बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग ११).

बनगरवाडी..

आणि ती धीराने म्हणाली, “उद्या पेरायचं! “बैल ग? “मी आनते. ‘ कुटून आनतीस ? ” वाटेल तथनं आनीन. “तरी पन ” तुमाला का पंचाईत ? मी बैल आनीन. सकाळी उठून रानात जा म्हंजे झालं ! “बायको कुणाचा बैल आणणार याविषयी विचार करीत सकाळी शेकू उठला आणि टिपण खांद्यावर घेऊन , एक बैल एका हातात धरून रानात गेला. गावाकडे तोंड करून बांधावर बसला. बायको येण्याची वाट बघू लागला. तासभर गेला आणि शेकूची बायको येताना दिसली. तिच्यापाशी बैल नव्हता. शेकूचे तोंड उतरले. बायकोने पैज मारली, पण तिलाही बैल मिळालेला नाही. आता पेरणी होत नाही. सर्वांची झाल्यावर बैल मिळेल, पण त्याचा काय उपयोग? पेरले तरी पीक मागास होणार. नीट साधणार नाही. वर्षापुरते धान्य नाही आले तर उपासमार होणार.

https://bit.ly/bspmycityshrigonda

गाव सोडून रोजगारासाठी गावोगाव भटकावे लागणार. असा विचार मनात येऊन तो कष्टाळू धनगर दुर्मुखला आणि त्याची दणकट बायको रानात आली. ‘ का ग, मिळाला न्हाई बैल ?” न मिळायला काय झालं ? जुपा टिपन ! “पर बैल कुटाय ?” हाय मी. एका बाजूला बैल जुपा, एका बाजूनं मी रेटीन !” बायकोच्या या बोलण्याने शेकू थरारून गेला. काय बोलावे हे त्याला कळेना. ” छ्या, असंग कसं ? ” पण त्या बाईने मनाची तयारीच केली होती. तिच्या शरीरावर तिचा विश्वास होता. “कसं न्हाई आन् काय न्हाई. टिपन जुपा! ” नवरा जागचा हलत नाही, खाली मान घालून बसला आहे, बघताच ती उठली आणि तिने बैल जोडला. एकीकडचे जू आत होऊन आपल्या खांद्यावर घेतले आणि ओरडून ती म्हणाली, “ हां, आवळा. मग मनाचा धोंडा करून तो दुबळ्या शरीराचा नवरा उठला आणि चाड्यावर मूठ धरून त्याने इशारा केला. बैल हलला. बाई हलली.

टिपणींचे फण ओल्या मातीत घुसले, आणिजमीन फाडत चालले. शेकूने बाजरीची मूठ सोडली. पोकळ बांबूतून दाणे खाली उतरले आणि त्यांनी जमिनीवर उड्या घेतल्या. अंगच्या बळाने शेकूची बायको बैलाबरोबर टिपण ओढीत राहिली. सकाळपासून दुपारपर्यंत शेकूने पेरले. मग धापा टाकणाऱ्या बायकोने आणि त्याने बसून मुकाट्याने भाकरी खाल्ली. शेकूला काही बोलणे झाले नाही. बायको काहीतरी बोलली. पुन्हा दोघांनी मिळून रासणी केली. म्हणजे कुळव फिरवून उपडे बी मातीखाली झाकून टाकले. संध्याकाळ होईपर्यंत दोन एकर रान या तिघांनी पेरून टाकले. सूर्य मावळला तेव्हा दमगीर होऊन तिघेही परत घराकडे आली. ही बातमी गावात कळली, तेव्हा सर्वांनी नवल केले. त्यात कौतुकाचा, आश्चर्याचा, क्वचित कुचेष्टेचाही भाग होता. रात्री शाळेकडून घराकडे जाताना शेकूच्या घरापुढे मी क्षणभर उभा राहिलो. आत चिमणीच्या प्रकाशात शेकूची बायको भिंतीला लागून पालथी पडली होती, आणि तिच्या पाठीवर उभा राहून शेकू तिचे अंग तुडवीत होता.

त्याने दोन्ही हातांनी भिंतीचा आधार घेतला होता आणि सावकाशपणे तो एकएक पाऊल उचलून बायकोची दुखरी पाठ तुडवीत होता.’ शनिवारची शाळा सोडून मी गावी गेलो आणि सहा कोस जमीन तुडवून परत आलो, तेंव्हा फार थकून गेलो होतो. हे जाण्या येण्याचे कामं खरोखरिच कंटाळवाणे होते. शारीरिक श्रमांचा भाग सोडला तरी एवढा वेळ गाडीवाट तुडवीत येणे मला जिकिरीचे वाटे. शाळा सोडून निघायचे म्हणजे सकाळी दहा – अकरा वाजत. घरी पोचेपर्यंत दुपार टळे. तिथे पोचताच आईच्या हातचे जेवून मी कलंडे, तो संध्याकाळपर्यंत! रात्री झोप. रविवारी सकाळचे जेवण होते न होते, दिवस कलतो न कलतो, तो परत जाण्याचे वेध लागत. रात्री झोपतेवेळी पुन्हापुन्हा मी आईला बजावी, “आई, पहाटे लवकर जाईन, दशम्या कर. ‘ती बिचारी एक झोप घेऊनच उठे आणि स्वयंपाकाला लागे.

चांदणी उगवायच्या सुमारास पाठीशी दशम्यांची पिशवी मारून मी बनगरवाडीच्या रस्त्याला लागलेला असे. प्रत्येक शनिवारी जाणे – येणे ही काही फारशी सुखद गोष्ट नव्हती, पण जावे वाटे. घराची ओढ ही काही वेगळीच गोष्ट आहे. माझ्या या पायपिटीची कणव आयबूलादेखील येई. तो म्हणे, “मास्तर, बिऱ्हाड कवा करताय ? “का रे ? “पोटाचं हाल होत्यात. लगीन करा आन् बिहाड करा. लगीन करून बिहाड करायचे ते पोटाचे हाल होऊ नयेत म्हणून! नाहीपेक्षा लग्नाची तशी जरुरी आयबूला वाटत नसावी. खरे आहे. त्या बापड्याला जे जाणवले तेच त्याने बोलून दाखवले. हाताने तुकडे भाजून खायचा कंटाळा कोणा पुरुषाला येत नाही? पण केवळ त्यासाठी सगळे सोडून लग्न करावे, असा विचार माझ्या मनातही आला नाही. फारच कंटाळा आला म्हणजे एखादा आठवडा मी जाण्याचे टाळत असे. गेलो म्हणजे सोमवारचा मंगळवार करीत असे. एरवी पायपीट चालू होती. या खेपेला उशिरा निघालो होतो. गावात आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मेंढरे अद्याप रानातून परतली नव्हती.

या खेपेला रामाचे पैसे मी बदलून आणले होते. सर्व वाटेने येताना दशम्यांच्या पिशवीत असलेल्या धनाचे ओझे माझ्या डोक्यावर होते. ती पिशवी गच्च धरून चालताना, या वेळी अचानक कोणी आले आणि आपल्याला लुटले तर केवढा भयंकर प्रसंग येईल असे वाटून मागेपुढे बघत मी फार झपाट्याने पाऊल उचलले होते. गावात शिरताच ते ओझे, दडपण निघाले. खोलीचे दार उघडून मी दिवा लावला आणि हातपाय धुवून जरा टेकून बसलो. खूप चालून आल्यावर पाय पसरून बसणे ही किती सुखाची गोष्ट असते, हे कळण्यासाठी ते अनुभवले पाहिजे ! पावसाळी हवेमुळे भिंतीला लोणा आला होता. चारदोन दिवस मोकळी हवा न आल्यामुळे खोली कुबट झाली होती. कोपऱ्यात बसून राहिलेले डास उठले होते. त्यांची कंटाळवाणी गुणगूण चालली होती.

मी फार थकलो होतो. कंटाळलो होतो. डोळे मिटायला लागले होते. पण दिवेलागणीच्या सुमाराला झोपणे बरे नव्हे. लक्ष्मी यायच्या या वेळी झोपणे म्हणजे करंट्याचे लक्षण. पण नशीबवान असला तरी थकल्यावर काय करतो? शरीर करंट्याचेही सारखे आणि भाग्यवंताचेही सारखे. ते थकले की विश्रांती मागणारच. ते विश्रांती घेऊ लागले की डोळे मिटणारच आणि म्हणजे झोप आलीच. हे बरे नव्हे, हे चांगले नव्हे !

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading