बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १३).

बनगरवाडी.

“शनिवारी दुपारी घरी जाताच मी वेळ बघून पैसे गेल्याची गोष्ट वडिलांच्यापाशी बोललो. माझे बोलने शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी प्रथम मी ही जबाबदारी स्वीकारली याबद्दल मला दोष दिला. मी समर्थनासाठी म्हणालो, “त्याचा विश्वास मला मिळवायचा होता. त्यासाठी मी ही जोखीम घेतली.’ “पण तू असाही विचार करायला पाहिजे होतास की, हे पैसे आपल्या हातून गेले, तर तेवढे भरण्याची ताकद आपल्यापाशी नाही, आपल्या घरातल्या माणसांपाशी नाही. ते जर भरता आले नाहीत तर आजपर्यंत मिळवलास तो सगळा विश्वास या गोष्टीपायी जाईल !“हे झालं. माझ्या हातून चूक घडली आहे. पण मी तुमच्यापाशी सल्ला मागतो आहे.” वडील थोडा वेळ गप्प राहिले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

निष्कारण उलाढाली केलेल्या त्यांना खपत नसत. आपले काम बरे आपण बरे असे असावे, पैशासारख्या जोखमीच्या बाबीत तर मुळीच पडू नये, पैशामुळे हमखास वाईटपणा येतो, असे त्यांचे नेहमी सांगणे असे. त्यामुळे मी अंगावर आलेली ही भानगड सांगताच ते कठोरपणे बोलले. पण पुन्हा त्यांचे त्यांनाच वाटले असावे की, ‘तू केलंस; तुझं तू निस्तार’ असे या पोराला सांगणे बरे नव्हे. ते म्हणाले, “तू स्पष्टपणे त्या मालकाला सांग की पैसे चोरीला गेले. तुमच्याच गावात गेले. सर्व जण मिळून तपास करू या. चोरी सापडेल. तो फारच खळखळ करायला लागला तर म्हणावं, मी काही कोणी उपरा नाही. घरदार, शेतीवाडी असलेला माणूस आहे. सरकारी नोकर आहे. तुझे पैसे परत करीन! “त्यांनी सांगितले. मलाही पटले, पण असे सांगणे माझ्याकडून होणार नाही, असे मात्र राहून राहून वाटू लागले.

रामा विश्वास ठेवणार नाही. गाव विश्वास ठेवणार नाही. पोलिसात वर्दी देऊनही त्याचा उपयोग होईलच असे नाही. निष्कारण गावात शिपाई गोंधळ घालतील, कुणालाही धरून मारहाण करतील, सगळ्या गावाला त्रास होईल. यापेक्षा पैसे गेले हे न बोलता, आपल्या पदरचे हवाली करावेत आणि कानाला खडा लावून गप्प बसावे, असाच विचार मनात पक्का होऊ लागला. पैसे कुठून मिळतील याची गणिते सुरू झाली, पण वाट कुठेही दिसेना. तीनचार मित्रांकडे, एकदोघा सावकारांकडे मागणी केली; पण मला पोराला एवढे पैसे देणार कोण? कुणी वडिलांचा हवाला मागत. कुणी चक्क नकार देत. फिरून फिरून मी कंटाळलो. तीनशे – साडेतीनशे रुपयेही आपण उभे करू शकत नाही, याचे मला वाईट वाटले. माझे तोंड चिमणीसारखे झाले. रविवारी रात्री मी जेवलोही नाही. बराच वेळ झोपही आली नाही. माझी ही तडफड आईने जाणली आणि अंधारातच ती उठून माझ्यापाशी आली. हळू आवाजात म्हणाली, “राजाराम, जागाच आहेस का रे अजून? ” मी ‘ हूं ‘ म्हटले आणि त्याच वेळी तिचा खरबरीत तळवा माझ्या अंगावरून फिरला. “हे बघ, पैसे हरवले ते सापडतात का ते बघ.

धनगर फार पाठीला लागला, तर तुझ्या आजोळी असलेलं माझं घर वीक . त्याचे येतील चारपाचशे रुपये. आणि देऊन टाक . आहे काय एवढं काळजी करण्यासारखं? “आईच्या या बोलण्याने मला धीर आला. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे, तशीच जरुरी पडली तर रामाचे पैसे मी भरू शकेन, अशी शक्यता निर्माण झाली. आणि झाली गोष्ट रात्रीच्या सभेमध्ये गावापुढे मांडावी असा निश्चय मी मनाशी केला. पण अजूनही या दोन्ही गोष्टी मला अवघड वाटत होत्या. आईचे घर विकणेही मला नको होते आणि पैसे हरवले असे रामाला सांगणेही मला नको होते. चापात अडकल्यासारखी ही अवस्था अशीच राहिली आणि वरवर निष्काळजी असल्याचे आईला भासवून मी सोमवारी पहाटे बनगरवाडीची वाट धरली. सोमवारची शाळा सोडून मी माझ्या खोलीवर आलो. रात्री शाळेपाशी मंडळी जमतील, तेव्हा तिथे चोरीबद्दलची वर्दी द्यायची असे मी ठरवून टाकले. हे सगळे करण्यापूर्वी एकवार कारभाऱ्याचा सल्ला घ्यावा, या हेतूने मी आयबूला म्हाताऱ्याकडे पाठवून दिले. ‘ थोडा वेळ येऊन जा.

मास्तरांचे जरुरीचे काम आहे’ असा निरोप त्याच्या हाती पाठवला. आयबू निघून गेला आणि झाली गोष्ट पटेल अशा रीतीने म्हाताऱ्याला कशी सांगावी याचा विचार करीत मी बसून राहिलो. एवढे सगळे झाले तरी मला मनात कुठे तरी सारखे वाटत होते की हे प्रकरण काही आपल्या अंगावर शेकणार नाही. काही विशेष न घडता, सहजासहजी गुंता सुटेल. आपण उगाच बाऊ करतो आहोत. पैसे चोरीला गेले नाहीत, फक्त ते कुठे तरी चुकून राहिलेत, हरवले…असे मला का वाटत होते हे काही सांगता येणार नाही, पण वाटत होते हे खरे. यात कोठे मोठा धोका आहे असे काही भासत नव्हते खरे. आयबू म्हाताऱ्याकडे जाऊन आला तो नाखूष असा. तो नाखूष झाला की त्याच्या कपाळावर आठ्या पडत, गाल घुप होत आणि दोन्ही हातांची घडी छातीवर येई. तो दारातून येत होता तेवढ्यातच मी विचारले, ” का, म्हातारा भेटला नाही ? ‘भेटला की.

न भेटायला तो काय पंतसरकार काय? “मग काय म्हणालाह? “येत नाही म्हणाला. जाऊन सांग तुज्या मास्तरला, मला सवड न्हाई. सवड मिळेल त्या दिवशी येईन।’ मी क्षणभर थंड झालो. कारभाऱ्याकडून असे काही उत्तर कधीकाळी मला मिळेल याची पुसट कल्पनाही मला नव्हती. नेहमी ‘मास्तर – मास्तर” करणारा, अत्यंत समजूतदारपणे वागणारा हा प्रेमळ म्हातारा असा तिरसटासारखा उलट जबाब पाठवणार नाही. मी आयबूला विचारले, “चेष्टेनं म्हणाला का खरंच? “त्यात चेष्टा कसली? चांगला कावून बोलला! “आयबूच्या नाकपुड्या रागाने फुगत होत्या.. मास्तराच्या बोलण्याला धनगराने असे उत्तर द्यावे ही गोष्ट त्याच्या अगदी जिव्हारी लागली होती. थांबून तो पुन्हा म्हणाला, “तुमच्यावर पार बिगडलेला दिसला तो! “मला काही कळेना. म्हातारा कशासाठी बिघडला ? माझ्या हातून काय अपराध घडला? टोपी घालून मी तडक म्हाताऱ्याच्या घरी गेलो. चुलीपाशी ठेवलेल्या पणतीचा अपुरा उजेड घरात होता. चुलीतल्या धुराने घर भरले होते.

अंजी संध्याकाळच्या भाकऱ्या बडवीत होती. मी येताच तिने चोरून माझ्याकडे बघितले. त्या बघण्याचा अर्थ असा होता, की मी चोळी शिवली हे म्हाताऱ्याला सांगू नका. भिंतीला पाठीचा रेटा देऊन गुडघे उभे करून कारभारी बसला होता. मी येताच त्याने ‘या’ही म्हटले नाही. त्या बुटक्या घरात उभे राहून मी म्हटले, ‘काय बाबा, निवांत बसलाय? “म्हातारा केवळ ‘ हूं ‘ म्हणाला, आणि गप्पच बसला. मला मोठे चोरट्यासारखे झाले . धुराने काळवंडलेल्या वरच्या छपराकडे बघत मी उभा राहिलो. अंजीलाही चमत्कारिक झाला. एकदोन वेळा, आळीपाळीने तिने माझ्याकडे आणि म्हाताऱ्याकडे बघितले. तिचा चेहरा गोंधळला होता. म्हाताऱ्याच्या वागण्यातला अर्थ तिलाही

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी य कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading