बलुतं..
संगमनेरात जमलं होतं . ते सकाळ – संध्याकाळ तेथे जाऊन चकाट्या पिटीत . त्यांचे नवीन होणारे सोयरे हे जवळच्याच डाकबंगल्याच्या आउटहाउसमध्ये राहत होते . त्यांचा पोराबाळांचा बराच बाडदाना . मास्तरांच्या हुकमावरून वसतिगृहाचा माल त्यांच्या घरी जाऊ लागला . मास्तर तसे वयानं उतरलेले आणि मुलगी तरुण . त्यामुळं मास्तरांचा हात जास्तच दिलदार होऊ लागला . एकदा असंच मागील दारानं सोयऱ्याच्या बायकोला टॉवेलात पीठ नेताना एका मुलानं पकडलं . हा आळ आईवर आलेला . मास्तरांच्या दडपणामुळं आम्ही मात्र मास्तरांचं प्रकरण जाहीरपणे बोलू शकलो नाही . मास्तरांचा रोष आम्हाला परवडणारा नव्हता . त्या रात्री मुलांच्या मंत्रिमंडळाच्या सभेत आईवर जाहीर दोषारोप होतो आहे आणि आई किंवा मी तोंड उघडीत नाही, अशी चमत्कारिक कोंडी झालेली . वाटायचं , आपलं काही खरं नाही .
आमच्या नात्यातला देठे नावाचा एक मुलगा होता . तो हाडापेरानं चांगला मजबूत . उंच धडंग असा . आमची बोर्डिंगमध्ये सारखे हाडहाड होतेय , आमचा छळ होतोय , याची बोचणी बहुधा त्याला होत असावी . त्याच्या धुमसत्या संतापाला वाट फुटली . मात्र चमत्कारिक पद्धतीनं . शाळेत येण्यापूर्वी तो लहानपणी गुरं चारायला जायचा . काही वर्षं गुरं चारण्यात गेल्यामुळे थोड्या उशिरानं त्यानं गावच्या शाळेत प्रवेश घेतला असावा. त्यामुळं त्याच्या वर्गातील मुलांपेक्षा तो थोराड वाटायचा . गुरं चारत असताना , त्यानं गुराखी खेळत असलेला एक चमत्कारिक खेळ पाहिलेला . कानात कुठल्या तरी झाडाचा पाला घातला , म्हणजे काही वेळ वेडाचे झटके यायचे . आता खरंच वेड लागत होतं , की तो बहाणा असायचा , हे कळण्यास मार्ग नव्हता . ही वनस्पती मी खेड्यात असतानाही कानात घालण्याचं धाडस झालं नव्हतं . एके रात्री देठे यानं बहुधा ही वनस्पती कानात घातली असावी . त्याला ‘ घुई ‘ म्हणत . एखाद्या भगताच्या अंगात यावं , तसा माणूस घुमू लागे . तोंडात ‘ घुईचा काटा , घुई ‘ हे पालुपद . नेमका असाच प्रकार देठेनं सुरू केलेला . त्याच्या हातात तरवडीच्या फांदीचा फोक . जो पुढे येईल , त्या पोराला देठे सडकून काढतो आहे . बोर्डिंगमध्ये हलकल्लोळ उडालेला . ह्या मारपिटीतही देठेची एक गोष्ट माझ्या नजरेतून सुटलेली नसते . देठे मला किंवा आईला त्याच्या ह्या वेडाचा प्रताप दाखवीत नसतो . गर्दीतही नेमकं आम्हाला सोडून दुसऱ्या मुलांवर हा वार करायचा . त्या बोर्डिंगमधल्या दादा मंडळींवर तर जास्तच कटाक्ष . पुढं बराच काळ आपल्याला देठेनं का बरं मारलं नसावं याचा अचंबा वाटतो आहे . त्याचं त्या दिवशीचं ‘ घुईचा काटा , घुई ‘ हे वेड खरं होतं काय ?
बोर्डिंगचा प्रत्येक मुलगा म्हणजे नुसता अनुभवाचा अर्क होता . जवळजवळ सारेच खेड्यांतून आलेले- त्यातही तळागाळातून . त्यामुळे तेथील साऱ्याच बऱ्यावाईट संस्कारांचा त्यांच्यावर लेप चढलेला . त्यातून ती मुक्त कशी असू शकतील ? त्यामुळं भांडणं , मारामाऱ्या सतत चालत . ह्या सर्व मुलांव्यतिरिक्त मुंबईचा , श्रीमंत बापाचा एका गोजिरवाणा मुलगा होता . चिमटा घेतला तर रक्त निघेल , असा . सर्वात लहान . मुंबईला त्याचे वडील फोरमन होते . त्याला दर महिन्याला मनीऑर्डर येई . सर्वांपेक्षा त्याचे कपडे झकपक . तो बोर्डिंगमध्ये नावालाच जेवायचा . बहुधा हॉटेलातच जेवत असायचा . सर्वांसमोर दोन घास खात असावा , त्याचे दोन्ही मोठे भाऊ मुंबईत शिकले नाहीत , मवाल्यांची संगत धरली . म्हणून लहानपणापासूनच त्याच्या वडिलांनी ही काळजी घेतली . सारी मुलं त्याचा शब्द झेलीत . त्याला सिनेमा – हॉटेलात गंडवीत , त्याचे उंची कपडे वापरण्याकरिता झुरत .
खाण्यासाठी मुलं मास्तरबरोबर सतत भांडत . त्यात फीस्टकरिता जास्त . मास्तरांच्या नकळत मुलं हिशोबाच्या वह्या तपासीत . ग्रँट किती मिळते , हे मुलांना तोंडपाठ . सकाळी देत असलेली उसळ पुढे बंद केली गेली, म्हणून मुलांत कमालीचा असंतोष . मास्तरांची कीव यायची. त्यांची नोकरी म्हणजे तलवारीच्या धारेसारखी . एकीकडे ट्रस्टी आणि दुसरीकडे मुलं ह्यांच्या कोंडीत मास्तर . ग्रांटचा पैशाचा हप्ता हाती लवकर यायचा नाही त्यामुळे किराणा मालाची दोन – तीन महिन्यांची उधारी थकलेली . कधी फाके पडत . मास्तर आणि ट्रस्टी यांच्या नावानं मुलं शिमगा करीत . कधी काळी ट्रस्टी सभासद आले, तर त्यांच्यापुढे केवळ खाण्याच्याच तक्रारी . संस्थेचा दुबेरजी व्यवहार . सरकारी ग्रांट पुरायची नाही . सरकार म्हणे , ‘ निम्मे पैसे तुम्ही लोकांकडून गोळा करा ‘ आणि मदत विशेष मिळायची नाही. त्यात पैसे खाली येईपर्यंत त्यांना गळती लागलेली . मास्तर पैसे खातात , हा आरोप तर कधी नवा नसायचा . महागाई वाढली म्हणजे गल्लीतल्या पोरांनी दुकानदाराला दम द्यावा , तसा तो प्रकार होता .
डॉ. आंबेडकर जयंतीला किंवा एखाद्या मोठ्या सणासुदीला बोर्डिंगात फीस्ट मिळे . सहज मागून मिळाली नाही, तर मुलं घेरावचं तंत्र वापरीत . फीस्ट म्हणजे हॉटेलातून मेन आयटेम लाडू किंवा जिलेवी आणणे . त्या दिवशी मुलं भाताला अथवा चपातीला हात लावत नसायची. जेवताना पैजा लागायच्या . त्या वेळची एक पैज आठवते . वरच्या वर्गातील एका मुलानं बचकेएवढे बुंदीचे २०-२५ लाडू खाल्लेले. आम्ही सर्व आवाक झालेलो . आठवड्यातून एकदा मटन असायचं. मटन म्हणजे चक्क बरबाट. एकदोन बोटी मिळायच्या . एकदा चुकून बाजारहाट करणाऱ्या मुलानं मेंढराचं मटन आणलेलं . बातमी फुटावयास वेळ लागला नाही . मुलांनी जेवणावर बहिष्कार टाकला . आम्ही एक – दोघं फक्त जेवलो. बाकीच्या मुलांना हॉटेलातून भेळ आणि लाडू आणून द्यावे लागले . मास्तर म्हणायचे , ” आतडी बाटली , आता कातडीला काय जपता ?
” बोर्डिंग सुपरिटेंडंट भागवत मास्तर हे तसं अदार्श व्यक्तिमत्त्व होतं . त्यांचं जेवण वेगळं नसायचं , मुलांच्या पंगतीतच ते बसत. त्यापूर्वी येऊन गेलेल्या मास्तरांचा मुलांना वाईट अनुभव होता. मुलांनी त्यांना जवळजजवळ पळवून लावलेलं . पण भागवत मास्तरांबद्दल मुलांच्या मनात आदरच असायचा . मास्तर मुलांची बाजू घेऊन ट्रस्टीबरोबर भांडायचे . त्यांचं दुखलं – खुपलं बघायचे . मास्तरांचा कुठलाही बडेजाव नसे . राहायचे साधे . त्यांची देहयष्टी काठीसारखी सडसडीत. रेखीव, वाकडा भांग पाडायचे. केसांचा झुपका कपाळावर यायचा . एका हातानं कोटाची खालची बाजू पकडून धरणं ही त्यांची लकव . बहुधा त्यांचा समोरचा एक दात निखळला असावा . ते एका काळी मिलिटरीत होते . त्यामुळं त्यांना व्यायामाची खूप आवड . मुलांनी व्यायाम करावा , खेळ खेळावे , अशी त्याचं ताकीद . संध्याकाळी ग्राउंडवर खेळावयास आला नाही तर त्याचं जेवण बंद करावयाची तंबी ते देत. पण मुलं जेवून उठली म्हणजे त्याच मुलांची त्यांना आठवण यायची. सोनावणे नावाचा एक मुलगा होता. सारखा तंबाखू हातावर चोळत बसायचा. त्याला खेळण्याचा कमालीचा कंटाळा. ह्यास मास्तरांच्या सूचनेवरून एकदा ग्राउंडवर चक्क उचलून नेलेलं. पण एखादी म्हैस पाण्यात बसावी, तसा हा धुळीत बसून राहिला . खेळायचं नाव नाही . शेवटी मास्तरांनी त्याचा नाद सोडला . सुरुवातीला मुलांना मिलिटरीसारखी शिस्त लावावी अशी मास्तरांची इच्छा . कवायत घेण्यास ते पहाटेच उठत . संगमनेर- पुणे रस्त्यानं ते सर्वांना बरोबर घेऊन धावत . धावताना ते सर्वांच्या पुढं . एकदा त्यांनी, अचानक विमान हल्ला झाला म्हणजे खाली जमिनीवर कसं पडायचं याचं प्रात्यक्षिक दाखविलं . दाखवताना ते खाली जमिनीवर असे काही आदळल , की छातीच्या आजारानं ते पुढे दोन महिने आजारी होते . त्यांच्या छातीवर पट्टया बांधाव्या लागल्या. आम्हा मुलांची मात्र करमणूक झाली . त्यानंतर कधी मास्तरांनी कवायतीची आठवण काढली नाही.
बोर्डिंगच्या मुलांमध्ये हायस्कूलमधील पोरींबद्दल नेहमीच चर्चा चाले . अर्थात , त्या साऱ्या सवर्णांच्या . त्यांचा दररोजचा मेकअप , त्यांच्या साड्या याचीही चर्चा होई. काही मुलं तर साड्या मोजत . बोर्डिंगमधील बऱ्याच मुलांना कपड्यांचे एक – दोनच जोड असत . त्यामुळं मुलींच्या मोजता येणार नाहीत , एवढ्या साड्या पाहून ते चक्रावून जात . काही मुलं वर्गातील मुलींवर एकतर्फीच प्रेम करीत . नुसती वह्यांची बदली झाली तरी अस्मान गाठल्याचा आनंद मिळे . पाठारे नावाचा एक विद्यार्थी होता . चांगला हीरोसारखा राह्यचा . गावातल्या श्रीमंत मित्रांची इस्त्री शनिवारी घेऊन यायचा. शाळेत जाताना नेहमी अप – टु – डेट जायचा . हा एका ब्राह्मणाच्या मुलीवर मरत असल्याची पोरांनी बनाव केला- स्वत : च्या हस्ताक्षरातील चिठ्ठी मुलीनं पाठवावी अशा पद्धतीन काही काहींना जाणीव होती. चिडवलं तर त्याची कळी जास्तच खुलायची. एकदा ,चिठ्ठी लिहिली आणि ती पाठारेच्या वहीत ठेवून दिली . एस.टी. नाक्यावर सायंकाळी बोलावलंय, असा मजकूर होता. पाठारेला कोण आनंद झाला , म्हणून सांगू ! तो सारखा प्रत्येकाला प्रेमचिठ्ठी दाखवीत सुटला. त्याच्या पाठीमागे सारे हसायचे. जायच्या वेळी तो नटून – थटून गेला होता, पण ती आलीच नाही , म्हणून हिरमुसला होऊन परतला होता . त्या रात्री सर्व त्याच्याशी , मांजरानं उंदराशी खळाव , तसे खेळत होते . बिचारा रडकुंडीला आला होता .
ह्याउलट रोकडे याची घटना खूपच अंतर्मुख करणारी. बोर्डिंगमधील हा स्कॉलर मुलगा . घरची परिस्थिती तशी कमालीची गरीब . आईवडील मोलमजुरी करत . याची पुस्तकांची आणि कपड्यांची खूपच टंचाई . रात्री त्याच्या वर्गातली मुलं झोपली , म्हणजे हा अभ्यासाला उठायचा . त्यांची पुस्तकं वाचायला मिळावी , हा उद्देश; दिवसा कुणी देत नसत . त्याचे सर्वच विषय चांगले . संस्कृत आणि गणितात त्याला पैकीच्या पैकी मार्क पडत. वर्गात नेहमी पहिल्या – दुसऱ्या नंबरावर असायचा . त्याच्या वर्गात कुलकर्णी नावाची मोठी गोड पोरगी होती . अभ्यासाच्या निमित्तानं त्यांची ओळख वाढलेली . संध्याकाळी ती आपल्या म्हाताऱ्या आजोबांबरोबर बोर्डिंगच्या दिशेला फिरायला यायची . तेव्हा रोकडे आसपास रेंगाळायचा . अभ्यासाचं निमित्त करून दोन शब्द बोलायचा. कुलकर्णी दिसायला खूपच छान , गोबरे गाल , अटकर बांधा . तेजस्वी डोळे , रंग केतकीसारखा. रोकडे तिच्याबद्दल एकांतात तासन् तास बोलायचा . रोकडेच्या आणि माझ्या चेहरेपट्टीत व शरीरयष्टीत बरंचसं साम्य . आमच्या कपड्यांचीही अदलाबदल होत असे . त्यामुळे रोकडे हा माझा धाकटा भाऊ आहे , असंच शाळेत समजत . रोकडे आणि कुलकर्णी यांचं प्रेमाचं लळीत कुठपर्यंत गेलं होतं, हे समजण्यास मार्ग नव्हता . पण एस.एस.सी.च्या परीक्षेच्या वेळी जेव्हा सेंडऑफचा कार्यक्रम झाला , तेव्हा दोघे हमसून हमसून रडले .
रोकडे पुढं मुंबईला येतो . कुलकर्णी पुण्याला जाते . रोकडे कॉलेजात शिकत असतो . पण तीन – चार वर्षे मुंबईला काढूनही तो कुलकर्णीला विसरलेला नसतो . त्याच्या ध्यानीमनी कुलकर्णीच दिसायची . तब्बल चार वर्षांनी कुलकर्णी त्याला ठाण्याला अचानक भेटते . रोकडेसारखीच तीही ग्रॅज्युएट झालेली असते . रोकडे तिला आपल्या शाळेतील प्रेमाची आठवण करून देतो. ” आपण दोघं लग्न करू ” असंही सुचवतो . खरं म्हणजे रोकडेनं सलग चार वर्ष हे स्वप्न जपलेलं असतं . कुलकर्णी या प्रेमाचं कोरडं स्वागत करते . ” एवढी वर्षे तू कुठं होतास ? मी तर तुला विसरूनच गेलेय . शाळेतलं हे सारं तू खर कसं समजलास ? ” असं तिनं त्याला सांगितलं. रोकडे वेडापिसा झाला . तो तिला विसरायला तयार नव्हता . नंतर तो तिच्या नातेवाइकांनाही भेटला. त्यांनी तर त्याची जातच काढली . एखाद्या धबधब्यावर कुणी फेकावं , तसा रोकडे कोसळून पडला .
संगमनेरात त्या काळी एक आंतरजातीय लग्न मात्र कमालीचं गाजलं . नवरा ब्राह्मण आणि नवरी महार. मुलगी संगमनेर महारवाड्यातील होती . नाव बहुधा हंसा असावं . हंसासारखीच देखणी . हा काही प्रेमविवाह नव्हता . चक्क प्रपोज्ड मॅरेज . हायस्कूलमध्ये एक ब्राह्मण शिक्षक होते . ते पुरोगामी विचारांचे म्हणून ओळखले जात . नाव देशपांडे .
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं पुस्तकातुन)
