बलुतं..दया पवार..(भाग ४६)..

बलुतं..

काहीच जागा नसते . उगाच तिला सुळावर देण्यात काय बरं हशील आहे ? लग्न झाल्यानंतरचं तिचं मनस्वी प्रेम आजही तसंच उचंबळत असतं . तिनं आपल्याच मित्रासंबंधी केलेल्या तक्रारी आठवत असतात . त्यामुळं तिच्याबद्दल संशय घेण्यास काहीच जागा नसते .

पण ह्याच दरम्यान एक घटना घडते . कामावरून आलो , म्हणजे जोरानं मुलीच्या नावानं ‘ बकुळा ‘ म्हणून ओरडणं हा माझा परिपाठ . लहान मुलीचं मला मनस्वी वेड लागलेलं . चाळीत चांगलाच अंधार . घरात बघतो , तो सई नाही . माझा आवाज ऐकून ती संडासाच्या दिशेनं येते . तिच्या हाती राखेचा टोप असतो . मी कुतूहलानं संडासाच्या वाजूला डोकावतो . तिथं नळावर मेहबूब कपडे धूत होता . माझ्या मनात संशयकल्लोळ जन्म पावतो . साऱ्या रात्रभर झोप लागत नाही . सईला विचारण्याचा प्रयत्न करतो . ती रडायला लागते , मुलीच्या नावानं आणाशपथा घेते . काय करावं , कळत नाही . विचारानं रात्रभर माथा फुटायला आलेला .

सकाळी रविवार असतो . कामावर जाण्याची घाई नसते . ही दोघं बाहेर कुठं भेटत असतील ? सईला ‘ सभेला जातो ‘ असं सांगून बाहेर सटकतो . सई दररोज वाजाराकरिता कामाठीपुऱ्यातील हागरी बाजारात जात असे . तिथं जाऊन एका कोपऱ्यात उभा राहतो . प्रियकराला भेटावयास जायचं तर शृंगार करतात . पण सई तशी मूल झाल्यापासून खूपच गवाळी राहायची . तिला ” घाणेरडं का राहतेस ? ” म्हणून विचारलं , तर सांगायची , ” मला काय करायचंय नटून – सजून ? ” ह्या वेळीही ती अशीच गबाळ्या जुनेरात मार्केटात आलेली . पण त्या जुनेरातही तिचं सौंदर्य उठून दिसत होतं . आपण ह्या निष्पाप चेहऱ्यावर उगाचच आळ घेतोय , असंही वाटत असतं . ती बाजारातून परतत असताना चमत्कार घडतो . तिथं मेहबूब एका कोपऱ्यावर तिच्याशी बोलत उभा . जमीन फाटावी आणि आपल्याला धरतीनं आत घ्यावं , असं वाटतं . मी तसाच पुढे होतो . मला पाहताच सई घाबरलेली . मी तिला घरी जावयास सांगतो . मेहबूबला घेऊन एका इराणी हॉटेलात जातो . आता रडायला लागलेला . ” कुरान की कसम , वह मेरी बहन है … ” असं बडबडायला लागला . काय करावं हे कळेना . मी त्याला लगेच मुंबई सोडायला सांगतो .

घरी येऊन पाहतो , तो मेहबूब गावी जाण्याच्या मार्गाला लागलेला . तेव्हापासून तो पुढं कुठंच दिसला नाही .

आपल्या मनात मात्र सैतान जागा झालेला . खरं काय खोटं काय , म्हणून रात्र रात्र सईला छेडत असतो . ती काहीच सांगायला तयार नसते . तिनं नन्नाचा पाढा धरलेला ,आजवर आपण अनेक पुस्तकं वाचलेली . रसेलचं ‘ नीतिशास्त्र ‘ वाचलेलं . पण अशा वेळी हे ग्रंथ उपयोगी पडेनात .

दहा – पंधरा दिवस विचारातच गेले . खूपच हल्लक झालो . नव्वद पौंडावर आलो . एकदा मात्र वाटलं , की विचारा – विचारानं आपण मरणार . डोळ्यांपुढं काजवे चमकू लागले . दिवाळी आठवड्यावर आलेली . मी सईला , मुलीला नवीन कपडे घेतले . सईला माहेरला नेऊन सोडावं , हा विचार पक्का झाला . सईला मात्र माझ्या मनाचा अंदाज लागला नाही . तिच्या माहेराहून निघताना ” आपल्याला टी.वी. झाला आहे . काही दिवस सईला माहेरालाच ठेवा . ” असं सासरच्या मंडळींना सांगावयास विसरलो नव्हतो .

कावाखान्यात पुन्हा परतलो होतो . आता सारा काबाखाना खायला उठला होता . बेचैनी वाढत होती . आपली फसवणूक झाली , असं मनोमन वाटू लागलं . कुणाशी नीट बोलत नव्हतो . रात्र झाली म्हणजे आपोआप डोळ्यांना धारा लागत . प्रेमभंगाचं दुःख काळीज कुरतडत होतं . हे सारं होतं , तरी नोकरीची विगार टाकत होतो . कावाखाना जेव्हा खूपच मानसिक त्रास देऊ लागला , तेव्हा शिवडीला बहिणीकडे राहावयास गेलो . बहीण नवऱ्याबरोबर राहत होती .

गावी ” मला वेड लागलंय ‘ अशा बातम्या पोहोचल्या होत्या . मी रस्त्यावरच कागद फाडतो , दगडी मारतो , ही भुमका फुटली होती . आई मात्र दुभंगून गेली होती . तिला वाटलं , माझ्यावर सईनं करणी केली . ती भगत पाहत होती . एकदा आठवतं , तिनं एक कोकणी भगत घरी आणलेला . त्यानं कोंबडं , काही उतारा माझ्यावरून उतरून टाकला होता . मी हे सारं सुन्नपणे पाहत होतो . विरोध करण्याचं मानसिक धैर्य राहिलं नव्हतं . मी मनानं खूपच विकल झालो होतो . एकाच वेळी सईची आसक्ती आणि घृणा वाटत होती . मई मात्र मनातून तुटता तुटत नव्हती . एकदा – दोनदा सई मुलीला घेऊन नांदावला आली होती . पण मी तिला साडीचोळी घेऊन , गाडीखर्च देऊन पुन्हा गावी रवाना केली होती . आज ना उद्या आपल्याला नवरा घेऊन जाईल , ही आशा तिला होती . मी डवलरोल खेळत होतो , याची तिला जाणीव नव्हती .

काळ असा जात होता आणि माझं मन पुन्हा नव्यानं उभारी धरत नव्हतं . पुरा कोसळून पडलो होतो . सावळे नावाचा माझा एक मित्र होता . त्या काळात ह्यानं खूपच धीर दिला . पण गेलं वर्षभर मी बाईशिवाय कसा राहू शकलो , हा त्याला प्रश्न पडलेला . तसं त्याचं चारित्र्य चांगलं होतं . दारूच्या थंवालाही तो शिवत नव्हता . मी एवढा उद्ध्वस्त झालो होतो तरी दारूच्या थेंबात है दु : ख बुडवावं असं मला वाटलं नाही . सावळेला माझी मात्र काळजी होती . तो मला रात्र रात्र फोरास रोड , पवन पूल इत्यादी ठिकाणी वेश्यांच्या वस्तीत फिरवायचा . पण ह्या बाया मला ऑगळ वाटायच्या . माझ्या शरीराला झिणझिण्या यायच्या नाहीत . कधी तर वाटायचं , ” साला आपण छक्का झालो की काय ? ” सुंदर मुलगी दिसली की इंद्रियाची थरथर व्हायची .

तालुक्यात मुलींचं वसतिगृह होतं . एकदा तिथं टूस्टीची वार्षिक सभा असते . त्या सभेला कार्यकर्ता म्हणून गेलेलो . स्वयंपाकीण बाई आणि मुलींचं सतत भांडण . ही भांडणं मिटवून मुंबईस परतावं , असं मला ट्रस्टीकडून सांगितलं जातं . तिथं घारोळ्या डोळ्याची एक मुलगी होती . गोरीपान , पण अटकर बांध्याची . तिला मी मनापासून आवडलेलो . माझ्या तिथल्याच एका नातेवाईक मुलीनं माझी ट्रॅजिडी तिला सांगितलेली . तो परिस्थितीनं खूपच गरीब आहे असंही सांगितलेलं . ती म्हणाली , “ मी त्याच्यावरोवर झोपडीतही राहीन . ” पण का कुणास ठाऊक , घाऱ्या डोळ्यांचा मी धसका घेतला . मी रिस्पॉन्स दिला नाही .

ह्याच दरम्यान मित्राने एकदा माझ्यासाठी एक बाई ठरवलेली . चौपाटीला एकटीच फिरत होती . वाई काळीसावळी , पण दिसायला छान होती . तिनंच आम्हाला नवलकर स्ट्रीटला नेलेलं , मित्र बाहेरच थांबला . बाई धंदेवाली होती . बाहेरून ती शिकार पकडून आणीत असावी . “ आज कोण बकरा पकडला ” म्हणून बाकीच्या फसकन हसत बोलल्या . मला तर मनातून धडकी भरलेली . कुणाचाही कदाचित विश्वास बसणार नाही . ती बाई माझ्यासमोर नागडी उभी राहिली तरी माझ्या देहाला वासनेच्या मुंग्या आल्या नाहीत . थंडगार गोळ्यासारखा मी तिच्याकडे पाहात राहिलो . तिलाही नवल वाटलेलं दिसलं . तिच्या – माझ्यात झालेला संवाद आजही आठवतोय . मी तिला म्हणालो , ” तुझं लग्न झालंय ? ” त्यावर उदास हसत ती म्हणाली , ” माझं लग्न दररोजच होतं . ” मी जेव्हा काहीही न करता तसाच बाहेर आलो , तेव्हा मित्राने तिला विचारलं . ती म्हणाली , ” तुम्हारा आदमी कामका नहीं है ! ” तेव्हा मित्र माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहू लागला . वेश्यागारातील ती माझी पहिली आणि शेवटची वेळ .

इथं मात्र थोडंसं खोटं बोललो . अलिकडे एका श्रीमंत मित्राबरोबर फोरास रोडला कोठीवर गाणं ऐकायला गेलेलो . तिथल्या गाण्याचा आनंद मात्र लुटू शकलो नाही . कोठीवर पाहिलेलं मुलांचं पाटीदार , मागच्या दालनात झोपलेली मुलं- ह्यानंच अधिक अस्वस्थ झालो . आपल्यासमोर हातात गजरे बांधलेल्या , तारुण्यानं मुसमुसलेल्या चार – पाच पोरी टाळ्या पिटीत गात असतात . अशा वेळी एक मुलगी नेमकी माझ्याच मुलीसारखी मला भासते . चेहऱ्याची ठेवणही तशीच . घारे डोळे , निमुळता चेहरा , गोरा रंग . नाचत असताना तिचं गरोदर पीट दिसत असतं . आपल्या मनात हा विचार का बरं यावा , याची मुळं मला उलगडत नाहीत . माझं मन ज्वालागृहासारखं आत कोंडून फुटेल की काय , असा भास मला होत होता . माझं मन मित्राला समजलं की काय कुणास ठाऊक ; पण त्यानं तिला नाचवायचं थांबवलं .

त्या वेळच्या दुःखावर एक फुकर मिळाली ती मात्र एका दुर्दैवी घटनेमुळं . माणसाचं मन मोठं गमतीदार असतं , हेच खरं . शत्रूवरही असं संकट येऊ नये असं आपण म्हणतो खरं ; पण आपल्यासारखं कुणाचं दुःख पाहिलं , तर बरं वाटत असेल काय ? मी जी घटना ऐकली त्यामुळं वाटलं , आपलं दुःख या घटनेपुढे काहीच नाही .

ऑफिसात शेजारच्या टेबलावर एक गृहस्थ काम करीत असायचा . स्वभावाने खूपच उमदा – चांगला स्पोर्ट्समन . तो एकाएकी खूपच खचला . काळजीनं त्याचा चेहरा काळवंडलेला . माझी घटना तशी ऑफिसच्या जगात कुणालाच माहिती नव्हती . शेजारी काम करीत असलेल्या त्या कर्मचाऱ्यानं एकदा माझ्याजवळ मन उघडे केलेले . तसा चांगला सुशिक्षित , वी.एस्सी . झालेला . जातीनं उच्चवर्णीय . त्याने सांगितलेल्या घटनेवर तर माझा विश्वास बसेना .

त्यानं नुकतीच बायको सोडली होती . आपली मुलं परत मिळावीत , म्हणून तो कोर्टात भांडत होता . बायको सोडण्याचं कारण खूपच धक्कादायक वाटलं . त्याच्या म्हणण्याप्रमाणं वायकोने तिच्याच सख्ख्या भावाबरोबर जार – कर्म केलेलं . माझं तर डोकं फिरायची वेळ आली . असलं आक्रित कधीच ऐकलं नव्हतं . मी जेव्हा अविश्वास व्यक्त केला , तेव्हा त्यानं बहीण – भांवडांची काही पत्रं दाखविली . भावानं बहिणीला लिहिलं होतं . पत्राच्या वर ‘ साईबाबा प्रसन्न ‘ असं लिहिलेलं . त्यात एक वाक्य खूपच चमत्कारिक होतं . ” तुझ्या लग्नाच्या आधी आपण जे काम करीत होतो , ते ह्यापुढंही करता येईल . अर्थात ‘ काम ‘ ह्याचा अर्थ तुला कळला असेलच ! ” जीवनाची खूपच विकृत वाजू मी पाहत होतो . ही पत्रं खोटी तरी कशी समजायची ? कर्मचारी सांगत होता , ” मी हा असा टूरवर . बहिणीला सांभाळायला भावापेक्षा जगात अशी कोणती समर्थ ताकद आहे ? ” कोर्टात सादर करण्याकरिता ह्या पत्रांचे त्यानं काही फोटोही काढले होते .

ही गोष्ट ऐकताना , का कुणास ठाऊक , जावजीबाबांनी लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आठवली . गोष्ट अशी : एक होता ब्राह्मण . तो हसला , म्हणजे त्याच्या तोंडातून मोती – पोवळी पडायची . राजाला ही बातमी समजते . असलं आश्चर्य आपल्या दरवारी असावं , म्हणून तो शिपायांना त्याला आणावयास पाठवतो . राजाची आज्ञा ऐकून तो ब्राह्मण शिपायांबरोबर घराबाहेर पडतो . फागभर अंतर चालून गेल्यावर त्याच्या लक्षात येतं , की आपलं पंचांग घरी विसरलंय . ब्राह्मण घरी जातो , तो दरवाज्यातूनच बघतो की आपली बायको परपुरुषाशी रममाण झाली आहे . तो तसाच मागे परततो . राजवाड्यात येतो , तेव्हा ब्राह्मण हसतच नाही . त्याच्यापुढे अनेक विनोदी

क्रमशः
स्रोत:(बलुतं या दया पवारांच्या आत्मचरित्रातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading