बलुतं..
अशाच एका रिपब्लिकन पुढाऱ्याची गोष्ट सांगतात . हा कुठंही सभेला जाणार म्हणजे फुल सुटात . एका खेडेगावात जयंतीच्या निमित्तानं ह्या पुढाऱ्याची सभा झाली . साहेबांनी कोंबडीचं जेवण भरपेट खाल्लं . साहेब उघड्यावर झोपावयास तयार नाही . शेवटी साहेबांची सोय एका खोलीत केलेली . खोलीला लागूनच छोटीशी स्वयंपाक खोली . ज्या कार्यकर्त्याचं हे घर होतं , त्यांच्या पत्नीनंच सुग्रास मटणाचं जेवण केलेलं . बाई चुलीपुढं कलंडलेली . रात्री साहेबाच्या वासना चाळवतात . साहेब अंधारातच बाईला चाफण्यासाठी सरकतात . बाई बिचारी गाढ झोपेत . घरात झोपलेला साहेब रात्रीचा असा आपल्याला चाफायला आलाय , ह्यामुळं बाई भेदरलेली . ती जोरानं बोंब ठोकते . बाहेर झोपलेली पुरुष मंडळी जागी होतात . सगळी साहेबांना आईमाईवरून शिव्या देतात . साहेब तसे बेरकीच . अंधारातच आपला सूट छातीला लावून पळत सुटतात . पाठीमागं लागलेल्या कार्यकर्त्यांना सापडत नाहीत . सकाळीच कार्यकर्ता साहेबाच्या शोधात शहरात . ज्यांनी हा पुढारी ठरवून दिला , त्या गृहस्थाकडे जातात . म्हणतात , ” साहेब , बरं केलं . चांगला पुढारी धाडला , की जो आमच्या आयाबहिणींना चाफायला निघाला ! ” आजही हा पुढारी समाजात उजळ माथ्यानं वावरतोय . नवल म्हणजे आमदार म्हणून निवडून आलाय . कुंपणच असं शेत खातं , त्यामुळे तक्रार कुठं न्यायची , असा प्रश्न सामान्य माणसाला पडे .
दादासाहेब मात्र कधीच बाई – बाटलीच्या भानगडीत नव्हते . एक शुद्ध चारित्र्याचे म्हणूनच आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखीत असू . ह्या राजकारणात मात्र दादासाहेबांची कमालीची घुसमट होत असावी . त्या काळात ‘ मिलिंद ‘ ह्या टोपणनावानं ‘ रिपब्लिकनांना कम्युनिस्टांपासून कोणी वाचविले ‘ ह्या नावाची एक पुस्तिका प्रसिद्ध झाली होती . ह्या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर चित्रकारानं एक चित्रं काढलं होतं . एका बैलगाडीला पार्टीतील काही नेते बैल म्हणून जोडले होते . गाडी हाकणाराच्या हाती चाबूक होता आणि पाठीमागून गाडीला धरून रस्त्यातून घसरत जाणारे हे दादासाहेब होते . अर्थात , गाडी हाकणारे हे ह्याच पुढारी मंडळींनी मोठे केलेले ‘ भारतातील केनेडी ‘ . घटना – पंडित म्हणून गौरव केलेला . कार्यकर्त्यांत ह्या केनेडीबद्दल खुली चर्चा चाले . ” अरे , हा ना ? खंडीच्या वरणात मुतणारा , पोपटासारखा मिठू मिठू बोलणारा . आपल्याला डाळिंब कुणी घातलं , ह्याचा विचार न करणारा ! ” कुठलाही विधायक कार्यक्रम असो , हा केनेडी त्यात खो घाली . संसदीय लोकशाहीच्या सतत गप्पा मारी , पण अंतर्गत लोकशाहीवर याचा कधीही विश्वास नसायचा . ‘ मिलिंद ‘ यांनी जी पुस्तिका लिहिलीय , ती म्हणजे दादासाहेबांनीच लिहिलीय , असा कार्यकर्त्यांचा समज झालेला . केनेडी जसा व्हॉल्टेअर , अब्राहम लिंकन ह्यांची सतत कोटेशन्स द्यायचा , तसाच प्रकार ह्या पुस्तकात होतो . आणि मिलिंद एवढं चांगलं पुस्तक लिहू शकणार नाही , हा कार्यकर्त्यांचा होरा होता . ह्याचा परिणाम एक झाला , रिपब्लिकनांमधील दुरुस्तांमध्येही फूट अटळ ठरली . दादासाहेब वैतागून सरकारी नोकरीत निघून गेले .
ह्या समाजकार्याच्या वेडापायी घरी खूपच दुर्लक्ष झालं . सई तशी अडाणी . तिला हे सारं आवडायचं नाही . आपला विरह तिला क्षणभरही सहन व्हायचा नाही . मी मात्र कधी काळी वाचलेल्या सावरकरांच्या ‘ काळे पाणी ‘ ह्या पुस्तकातील वाक्य तिच्या तोंडावर फेकायचो , ” अग , संसार म्हणजे तरी काय ? कावळे नाही का काडी काडी रचून घरटी सजवत , तसा संसार . आपल्या घराचा जरी धूर निघाला , तरी उद्या दुसऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघणार आहे . ” सभेत भाषण करावं तशा आविर्भावातील वाक्य ऐकून ती गोरीमोरी व्हायची .
सईला सुरुवातीची दोन – तीन वर्ष मूलबाळ नव्हतं . मुलासाठी ती खूपच कष्टी असायची . एकदा ती तिच्या चुलत्याकडे माहेरला जाते . तिचा चुलता जवळच गोलपिठ्याला लागून असलेल्या सिद्धार्थनगरच्या बाप्टी चाळीत राहत असतो . भोवतालची वस्ती आवडायची नाही . दिवसाही हिजडे – वेश्या फूटपाथला उभ्या राहत . त्यांचे अचकट विचकट हावभाव चालत . सईनं तिकडे जाऊ नये , असं खूपदा वाटायचं .
एकदा ती अशीच माहेराहून परतलेली असते . तिथं तिनं मूल व्हावं म्हणून भगत पाहिलेला . त्याचा अंगारा घेऊन ती आलेली असते . मी कधीही विशेष न रागावणारा ; पण तिच्यावर कमालीचा वैतागलो . तिला घराबाहेर हुसकावून लावलं . नाटकात जसा क्षमा मागण्याचा सीन असतो , तसं तिला ” पुन्हा असं करणार नाही ” अशी क्षमायाचना करायला लावलं , तेव्हा कुठं तिला घरात घेतलं .
लग्नानंतर तब्बल दोन – तीन वर्षांनी सईला दिवस जातात . राजकमलच्या ‘ नवरंग ‘ या चित्रपटातील कवीसारखी माझी अवस्था होते . सईला मुलगा हवा असतो , तर मला मुलगी . आईलाही वंशाला दिवा हवा असतो . बायकोचं बाळंतपण आलं असताना नेमक्या त्याच वेळी सासूबाईंचं बाळंतपण आलं असेल , तर कसं वाटेल ? अर्थात , मी ज्या सासूबाईबद्दल सांगत आहे , ती माझ्या सासऱ्यानं ठेवलेली बाई . देशमुखीण . मराठा जातीतील . बऱ्याच वर्षांपासून सासऱ्याचं हे लळीत असावं . देशमुखीण असल्यामुळे पुन्हा लग्न करण्यास परवानगी नाही . बाईचा लग्नाचा नवरा ऐन उमेदीत मेलेला . बाई सासऱ्यावर कशी बर भाळली ? सासरा तर डांबरासारखा काळा आणि बाई खूपच नेटकी . उजळ अंगकांतीची . सासऱ्यानं बाईला चक्क वाळंतपणाकरता गावावरून मुंबईला आणलेलं . तेही जावयाकडे . बाई पिवळीधमक पडलेली . बाईचं भरलेलं पोट दिसायचं . बाई मात्र लाजेन खूपच खजील झालेल्या . नजर वर करीत नसत . अशा बाया पूर्वी पंढरपूरला जायच्या . आता सासऱ्यानं मुंबईची शक्कल लढवली होती . वायको आणि सासुवाई एकाच दवाखान्यात बाळंत झाल्या . मला मुलगी झालेली असते . मुलगी आईचाच चेहरा घेऊन आलेली असते . डोळे निळसर घारे , गुलावी रंग , अंग कापसासारखं मऊ . हातात घेतलं तर सुळकन् पडेल , अशी . वर्गात पाहिलेल्या एका मुलीची आठवण झाली . मुलीचं नाव बकुळा ठेवलं . झालेला आनंद काही फार काळ टिकला नाही . सासुबाई बाळंत होतात . त्या जेव्हा घरी आल्या , तेव्हा मूल सोबत आणलं जात नाही . बाईला गोरापान मुलगा झालेला असतो . कावाखान्यातही वाया कुजबुजत असतात . म्युनिसिपालिटीच्या दवाखान्यात तळालाच एक पाळणा असतो – बेवारशी मुलांकरिता . त्यात बाईनं मूल ठेवून दिलेलं . बाई उजळ माथ्यान गावी निघून जातात . सोबत सासरे . झालेल्या प्रकारानं मी मात्र बराच काळ बेचैन . खरंच , त्या टाकलेल्या मुलाचं शेवटी काय बरं झालं असेल ?
आता मी जे सांगणार आहे . ना , ते माझ्या घरच्या भानगडीबद्दल . आतापर्यंत दुसऱ्यांची लफडी काढण्यात मी चांगलास रस घेतला ; पण स्वत : चं सांगताना मात्र कासावीस होतोय . अर्थात भारतीय समाजातील नीतीचं जे ओझं आहे , ते माझ्याही मानेवर आहे . पुरुषाबद्दल , त्याच्या भानगडीबद्दल कुणाला काहीच वाटत नाही . पण स्वत : च्या स्त्रीचा साधा संशय जरी आला , तरी केवढं मोठं रामायण घडतं , हे अनेकांना माहीत आहेच .
ह्यात सईचा दोष किती आणि परिस्थितीचा किती , ह्याचा मला आजही संभ्रम पडलाय . एखादा सस्पेन्स सिनेमा पाहावा ना , तसं हेही कथानक खूपच गुंतागुंतीचं . त्यात अनेक प्रसंगांच , विचाराचे दोर अडकलेले .
घटनेला सुरुवात झाली , ती आम्ही ज्या चाळीत राहत होतो ना , तिला तोडण्याच्या प्रकरणावरून . कावाखान्याची जी नालाच्या आकाराची कौलारू चाळ होती , ती जागेच्या मालकाला तोडायची होती . तिथं त्याला टोलेजंग इमारत बांधायची असते . अर्थात आम्ही , आमचे बापजादे खूप काळापासून इथं राहत होतो . आम्हाला मालकानं पर्यायी जागा द्यावी , हे भाडेकरूंचं म्हणणं ओघानं आलंच . ह्या जागेचा मालक मी केव्हाच पाहिला नाही , पण भाडं उकळणारा मेहता चांगला परिचयाचा होता . उंच धडंग . मखमली सदरा , धोतर . रंगानं काळा . त्यानं काय करावं ? सरळ ‘ फोडा – झोडा’ची नीती अवलंबिली . नवीन घरं देण्यास तो तयार होता , पण कुणाच्या हाती द्यावी , हा त्याचा सरळ प्रश्न होता . आमच्या नावे काही भाड्याच्या पावत्या नव्हत्या . आणि दुसरी गोष्ट म्हणजे काकूला आम्ही नवीन घरात राहायला नको होतो . काकूला जस आम्ही नको असता , तसंच मावसचुलत्याच्या घरात त्याची विधवा भावजय राहत होती . तिलाही दिराबरोबर राहायला नको होतं . शेवटी वेगवेगळ्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र नोंदवली गेली . भाडेकरूंना वेगवेगळं गाठून मेहता फितवत होताच . शेवटी बिल्डिंग तयार होईपर्यंत आम्हाला घर सोडावं लागलंच . राहण्याचा बागुलबुवा होताच . जवळच्याच इमारतीत चंदरच्या घरात आम्ही – म्हणजे आई , बायको , मुलगी असे राहायला गेलो . बाकीची मंडळी अशीच कुठं कुठं दिवस काढीत होती . नव्याकोऱ्या इमारतीत आपल्याला घर मिळेल , ह्या स्वप्नावर आम्ही सारे जगत होतो . अनेकांना नवल वाटत असेल , मूळच्या दहा – बाय – दहाच्या रूममध्ये आम्ही एवढी माणसं कशी राहत होतो ? नव्या जागेत त्यापेक्षाही कमी जागा होती . इथं तर चंदरचं बिहाड धरून तीन खटली राहत होती . रात्री पातळाच्या तात्पुरत्या भिंती . आजही आठवण येते , तेव्हा अंगावर काटा उभा राहतो .
दोन – तीन महिने आम्ही ह्या घरात पोटभाडोत्री असू . ह्याच दरम्यान सईसंबंधी अवतीभवती कुजबूज सुरू झाली . त्याला कारणही मीच . इमारतीच्या कोपऱ्याला एक सायकलचं दुकान होतं . तिथं मेहबूब नावाचा मुसलमान तरुण कामाला होता . माझ्यापेक्षा थोडासा ठेंगणाच असेल . रंगानं गोरापान . सायकलच्या दुकानात कष्टाची कामं करायचा . त्यामुळं त्याचे दंड खूपच धष्टपुष्ट वाटत . हा स्वभावानं गोड होता . त्याला शेर – शायरीचा चांगलाच नाद होता , मला तो मनापासून आवडायचा . मी त्याच्याबरोबर नेहमीच फिरायचो . हॉटेलात जाऊन चहा प्यायचो . एकदा – दोनदा घरातील पुरणपोळी त्याला मोठ्या आग्रहानं खायला दिली होती . एकदा तर आजारी असताना दवाखान्यात घेऊन गेलो होतो , ” मला सदमा झालाय ” असं तो म्हणाला होता . घरी आल्यावर सईलाच वेळेवर औषध देण्यास सुचवलं होतं- त्याचं मुंबईत कुणी नव्हतं . तो खाट टाकून आमच्या गॅलरीत झोपायचा . आजुबाजूची कुजबूज माझ्या लक्षात येत होती . पण हा सारा मूर्खपणा आहे , ह्यात कुणाचा तरी बनाव आहे , आम्ही कावाखाना सोडून गेलो तर आमचा घरात वाटा राहणार नाही , म्हणून कुणी तरी हिडीस नाटक रचलं आहे , असं वाटायचं . लोकांना खिजवण्याकरिता मी मेहबूबबरोबर जास्तीच फिरू लागलो . हॉटेलात तासन् तास बसू लागलो . आईनंही एकदा – दोनदा सईचं पाऊल घसरत चाललंय म्हणून नकळत सूचना देऊन पाहिलं . मी उलट आईवरच रागावलो . म्हणालो , ” मला पुरावा दाखव ! ” अर्थात , कोणती आई असा पुरावा दाखवील ? ती गप्प बसली . मी ऐकत नाही हे पाहून ती मुलीकडे गावी निघूनच गेली .
आता गावगप्पांना जादाच ऊत आलेला . त्यावेळी मी ‘ बुद्धायन ‘ लिहीत होतो . बहुधा ग.दि.माडगूळकरांकडून प्रेरणा घेतली असावी . दहा – पंधरा गीतही बांधली होती . एका कॉलेजमधल्या मित्राला मी दाखवली ; तो गीतं वाचून म्हणाला , ” बुद्धायन काय लिहितोस ? ‘ झवायन ‘ लिही ! ” असं म्हणत माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत तो निघून गेला . कावाखान्यात शिरताना आपल्याकडे सारेच , कॉलेजमधला मित्र आज जसा पाहत असतो तसे पाहतात . दिवसेंदिवस मी खचत जातो . सईचा संशय घेण्यास
क्रमशः
स्रोत:(दया पवार यांच्या बलुतं या आत्मचरित्रातून)
