बलुतं.
पण मी मात्र खूपच गंभीर होत चाललेला . ह्या शृंगारिक कल्पनेमुळं मन केव्हाच रोमांचित व्हायचं नाही . मस्टर चुकणार नाही ना , ही भीती . पावसाळ्यात छत्रीही घेणं परवडायचं नाही . तेव्हा भिजतच ऑफिसच्या ठिकाणी जाणं , लॅबोरटरीच कपडे वाळवणं , तेच कपडे वाळले म्हणजे घालणं आणि शेणाच्या नरकात बुडणं – हा उद्योग , त्या काळात आपण हे सारं कसं सहन केलं , याचं आजही आश्चर्य वाटतं आहे . मी खऱ्या अर्थानं दुभंगलो होतो .
बायको मुंबईला येते . तिचा बाप तिला घेऊन येतो . पावसाळ्याचे दिवस . पावसाची उघडीप असली , की मी फूटपाथला पथारी टाकून झोपायचो . घरात खूपच गर्दी . मध्येच पाऊस आला की गोधडी – उशी काखेला मारून घराकडे पळायचो . तिथं कुठं तरी कुणाच्या उशा – पायथ्याशी झोपावं लागे .
बायको येऊन सात – आठ दिवस झालेले असतात . बायकोच्या हळदीच्या अंगाची तकाकी जास्तच वाढलेली असते . घरातल्या गर्दीतही मी तिच्या नजरेचा शोध घेत असतो . आमचं लग्न झालंय ; आम्हाला आडोशाला का होईना , झोपायची व्यवस्था करावी , असं कुणालाच वाटत नव्हतं . बायको दिवसा कामधंद्याला आमच्याकडे आणि रात्री झोपायला बाजूच्या तात्याच्या खोलीत . तात्या – काकू पलंगावर , तर ती खाली पलंगाखाली .
फूटपाथला झोपलो असताना मध्येच पाऊस येतो . पाऊस पडल्यामुळं एवढा आनंद कधीच झालेला नसतो . नेहमी शिव्या मोजणारा मी आज खुशीतच बिछाना काखोटीला मारून तात्याच्या घरातच गोधडी पसरतो . खाली पाय पसरतो , तो बायकोच्या पावलाचा स्पर्श . अंधारातही मी तिला ओळखतो . मी मांजरीच्या डोळ्यांनी रोखून बघतो . तिची चुळबूळ चाललेली , ती जागीच असते . दोघांच्याही पायांच्या तळव्यांचा स्पर्श एकमेकांच्या पायांना होत असतो . अंगभर वीज सळसळत असते . बाजूला पडलेलं लादी पुसण्याचं बारदान मी तिच्या अंगावर फेकतो . ती ते पुन्हा अंगावर फेकते . तिच्या जवळ जाण्याचं धारिष्ट मात्र होत नाही . वाटतं , सालं काय हे आयुष्य ! हक्काची बायको असूनही तिच्या शेजेवर जाता येत नाही .
चाळीतल्या बायकांना बहुधा माझी दया आली असावी . माझ्या काकूला त्यांनी झापलं . ह्या प्रश्नावरून आईची आणि काकूची नेहमी धुसफूस व्हायची . केव्हा केव्हा भांडणाचा कडेलोट व्हायचा . दोन – चार दिवसांसाठी तरी आम्हाला घर मोकळं करून देण्याचं बहुधा ठरलं असावं . इथून मार्ग कावाखान्यात नवरदेवांच्या पहिल्या रात्री तशा खूप गाजलेल्या . लग्न झालेली मुलगी तशी सहजासहजी नवऱ्याला हात लावू देत नसे . प्रचंड आरडाओरड , नवऱ्याला लाथा मारणं हा प्रकार . त्यामुळं नक्ऱ्या मुलीला जेवताना ताटात भांग कालवून खायला घालणं हा प्रघात . मुलीला मात्र ह्याची अजिबात कल्पना नसे . एखादी चाणाक्ष मुलगी असली आणि तिला हा प्रकार ऐकून माहीत असला , म्हणजे ती वेगळी जेवावयास बसण्यास कचरत असे . सासूबाईंबरोबर अगर नणंदेबरोबर एका ताटात जेवायला बसण्याचा आग्रह ती धरी . अशा वेळी सूनबाई ज्या बाजूला जेवत असेल , तो भांग घातलेला भाग तिच्याकडे तत्परतेनं फिरवणं आणि तिच्या नकळत तिला भांग चारण ह्या कामात म्हाताऱ्या स्त्रिया तरबेज असत .
शिवातात्याचं लग्न झालं आणि त्याच्या नुकत्याच वयात आलेल्या बायकोला अशीच फसवून भांग चारली गेली , हा लहानपणाचा प्रसंग आठवतो . मुंबईला तरी नवरा – बायकोची शेज दिसायची . पण गावी हा प्रकार नाही . एकत्र कुटुंब असलं , तर मग पाहायलाच नको . नवरा जेवायला आला , म्हणजे चंची किंवा पागोटं विसरल्याचा बहाणा करायचा . त्याच्या बायकोनं ही खूण ओळखायची . मग चोरीलपीनं ते एकत्र यायचे . खळ्यात किंवा वाडग्यात चोरून – लपून कारभार उरकला जायचा . संतांच्या अध्यात्माचा तर हा नकळत परिणाम नसावा ना !
भांग देणं हा तर पाशवीपणा वाटायचा . हा प्रकार माझ्या बाबतीत चाळीतल्या स्त्रियांना शक्य नव्हता . संध्याकाळपासूनच मनात प्रचंड हुरहूर दाटलेली . खऱ्या अर्थानं तो स्त्रीचा पहिला स्पर्श होता . लैंगिक पुस्तकं वाचल्यामुळं खोलीत फुललाइट ठेवणं हे मनोमन पटलेलं . सई मला पाहताच रडू लागलेली . धसमुसळेपणामुळे हातातील बांगड्या फुटलेल्या . ती कमालीची भेदरलेली . तिच्या अंगाला गावरान वास असतो . नुकताच पाऊस पडून जावा आणि मातीला सुगंध यावा , तसा . हवाहवासा वाटणारा . मी तिला सारं काही समजावून सांगतो आहे . ” तुझा विरोध असल्यास मी तुला स्पर्श करणार नाही ‘ असंही सांगतो आहे . अर्थात हे सारं पुस्तकी पांडित्य . एक मोठं लेक्चर दिल्यामुळं सई अंतर्मुख होते आहे .
सकाळी उठतो , तेव्हा चाळीतील स्त्रियांचा संवाद कानावर पडतोय , ” काय बाई , दगडू किती शहाणा ! नव्या बायकोला त्यानं कसं मथवलं ! ” सारा प्रकार माझ्या ध्यानात येतो . आमच्या खोलीच्या शेजारीच अंगणात रात्रभर बायकांनी ठाण मांडलेलं . खोलीतील फुललाइट , माझा संवाद , हे सारं सारं त्यांनी ऐकलेलं – पाहिलेलं असावं . रात्रभर लाइट ठेवण्याची आणि स्वप्नात असल्यासारखी बडबड आपण उगाच केली , याचा पश्चात्ताप होत असतो . दिवसभर चेहऱ्यावर चोरी पकडली गेल्याचा भाव . माझ्या साऱ्या स्वप्नाचा चुराडा होतो .
सईच्या सहवासाची मात्र ओढ लागलेली . केव्हा एकदा रात्र होते , असं होऊन जायचं . पण नुसती रात्र होऊन भागायची नाही . आम्ही दोघं काकूच्या पंलगाखाली अडगळीत झोपायचो . काकूच्या पलंगावर आम्हाला बूड टेकवायचीही परवानगी नव्हती . रात्री बराच वेळपर्यंत काकू चाळीतल्या इतर बायकांबरोबर गप्पा मारत फूटपातला बसत असे . काकू झोपायला केव्हा येते आणि दिवा केव्हा घालवते , याची आम्ही ताटकळत वाट पाहत बसायचो . काकू तशी वयानं खूपच तरुण . तात्या गेल्यापाठीमागे तिनं मोठ्या निष्ठेनं रांडपण घालविलेलं . पण शरीराचा काही गुणधर्म असतो . त्याच्या काही वेगळ्या भुका असतात . काकूला याची जाणीव असावी . त्यामुळं काकू सकाळीच उठून निंबाच्या पानांचा कडू काढा पीत असे . आपल्या शरीरातील वासना मारण्याकरता काकूचा हा प्रामाणिक प्रयत्न . काकू मीठही खात नसते . पण ती रात्री खूप वेळ बाहेर गप्पा मारत का बसते , हे कळायचं नाही . केवळ आमचा छळ करण्यात तर तिला मानसिक आनंद होत नसावा ना ? आम्ही कंटाळून शेवटी घर सोडून जावं , याकरता तर हा काकूचा आडाखा नसावा ना ? केव्हा केव्हा तर रात्रीचे बारा वाजून जात . काकू येण्यापूर्वी लाइट बंदं करणं हेही आम्हाला शक्य नसायचं .
एकदा असाच आम्ही घरात अंधार करून बसलेलो . शेवटी आम्ही दोघे किती वेळ कळ काढणार ? काकू अचानक घरात येते आणि दिवा लावते . आमची खूपच तारांबळ होते . आमची उघडी शरीरं अंथरुणात लपवता लपवता त्रेधातिरपीट होते . काकू आम्हांला अशी छळते , याची जाणीव बहुधा आईला होत असावी . ती सकाळीच तोंड उघडायची . कुत्र्या – मांजरावर घालून – पाडून बोलायची .
एकदा तर घरात तुंबळ भांडण . सांगता येणार नाही , अशी शिवीगाळ . ” ह्या घरात आमचाही वाटा ” हे आईचं म्हणणं , तर ” तुम्ही पोट जाळायला गावी गेलात तेव्हा हे घर आम्ही सांभाळल ” असा काकूचा युक्तिवाद . ह्या भांडणामुळं मी खरा वैतागलेलो . एकदा तर भांडणात आई काकूला काय बोलली , हे माहीत नव्हतं . काकू धावत – पळत येऊन मला धरते आणि ओरडते , ” ये रे , लेका ! कर रे तुझ्या मनाची शांती . तुझ्या आईचा जीव थंडगार होईल ! ” माझ्या हातापायांना थरथर सुटते . आपल्या पुढ्यात संस्कृतीची किती भीषण रूपं एखाद्या दैत्यासारखी अक्राळ – विक्राळ नाचतात , असं वाटू लागतं . चाळीत कुणाला तोंड दाखवू नये , असं वाटत असतं . आई , बायको मध्ये पडून माझी सुटका करतात .
राहुल सांकृत्यायन यांच्या ‘ व्होल्गा ते गंगा ‘ ह्या पुस्तकात आदिम स्वीच्या आक्रमकतेची उदाहरणं आहेत . हे सर्व प्रसंग फिके पडावेत , असा हा प्रसंग . आपण मुंबईला येऊन कुठल्या नरकात पडलो , असं वाटू लागतं .
एवढं होत होतं , तरी आपण काकूचं घर खरंच का बरं सोडलं नाही ? तसं पाहिलं तर काकूच्या म्हणण्यात खूपच तथ्य होतं . आम्ही आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला आलो होतो , याची जाणीव होते . एवढ्या महानगरीत कुठंही डोकं टेकायला . जागा मिळाली नसती का ? निश्चित मिळाली असती . त्या वेळी कोळीवाड्याच्या झोपडपट्टीत एक झोपडंही ठरवून आलेलो . पन्नास रुपये विसारसुद्धा दिला होता . पण आजी – आईनं आकांत मांडला . ” एवढी देखणी बायको घेऊन तू झोपडपट्टीत कसा जाशील ? तिथं मवाल्यांचं राज्य . दारूचे अड्डे . जुगार , सट्टा बेटिंग . भांडणात रक्ताचं शिंपण ! … ” खरं म्हणजे झोपडपट्टीत नुसती मवाली मंडळी राहतात , हे काही खरं नव्हतं . पण त्या वेळी आपल्या गोऱ्यापान बायकोला एखादा अल्लाउद्दीन खिलजी पळवून तर नेणार नाही ना , असं वाटलं एवढं मात्र खरं . ह्या मायाजाळात आपली बायको सुरक्षित आहे , अशी खूणगाठ बहुधा मी मनात बांधली असावी . नेमकी काय कारणमीमांसा झाली , हे काही आज निश्चित सांगता येणार नाही . पण मी त्या वेळी कावाखाना सोडला नाही एवढं मात्र खरं . माझी आजी , आई , बाजूचे राहत असलेले नातेवाईक यांचाही आग्रह होताच , की मी कावाखाना सोडू नये म्हणून .
सईच्या स्वभावात खूपच गोडवा होता . ती सतत सावलीसारखी मागे मागे रेंगाळायची . मित्र घरी आलेले तिला अजिबात आवडायचं नाही . शनिवार – रविवार मित्रांच्या गप्पा , त्यांच्याबरोबर बाहेर भटकायला जाणं ह्यामुळे तिचा माथं खूपच भडके . एकदा तर तिनं एका मित्राला , तो मला घराबाहेर घेऊन जातो म्हणून तिच्या गावरानी भाषेत खूपच शिव्या दिलेल्या . हे तिचं रूप मला नवं होतं . सकाळचं कॉलेज , दिवसभर व्हेटरनरी कॉलेजातील काम आणि रात्री खूप जागरण , ह्यामुळं मला खूपच थकवा यायचा . रात्री थोडा वेळ कॉलेजचे पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न करावा , तर असं वाचत बसणं सईला आवडायचं नाही , ती हातातील पुस्तक काढून घ्यायची .
माझ्या मित्रमंडळीत तिच्या सौंदर्याची बरीच तारीफ झाली असावी . एकदा तिनं एका मित्राबद्दल माझ्याकडे तक्रार केली . हा मित्र तसा खूपच बोलका . युनियनचा कार्यकर्ता , प्रभावी वक्ता . हजारांच्या सभा गाजवायचा . ” जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा पाणी मागतो , आणि मी तुमच्या मित्राला पाणी देते तेव्हा तो तळहाताला चिमटे घेतो ” ही तिची तक्रार .
हा सारा प्रकार मी हसण्यावारी नेतो . मला राग कसा येत नाही , याचं तिला नवल वाटत असतं . मी तिची समजूत काढतो . ” अग , तू आहेसच तशी देखणी . कुणाचंही मन तुला पाहून ढळेल . तुझ्या मनात काही पाप नाही ना ? मग झालं तर . ‘ माझ्या ह्या वागण्यानं मी तिला मुलखावेगळाच माणूस वाटू लागलो . गावाला असं कुणी ऐकलं , तर एक घाव – दोन तुकडे , अशी रीत . आणि मी तर खूपच शामळू माणसासारखा वागतो आहे . तिला माझ्या स्वभावाचं कोडं कळायचं नाही . मी खरा म्हणजे पुस्तकी जगात वावरत होतो . स्वत : ला मॉडर्न विचारांचाही समजत होतो , तेव्हा…
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातून)
