भाग २७)

बलुतं.

कचाट्यातून सुटतो , असं झालेलं . सिनेमा सुटल्यावर सहादबा मला हॉटेलात नेऊन छान छान केक खायला घालतो . गोलपिठ्यातून घराच्या दिशेनं येत असताना सहादबाला एक आठवण झाली . म्हणाला , ” अरे , तुझी मावशी जमना तुला आठवतेय काय ? ती इथंच असते . चल , तिला भेटायला जाऊ . ” वेश्यांच्या गल्लीत कुणी माझी मावशी आहे , याची जाणीव मला स्वप्नातही नसते . आईनंही कधी सांगितलेलं आठवत नाही . वाघाचे लोखंडी पिंजरे असावेत , तसे गोलपिठ्यात दोन्ही बाजूंना पिंजरे असतात . पिंजऱ्यापाठीमागे अर्धनग्न स्त्रिया . काहींनी लांडे झगे घातलेले . त्यांच्या पुष्ट मांड्या प्रेक्षकांच्या वासना चाळवत होत्या . पिंजऱ्यातील भुकेल्या वाघांनी मांसखंडाची वाट पाहावी , तसं हे दृश्य माझ्या मनावर कोरलेलं . अशाच एका पिंजऱ्यात सहादबा मला घेऊन गेलेला .

वेश्येच्या घराची पायरी चढण्याचा हा माझा आयुष्यातील पहिला प्रसंग . दहा बाय बाराची रूम असते . मध्ये कापडी पडदे टाकलेले. भिंतीला यल्लामाचा देव्हारा . पैसे टाकण्याचा लाकडी गल्ला . भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो पाहून मला अचंबा वाटलेला . सहादबा एका सडपातळ गोऱ्यापान बाईशी माझी ओळख करून देतो . ती जमना असते . मूळचा गोरा रंग पिवळा पडलेला , तिच्या अंगावर उंची साडी असते , हाताची नखं रंगवलेली . चेहऱ्यावर जादाच मेकअप . जमुना तशी खूपच आकर्षक वाटते . मी सखूचा मुलगा , हे ऐकून तिचे डोळे पाण्यानं भरतात . ती मला मायेनं कुरवाळते . बाहेरवाल्याला बोलावून थंड पेय पाजते , दुसऱ्या दिवशी जमना बोलावते . ” तुला छान कपडे घेते ” असं आश्वासन देते . जाताना , काही नोटा माझ्या हातात कोंबते . मला त्या नाकाराव्याशा वाटत नाहीत . मी बाहेर पडतो , तेव्हा सहादबाला जमनाबद्दल खोदून विचारतो . तो सांगतो , “ अरे , ही तुझ्या आईची दुधबहीण . आई एक आणि बाप दोन . ” ” मग ही इथं का ? ” ह्यावर सहादबा जे सांगतो , त्यामुळं मी अंतर्मुख झालेलो . जमना जवळच तंबूच्या माडीत नवऱ्याबरोबर राहत होती , तिच्या देखणेपणामुळं नवरा तिच्यावर सारखा इसळायचा . तिला मारझोड करायचा . शेवटी त्यानंच तिला इथं आणून विकलं . स्वत : ची बायको नवरा विकतो आहे , हे मला खरंच वाटत नाही .

दुसऱ्या दिवशी मी जमनाच्या पिंजऱ्यात एकटाच जातो . जाऊ की नको ह्याबद्दल रात्रभर मनात घालमेल चालू असते . जमनामावशीबद्दल एकदम वाटलेली आपुलकी , की नवे कपडे मिळणार याचं आकर्षण -ह्यापैकी कोणतं वरचढ झालं हे सांगता येत नाही . पण मी दुसऱ्या दिवशी गेलो हे मात्र खरं . जमनानं मला त्या दिवशी छान छान कपडे घेतले , घोडागाडीतून दूरवर फिरवलं . ” पुन्हा कधी सुट्टीत आलास , तर नक्की मावशीकडे ये . ” हे सांगायला विसरली नाही . जमनामावशीचा पुढच्या आयुष्यात कधी शोध घ्यावासं मात्र वाटलं नाही . तिनं दिलेल्या कपड्यांविषयी मी गावी गेलो तेव्हा आईलासुद्धा सांगितलं नाही . आईला काय वाटेल , याचीच भीती मला होती . तिच्या संदर्भात बातम्या मात्र कानावर येत , तिनं धंदा सोडलाय , रस्त्यात भीक मागतेय , तिला वेड लागलंय , अशा कितीतरी वेगवेगळ्या .

