बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १५).

बनगरवाडी

लागत नसावा. चुलीसाठी बाहेरच्या काटक्या मोडून आणण्याचे निमित्त करून ती बाहेर पडली. मी आणि म्हातारा दोघे राहिलो. तो तसा आखडून बसलेला आणि मी आता काय करावे अशा अवस्थेत उभा राहिलेला. चुलीतला जाळ विझला होता आणि धूर जास्त निघू लागला होता. वर गाडग्यात शिजत असलेल्या कालवणाचा वास वाफेतून बाहेर येत होता. रटरट आवाज होत होता. दारातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने पणतीची ज्योत डुलत होती. भितीवर पडलेल्या काळ्या सावल्या हलत होत्या. मला काही बोलणे सुधरेना. उगीच मी उभा राहिलो आणि हळू आवाजात म्हणालो, “मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं बाबा. एक जरुरीची गोष्ट सांगायची होती.’ म्हाताऱ्याने मुळीच लक्ष दिले नाही.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अंजी काटक्यांची जुडी हातात घेऊन आत आली. वाकून चूल फुकू लागली. म्हातारा खणखणीत शब्दात म्हणाला, “तू जा आपला. मला काय सांगू नकंस. मी काय ऐकनार न्हाई!” आणि जागचा उठून तो मला डावलून दारातून बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. त्या अपमानाने माझा चेहरा गोरामोरा झाला. कानशिलं तापली. घुटका गिळून मी बाहेर पडू लागलो, तेव्हा अंजी हलक्या आवाजात म्हणाली, “त्या भाड्या दाद्यानं कायतरी सांगटलंय म्हाताऱ्याला. ‘मी विचारले, “काय ? “कुनाला ठावं काय वकला ते. लई हाय आगलाव्या. मी ऐकून घेतले. ही तरणीताठी मुलगी घरात एकटी असताना तिच्याशी बोलत उभे राहणे बरोबर नाही असे वाटले आणि काहीही न बोलता मी बाहेर पडलो. अंधारातून ठेचा खात खोलीवर आलो. आयबू दिवा लावून बसला होता. काही वेळ दोघेही एकमेकाशी बोललो नाही. पण ऐकली गोष्ट बोलल्याशिवाय मला राहवेना. “दादू बालट्यानं कारभाऱ्याला काही तरी सांगितलंय, आयबू. त्यानं माझ्यावर बिघडला. ‘आयबूला एकाएकी कोडे उलगडल्यासारखे झाले. ‘असं का? “होय. मला कळलं. आणि ते खरंही असेल.

“हायेच. बालट्या तुमच्यावर भारी जळतो, मास्तर! “पण जळण्याचं काही कारण नाही. मी त्याचं काय केलंय? ” तुम्ही गावात आल्यापासनं त्याच्या टगेपनाला कुणी विचारंना. “तो टग्या आहे का ? “तर ! तो जगतो कशावर? ह्याची टोपी त्याला घालायची, त्याची ह्याला घालायची. चांगला गोल टग्या हाय तो! “एखाद्या कादंबरीत, नाटकात खलनायक असावा, तसा हा बालट्या माझ्या मागे का लागला होता, हे मला कळत नव्हते. मी त्याचे काही वाईट केले नव्हते, काही अपराध केला नव्हता. पण सुरुवातीपासूनच तो माझ्या डाई पडला होता. जणू त्याचे माझे वैर हे नैसर्गिकच होते. कावळ्या – घुबडाचे, सापा- मुंगसाचे असते तसेच. नाहीपेक्षा माझ्या गावात येण्याने त्याचे वजन कमी झाले, टग्या म्हणून त्याला कोणी विचारीनासे झाले, त्याचा सल्ला घेईनासे झाले, म्हणून तो माझा वैरी झाला असे मानावे, तर अगदी पहिल्या भेटीतच त्याने मला का फटकावले होते? कदाचित माझ्या अगोदर आलेल्या मास्तराने त्याचा काही अपराध केला असेल, आणि समस्त मास्तरजातीविषयी त्याला राग वाटत असेल. पण माझ्या इतक्या दिवसांच्या वागणुकीने तो जायला हरकत नव्हती. आयबू उठला आणि भाकरी आणण्यासाठी बाहेर निघून गेला.

अगोदरच रामा बनगराच्या पैशाने माझी झोप उडवली होती. त्यात बालट्याचे हे जुने दुखणे पुन्हा उमटले. सुरुवातीपासूनच माझ्या मागे असणारा, एकच एक असा गावातला वजनदार माणूस, कारभारी, तोही वाकडा झाला. अलीकडे मला थोडा विश्वास उत्पन्न झाला होता. गावात आपण काही चांगले काम करू, खात्याकडून शाबासकी मिळवू, अशी उमेद निर्माण झाली होती , तोवर या घटना घडल्या . माझे मन उदास झाले. उठून चूळ भरली. घरून बांधून आणलेल्या भाकरी सोडल्या. एकटाच खात बसलो. त्या खाण्याचा आवाजही मला मोठा वाटू लागला. आणि मग आनंदा रामोशी आला. दाराबाहेरच उभा राहून म्हणाला, “एकलेच हाय का मास्तर ? ” “होय, एकटाच आहे. जेवतोय. का रे आनंद ? “जेवा. मी येतो माघारी.”झालं जेवण. काही काम आहे का ? ” मी भाकरी गुंडाळून ठेवल्या. हात धुतले. आणि आनंदा आत येऊन बसला. खोलीचे दार त्याने लावून घेतले. हलक्या आवाजात त्याने विचारले, ” तुमचे काय पैसे गेलेत का खोलीतनं ? “मला एकाएकी धक्का बसला. या कानाची त्या कानाला ठाऊक नसलेली ही गोष्ट या रामोशाला कळली कशी, सांगितली कुणी ?

ज्या अर्थी पैसे गेलेले याला माहीत आहेत त्या अर्थी ते कुणी, कशासाठी दिले होते, हेही याला कळले असेल. म्हणजे इतके दिवस अबूला जपण्याची जी खटपट मी केली ती सगळी व्यर्थच गेली. रामाने मोडण्यासाठी दिलेले पैसे मी खाऊन बसलो ही गोष्ट जगजाहीर झाली. आता याला खरी गोष्ट सांगावी का टाळाटाळ करावी, उडवाउडवीची उत्तरे द्यावी ? मी चांगलाच गोंधळून गेलो आणि माझ्या तोंडून शब्दही गेले” हो. तुला कुणी सांगितलं ? “मला ठाऊक हाय. “पण कसं ?” आनंदा शांतपणे म्हणाला, “मीच ते नेले होते. “माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. मोठ्या डोळ्यांनी आणि उघडल्या तोडाने मी नुसता बघत राहिलो. आनंदाने बरोबर आणलेले धोतराचे गाठोडे सोडले आणि त्याने बंदोबस्ताने ठेवलेले पैसे काढून माझ्यापुढे ठेवीत तो म्हणाला, “जसं नेलं तसं परत आणलं. ही घ्या जोखीम! “मी पैशांवर झडप घातली. ते आपल्या ताब्यात घेतले. मनावरचे प्रचंड ओझे कमी झाले. हा आनंदा रामोशी परमेश्वरासारखा माझ्या संकटाच्या वेळी उभा राहिला असे मला वाटले. मग आनंदा म्हणाला, “ मोजून बगा. मी तीन रुपये धा आने खाऊन बसलोय.

ते काय माघारी देनार न्हाई. पर बाकी तुमचं सगळं रुपयं तसंच हायेत! त्या रामोशाचा मला राग आला आणि त्याच्याविषयी लोभही वाटला. ‘आनंदा, रुपये नेलेस कशाबद्दल ? तुला हे मिळाले कुठं ? ” आनंदा म्हणाला, ” खंडोबाची आण मास्तर, न्यावं म्हणून मी रुपयं नेलं न्हाईत. तुमापाशी भाकरी मागावी म्हणून आलो, तर तुमाला झोप लागलेली. निजलेल्याला जागं कसं करावं? तुमी आणलेलं भाकरीचं गटुळं तिथंच दिसलं, घमाघमा वास येऊ लागला. म्हटलं, जावं घेऊन भाकरी. झालं मास्तर जागं तर त्येना वाटल नेल्या कुत्र्यानं. असा इचार केला आन् मुकाट्यानं गटुळं घेऊन घरी गेलो. गठुळं सोडलं तर त्यात भाकरी होत्या, आन् मुलूखभर रुपयं बी होतं. ते बघताच वासना झाली. “ठीक. पण माझा इकडं गळा गुंतला होता. तो कसा गुंतला? पांडुरंग तुमच्या पाठीशी हाय, मास्तर, मी जातीचा बेरड.

एवढं रुपयं पचवायला काय जड नव्हतं. पर आठ दिवस रुपयं जवळ ठेवलं आन् सारकं मनात याला लागलं – लेका आनंद्या , मास्तरचा पैका का रं घेतलास ? मास्तर काय जहागीरदार का सावकार! “त्याला हा धोका कशापायी? कायम बैठकीत बसून हा असा दगा देनं खरं न्हाई. आन् मास्तर आज हे रुपये पायापाशी आनल्यात तुमच्या. आता फिर्याद करा, तुरुंगात डांबा, न्हाई तर मोकळं सोडा. “ही सगळी हकीकत आनंदाने इतक्या सहज, इतक्या मोकळेपणाने सांगितली की त्याला काय बोलावे हे मला सुचेना . लहानसान चोऱ्या करणाऱ्या या रामोशाने मोठीच मजल गाठली होती. पण आपणहून त्याने रक्कम माघारीही केली होती. बरे, चोरी करावी म्हणून तो माझ्या घरात शिरला होता, पण ती भाकरीची. रुपये नेण्याचा त्याचा बिलकूल इरादा नव्हता.

तेच त्याच्याबरोबर गेले. आता तो सांगत होता की माझी कणव घेऊन त्याने ते माघारी केले. पण खरी गोष्ट ही नसणार. चोरी आज ना उद्या उघडकीला नक्की येणार, या विचाराने आनंदा सज्जन झाला. लहानसान चोऱ्या करूनसुद्धा आठपंधरा दिवसांनी तो त्या मालकांपाशी कबूल करीत असे. गेलेला माल इतका मामुली असे की चार शिव्या हासडण्यापलिकडे कोणी त्याला काही करत नसे. कारण आनंदा म्हणे: मागून कोणी देत नाही म्हणून मुकाट्याने न्यावे लागते. आणि मी जास्त कुठे नेतो? पोटाला लागेल तेवढेच मला पाहिजे असते. गुरे खातात, पाखरे खातात, कीडवाळवी खाते, तसे आनंदाने खाल्ले म्हणा आणि हळहळू नका. मांडी ठोकून आनंदा माझ्यापुढे बसला होता आणि मी काय बोलतो याच्याकडे त्याचे ध्यान होते. मला संतापच आला. या माणसाचे पुन्हा तोंडही बघू नये असे वाटले. त्याच्या या मूर्खपणामुळे मला किती यातना भोगाव्या लागल्या होत्या! गेले आठ दिवस माझा जीव कसा झाला होता! मोठ्याने ओरडून मी म्हणालो, ‘शहाणा आहेस. जा. तुझं थोबाडसुद्धा मला पुन्हा बघायचं नाही. आनंदा काही बोलला नाही. कानावर ठेवलेली अर्धी विडी काढून त्याने दिव्यावर पेटवली आणि तो निघून गेला. मी उठलो आणि तडक रामाच्या घरी गेलो. त्याचे पैसे त्याच्या हवाली केले, आणि सुटकेचा श्वास सोडला. रामा म्हणाला, “काय घाई व्हती मास्तर ? पैसे तुमच्या घरी व्हतं म्हणजे माझ्या घरी व्हतं. “मी म्हणालो, “खरं आहे!” मध्यंतरीच्या काळात काय घडामोडी झाल्या याची त्याला काहीच कल्पना नव्हती. परत येताना मी आवर्जून रामाला सांगितले, “पैसे घरात ठेवू नका. गुंतवून टाका. जमीन घ्या, आणखी मेंढरं घ्या, पण जोखीम अशी घरात ठेवू नका. वेळ सांगून येत नाही. ‘पुढे काही दिवसांनी रामाने त्या पैशाची मेंढरे घेतली. त्याचे खांड खूप मोठे झाले.

जीरायतातील बाजरी हळूहळू वाढली. पोटरीतुन लांब दांड्याची शेलाटी कनसबाहेर पडली. हिरव्या ताटांवर तपकिरी रंगाची कणसे सर्वत्र डुलू लागली आणि लवकरच जांभळ्या फुलोऱ्यांनी फुलून गेली. तो नाजूक फुलोरा डवरला आणि लहान मुंग्या कणसांवर चढू लागल्या. मधमाशा कणसांभोवती फिरूं लागल्या. पिवळ्या रंगाची लहान फुलपाखरे जोडीजोडीने तरंगत येऊन बसू लागली. कधी धिंगाणा घालणाऱ्या वाऱ्यावर फुलोरा उडू लागला आणि कणसे उघडी पडू लागली. बाजरीच्या बरोबरीने, आत टाकलेले कडधान्याचे वेल पसरू लागले. मटकीच्या शेंगांचे झुपके कुठेकुठे दिसू लागले. हुलग्याला जोम आला.

तुरीच्या उभार झाडांवर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागल्या. भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या. बांधाबांधावर उगवलेले कुडूचे पांढरे – जांभळे तुरे लागले. आणि लवकरच फुलोऱ्यांनी डवरलेली कणसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी टचटचली. चिवळांचे थवे भरारत येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले. ज्यांची राने होती ते लोक भल्या पहाटे उठून राखणीसाठी रानात जाऊ लागले. बनगरवाडीतील बायकापोरे रोजगाराला शेजारच्या गावातील रानावर जाऊ लागली. हिरवेहिरवे खाऊन मेंढरे गुबगुबीत दिसू लागली. त्यांच्या अंगावर चरबी वाढली. नडीअडचणीला धनगर बाजार दाखवू लागला, तेव्हा त्या गुबगुबीत मेंढरांना भाव चांगला येऊ लागला. बाजरी चांगली तयार झाली. पोरेठोरे लिंबूर खाऊन तयारी धरू लागली. दसरा आला. शिलंगणाच्या सोन्याबरोबर बाजरीची नवी कणसेही लोकांनी वाटली आणि मग काढणीची गडबड सुरू झाली. पाच महिने वाढलेली बाजरीची जोमदार धाटे विळ्याच्या तडाख्यांनी आडवी झाली. ती तशीच जमिनीवर पडू दिली तर भुरळुका चिमण्या कणसे खातील म्हणून लगोलग पेंढ्या एकत्र उभ्या करून झोपडीच्या आकाराच्या बुचड्या घातल्या गेल्या. त्या दडप्यामुळे, उबेमुळे, बाहेर न आलेले दाणे कणसाबाहेर पडले आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बुचड्या उलगडून लहानसहान कोथळ्या घातल्या गेल्या. एकमेकांना लावून उभ्या केलेल्या त्या पेंढ्या सूर्याचे ऊन्ह घेऊ लागल्या.

ओले दाणे वाळू लागले. सकाळ – संध्याकाळ होले, चिमण्या त्यांच्यावर गर्दी करू लागल्या. ज्याला नड होती त्याने मोडणी करून कणसे बडवली. घरची जनावरे कुरकुरीत सरमाड खाऊ लागली. घरची माणसे बाजरीच्या हिरव्यागार भाकरी खाऊ लागली. ज्यांच्या घरी चंदी होती त्यांनी घाई केली नाही. बाकीची कामे करण्यासाठी बाजरी काढण्याची चालढकल चालविली. पण आज ना उद्या त्यांनाही कोथळ्या उलगडणे भाग होते. हळूहळू कडधान्यही निघाले. हुलग्याच्या शेंगांचे खुळखुळे वाजू लागले, तेव्हा हुलगा निघाला, भुईमूग निघाला, तूर निघाली, मटकी निघाली. मोकळ्या झालेल्या रानातून जनावरे हिंडू लागली. मेंढरे चगळचोथा खाऊ लागली. बाजरीची बरड, तांबडी राने उजाड दिसू लागली. कडक थंडी पडू लागली.

रात्री सकाळी चगळचोथा जमवून लोक शेकटा घेऊ लागले. त्यांचे ओठ, तोंडे थंडीने तडकली. धनगरांची काळी अंगे काळ्या घोगडीतून निघेनात. निवळशंख ओढ्याच्या पाण्यावर, विहिरीवर सकाळच्या प्रहरी वाफा दिसू लागल्या. दरम्यान श्रावणमासी पेरलेली ज्वारी बळावली. काळ्या रानांतून ज्वारीची धाटे गुडघ्या मांडीला आली. कमरेला लागू लागली. मधून टाकलेल्या करड्याचे पट्टे काट्याला आले. हरबऱ्याला लहान जांभळी फुले आली. बघता बघता ज्वारीची कणसे दिसू लागली. करड्याला सुरेख पिवळी फुले आली. हरबऱ्याला पोचट घाटे लोंबू लागले. हिरवे बाटूक खाऊन जनावरे गोटीसारखी गोलगरगरीत झाली. पांढरीफेक दिसू लागली. शिंगाने माती उकरू लागली . बांडा धाटाचा ऊस आणि ओला हरबरा खाण्यासाठी पोरे चोऱ्या करू लागली. राखणाराची नजर चुकवून शेरडे – करडे ज्वारीची धाटे ओरबडू लागली. चिकट हातांनी आणि पांढरे फरकाटे उठलेल्या तोंडांनी पोरे रानात हुंदडू लागली. हुरड्याच्या आगट्या ठिकठिकाणी पडल्या. भल्या सकाळी रानारानात पेटलेल्या आगट्यांचा धूर आभाळात चढू लागला. तरण्या पोरांनी हुरड्याचा खुराक सुरू केला. म्हातारेकोतारेसुद्धा खलबत्त्यात कुटून हुरड्याची चव घेऊ लागले. बायकापोरी सवड काढून चार दाणे तोंडात टाकू लागल्या. दरसाल या वेळी येणारी परदेशी पाखरे बातमी पोचल्यासारखी आली. सूर्य उगवतो न उगवतो तोच दूरवरून’ ट्राँवट्राँव ‘आवाज ऐकू येऊ लागला. निळ्यास्वच्छ आभाळातून त्यांचे शेकडो पाखरे असलेले थवे उडू लागले. उडता उडता त्यांच्या लांबलचक ओळी वेगवेगळे आकार घेऊ लागल्या.

अंगणात, रानात उभी राहून, तोंडे वर करून पोरे ओरडू लागली. तालात म्हणू लागली “कांड्याकरकोच्या, बारा बैलांचा, नांगर धर, नांगर धर! “ही पाखरांची धाड पडू नये आणि कणसे ओरबाडून त्यांनी पिकाची नासाडी करू नये म्हणून आभाळात पटके फेकून शेतकरी त्यांना बुजवू लागले. आरडाओरड करू लागले. तरी उंचउंच पायांची ती पाखरे गोल फिरत पिकांवर पडू लागली आणि आरडाओरड करीत ज्वारीची कणसे ओरबाडू लागली. तीन कोंबड्यांच्या बरोबरीने वजनाला असलेली, चरबीने भरलेली ही पाखरे बघून रामोशांच्या

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading