बलुतं..दया पवार(भाग ३२)

बलुतं..

त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाकरिता हंसाला मागणी घातली . गावात खळवळ माजली . काहींना शिक्षक विक्षिम वाटले . कुणी म्हणायचे , ” नवरा मुलगा हा टी.बी.नं आजारी आहे . त्याला कुणी जातीत मुलगी देत नाहीत , म्हणून ही महाराची सून करायला निघालेत . ” लग्न मोठ्या थाटात होतं . कलेक्टर , प्रसिद्ध पुढारी मंडळी लग्नाला आलेली . लग्नाचा शेवट मात्र दुःखद होतो . एका मुलाला जन्म देऊन नवरामुलगा गचकतो. पांढरं कपाळ घेऊन हंसा पुन्हा महारवाड्यात येते .

शरीरात वासना थैमान घालण्याचं ते माझंही वय होतं. पण मराठी शाळेत बानूच्या घटनेनं तोंड पोळल्यामुळं ताकही फुकून पीत होतो. सवर्णांच्या मुलींशी लगट करावी, असं धाडस होत नव्हतं. पण मनातलं कशाला लपवू? त्यांच्याबद्दल तसं कमालीचं आकर्षण वाटायचं . मी आणि खांबेकर बसायचो , तेच मुळी मुलींच्या बेंचच्या मागं. त्यांनी केलेल्या मेकअपचा सुगंध जाणवायचा . केसांना हात लावावा, असंही वाटायचं. खांबेकरशी बोलताना चावट विनोदही करायचो . पोरी लाजायच्या . मुली वेगळ्याच बसायच्या . विशेष कुणी मुलांशी बोलत नव्हतं . मधली सुट्टी झाली, तर एकही मुलगी थांबत नसे. भुर्रकन उडून जायच्या. अशा मुली नसलेल्या वर्गाचा मी ताबा घ्यायचो . मुलं जमवून चावट विनोद सांगायचो . गाणी रचायची सवय ह्याच काळात लागलेली . वर्गातल्या मुलींवर ‘ वर्गातल्या , बाई चार मुली ; बुद्धी माझी करती खुळी ‘ असं गीत लिहिलेलं आठवतं . अर्थात एका प्रसिद्ध भावगीताचं ते विडंबन होतं. शेवटच्या वाक्यात त्यांच्या शारीरिक व्यंगाचा उल्लेख असायचा . ह्या कवितेत ‘ सपाट लोशन ‘ हा शब्दप्रयोग केलेला . ज्या मुलीची छाती सपाट असेल, तिच्या संदर्भात हा शब्दप्रयोग होता. मुलांत या शब्दप्रयोग पॉप्युलर झाला होता. ह्या शब्दावरून आठवलं . काही शब्द त्या त्या भागातल्या लोकांनाच कळतात . संगमनेरात ‘ लाकडं झाली ‘ हा असाच एक शब्दप्रयोग . ‘ दांडी उडाली ‘ अशा अर्थानंच तो वापरीत .

कळू लागल्यापासून वाचनाचं मला मनस्वी वेड . वाचताना तहानभूक हरपायची . पण अन्नाची जशी भूक लागली नाही , तशीच वाचनाचीही . मला त्या वेळी म्हणायचे , ” हा गुवातला कागद वाचील ! ” लहानपणी तर उमाआज्या पिवळ्या कागदांतील पोथ्या वाचू द्यायचा नाही . त्यामुळं पुढील आयुष्यात जे पुस्तक हाती मिळेल , ते वाचण्याचा सपाटा लावलेला . लायब्ररीच मेंबर व्हायचं , तर हाती पैसे नसायचे . त्यामुळं एक झालं, श्रीमंत मित्रांकडे त्यावेळी ‘ मस्ती ‘ आणि ‘ उन्माद ‘ नावाची काही अश्लील मासिकं येत असत – पिवळ्या कागदातील – त्यात नग्न बायांची चित्रं असायची. ‘ ही चौऱ्याऐशी आसन ‘ वगैरे पुस्तकं वाचण्याची चटक लागली. शनिवारी दुपारी सुट्टी असायची. ह्या वेळात ती मी वाचायचो. केव्हा केव्हा बोर्डिंगवर आणायचो. बाकीच्या कुणाला दाखवत नसे . अभ्यासाच्या पुस्तकात हे मासिक घालून मी वाचत असताना एकदा भागवत मास्तरांनी मला पकडलं . खूपच गोरामोरा झालो . ह्या पुस्तकांची सवय मात्र पुढे बराच काळ गेली नाही. वाचताना साऱ्या अंगभर वासनेचा लोळ उठायचा. ह्याच वयात एकसष्ट बासष्टची सवय लागली. ह्यामुळे शरीराची नासाडी होते , ते सांगण्यास मात्र कुणी भेटला नाही.

ह्याच दरम्यान एका मुलीशी सलगी वाढली . तिचं नाव गऊ , वडारीण होती . वयाचाही तो दोष असेल . तीच का आवडली , हाही प्रश्नच आहे . बोर्डिंगच्या जवळ वडारांची काही पालं होती . बारदानात बांधलेली . कोसळू नये , म्हणून आत काठ्यांचा डोलारा उभा केलेला . पालात जायचं असेल , तर कमरेत वाकूनच जावं लागे. त्यातील एका पालात गऊ राहायची . तिला फक्त म्हातारी आई होती . तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेल. गऊची बहीण शेजारच्याच पालात राहायची. बरीच वर्षे लग्न होऊनही तिला मूलबाळ नव्हतं. गऊच्या बहिणीचा नवरा मात्र एखादा राक्षस दिसावा तसा काळाकभिन् . डोळे सतत तांबारलेले . त्याची गऊवर नजर होती. गऊशी मुलाबाळाकरिता लग्न करावं , अशी त्याची इच्छा होती ; पण गऊला तो मुळीच आवडत नसे .

गऊ तशी देखणी होती . चांगलीच गच्च . मक्याच्या कणसासारखी . उजळ , तांबूस रंगाची . वडारणी नेसतात तशी लुगडं नेसायची. गच्च आवळून . नाचणारीण नेसते तशी नऊवारी पद्धतीनं . पदर छातीला घट्ट गुंडाळलेला. दंड मात्र उघडे . स्लीव्हलेस ब्लाउजमधील एखाद्या बाईचे असावेत , तसे . गऊ दुपारच्या वेळी आईकडे गप्पा मारायला यायची. आपल्या पुढली भविष्याची चिंता आईपाशी टिपं गाळून सांगायची. अशा वेळी मी पुस्तक वाचण्याच्या निमित्तानं जवळ रेंगाळायचो. पुस्तकातील अक्षरांवर माझं लक्ष नसायचं. गऊ आपल्याकडे एकटक पाहते आहे , हेही ध्यानी यायचं . साऱ्या अंगभर रोमांच उभे राह्यचे .

गऊ आईला थोडीफार मदत करायची . केव्हा केव्हा स्वयंपाकखोली , जेवणाचा हॉल शेणानं सारवायची . अशा वेळी तिचं सारवणं एकटक पाहणं हा माझा आवडता छंद . दोन्ही हात शेणानं भरलेले , पुढं आलेली केसाची बट. माझ्याकडे मदंपणे हसत ती शेणानं भुईवर कमळाच्या पाकळ्या काढायची . एका पाकळीतून दुसरी पाकळी उलगडत जायची. अशा वेळी तिच्या बांगड्यांची किणकिण कानांवर यायची . हे रूप आजही मनावर कोरलेलं .

गऊशी जवळीक करावी , असं धाडस मला होत नसायचं . तिच्या डोळ्यांतून इच्छा प्रकट व्हायची. पण आईचं माझ्यावर लक्ष असायचं. मी गऊजवळ जादा रेंगाळलो, तर आई वैतागायची. म्हणायची, ” शेवटी तू बापासारखाच होणार ! ” हा घाव मात्र माझ्या खूपच वर्मी बसायचा. माझे सारेच अवयव कासवासारखे आक्रसत.

गऊबरोबर संवाद व्हायचा तोही मजेशीर . गऊ अशिक्षित होती ; पण तिला जीवनाची खूपच समज होती . कळू लागल्यापासून तिनं कष्टाची कामं केलेली . एकदा – दोनदा तिचा हात हातात घेऊन पाहिला होता. खूपच रखरखीत . लोखंडाची कांव हातात घ्यावी , असा वाटला होता . माझे तळहात मात्र खूपच मऊ. तिचे उघडे दंड मात्र कमळाच्या गाभ्यांसारखे. ते वासना चेतावीत .

एकदा तिला ‘ चोळी का घालत नाहीस ‘ म्हणून विचारलेलं आठवतं. खरं म्हणजे तिला ब्लाउज घालणं आवडत असतं . पण त्यांची जात – पंचायत खूपच कडक . बहिष्कार टाकायचे . चोळी का घालत नाही , या संदर्भातला किस्साही मजेशीरच . ” रामायणात सीतेला हरणाची चोळी मिळाली नाही , म्हणून आम्हीही तेव्हापासून चोळी घालायचं सोडून दिलेलं. ” गऊच्या युक्तिवादाचं हसू यायचं . पण , का कुणास ठाऊक , गऊल्ला पळवणारा रावण म्हणजे तिचा अक्राळविक्राळ मेहुणाच दिसायचा . त्याला माझा बहुधा संशय आला असावा . तो येता – जाता माझ्याकडे तांबारलेल्या नजरेने बघायचा. त्याच्या खांद्यावर तळपती चंद्रभान कुऱ्हाड असायची . माझं काळीज लक्कन हलायचं ,

पुढं गऊचं लग्न झालं ते मेव्हण्याशीच . त्यानं जात – पंचायत भरवली होती . पंचांना दारू पाजली होती. गऊला वडील नव्हतेच . आई विचारी कितीसा विरोध करणार ? बहिणीची सवत म्हणून तिनं आईचं पाल सोडलं. लग्नाच्या वेळी डुक्कर कापलं गेलं होतं . त्याचा कानठळ्या बसविणारा चित्कार साऱ्या बोर्डिंगभर पसरला होता. पुढील काही रात्री बेचैनीत गेल्या . रात्र रात्र डुकराचं चित्कारणं ऐकू यायचं . त्यामागं गऊचा निष्पाप चेहरा दिसायचा. काही दिवसांतच वडाऱ्यांची पालं तिथून उठलेली असतात . त्या गावचा त्यांचा शेर संपलेला असतो. पुढील काळात गऊ केव्हाच दिसली नाही. रस्त्यावर अथवा बांधावर वडारी खिया मी जेव्हा काम करताना पाहतो , तेव्हा गऊचा शोध घेतो . पण हा शोध हास्यास्पद आहे, हे क्षणभर तरी कळत नाही.

आईचे आणि माझे संबंध खूपच मोकळे होते . मी तिच्यापासून काही लपवत नसे . तिची शिकवण होती , की आयुष्यातल्या साऱ्या बऱ्यावाईट गोष्टी एका तरी माणसाला खऱ्या सांगाव्यात . ती हे तत्त्वज्ञान कुठं शिकली होती , कुणास ठाऊक ? पण ह्या तिच्या सांगण्याचा मजवर खोल परिणाम झालाय . आज हे जे मी सांगतो आहे , ते त्याच श्रध्देनं . बराच मोठा घोडा होईपर्यंत लाडात आलो , म्हणजे आईच्या मांडीवर झोपायचो . आई अशा वेळी केसांतून हात फिरवायची. आईचा आवाज खूपच सुरेख. ती एखादं गाणं गुणगुणायची. गावी असताना तिची जात्यावरची गाणी ऐकणं हा माझा आवडीचा छंद . ती गात असताना आपोआप डोळ्यांतून धारा वाहायच्या. बोर्डिंगमध्ये असताना तिला सुट्टी असली, म्हणजे मी काही पुस्तकांतल्या गोष्टी तिला वाचून दाखवत असे . एकदा तिला ‘ मानिनी ‘ नावाची गोष्ट वाचून दाखवताना तिला तिचं माहेर आठवलं – आपली दुबळवाडी . त्यामुळं माहेरचे लोक कसे कस्पटासमान धरीत, ह्याची आठवण तिला यायची . नवरा मेल्यानंतर पुन्हा दुसरा नवरा आईनं करावा , ही माहेरची इच्छा ती आयुष्यभर कधी विसरली नव्हती . बाण लागावा तशी तिला ह्या घटनेची आठवण होताच अस्वस्थ व्हायची .

ह्या जुन्या गोष्टींमुळं की काय , ती सुट्टीतही औरंगपूरची गोष्ट काढत नसे ; मुंबईला तर नकोच म्हणे . अशा वेळी आम्ही मावशीच्या गावी जायचो . काका – मावशी तसे खूपच गरीब , पण मनाने प्रेमळ होते . मावशीचं गावही मला खूप आवडे . गावचं शिवार हे सतत हिरवगार . पाटाचं पाणी बांधाबांधानं झुळझुळत वाहायचं. ह्या गावी पहाटेच बायका जात्यावर दळायला बसत . प्रत्येक घरी सुरेल आवाजात जणू काय बांगडी वाजायची. जवळ जवळ एकमेकींची स्पर्धा चाले . हे गाव तसं खूपच खेतरी . पुरुषमंडळी वाजंत्र्यांचा तापा घेऊन गावोगावी फिरत . संध्याकाळी लावण्या म्हणत . कुणीच पुरुष कष्टाची कामं करीत नसे . स्त्रिया मात्र रात्रंदिवस थोरा – मोठ्यांच्या घरी मोलमजुरी करत .

मी लग्न करावं म्हणून आईला मावशीच्या गावची मंडळी भंडावून सोडत . एकदा तर एका मुलीला माझ्याकरता निवडलेलं . पण लग्नाच्या बाबतीत मी टाळाटाळ करायचो . महार मंडळीत लग्न लवकर करण्याची परंपरा . त्यांच्या दृष्टीनं मी खूपच मोठा झालो होतो . आईला ते रंजीस आणीत . ह्या गावच्या तरुण पोरींचा माझ्यावर डोळा होता . चेष्टा – मस्करी करायच्या . पण मी खूपच पुस्तकी होतो . चालून आलेल्या गोष्टीचा फायदा घ्यावा , असं मला वाटत नसे . वयात आलेल्या एका मुलीनं तर चांगलंच आक्रमण केलं होतं . मी घाबरलो होतो . आईला हे सारं सांगायचो . म्हणायचो ,

” आये , चल पाहू इथून . खूपच भीती वाटते ह्या गावची !

” मला पाहून आई हसायची .

” रांडकीच्या रांडपोराला लय बुध असते ” हे लहानपणापासून वाट्याला आलेले उद्गार . ह्यात टवाळीचा सूर होता . पण आता हे उद्गार मी अभिमानानं मिरवू लागलो . वाटायचं , खरंच आपल्याजवळ ‘ बुध ‘ आहे ; नाही तर आपण एवढ्या कमी वयात जे भोगलं, असं कुणाच्या वाट्याला येतं ? त्यामुळं फार कमी वयातच चेहऱ्यावर मोठ्या माणसासारखं गांभीर्य आलेलं . आपल्या वयाच्या मुलांत खेळण्यापेक्षा वेगळं करावं , मोठ्या मंडळींत बसावं , असं सारखं वाटत असतं . स्वत : च्या गावी केव्हा केव्हा जायचो . इंग्रजी शाळेत शिकत असल्यामुळं गावातही भाव मिळायचा. आता आमची परिस्थिती थोडीफार बरी असते . आईच्या कष्टाच्या कमाईवर अंगावर नवी कोरी कापडं येतात . हळुहळू महारवाड्यातील बाकीच्या मुलापेक्षा मी वेगळा वागतो आहे. महारवाड्यातील मंडळींची पत्रं लिहून दे , मुलांना शिकव , महारवाडा झाडून काढ , इत्यादी उद्योग सुचतात . ढोलक , तुणतुणं , इत्यादी शिकणं कमीपणाचं वाटतं आहे , बापाचं कांडं तर शेजारी चुलत्याला स्वत: च देऊन टाकलेलं . घरात पिकत असलेली विद्या आपण शिकलो नाही , याचं वैषम्य आज वाटतं आहे . शिक्षणामुळं आपल्याच परंपरेतून आलेल्या गोष्टीही सोडून दिलेल्या . आज मला कुठलंही वाद्य वाजवता येत नाही . बाप चांगला ढोलकी वाजवायचा . सनई फुकायचा . पण ह्याच

क्रमशः
(स्रोत:बलुतं या दया पवारांच्या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading