बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १४).

बनगरवाडी..

लागत नसावा. चुलीसाठी बाहेरच्या काटक्या मोडून आणण्याचे निमित्त करून ती बाहेर पडली. मी आणि म्हातारा दोघे राहिलो. तो तसा आखडून बसलेला आणि मी आता काय करावे अशा अवस्थेत उभा राहिलेला. चुलीतला जाळ विझला होता आणि धूर जास्त निघू लागला होता. वर गाडग्यात शिजत असलेल्या कालवणाचा वास वाफेतून बाहेर येत होता. रटरट आवाज होत होता. दारातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने पणतीची ज्योत डुलत होती. भितीवर पडलेल्या काळ्या सावल्या हलत होत्या. मला काही बोलणे सुधरेना. उगीच मी उभा राहिलो आणि हळू आवाजात म्हणालो, “मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं बाबा. एक जरुरीची गोष्ट सांगायची होती.

https://bit.ly/bspmycityshrigonda

‘म्हाताऱ्याने मुळीच लक्ष दिले नाही. अंजी काटक्यांची जुडी हातात घेऊन आत आली. वाकून चूल फुकू लागली. म्हातारा खणखणीत शब्दात म्हणाला, “तू जा आपला. मला काय सांगू नकंस. मी काय ऐकनार न्हाई ! “आणि जागचा उठून तो मला डावलून दारातून बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. त्या अपमानाने माझा चेहरा गोरामोरा झाला. कानशिलं तापली . घुटका गिळून मी बाहेर पडू लागलो, तेव्हा अंजी हलक्या आवाजात म्हणाली, “त्या भाड्या दाद्यानं कायतरी सांगटलंय म्हाताऱ्याला. मी विचारले, “काय? “कुनाला ठावं काय वकला ते. लई हाय आगलाव्या. मी ऐकून घेतले.

ही तरणीताठी मुलगी घरात एकटी असताना तिच्याशी बोलत उभे राहणे बरोबर नाही असे वाटले आणि काहीही न बोलता मी बाहेर पडलो. अंधारातून ठेचा खात खोलीवर आलो. आयबू दिवा लावून बसला होता. काही वेळ दोघेही एकमेकाशी बोललो नाही. पण ऐकली गोष्ट बोलल्याशिवाय मला राहवेना. “दादू बालट्यानं कारभाऱ्याला काही तरी सांगितलंय, आयबू. त्यानं माझ्यावर बिघडला. ‘आयबूला एकाएकी कोडे उलगडल्यासारखे झाले. ‘असं का? “होय. मला कळलं. आणि ते खरंही असेल. ” हायेच. बालट्या तुमच्यावर भारी जळतो, मास्तर ! “पण जळण्याचं काही कारण नाही. मी त्याचं काय केलंय ? “

तुम्ही गावात आल्यापासनं त्याच्या टगेपनाला कुणी विचारंना. “तो टग्या आहे का ? ” तर ! तो जगतो कशावर ? ह्याची टोपी त्याला घालायची, त्याची ह्याला घालायची. चांगला गोल टग्या हाय तो ! ” एखाद्या कादंबरीत, नाटकात खलनायक असावा, तसा हा बालट्या माझ्या मागे का लागला होता, हे मला कळत नव्हते. मी त्याचे काही वाईट केले नव्हते, काही अपराध केला नव्हता. पण सुरुवातीपासूनच तो माझ्या डाई पडला होता. जणू त्याचे माझे वैर हे नैसर्गिकच होते. कावळ्या – घुबडाचे, सापा – मुंगसाचे असते तसेच. नाहीपेक्षा माझ्या गावात येण्याने त्याचे वजन कमी झाले, टग्या म्हणून त्याला कोणी विचारीनासे झाले, त्याचा सल्ला घेईनासे झाले, म्हणून तो माझा वैरी झाला असे मानावे, तर अगदी पहिल्या भेटीतच त्याने मला का फटकावले होते? कदाचित माझ्या अगोदर आलेल्या मास्तराने त्याचा काही अपराध केला असेल, आणि समस्त मास्तरजातीविषयी त्याला राग वाटत असेल.

पण माझ्या इतक्या दिवसांच्या वागणुकीने तो जायला हरकत नव्हती. आयबू उठला आणि भाकरी आणण्यासाठी बाहेर निघून गेला. अगोदरच रामा बनगराच्या पैशाने माझी झोप उडवली होती. त्यात बालट्याचे हे जुने दुखणे पुन्हा उमटले. सुरुवातीपासूनच माझ्या मागे असणारा, एकच एक असा गावातला वजनदार माणूस, कारभारी, तोही वाकडा झाला. अलीकडे मला थोडा विश्वास उत्पन्न झाला होता. गावात आपण काही चांगले काम करू, खात्याकडून शाबासकी मिळवू, अशी उमेद निर्माण झाली होती, तोवर या घटना घडल्या. माझे मन उदास झाले. उठून चूळ भरली. घरून बांधून आणलेल्या भाकरी सोडल्या.

एकटाच खात बसलो. त्या खाण्याचा आवाजही मला मोठा वाटू लागला. आणि मग आनंदा रामोशी आला. दाराबाहेरच उभा राहून म्हणाला, “एकलेच हाय का मास्तर? “होय, एकटाच आहे. जेवतोय, का रे आनंद? “जेवा. मी येतो माघारी. ”झालं जेवण. काही काम आहे का? “मी भाकरी गुंडाळून ठेवल्या. हात धुतले. आणि आनंदा आत येऊन बसला. खोलीचे दार त्याने लावून घेतले. हलक्या आवाजात त्याने विचारले, “तुमचे काय पैसे गेलेत का खोलीतनं?” मला एकाएकी धक्का बसला. या कानाची त्या कानाला ठाऊक नसलेली ही गोष्ट या रामोशाला कळली कशी, सांगितली कुणी? ज्या अर्थी पैसे गेलेले याला माहीत आहेत त्या..

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading