बलुतं..
” रिपब्लिकन युती घडलेली . अशा वेळी झेडपीची निवडणूक आली . काँग्रेस मंडळी सदाशिवची मागणी करीत होते . पण जिल्ह्यातील रिपब्लिकन नेतृत्वाला हे मान्य नव्हतं . सदाशिवला तिकीट नाकारलं गेलं . असा हा सदाशिव राजकारणातही सडला गेला . एक तर सदाशिव फटकळ . कुणाचं धोतर धरावं असा त्याचा स्वभाव नाही . तसं त्याचं कर्तृत्व अफाट . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राच्या मान्यवर पुढारी मंडळींबरोबर त्यानं जाहीर सभा केलेल्या . त्याच्या पडझडीच्या काळात हे आठवतं . यानंतर सदाशिव दुभंगत गेलेला . तिकीट नाकारल्यानं त्याला मनस्वी दुःख झालं होतं . तो नेहमी उपल्याची गोष्ट सांगायचा :
” अरे , वानरांच्या टोळीत उपल्या असतो . तो जन्माला आलेला नर खातो आणि माद्या जिवंत ठेवतो . आपल्याला कुणी प्रतिस्पर्धी होऊ नये , म्हणून तो ही काळजी घेतो . असंच असतं राजकारण .
तो उपल्या कोणाला म्हणतोय हे आम्हाला कळायचं .
पुढं सदाशिव तमाशात गेला . दैनंदिन जगणं त्याला अवघड होत गेलेलं . फाके पडू लागले . त्यात वाढता संसार . त्यामुळे त्यानं तमाशा धुंडाळला . तमाशात तो मॅनेजर होता . अर्थात मॅनेजर म्हणजे पडेल ते काम करायचं .
दादू मारुती इंदुरीकरांच्या तमाशात तो होता . एकदा त्यानं घरी येऊन ‘ गाढवाच्या लग्ना’चे खास निमंत्रण दिलेलं . मी लालबागच्या थिएटरावर जातो . संगीत बाऱ्या संपलेल्या असतात . घाईत कोठून तरी सदाशिव उपटतो . माझी पहिल्या रांगेत सोय करून देतो . ‘ गाढवाचं लग्न ‘ ह्या वगनाट्याला सुरुवात होते . इंदुरीकर सावळ्या कुंभाराच्या भूमिकेत हास्याचे भुईनळे उडवीत होते . त्यानंतर स्टेजवर काही गाढवं आणली जातात . माणसंच ओणवी होऊन गाढवाचे पार्ट करीत . दृश्य पाहून मी हादरतो . त्यात एका गाढवाचं काम सदाशिवनं केलेलं . साऱ्या नाटकभर ओणवा उभा . संवाद नाहीत . ज्याची जीभ तलवारीच्या पात्यासारखी चालणारी , त्याची वाचाच वंद ! खरंच , सदाशिवला काय वाटत असेल ? मी फार वेळ वग पाहू शकत नाही . सारखी सदाशिवाची अवस्था जाळीत असते . मी बाहेर येऊन उभा राहतो . सदाशिव काम संपल्यावर बाहेर येतो . समोरच्या हॉटेलात नेतो . आता तो माझ्याशी तमासगिरांच्या होत असलेल्या शोषणाबद्दल पोटतिडिकेनं बोलत असतो . काँट्रॅक्टर ह्यांना उसाच्या चिपाडासारखे पिळतात . यांच्या कलेवर इमले उठवतात . हे ऐकून मला आश्चर्य वाटत असतं . तमासगिरांची युनियन बांधण्याचं स्वप्न तो मला सांगतो . आजही सदाशिव तमाशातच आहे . त्याचं स्वप्न साकार झालेलं नाही . पण भेटला म्हणजे नेहमीच्याच उत्साहानं बोलत असतो . त्याचा वयात आलेला शरद हा मुलगा ह्या समाजव्यवस्थेत खलास झालाय . सुरुवातीला तोही पँथरच्या तरुण नेत्यांच्या बॅगा वागवायचा . बॉडीगार्ड म्हणून काम करायचा . आज त्याच्याही जीवनाचं मातरं झालं . दोघा बापलेकांची अवस्था सारखीच का बरं व्हावी , हे कोडं मला उकलत नाही .
ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात फार महत्त्वाची . ह्यांना वेगळं काढून माझं व्यक्तिमत्व उभंच राहत नाही . पाण्यावर तेलाचा तवंग असावा ना , तसे हे माझ्या जीवनावर पसरलेले … चंदर , आंबू किंवा सदाशिव काय – हे माझे पुस्तकी जगाबाहेरच्या जगातील मार्गदर्शकच होते . ह्यांच्या जगावेगळ्या विद्यापीठातच मी बरंच काही शिकलो . याचा माझ्यावर खोलवर परिणाम झालाय . ,
ह्यांचा जसा माझ्यावर परिणाम झाला , तसाच अगदी उलट दिशेनं दादासाहेबांचा झाला . त्यांच्यासारखं सार्वजनिक जीवनात चमकावं , भाषणं करावीत …. सामाजिक प्रश्नावरच्या आंबेडकरी प्रेरणा मिळाल्या त्या त्यांच्यामुळे . वसतिगृहातील आमच्या वयाच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श पुढे ठेवावासा वाटायचा . दादासाहेब वसतिगृहात यायचे . अर्थात , मी हे कोळी बोर्डिंगबद्दल सांगत नाही . पुढं भेटलेल्या सिद्धार्थ वसतिगृहाबद्दल सांगतोय . तिथं ते मुलांत मिसळायचे . मुलांबरोबर मूलच होत . गायचे , ढोलकी वाजवायचे . एखादे वेळी रंगात आले म्हणजे चावट विनोद सांगावचे . त्यांच्या विनोदात अस्सल महारी बाज होता . आम्ही तेव्हा बेंबीच्या देठापासून गदगदून हसायचो . दादासाहेब गात असलेलं गीत अजूनही आठवतंय- ” कार्य करा रे , तरुणांनो ! सत्याचा मार्ग धरा रे ! शूर मावळ्यांची जमवून सेना , बाजी आणि ताना मनी आठवा रे ! ” दादासाहेब हे गीत गात असताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहायचे . दादासाहेबांच्या खाजगी जीवनाचंही आम्हा मुलांना खूप आकर्षण वाटायचं . त्यांची बायको देखणी , गोरीपान , घाऱ्या डोळ्यांची , सदाशिव पेठेतील असावी अशी . आपल्यालाही अशीच बायको असावी , अशी सुप्त इच्छा मनात बळावलेली .
सातवीच्या परीक्षेला त्या काळी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागे . परीक्षेला अहमदनगर इथं गेलो . गावची मराठ्याची मुलं शेतकरी बोर्डिंगात उतरलेली , तर मी पार्टी ऑफिसात . जाताना अंगावर धड़ कपडे नव्हते . आईला गाडीखर्चाकरिता अनेकांकडे तोंड वेगाडावं लागलं होतं . त्या वेळी माझ्या अंगात चमत्कारिक बुशशर्ट होता . त्याची बटणं खांद्यावर . भडक , झिळमिळीत कापड . आजीनं तो गाववाल्याच्या हाती पाठविलेला . बहुधा तिला बंगल्यातील कुणा तरी श्रीमंत मडमेनं दिलेला . मी जाताना तसा मनातून ओशाळलेलो . पार्टी – ऑफिसमध्ये सावळेमामा नावाचे गृहस्थ पाहिले . साधे मराठी शाळेचे मास्तर . पण सकाळीच उठून ‘ टाइम्स ‘ आणि डिक्शरी घेऊन बसायचे . कधी इंग्रजी शाळेत गेलेले नाहीत . डिक्शनरी पाहूनच त्यांनी इंग्रजीचं ज्ञान मिळवलेलं . पुढे ते एम.ए. झाले . त्यांचा मुलगा आणि ते एकत्रच कॉलेजात जात . बराच काळ ते एका हायस्कूलचे हेडमास्तर होते . मामांची जिद्द पाहून त्या लहानवयातही मी भारावून गेलो होतो .
पार्टी – ऑफिस मुसलमानांच्या वस्तीत होतं . पहिल्या दिवशी एक गंडांतर आलेलं . सकाळी गच्चीत दात घासत मी उभा . खाली काही हिजड्यांचा घोळका . मला काय लहर आली कुणास ठाऊक ! मी शेजारच्या मुलाला हिजड्यांबद्दल काहीबाही सांगत होतो . एका हिजड्याचं माझ्याकडं लक्ष गेलं . तो हिजडा खवळला , “ साले , धेडके बच्चे ! माटीमिले … . ” अशा शिव्या देऊ लागला . पार्टीचे कार्यकर्ते आमच्यावरच वैतागले . आपलं काय चुकलं , हे मात्र कळू शकलं नाही . बेचैनीतच पेपर लिहिले . पुढं परीक्षा झाल्यावर नगर पालथं घातलं . मोठं खेडं वाटलं . पंडित नेहरूना स्थानबद्ध केलेला किल्ला पाहिला . पण ह्या किल्ल्यापेक्षा आवडून जातो तो चांदबिबीचा महाल . चांदबिबीचा महाल ते नगर असा त्या काळी भुयारातून रस्ता होता , म्हणतात . इतिहासाच्या पुस्तकात पाहिलेली चांदबिबी त्या रस्त्यानं घोडा उडवीत जाते आहे , असंच दृश्य दिसत होतं .
तसा माझा स्वभाव खूपच सोशिक . सारा मान – अपमान मुक्या मनानं गिळायची सवय लागलेली . पण पुढं पुढं मधूनच माझा खोडकर स्वभाव जागा व्हायचा . शिक्षणामुळं हे असेल . त्यामुळं खूपदा गोंधळ उडायचा . आपण तसं बोललोच कसं , ह्याचाच संभ्रम पडायचा . असाच एकदा राजूर ह्या गावी जनावरांचे प्रदर्शन पाह्यला गेलेलो . संध्याकाळच्या वेळी तिथल्या मराठी शाळा पाहण्यास गेलो . मुलं बहुधा रात्री अभ्यासाला जमत असावीत . शिक्षक नसल्यामुळं मुलांचा प्रचंड गोंधळ . आपसात हाणामाऱ्या करीत होती . सोबत माझा मित्र होता . मी थोडं मोठ्यानंच बोललो , ” वा ! काय शाळेची शिस्त ! ” झालं . पोरांनी आपसातील भांडण सोडलं आणि माझ्याकडे मोर्चा वळवला . माझा मित्र पळून गेला होता . त्या रात्री सर्व पोरांनी मिळून मला चांगलं चिखलासारख तुडवलं होतं .
दुसरा प्रसंग तर अंगावर शहारे आणणारा . त्यावेळी इंग्रजी शाळेत शिकत होतो . शहरात तेव्हा दोन प्रसिद्ध दादा मंडळी होती . बबन आणि सावजी . त्यांचा गावावर फारच वचक . त्यांचा अफू – गांज्याचा होलसेल बिझिनेस होता , म्हणतात . शहरातल्या काँग्रेसच्या राजकारणावरही यांचीच पकड . त्यांपैकी एक खूपच देखणा , गोरापान , राजबिंडा . एखादा कुस्तीगीर हौद्यात उतरावा तसा रस्त्यानं चालायचा . राजपुत्राचा पेहेराव करून ह्यांनी काश्मीरमध्ये धनिकांना गंडा घातला , ही गोष्ट नेहमी चर्चिली जाई . दुसरा खूपच शिडशिडीत . पण विरोळ्यासारखा चपळ . ह्यांची जोडगोळी रस्त्यानं चालली , म्हणजे झाडावरचा कावळाही शिटायचा . त्यावेळी आम्ही म्हणजे तशी त्यांच्यापुढं चिमुरडी पोरं . नाक्यावर गप्पा मारत आम्ही उभे असतो . सोबत गावातील सवर्ण मुलं . अशा वेळी गप्पांचं सूत्र माझ्याच हाती असायचं . अनेक अनुभवांच्या चमत्कारिक पुड्या माझ्यापाशी . बाकीची मुलं म्हणजे मध्यमवर्गीय , शामळू . त्या दिवशी ते दोघे दादा आपल्या मोटारीतून सत्याने चाललेले . गर्दीमुळं मोटार आपल्यापाशी रेंगाळते . सारी मुलं घाबरतात . मी त्यांना ऐकू जाईल अशी एक शिवी सणकन देतो . झालं . पोरं घाबरतात . त्या दिवशी मला हा धीर कुणी दिला , कुणास ठाऊक . दादा आता गाडीतून खाली उतरलेला . सारं शहर आपल्याला चळचळा कापतंय आणि हे कालचं पोर शिवी देतंय , म्हणजे काय ? आता आपली धडगत नाही . क्षणभर पायाखालची जमीन सरकते . पडेल तो मार खाण्याची मी तयारी ठेवतो . पळून जावंसं वाटत नाही . पण त्या दिवशी माझा मार वाचतो . मी ज्या पोरांबरोबर गप्पा मारत उभा असतो , ती सारी थोरामोठ्यांची मुलं असतात आणि त्यांच्या पालकांना ही दादा मंडळी ओळखत असतात !
असाच माझ्या जिभलीचा प्रताप आठवतोय . अर्थात तो घडला मात्र मुंबईला . चांगला घोडा होतो ; एस.एस.सी. पास झालेला . मुंबईत सदाशिवच्या एका नातेवाईक मुलीचं लग्न होतं . मुलगी काळीसावळी . तोंडावर देवीचे व्रण असलेली . मुलगा मात्र चांगला गोरापान मिळालेला . लग्नाचं वऱ्हाड येतं , तेव्हा लक्षात येतं , की नवऱ्या मुलाचा धाक भाऊ हा माझ्याच शाळेत होता . हायस्कुलात . आम्ही सर्व अर्थात मुलीच्या बाजूनं . थोडंफार पडेल ते काम करणारे . वऱ्हाड आल्यापासून एक गोष्ट लक्षात आलेली – नवरदेवाचा भाऊ हा जादा भाव खातो आहे . सारखा मुलींच्या घोळक्यात . लग्न लागलं . जेवणं आटोपतात . आता सारं व – हाड कोंडाळ करून आपसांत गप्पा मारीत असतं . लग्नाचं स्टेज रिकाम . त्यावर माइक ठेवलेला . मी लगेच स्टेजवर चढतो . माइक हाती घेतो आणि वऱ्हाडाला उद्देशून बोलू लागतो :
” बंधु – भगिनींनो ! आज मी तुम्हांला नवरदेवाच्या भावाची ओळख करून देत . ” आणि मग मी भाषणात नवरदेवाच्या भावासंबंधानं शाळेत झालेला एक किस्सा सांगतो : ” प्रार्थनेची वेळ असते . सारी मुलं – मुली रांगेत उभी . त्याच वेळी चित्रविचित्र चित्रं असलेला बुश शर्ट अंगात घालून धावत – पळत नवरदेवाचा भाऊ प्रार्थनच्या ठिकाणी येतो . संगमनेरसारख्या ठिकाणी असा पेहेराव मुलामुलींना विदूषकासारखा वाटतो . ते हसत असतात . प्रार्थनेच्या वेळी व्यत्यय आला , म्हणून प्रिन्सिपॉल त्याला रागानं बाहेर काढतात . वर्गात जाण्यास फर्मावतात . अशा वेळी घाबरलेल्या अवस्थेत तो पळतच वर्गाच्या दिशेने जाऊन लागतो . खाली फरशी असते . सर्वांसमोर तो घसरतो . पुस्तकं सैरभैर होतात . पुन्हा मुला – मुलींना हसण्याची उकळी फुटते … ” हे सारं व – हाडाला मी माइकवरून सांगत असतो आणि सारं वऱ्हाड खो खो हसत असतं . त्यांना तो सारा प्रकार करमणुकीसारखा वाटतो आहे . गंमत म्हणजे त्या विनोदात नवऱ्याकडचंही व – हाड सामील झालेलं .
त्या दिवशी त्या मुलाच्या मन : स्थितीची कल्पना मला येत नाही . त्याच्याकडे आहे …
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)
