बलुतं..दया पवार..(भाग ४७)

बलुतं..

प्रहसनं केली जातात , पण ब्राह्मण मुकाच . शेवटी राजा त्याला तुरुंगात डांबतो . तिथं एका रात्री ब्राह्मण झरोक्यातून पौर्णिमचं चांदणं पाहत असतो . तो एकाएकी चमकतो . राजाची पट्टराणी पंचारती घेऊन घोड्याचा खरारा करणाऱ्या नोकराला ओवाळीत असते . नोकराचा हट्ट म्हणून ती घोडीसारखी वाकते . तिच्या पाठीवर तो नोकर बसलेला आणि झ्या झ्या करीत घोडा हाकतो आहे . हे दृश्य पाहताच ब्राह्मण खळाळून हसू लागतो . सकाळी बघतात तो सारा तुरुंग मोती – पोवळ्यांनी भरलेला .

बोलून – चालून ही गोष्टच ; पण त्यात जीवनाचं मोठं सार साठलं आहे , असं वाटलं .

पुढं कावाखान्यात राहणं असह्य होऊ लागलं . आम्हाला ज्या नव्या इमारतीत घरे मिळणार असतात , त्या इमारतीचे माळे चढत असतात आणि आम्ही त्याखाली गुदमरत असतो . मालक घर देण्याचं नावच काढीना . आम्हा सर्वांना टांगतं ठेवलेलं . शेवटी जे व्हायचं , तेच झालं . ज्या नातेवाइकाच्या नावे सर्व घरांच्या भाड्याच्या पावत्या होत्या , त्याला मेहतानं फोडलं . काही हजारांची रक्कम देऊन वाटेला लावलं . आमच्या सर्वांच्या तोंडाला पानं पुसली गेली होती . आमच्या हाती घराच्या संदर्भात कागदाचा कपटाही नसल्यामुळे आम्हाला कोर्टात जाता येत नव्हतं . इमारतीचा प्रत्येक फ्लॅट पन्नास – साठ हजारांनी विकाक्यास काढणाऱ्या मालकाला आम्ही म्हणजे कोणत्या तरी झाडाचा पाला वाटत होता . शेवटी सर्व नातेवाईक कावाखान्यातून पांगले . माझी तर ह्या दरम्यान मन : स्थिती खूपच खचलेली . ह्या इमारतीपायीच माझ्या संसाराची धूळधाण झाली , असं वाटायचं . ह्या ठिकाणी राहणं म्हणजे पुनःपुन्हा पूर्वस्मृती चाळवणं असंच झालं असतं .

आई आणि मी कावाखाना सोडतो . आई आता माझ्या बाबतीत खूपच हळवी झालेली असते . तिच्या एकुलत्या एका मुलाच्या संसाराची धूळधाण झाली होती . सई असताना ती नेहमी मुलीची बाजू घ्यायची . पण सई गेल्यानंतर ती आपल्याच मुलीवर डाफरायची . मला तळहाताच्या फोडासारखी जपायची . आईच्या स्वभावाची गंमत वाटायची . मुंबईत अर्थात आम्हाला कुठं सहारा नव्हताच . आम्ही शिवडीला बहिणीकडे राहावयास गेलो . तुम्ही एकमेकांना खेटलेल्या दोन झाडांच्या खोडांतून तिसरंच झाड उगवलेलं पाहिल असेल . म्हणतात , त्या खोडांच्या बेचक्यात पक्षी उडताना बी टाकतो . शिवडीला राहावयास गेलो ,

तेव्हा माझ्या ह्या दुभंगलेल्या मनात तरारून कोंब फुटू लागला . भौगोलिक आणि सामाजिक परिसर पाहावा लागेल , म्हणजे नेमकी कल्पना येईल . आता तुझी उत्सुकता चाळवली गेली असेल . पण हे सारं ऐकण्यापूर्वी शिवडीचा सारा भौगोलिक आणि सामाजिक परिसर पहावा लागेल,म्हणजे नेमकी कल्पना येईल .

शिवडी स्टेशन सोडलं आणि वडाळ्याच्या दिशेनं काही पावलं चालू लागर म्हणजे रेल्वे लायनीला खेटून फारच मोठी झोपडपट्टी आहे . एकमेकाला खेटून असलेली . सारी पत्र्याची घरं . घरासमोर चिंचोळ्या वाटा . एकदा आत गेलात , की चक्रव्यूहात अडकल्यासारखं गरगरायला होतं . सुरुवातीच्या सात – आठ दिवसांत दोन कारणामुळे वैतागलो . एक म्हणजे शिवडीचा जीवघेणा वास . ह्या भागात सुक्या मासळीची गुदामं . गल्लीतून जाताना नाकाला रुमाल लावायला लागायचा . पुढे ह्या वासाची सवय झाली . वासच येईनासा झाला .

ह्या वासावरून आठवलं . एकदा सुक्या बोंबलाचं पुडकं घेऊन फर्स्ट क्लासच्या डव्यात चुकून चढलो होतो . फर्स्ट क्लासचे सारे प्रवासी ‘ वास कोठून येतो ‘ म्हणून नाकांनी शोध घेत होते . वरमून लगेच पुढच्या स्टेशनात उतरलो . तिसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना हा वास मात्र आला नाही . आहे की नाही गंमत ? तर काय सांगत होतो ? शिवडीचा हा असा वास .

वैतागायचं दुसरं कारण म्हणजे ह्या चाळीशेजारूनच लोकल धावायच्या . गाडी रुळांवरून जाताना झोपमोड व्हायची . घराची खालची सारवलेली जमीन भूकंपासारखी थरथर करायची . ह्या थरथरीचीही पुढं पुढं सवय होत गेली . कुठं तरी वाचलंय एका ध्येबानं प्रेरित झालेली माणसं नरकातही स्वर्गसुख मिळवतील . असं हे स्वर्गसुख ! नरकाचंही हे केवढं बरं उदात्तीकरण !

अशा ह्या नरकात बहिणीनं संसार थाटलेला . बहिणीची या चाळीत दहा – बाय – वाराची रूम . पत्र्याच्याच भिंती . एका घरात बोललं तर सहजच दुसऱ्या घरात ऐकू जाईल , अशी अवस्था . सार्वजनिक नळाचं पाणी . घरात जी न्हाणी होती , ती दरवाज्यातच पाडलेली . बाहेर थोडंसं अंगण , त्यावर पत्र्याची शेड . अवतीभवती सारी वस्ती मुसलमानांची . सारे मुसलमान घाटावरचे , काही कोकणातले . त्यांची हिंदी भाषाही मजेशीर . ” कावळ्याने फडकं फाड्या ” किंवा ” म्हैसने गोबर हाम्या ” अशी मराठी मिश्रित . ह्या वस्तीत एक – दोन घर महारांची असावीत . मुसलमान मंडळी महाराचा बाट धरतात , त्याच्या घरचं कुणी खात – पीत नाहीत , हे जेव्हा कळलं , तेव्हा उडालोच . भारतीय जातिव्यवस्थेची मुळं ही अशी वेडीवाकडी , खोलवर रुजलेली . ह्या दहा – बाय – बाराच्या खोलीत मेव्हणा , बहीण , त्यांचं लहान मूल , सासरा ही मंडळी राहायची . ह्याशिवाय मेव्हण्याच्या मित्राचंही बिहाड होतं . कोकणस्थ . सावंत त्याचं नाव . त्याची पत्नी चंपाताई मात्र खूपच मनमिळाऊ .

ह्या सर्व गचपणात आई आणि मी राहायला आलेलो . आता आम्ही कसे राहत असू , याची तू कल्पना तरी करू शकतोस काय ? ह्या वस्तीत राहताना सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे संडासाचा . चाळीच्या संडासात जाताना अंगावर काटा उभा राह्यचा , वळवळणारे पांढरे किड , वर आलेली विष्ठा . त्यामुळं सकाळ झाली म्हणजे संडासातजाणं दिव्य वाटायचं . पुढं पुढं मी कळ दाबून ऑफिसातच संडासला जाऊ लागलो .

शिवडीला राहयला आलो खरा , पण मनातील बेचैनी जात नव्हती . सईची आणि बकुळाची आठवण विसरू शकत नव्हतो . अंगणातील बाकड्यावर गुडघ्यात मान खुपसून तासन् तास बसायचो . वाचावंसं वाटायचं नाही किंवा बहिणीच्या मुलाशी खेळण्यातही रस वाटायचा नाही . आई मात्र हवालदिल झालेली . काय करावं , हे तिला कळेना .

अशा मानसिक अवस्थेतच सलमा भेटली . आता ही सलमा कोण , म्हणून कुणा कुणाला प्रश्न पडेल . एका मुसलमानामुळं माझ्या संसाराचे धिंडवडे निघाले होते , तेव्हा एका मुसलमान पोरीसंबंधी मी ही थाप मारतोय , असंही कुणाकुणाला वाटेल . पण सलमाला मी प्रथम पाहिलं आणि तिनंच जेव्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला , तेव्हा निसर्गाच्या ह्या योगायोगाचा , सुरुवातीला मला अचंबा वाटला .

त्याचं काय झालं , सलमाचं घर समोरच्या चाळीत . दोन्ही चाळीत दहा – बारा फुटाचं अंतर . नळावरून पाणी आणायची . सलमाची वाट आमच्याच घरापासून गेलेली . घरात किंवा अंगणात बसलं , म्हणजे सलमाचं घर दिसायचं .

सलमा तशी अंगकाठीनं सडपातळ . काळ्या – सावळ्या रंगाची , तिचे बदामी डोळे मात्र काळेभोर . सोळा – सतरा वर्षांची असावी . कुरता – पायजमा घालायची . सुळसुळीत दुपट्टा . पाठीवर लांबसडक केसांची वेणी ती सोडायची . सलमा तशी खूपच आकर्षक होती . वस्तीत तिला तरुण मुलं ‘ नर्गिस ‘ म्हणून चिडवीत . तिच्या शरीराला कातीव आकार होता .

एकदा तिनं प्रश्न विचारला , ” आपको क्या होता है ? बडे उदास बैठते हो । ” मी ह्यावर खिन्न हसलो होतो . बहिणीशी आणि चंपाताईशी तिची तशी दोस्ती . केव्हा केव्हा भिंगरीसारखी घरात नाचून जायची . तिला माझ्या आयुष्याची एव्हाना कल्पना आली होती . ती म्हणायची , ” तेरी औरत यहाँ आयेगी , तो मै उसे लाठीसे मारूंगी ! ” हिनं माझ्यात काय पाहिलं होतं , कुणास ठाऊक ? मी स्वत : ला आरशात बघायचो , तेव्हा माझीच मला भीती वाटायची . गालफडं बसलेली . डोळे खोल गेलेले . त्याभोवती काळी वर्तुळ . खूप रडल्याचाही तो परिणाम असावा .

एकदा तर तिनं चक्क अंगावर पाणी टाकलं . विशेष काहीच वाटलं नाही . ही पोरगी आपल्याला का छळते , म्हणून वैतागलो होतो .

हळुहळू सलमा माझ्यावर प्रभाव टाकू लागली . मला वाटायचं , मांजर उंदराशी खेळावं तशी ती माझ्याशी खेळते आहे . दुधानं माझं तोंड पोळलं होतं . त्यामुळं हा सारा प्रकार मला हास्यास्पद वाटत होता . पण एवढं जरी होतं , तरी माझ्यावर निश्चित परंतु नकळत काही परिणाम होत होता , याची जाणीवही मला नव्हती .

सलमाचा बाप ह्या भागातला एक प्रसिद्ध दादा होता . त्याला येता – जाता एकदा – दोनदा मी पाहिलं होतं . त्याची करडी नजर पाहून टरकलो होतो . सलमाच्या आईकडं मात्र त्याचं विशेष लक्ष नसावं . त्यानं दुसरं लग्न केलं होतं . ती बाई सलमाच्या आईपक्षा खूपच तरुण होती . तिला घेऊन सलमाच्या बापानं वेगळं विहाड थाटलं होतं . पण ह्या घरातही त्याचा तेवढाच वचक होता . तो मनात आलं म्हणजे चक्कर टाकायचा .

सलमा काही माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती . तिच्याबरोबर तसं उघड बोलणं शक्यच नव्हतं . तिच्या घरात तसा कडक गोशा होता . ती कधी बाहेर पडलीच तर बुरखा घालूनच बाहेर पडे . पण सलमा खूपच चतुर वाटली . तिचं उर्दू चवथीपर्यंत शिक्षण झालं होतं , पण तिला जीवनाची समज मोठी होती .

आम्हा दोघांत आमची अशी कोड – भाषा सुरू झाली . सकाळीच ती उठली , म्हणजे ती घरातून गाण्याची एक दर्दभरी लकेर सोडायची . ” अभी ना जाओ छोड के , दिल अभी भरा नहीं ” किंवा ” सागर में आप को उतारे चले गये , हम बेखुदी में आप को उतारे चले गये ” ह्या काही गाण्यांच्या ओळी आजही आठवतात . अर्थात पुढं मीही गाण्यातच उत्तर द्यायचो . गाण्याच्या सुरावटीमुळं मला जाग यायची . लहान मुलांशी बोलता बोलता माझ्या लक्षात यायचं , की अरे , ही तर आपल्याशी बोलते आहे . संध्याकाळी मी लवकर घरी यावं , म्हणून आग्रहानं सांगू लागली . अर्थात , हा सारा संवाद तिच्या लहान भावंडाबरोबर चाले . मी काय समजायचं ते समजून चुकायचो . ऑफिसात फाइलच्या पानातून तिचे हसरे डोळे दिसायचे .

माझ्यात होत असलेला फरक मलाही कळू लागला . काल – परवापर्यंत सईचा विचार करीत असतो . आता मात्र सईची जागा सलमानं घेतलीय , ही जाणीव व्हायची . मी खूप रात्री येणारा , आता घरी लवकर येऊ लागलो . चाळीत घुसताना लक्षात यायचं , सलमा नटून – सजून माझीच वाट पाहत आहे . कुणाच्या लक्षात येणार नाही , अशी ती कुर्निसात करायची . वाटायचं , आपण राजदरबारात पोहोचलो आहोत .

चाळीतील मुसलमान स्त्रियांत कुजबूज व्हायला वेळ लागला नाही . मी आलो म्हणजे स्त्रिया माझ्याकडे संशयानं पाहायच्या . कधी जर नळावर गेलो तर म्हणायच्या ” ए रोशन , दिखता नही क्या ? जावई आया ! ” मी पुरता गोरामोरा व्हायचो . वाटायचं , आपलं आणि सलमाचं काहीच नाही . उगाच पराचा कावळा व्हायचा . घरात आलो म्हणजे आई हातापाया पडायची . म्हणायची , ” अरे लेका , तिचा बाप कर्दनकाळ हये . तुहं तुकडं तुकडं करीन ! ‘ मी म्हणायचो , “ आये , मी हद्द सोडली नाही . मी…

क्रमशः

(स्रोत:दया पवारांच्या बलुतं पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading