बलुतं..
जाते . माझी अलिकडे जेवणाची टेस्टही बदललेली . त्यामुळे मी मनाविरुद्ध जेवत असतो . रात्री जेव्हा घराकडे निघतो , तेव्हा तात्या – काकू माझ्या सुशिक्षित बायकोसाठी नवी कोरी साडी देतात. अर्थात तोही पाचवारी. गोल पातळ , ” तुझ्या बायकोसाठी घेऊन ठेवली होती . आली असती , तर तिला मांडवात नेसवली असती . ” मला ही माणसं खूपच मोठ्या मनाची वाटत असतात. आपल्या आणि यांच्या जगात अंतर पडत चाललंय याची खंत मात्र खूपच वेचैन करते .
बबनतात्वा हा जुन्या पिढीतला गावचा शेवटचा अवशेष. बापजाद्यांसारखा तोही अलिकडे दारू पिऊन हल्लक झालेला . महारवाड्यातील कितीतरी तरुण मंडळींचं मरण मी पाहिलेलं . बबनतात्याही थोड्याच दिवसांचा सोबती दिसतो . आता कधी काळी गावी महारवाड्यात गेला , तर शुकशुकाट दिसतो . दिवसा कैदासणी भूसं कांडतात अशी अवस्था . साऱ्या घरांची खिंडार झालेली त्यात डुकरं – कुत्र्यांची पिलावळ हिंडत असते. महारवाड्यात एक – दोन घरं उघडी . दरवाज्यात भुताटकीच्या गोष्टीत दिसावी तशी एखादी जख्खड म्हातारी बसलेली . तिच्या केसांच्या आंबाड्या झालेल्या . भुवयांचे केसही पिकलेले . बऱ्याचदा स्वत : शीच हातवारे करीत बडबडत असते . माझा जीव गलबलतो . महारवाड्यातील एवढी मोठी कर्दनकाळ माणसं ही अशी हवेत उडून जावीत , तशी कशी उडाली ? गावची मराठा मंडळी म्हणतात , “ महारवाड्यावर कुणी करणी केली . ” खरंच , कुणी बरं करणी केली असावी ? गेल्या पंचवीस – तीस वर्षांत गाव कसा गोकुळासारखा भरलेला . गावाला जमीन अपुरी पडू लागलेली . गावानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे . इंग्रजी कौलांची काही घरं, पंचायतीची टुमदार इमारत , नवी कोरी शाळा गावात झळकत आहे . लहानपणी आम्ही धोंडाळीवर परसाकडे जात असायचो . दगड – धोंड्यांनी माखलेलं माळरान . हत्तीएवढ्या काळ्याभोर शिळा . साबरबोंडाचं गच्चं काटेरी रान . आज ही धोंडाळी सपाट झाली आहे . तिथं काही धनिक मराठा मंडळींनी टुमदार घरं बांधली आहेत . सुगीत तिथंच खळी लावतात . तेल सांडलं तर भरून घ्यावं , अशी त्यांनी चकचकीत खळी लावलेली . पूर्वी महाखाड्यातील दरेक कुटुंबापाशी हाडकी – हाडवळ्याची जमीन असायची . गेल्या काही वर्षांपासून ही जमीन लुबाडण्याची गावात स्पर्धा लागलेली . गावातील माणसांच्या जमिनीचा दर एकरी हजार असला , तर महारच्या जमिनीचा दर एकरी पाचशे . जसा काही ह्यांनी कटच केलेला ! वीस – पंचवीस वर्षांत गावचा महार देशोधडीला लागला . गावची कामं बंद झाली , त्यामुळं बलुतं बंद . गावातही मोल मजुरी मिळायची नाही. ग्रामव्यवस्थेच्या आर्थिक उलाढाली , उत्पादन साधनांत त्यांचा वाटा नाही . सारे पोटासाठी मुंबईला परागंदा झालेला . टिचभर जमीन टंचाईच्या काळात गहाण ठेवू लागले . काही पक्क्या खरेदी केलेल्या . अशी जवळजवळ सर्वांची अवस्था . गावी माझीही तुटपुंजी जमीन होती . तिचं उत्पन्न आणायला जायचो , तर खर्चच जादा यायचा . पावलीची कोंबडी आणि रुपयाचा मसाला म्हणतात , तशी गत . दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न निघालं , तेव्हा एक हजार रुपये ह्याच जमिनीवर मी उभे केलेले . मराठा शेतकऱ्याजवळ गहाण ठेवली. आता एक – दोन वर्षांपासून गावाकडं जाणंयेणं बंद झालंय . ज्या घरात जन्म झालाय त्या घराबद्दल मनाच्या कोपऱ्यात ओलावा होता . पण मागच्याच वर्षी एका जवळच्या नातेवाईकानं त्याच्या जाहीर लिलाव केला . पुढील पावसाळ्यात त्याचं फाटही मिळालं नसतं , हे नातेवाईकाचं म्हणणं मला पटलं होतं . पण बायको संतापली होती . म्हणाली , ” आमचा काय वंसबुड झालाय काय ?
” एकदा का बोलायला लागलो , म्हणजे मला असं भान राहत नाही . पुन्हा मागे जावं लागेल . आयुष्याच्या विकल मनस्थितीत मला कवितेनंच वाचवलं आहे . नाहीतर विचारानं वेड लागायची पाळी यायची . पहिल्यांदा कवितेकडे वळल्याचा काळ आठवतोय . शाळेत कुठला तरी जाहीर समारंभ होता . मला एकादं गाणं म्हणण्याचा आग्रह होतो . लोककवी वामन कर्डकांचं डॉ . बाबासाहेब आंबेडकरांसंबंधी असलेलं गीत मी म्हणतो . गीताची हृदयस्पर्शी रचना , त्यातील मराठमोळी भाषा , यामुळे हे गीत मीच लिहिलं असावं असा सरांचा समज होतो . ते जाहीर तारीफ करतात . मला खुलासा करण्यास संधी मिळत नाही . हे म्हणजे मी चक्क वाङ्मयचौर्य केलं आहे , ह्यानं मी रात्रभर अस्वस्थ असतो . सकाळी जेव्हा शाळेत जातो , तेव्हा सरांजवळ मी खुलासा करतो . ते खूपच धीर देतात . सांगतात , ” अरे , त्यात काय विशेष ? तूही कवी होऊ शकतोस ! ” सरांच्या ह्या बोलण्याचा मजवर खोलवर परिणाम होतो . खरंच , का आपल्याला कविता करता येणार नाही ? मी काही गीतं बांधू लागतो. लोककवी वामन कर्डक नेहमीच वसतिगृहावर यायचे . केव्हा केव्हा जयंतीच्या निमित्तानं त्यांचे दलित वस्तीत जाहीर कार्यक्रम होत असत . ते येताना आपले साथीदार आणीत नसत. त्यामुळे त्यांच्या गाण्यांना साथ देण्यास आम्ही काही मुलं बसत असू . त्यांची गीतं म्हणजे त्या काळात कब्बाल – पार्टीत गातात तशा पद्धतीनं गायली जात . ह्या गीतांसारखीच गीतं मीही करू लागलो . सुरुवातीला सिनेमांच्या चाली वापरीत असे . ‘ अलबेला ‘ त्या काळात खूपच प्रसिद्ध . ह्या सिनेमातील एका चालीवर गीत बांधलेलं आठवतं . ‘ ठोक तुझा दंड नको बसू थंड , कर आता बंड ‘ असा त्याचा मुखडा आजही आठवतोय . ह्या गाण्यात यमकांची रेलचेल असायची . ‘ मोट चालली मळ्यात , हात घाल गं गळ्यात , मासे फिरती तळ्यात . ‘ अशा पद्धतीची ही गीतं होती . दर शनिवारी रात्री वसतिगृहावर आमचा कार्यक्रम व्हायचा . साधीला डबडी , रिकामी घागर असायची . आपली गीत कुणीतरी गातात , हेच थ्रिल असायचं .
ह्या गाण्यांचा विशेष उपयोग होईल असं मात्र कधी वाटलं नव्हतं . पण सुट्टी पडली म्हणजे बोर्डिगची मुलं आपापल्या घरोघरी जात . गावी जायचं म्हणजे खायचं काय , हा आमच्यापुढं बिकट प्रश्न असायचा . अशा वेळी भागवत मास्तरांबरोबर सुगीच्या दिवसांत गावोगाव फिरणं , बोर्डिंगसाठी धान्य जमविणं हा आमचा कार्यक्रम असायचा , अशा वेळी आम्ही गावात गेलो , म्हणजे चावडीवरच उतरायचो , त्यावेळी लोक जमविण्यासाठी ह्या गाण्यांचा उपयोग मी करायचो . आपण समाजकार्य करीत आहोत याची मात्र मला जाणीव नव्हती . नववी – दहावीत असताना बाबासाहेबांच्या ‘ जनता ‘ साप्ताहिकात माझ्या काही कविता प्रसिद्ध झालेल्या आठवतात. आज माझ्या कवितांत आढळणारी सफाई त्या गाण्यांत निश्चितच नव्हती . पण त्यांतील सामाजिक जाणीवा खोट्या नव्हत्या . झाली असतील दहा – पंधरा वर्ष . त्यावेळी नगरला दलित लेखकाचं साहित्य संमेलन भरलेलं . अध्यक्ष होते कुसुमाग्रज आणि उद्घाटक होते दादासाहेब गायकवाड. संमेलनाच्या संयोजकांपैकी मीही एक होतो. रिकाम्या वेळात कुसुमाग्रजांच्या पुढ्यात भीतभीतच माझी कवितांची वही सरकवली . त्यात प्रेम कवितेबरोबरच काही सामाजिक कविताही होत्या . कुसुमाग्रजांना माझी एक कविता विशेष आवडली होती आणि तिचा आशय सामाजिक होता . आजही जुन्या वहीत ती आहे . नाव होतं ‘ झूल ‘ , कविता अशी होती :
कीर्तीच्या वलयासाठी इथे मानवता नाचे नंदीबैला झाली थिटी शिमग्याच्या सोंगापरी पाय झाकण्यास जाता कुडी चिखलात बुडे ॥ उघडी शीर करोटी । नच कुणी दिसे मला उडदांत काळे गोरे आज इथे प्रजावान कुणी कुणा निवडावे ? सारे अमिषाचे धनी माजे मतलबी रान ।। समाजसेवेची झूल भीही त्यांतलाच एक सत्व कसे गवसावे ?॥
तसा हा इंगळ माझ्या मनात सुप्त दडी मारून बसलेला . आयुष्यात थोरामोठ्यांचं बोट धरलं नाही असंही नाही. पण हे बोट मी केव्हा सोडलं , याचा अंदाज मलाही लागला नाही . आता हा कृतघ्नपणा वाटेल . पण कोणत्याही माणसाकडे मी लोहचुंबकासारखा आकर्षित होतो . त्यात सार्वजनिक जीवनात गाजत असलेल्या माणसांकडे तर प्रथम . एखाद्या टिपकागदानं सारा द्रव शोषून घ्यावा , तसं त्याचं व्यक्तिमत्व मला शोषून घ्यावंसं वाटतं . पुढे पुढे लक्षात येतं , की या माणसाकडे घेण्याकरिता आता काहीच शिल्लक राहिलं नाही . मग वाटतं , पुढला प्रवास हा आपल्याला एकाकीच करावा लागेल . त्यामुळे माझ्याबद्दल कितीदा तरी घोटाळे होतात . काहींना तर शंका येते , मी डावा की उजवा म्हणून . ते प्रेमानं सांगतात , ” अरे बाबा , कुठल्यातरी एका बाजूला उभा राहा – नाहीतर मधल्या जागेत सापडून अपघात व्हायचा . पण खरं ” सांगू का ? प्रचलित डावी , उजवी माणसं किंवा पक्ष समजून घेण्यात माझं गोंधळ होतो . त्यात डावे केव्हा केव्हा उजव्यासारखे वागताना पाहिलं , म्हणजे गोंधळ जास्तच वाढतो . सिद्धांताच्या गदारोळात एक मात्र प्रामाणिकपणे वाटतं , की शेवटच्या तळाच्या माणसांबद्दल आपण सतत एकनिष्ठ असावं ,
मला समजून घेण्यात कसा घोटाळा होतो , त्याचा जाता जाता एक अलिकडचा किस्सा सांगतो . हमीद दलवाई किडनीच्या आजारानं खूपच आजारी असतात . त्यांना भेटायला एकदा मी जातो . अर्थात जातो तो मंत्र्याच्या मोटारीतून . दादासाहेब तेव्हा मंत्री असतात . तेही बरोबर असतात . हमीद मला पाहताच खळखळून हसतात आणि सांगतात ,
” आपण मानतो बुवा याला . हा सर्वत्र असतो ; पण कुठंच नसतो . ह्याला आपण गुरू मानलं .
” हमीदच्या कॉम्प्लिमेंटमुळं चेहरा पडलेला असतो . मनात विचार आला , खरंच आपल्याला जीवनात काय हवं ? आपलं काय बरं हरवलंय ? ही नुसती धावपळ काय आहे ? माझी बायको ही माझी कठोर टीकाकार . ती म्हणते ,
‘ कुत्र्याची डल्ली – इकडंही भल्ली , तिकडंही भल्ली !
” आता ह्याचा नेमका अर्थ काय , हे तिला विचारायलाच हवं .
सवर्ण मुलांत आणि माझ्या जाणिवांत वेगळा फरक आहे , याची जाणीव तशी शाळेतच येत होती . एक प्रसंग आठवतोय . सानेगुरुजींच्या ‘ भारतीय संस्कृती ‘ या पुस्तकावर निबंधस्पर्धा ठेवलेली . सर्व मुलांना शाळेतून पुस्तक वाचायला दिलेलं . पुस्तक वाचून आपलं डोकं भणाणलं होतं . निबंधात भारतीय संस्कृतीची मी खूपच टवाळी केलेली आठवते . आम्हाला कुलकर्णी नावाचे शिक्षक होते . निबंध वाचून ते खूपच अस्वस्थ झाले होते . त्यांनी जवळ बोलावून माझी समजूत काढली , ” तू जे विचार मांडतोस ते खरं म्हणजे राष्ट्रद्रोह आहे . ” मी त्यांच्याबरोबर तावातावाने भांडलेला आठवतो. एस.एस.सी.च्या वर्षात शेवटी विद्यार्थीदिन असायचा. त्यावेळी सारे शिक्षक वर्गात बसत आणि मुलं शाळा चालवीत . प्रिन्सिपॉल ते प्यूनपर्यंत मुलंच कामं करीत , अर्थात वरच्या वर्गाची . त्या वेळी शिक्षकाच्या पेहेरावात मी घेतलेले तास आठवतात. मराठी आणि इतिहास हे विषय मी निवडले होते . मराठीच्या तासाला कविता गाऊन दाखवल्या होत्या , तर इतिहासाच्या तासाला जातिव्यवस्था कशा निर्माण झाल्या ह्याचा पाठ घेतला होता . त्या वेळी जातिव्यवस्थेची व्युत्पत्ती सांगताना मनुस्मृतीवर , हिंदू धर्मातील ग्रंथांवर कठोर टीका केली होती . वर्गात इतिहासाचे ब्राह्मण शिक्षक बसलेले असतात . ते मध्ये मध्ये प्रश्न विचारून अडथळा आणतात आणि मी आक्रमकपणे त्यांना उत्तर देतो आहे हे चित्रं आठवतं आहे . खरं म्हणजे मी शाळेत हे जे बोलत
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)
