दिनांक २८ जुलै,श्रीगोंदा:
आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही सहा महिन्यांपासून आरोपींवर कुठलीही पोलीस कारवाई होत नसल्याने व आरोपीकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दत्तात्रय अंकुश खोरे व रंजना दत्तात्रय खोरे रा. दौंड मूळ गाव काष्टी ता. श्रीगोंदा या पीडित पतिपत्नीने दि.२५ ला उपोषण आंदोलन केले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दत्तात्रय अंकुश खोरे व पांडुरंग अंकुश खोरे रा. काष्टी ता. श्रीगोंदा हे सख्खे भाऊ असून त्यांच्यात जमीन वाटपावरून वाद चालू आहे. पांडुरंग खोरे व वडील अंकुश खोरे, पत्नी वैशाली पांडुरंग खोरे हे सतत दत्तात्रय व त्याच्या कुटुंबाला मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि.२९/१/२० पासून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल होते. पांडुरंग हा वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिस प्रशासनाने अद्याप कारवाई केली नसल्याचा आरोप करून दत्तात्रय अंकुश खोरे व त्यांची पत्नी रंजना दत्तात्रय खोरे हे उपोषणाला बसले होते.
उपोषणाची दखल घेत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन व आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. उपोषणानंतर दोनच दिवसात आरोपी हे श्रीगोंदा न्यायालयात आले असता पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या आदेशाने अंकुश बापूराव खोरे (वय ६०वर्षे) व श्रीगोंदा शहरातील होणराव चौकातील महादेवाच्या मंदिरात लपून बसलेल्या पांडुरंग अंकुश खोरे (वय ३५ वर्षे) याला अटक केली.तर पांडुरंगची पत्नी वैशाली पांडुरंग खोरे व सासरे संपत बाबुराव दिवेकर हे फरार आहेत. त्यांचा शोध चालू आहे.
मंगळवार दि.२९ रोजी आरोपींना श्रीगोंदा न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी हे करत आहेत.
स्रोत:(विजय उंडे यांनी दिलेली माहिती)
