जन्म दिनांक २९ जुलै १९८३…
श्रीगोंद्यातील सामान्य कुटुंबात जन्माला आलेला पत्रकार आता संपादक आणि काही दिवसांतच एक पुस्तक पूर्णत्वाला नेऊन प्रकाशन करणार असलेले लेखक चंदन घोडके यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा…
तालुका कार्यक्षेत्रामध्ये पुरोगामी चळवळ म्हणजेच फुले – शाहू – आंबेडकर, संत कबीर, संत तुकाराम ते बुद्धा पर्यंतच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, माणुसकी, या प्रक्रियेशी आपली नाळ जोडलेले आणि आपल्या लेखणीचा भाग करून सामान्यांच्या व्यथा जगासमोर मांडणारे पत्रकार चंदन घोडके यांचा आज जन्मदिवस.. यानिमित्ताने त्यांच्या कार्या विषयी लेखन करणे क्रमप्राप्त आहे.
पुरोगामी चळवळ आणि फुले/शाहू/आंबेडकर या मातृसंस्थेचं काम करतांना, अनेक अडचणींवर मात करीत,सामान्यांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांच्या चळवळीचा एक भाग. दलित आदिवासी भटके विमुक्त समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये आवाज उठवणे हे त्यांचे नेहमीचेच कार्य. गेल्या दहा-बारा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असतांना, समोर येणाऱ्या उपेक्षित आणि वंचितांच्या व्यथा जगासमोर आपल्या लेखणीच्या माध्यमांतून मांडने आणि त्याचा पाठपुरावा करून त्या नमूद पीडिताला न्यायाच्या चौकटी पर्यंत उभा करणे हाही या पत्रकारितेचा एक कार्यांश.
एक दशकापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये स्वतःची प्रतिमा आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष, हा पत्रकार असतांनाही पत्रकार सिद्ध होण्यासाठीचा खटाटोप, एका चित्रपटाप्रमाणे आहे. पत्रकारितेची डिग्री घेऊन विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. नंतर, स्थानिक वृत्तपत्रामध्ये काम करतांनाही पहिली बातमी ती सुद्धा सामान्यांची व्यथा मांडणारी,दरम्यान एका समतावादी म्हणवणाऱ्या वृत्तपत्रात काम केले त्यातही मानवतावादी तत्वज्ञान आणि गेल्या तीन वर्षापासून चालू असलेल्या न्यूज पोर्टल मध्ये दिवसातून दोन बातम्या किंवा लेख हेही चळवळीशी निगडीतच.
बहुदा श्रीगोंदा कार्यक्षेत्रात अशा पद्धतीने पुरोगामी चळवळीशी नाळ जोडलेली पत्रकार ठराविकच. मात्र, दिवस-रात्र भीमाचा जयघोष करणाऱ्यांपैकी एकमेव नाव समोर येईल ते चंदन घोडके यांचे. वास्तविक पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या अडचणी काही कमी नाहीत. पत्रकार म्हणून स्वतः सिद्ध होणे हेच एक मोठे दिव्य म्हणावे लागेल. ज्याला पत्रकारितेच्या गण, यती, मात्रा समजत नाहीत. अश्या वरच्या थरातली व्यक्ती सहज पत्रकार म्हणून सिद्ध होतात. परंतु, डिग्री घेऊन एका वृत्तपत्राची परवानगी घेत कार्यक्षेत्रात कार्यरत राहून सामान्य, पीडित, दलित, आदिवासी, भटके, शेतकरी, कष्टकऱ्यांची वास्तव दुर्दशा हाताळणारा हा पत्रकार अनेकदा निराश होऊन गतकाळाचे सिंहावलोकन करायला विसरला नाही.
मागील काही दिवसांपासून मासिकाच्या अनुषंगाने बहुजन समता पत्र या वृत्तपत्राचे ऑनलाईन न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले. आजही चालू आहे. परंतु, ते चालू झाल्यानंतर अनेकांच्या टीकेला मात्र सामोरे जावे लागले. प्रिंट इज प्रूफ असे काहींचे म्हणणे होते.!! तर, ते ऑनलाइन व्हाट्सअप आणि फेसबुकवरच कोण पाहतयं.!! असे अनेकांनी टोमणे मारले. पेपरच्या कागदाला न्यायालयांमध्ये मान्यता आहे. असे म्हणणारे त्यांच्यातीलच पत्रकार आज चंदन घोडके यांचा सल्ला घेत, काही साहित्य पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यासाठी विनंती करत आहेत. यातील काहींनी तर नाव ठेवता ठेवता स्वतःचे पोर्टलही सुरू केली आहेत. बहुदा बहुजन समता पत्र हे ऑनलाईन न्यूज पोर्टल सातत्य आणि विश्वास पूर्ण बातम्यांमुळे कार्यक्षेत्रातील सर्वांना दखल घेण्याजोगे जिम्मेदार वार्तापत्र ठरले आहे. काहींनी सामाजिक माध्यमांसह इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च होणाऱ्या पत्रकारांची यादी जाहीर केली. त्यात बहुजन समता पत्र हे अव्वलस्थानी असून, तालुक्यातील जनता आज पोर्टल ला एक नंबरची पसंती देत आहे. हे सर्व करण्यासाठी रात्रभर जागरण करून लोकांपर्यंत विश्वासपूर्ण माहिती पोहोचवणे, बातमीचा स्त्रोत नमूद करणे, संदर्भ शोधणे, विश्वसनिय आणि अभ्यासू व्यक्तींकडून सल्ला घेणे या सोप्या गोष्टी नाहीत..
गतकाळामध्ये केलेला संघर्ष डोळ्यापुढे ठेवून भविष्यामध्ये सामान्य आणि वंचितांच्या लढ्याला लोकांपर्यंत नेत न्याय मार्गापर्यंतचा हा खटाटोप असाच चालू राहणार आहे. यामध्ये अडथळा निर्माण होणे अशक्य बाब आहे. फुले/आंबेडकरी विचारांचा वारसा असणाऱ्या कार्यकर्त्याला कोणत्याही असंविधानिक गोष्टींची भीती नसते. संविधानिक अधिकारात लेखन स्वातंत्र्य असल्याने, सामान्यांच्या दबलेल्या आवाजाला व्यापकता बहाल करून, त्यांच्या चेहऱ्यावरील माणूसपणाचं स्मित हास्य फुलवन्याचे कार्य पत्रकार/संपादक/ लेखक चंदन घोडके अविरत चालू ठेवनार असा विश्वास असून, त्यांचा शेवटपर्यंतचा जयघोष जय भीम असणार आहे…वंचितांना साथ अन्यायाला लाथ आणि सामान्यांना हात देत झुंजार विचारांचे वास्तववादी लिखाण करणाऱ्या लेखकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… जय भीम… जय भारत…
सौ. मनीषा चंदन घोडके (सहसंपादक बहुजन समता पत्र..न्यूज पोर्टल, श्रीगोंदा)