अगदी अलीकडची गोष्ट . झाली असतील दोन – तीन वर्षे . मी दादरच्या पुलाखालून चाललेलो . माझ्या सोबत काही बडी लेखक मित्रमंडळी . पुलाखाली फारच मोठा भिकाऱ्यांचा घोळका . काहींनी तात्पुरती पालं उभारलेली . त्या भिकाऱ्यांच्या घोळक्यात दीनवाणी मुद्रेची , लक्तर फाटलेली , झिंज्या सोडलेली -अशा अवस्थेत मी जमनाला ओळखतो . जमनाच ती . तिनंही एवढ्या वर्षांनी मला ओळखलेलं असतं . ती एकटक माझ्याकडे बघत असते . मी पुन्हा पुन्हा मागं वळून पाहत असतो . तिची नजर आजही माझा पिच्छा पुरवतेय . तिच्याशी साधा संवादही मी करू शकलो नव्हतो . वाटलं , ह्या टेरिलीनच्या कपड्यात आपण किती पांढरपेशे झालोय ! भोवतालच्या मित्रांना काय सांगावं , हाही प्रश्न असेल . आणि समजा , जमनाशी बोललोच आणि तिला घेऊन घरी गेलो , तर आपली सुशिक्षित बायको तिला घरात घेईल काय ? बायको तर दिवसातून चार – पाच वेळा घर धुते , आरशासारखं चकचकीत करते , आणि जमना तर ही अशी ! अंगावर खंडीभर मळ .

त्या रात्री चांगली झोप काही येऊ शकली नाही . जमनामावशीची नजर तीक्ष्ण बाणासारखी अंधारातही काळीज चिरीत जात आहे .

पुढं नंतर मावसभाऊ भेटला . त्यानं जमनाबद्दल आश्चर्यकारक माहिती दिली .

” अरे , जमना मरणाच्या टायमाला गावी आली . “

आपलं माहेर तिनं कसं बरं शोधून काढलं ? जमना वेडी कशी ? मावसभाऊ सांगत असतो , काकानंच तिला मूठमाती दिली . अर्थात भाऊबंदांना दिवस घालण्यास मावसभाऊ विसरला नव्हता .

मुंबईच्या मुक्कामात गाववाले हमखास भेटत . त्यांपैकी जादा लळा लागला तो आंबू आणि सदाशिवचा . तसे हे माझ्यापेक्षा वयानं चार – पाच वर्षांनी वडील . मुंबईला नोकरीला असत , पण मला बरोबरीच्या नात्यानं वागवीत . ते गमतीनं मला गोलपिठ्यात फिरायला नेत . मी चिडत असे . त्या वयातही मी म्हणे , ” ताडीच्या झाडाखाली बसलं तरी लोक म्हणतात , ताडीच प्याला . ” ह्यावर ते खळाळून हसत . आंबू आणि सदाशिव ह्यांत तशी दोन टोकं . आंबू हा खेतरीसारखा हसवत राहायचा , तर सदाशिव धीर – गंभीर . जे बोलेल , ते सिरीयस . दोघांची जोडी मात्र अतूट होती . आंबू हा दिसायला देखणा ; राहायचा छान , तसा सहीचा आंगठा करायचा ; पण बोलायला लागला म्हणजे भल्याभल्यांना गुंगवायचा . तो जाहीर नकला करीत असे . अर्थात छंद म्हणून . त्याचा एकपात्री कार्यक्रम खूपच रंगत असे . त्याची पेटण्ट अशी कोकणी बाल्याची नक्कल जयंतीत खूपच गाजलेली .

आंबू काकूकडेच खानावळी होता . सकाळी कामाला निघाला म्हणजे चहाची खूपच तारीफ करायचा . म्हणायचा , ” काय पारबताबाय तुझ्या हाताचा चहा ! कंपनीच्या गेटपर्यंत जिभेवर चहाची चव असते ! ” याचा अर्थ घरात समजला जायचा . असं ह्याचं उपरोधिक बोलणं . त्याच्या वागण्या – बोलण्यात नुसतं चैतन्यं सळसळायचं . ह्याचं चैतन्यं एकाएकी थांबलं . आंबूला टीबीनं ग्रासलं . सुरुवातीला त्यानं हा रोग दडवून ठेवला . त्याच्या खोकण्यामुळं आणि चिपाड होऊ लागलेल्या शरीरामुळे त्याचा रोग सर्वांच्या ध्यानी आला . आपलं लग्न झालं नाही ; आपण आता एकाच बांबूवर जाणार , ह्याचंच दुःख त्याच्या चेहऱ्यावर उमटायचं .

पुढं त्याची एक सोडून दोन लग्न झाली . शेवटच्या बायकोनं मरेपर्यंत त्याची सेवा केली . आता मरणाच्या भीतीनं त्याचा चेहरा कमालीचा ग्रासलेला . त्याचं हसणं – खिदळणं , विनोदी संवाद , सारं सारं मावळलं . मृत्यूची भेसूर छाया त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली . त्याच्याकडे पाहवत नसे . मी गावी असताना त्याच्या मृत्यूची बातमी धडकते . मृत्यूचं थैमान तसं मी लहानपणापासून पाहिलेलं . पण त्या दिवशी आंबूचं मरण खूपच चटका लावून गेलं . त्याला मरावंसं वाटत नव्हतं आणि मरणाचे पाश तर त्याच्याभोवती आवळले जात होते . ह्या कात्रीत तो शेवटपर्यंत दिसत होता .

सदाशिवची शोकांतिका झाली , ती मात्र राजकारणानं . मुंबईला येण्यापूर्वीचा सदाशिव आठवतोय . चक्क नांगऱ्या होता . गुडघाभर धोतर , बंडी ह्या पेहेरावात शेतात राबत असे . त्याचे जवळचे नातेवाईक गावी येतात आणि त्याला मुंबईला घेऊन जातात . त्याला मुंबईत ट्रॅम कंपनीत ते चिकटवतात . सहावी – सातवी शिकलेला सदाशिव मुंबईच्या वाकड्या नळानं मात्र बदलतो . त्यानंतर गावी यायचा तेव्हा त्याचा रुबाब पाहून आम्ही दिपून जायचो . पांढरेशुभ्र बगळ्यासारखे कपडे , केस फिरवलेले , हातात कसलं तरी पुस्तक . तो आम्हांला मुंबईच्या खूप गमती सांगे . आता त्याची भाषा कमालीची शुद्ध वाटायची . दिसायला काळासावळा असला तरी खूपच रेखीव होता . शिवाजीची भूमिका सहज करील , असा .

सुरुवातीला हौशी नाटकमंडळ काढून नाटकं बसविणं हा त्याचा आवडीचा छंद . कामाठीपुरा येथील केंद्रात ह्या नाटकाच्या तालमी चालत . त्यांनी ‘ आजोबा ‘ नावाचं नाटक बसवलेलं आठवतं . तालमी चालू असताना मीही जात असे . नाटकातली नटी म्हणून गिरगावामधील ब्राह्मणाची एक देखणी मुलगी यायची . अशा हौशी मंडळीत नटीशी बोलायला मिळावं म्हणून खूपच स्पर्धा चाले . नटीच्या घरी जाऊन नटीला टॅक्सीतून आणणं हे त्यांना ‘ थ्रिल ‘ वाटायचं .

