प्रमोद वीर
पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी प्रमोद यांनी झुंज दिली . दोघांना जागेवरच कंठस्नान घातले . अतिरेक्यांच्या गोळ्या स्वत : च्या छातीवर झेलल्या . अतिरेक्यांशी झुंजताना त्यांना वीरमरण आले . जे देशासाठी लढले … ते अमर हुतात्मा झाले .. ! असा हा वीर मेंगलवाडीसाठीच नव्हे तर अवघ्या देशासाठी भूषण ठरला .
श्रीगोंदा तालुक्यातील मेंगलवाडी ( राजापूर ) येथील शहीद कै. प्रमोद शिवाजी वीर यांनी अशीच राष्ट्रभक्ती जोपासली आणि वीरयोध्दा म्हणून लौकिक मिळविला .
शिवाजी महादेव वीर व सुमनबाई यांचा सुखी संसार सुरू होता . वडील शिवाजी वीर यांनी लष्करात १५ वर्षेनिष्ठेने देशसेवा केली . त्यांनी अनेक सन्मान मिळवले . जवान शिवाजी व सुमनबाई यांच्या पोटी १४ डिसेंबर १९८२ रोजी प्रमोदच्या रूपाने रत्न जन्मले . भारतमातेच्या सेवेसाठी अजून एक पुत्र झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेना . शिवाजी वीर हे सैन्यदलातून निवृत्त होऊन महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले .
प्रमोदचे प्राथमिक शिक्षण श्रीरामपूरमधील नवीन मराठी शाळेत , माध्यमिक शिक्षण नगरला तर उच्च शिक्षण न्यू आर्टस महाविद्यालयात झाले . वडिलांच्या सहवासामुळे प्रमोदनेही देशसेवा हेच आयुष्याचे ध्येय ठरविले होते . त्यासाठी शरीरयष्टीचा खानदानी वारसा लाभला होता . सोलापूर येथे २५ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या भरतीत त्यांची निवड झाली . मुलगा भरती झाल्याचे कळताच वडिलांची छाती गर्वाने फुलली. आईच्या डोळ्यात आसू आणि चेहजयावर हसू होते .
बी . जी . सेंटर पुणे येथून प्रमोद यांचे ९ महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून भारतमातेचा हा सच्चा शिलेदार बनून सुट्टीसाठी गावी परतले . शिवाजी वीर यांचा मोठा मुलगा शहाजी हे शेती करतात . प्रमोद हे लहान असल्याने व लष्करात भरती झाल्यामुळे घरच्या मंडळींच्या जीवाला घोर लागला होता .
सुट्टी संपल्यानंतर प्रमोद यांचे पोस्टींग ११८ रेजिमेंट आसाम या ठिकाणी झाले . तेथे काही वर्ष सेवा केल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स तुकडीत जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात बदली झाली . जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशच्या सीमेवर हा जिल्हा आहे .या भागात उंच गवत , बर्फाळ प्रदेश व बाराही महिने वाहणाऱ्या नद्या होत्या . प्रमोद यांना या भागाची भौगोलिक माहिती देण्यात आली . त्यांनी या भागाची पाहणी करून सर्व परिस्थिती आत्मसात केली .
यावेळी डोडा भागात अतिरेकी दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला . त्यामुळे ऑपरेशन रक्षकमधील जवानांनी मोठ्या शिताफीने शोधमोहीम हाती घेतली . घनदाट अरण्यात लढण्यासाठी अतिरेक्यांनी खंदक खोदले होते . त्यातच ते लपायचे . प्रमोदसह १५ जवान हातात बंदूक घेऊन उंच वाढलेल्या गवतातून वाट काढत शोध घेत होते . इतक्यात उंचावर असणाऱ्या झाडांमध्ये हालचाल झाल्याचा आवाज प्रमोद यांच्या कानावर पडला . चाणाक्ष नजरेने ही हालचाल प्रमोदने अचूक टिपली . अन आपल्या जवळील मशिनगनचा चाप ओढत विजेच्या गतीने झाडाच्या पाल्यात गोळीबार करून दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले . रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अतिरेक्यांपैकी एकाचा श्वास अजूनही चालू होता हे पाहून रागाने संतापलेल्या प्रमोद यांनी दोन गोळ्या त्याच्या डोक्यात घातल्या . त्यामुळे इतर जवान सावध झाले होते . आजूबाजूला त्यांची नजर भिरभिरत होती आणि अचानक खंदकात लपलेल्या अतिरेक्यांनी प्रतिहल्ला केला . सर्वात पुढे असणारे प्रमोद यांना चार गोळ्या लागल्या . त्यातच ते शहीद झाले . क्षणभर निरव शांतता पसरली . हा शूरवीर भारतमातेचा सुपुत्र भारतभूमिच्या कुशीत २८ जानेवारी २००७ रोजी विसावला .
अन सगळे शोकसागरात बुडाले
प्रमोद शहीद झाल्याचा निरोप परिसरात कळताच कुणाचाही विश्वास बसेना . सर्व जण शोकसागरात बुडाले. कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला . दोन दिवसांनी तिरंग्यात लपेटलेले पार्थिव गावी आले . प्रमोद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला . लष्करी इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली . आईच्या आरोळीने वातावरण सुन्न झाले . जळणाऱ्या चितेमध्ये आई – वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांची होळी झाली होती .
(शब्दांकन: समीरन नागवडे , प्रभात)
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)