नाटकात काम करणारा एक कलावंत आठवतोय . त्याचा एक दात सोन्याचा होता . लग्न झालेलं ; पण नटीकरता हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार . तिला साड्या – चोळ्या पुरवायचा , म्हणतात . ह्या नट्या तशा वस्ताद . हात लावू द्यायच्या नाहीत . ही माणसं मात्र नुसती वासात दंग , हलवायाचं कुत्रं असतं , तशी . सदाशिव मात्र वेगळा होता . त्याला नाटकाचं मनापासून वेड . तालीम चालू असताना नटीला जातीचा अहंकार जागा झालेला . म्हणाली , ” काय हे तुमचे उच्चार ! वोलूनचालून महारच तुम्ही ! नाही सुधारायचे ! ” झालं . सदाशिव नटीवर कमालीचा भडकला . तो त्याच लयीत म्हणाला , ” बाई , भाषेचा एवढा अभिमान वाटतो , मग महारांच्या पोरांत चाळ बांधून नाचायला का येता ? ” बाईला हा वर्मी घाव होता . ती मुळूमुळू रडायला लागली . तिच्या नाकाचा शेंडा , गोबरे गाल लाल झालेले दिसले ,

सदाशिव युनियनच्या कार्याकडे कसा ओढला गेला , हे सांगता यायचं नाही . पण स्वस्थ बसणं हे त्याच्या स्वभावात नव्हतं . कुलाब्याला बस कंपनीच्या गेटपाशी त्याची भाषणं झडू लागली . बी.ई.एस.टी.च्या संपात त्याची नोकरी गेली . सदाशिव रस्त्यावर आला . त्यानं आपलं चंबुगबाळं आवरलं आणि तो पुन्हा गावाकडे आला . आता तो तालुक्याच्या राजकारणात भाग घेऊ लागला . गावात त्याला गावकरी’आमदार ‘ म्हणून संबोधित . खरं म्हणजे तो केव्हाही निवडून आला नव्हता . त्याला लोकांनीच ही पदवी बहाल केली . कुणाला तगाई काढण्यास मदत कर , कुणा नवरा – बायकोचं भांडण मिटव , एखाद्या वेळी कचेरीवर मोर्चा काढ- अशी त्याची कामं सुरू झाली . गावकरी आपल्याला सन्मानानं वागवितात , घरात नेतात , बसवतात , चहा पाजतात ; पण महारवाड्यातील इतरांना तुच्छतेनं वागवितात , ही खंत त्याच्या मनात सतत असायची .

एकदा त्यानं गावात धमाल केली . रामनवमीला गावात मोठी यात्रा भरायची . साऱ्यांना चुलबंद आवतण दिलेलं . सदाशिव म्हणाला , ” आम्हांला तुमची पंगत फुकट नको . महारवाड्याचीही वर्गणी घ्या . ” महारवाड्यातून वर्गणी गोळा केली जाते . संध्याकाळी मारुतीच्या देवळासमोर पंगती बसतात . महारांना पंगतीत बोलावलं जात नाही . सदाशिवचा पारा चढतो . त्यानं काय करावं ? धोतर खोचलं आणि जेवण वाढायला तो धावला . बाकीच्या मराठा तरुणांनी त्याला अडवलं . म्हणाले , ” अरे , ही म्हातारी खोडं काही ऐकत नाहीत . साऱ्या अन्नाचा नास हाईल . ” सदाशिव ऐकावयास तयार नाही . शेवटी त्याला कोंडून ठेवण्यात आलं . पंगती उठल्यावर त्याला घेऊन बाकीचे तरुण एकत्र जेवायला तयार झाले ; पण आपला घोर अपमान झालाय , असं म्हणून त्यानं जेवण नाकारलं . त्या रात्री महारवाड्यातून कोणीच जेवायला गेलं नाही .

तालुक्यात सदाशिव हा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता . काही काळानंतर काँग्रेस..

क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading