बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १८).

बनगरवाडी..

अर्धा – तास वाद घालून मी उठलो आणि उघड्या रानातला गार वारा घेत गावाकडे चालू लागलो. माझे मन उदास झाले. दुपारची शाळा सोडून एकदा मी गावाबाहेर विहिरीकडे अंघोळीला निघालो असताना म्हातारा कारभारी माझ्या मागोमाग येऊ लागला. एकदोन वार मी मागे वळून बघितले, तरी तो येतच होता. दुपारचे उन्ह नांगरलेल्या जमिनीवर झळ्या मारीत होते, आणि अंगात काही नसलेला, धोतराचा खोचा मारलेला कारभारी बांधाबांधाने माझ्या पाठोपाठ येत होता. प्रथम मला वाटले, कामासाठी कुठे तरी निघाला असेल. पण मी बांध सोडून ढेकळे तुडवीत विहिरीकडे जाऊ लागलो तेव्हा त्यानेही बांध सोडला. ढेकळे तुडवीत तोही विहिरीच्या बाजूने येऊ लागला. अंघोळ करण्यासाठी आला म्हणावे तर जवळ धोतर – तांब्या काही नव्हते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

उगीचच माझ्या छातीत धाकधुक होऊ लागले. परत मागे न बघता विहिरीपाशी गेलो. कपडे काढून ठेवले आणि लंगोट लावून आत उतरलो. पाण्यात पडलो. थोडा वेळ डुबक्या मारून वर येऊन बसलो, आणि अंग घासू लागलो. म्हातारा कारभारीही पायऱ्या उतरून आत आला आणि मी बसलो होतो तिथून वर दोन पायऱ्या सोडून बसला. थोडा वेळ थांबून म्हणाला, “एका गावात राहून एकमेकाशी भाषा करायची न्हाई हे बरं न्हाई, मास्तर! “हा आपणहून कसा बोलला याचे मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, “बोलणं बंद केलं तुम्ही बाबा, मी नाही. ‘अरं पर का बोलत न्हाई, कशापायी बोलत न्हाई, हे कधी तू मला इचारलंस का ? ” कशाला विचारू?” का, कमीपणा वाटला व्हय तुला त्यात ? अरं, मानपान आमी थोरल्यांनी बघायचं, तुमी कालच्या लेकरांनी, आं? “या बोलण्याने मी थोडासा हललो. मीही इतके आखडून वागायला नको होते. समजूतदारपणे पुन्हा म्हाताऱ्याशी बोललो असतो तर त्याने कारण खचीत सांगितले असते.

मग म्हाताराच बोलू लागला, ‘मला बालट्यानं सांगितलं, आमच्या अंजीला तू चोळी दिलीस. गोष्ट खरी का? ‘माझा चेहरा गोरामोरा झाला. क्षणभर काय उत्तर द्यावे हे मला सुचेना. म्हातारा असे काही विचारील, त्याच्या न बोलण्यामागे असे काही कारण असेल, याची अंधुकशी कल्पनाही मला नव्हती. अंजीला कधीकाळी मी चोळी आणून दिली होती, ही गोष्ट मी विसरून गेलो होतो. मी काही बोलत नाही हे बघून म्हातारा पुन्हा म्हणाला, ‘त्यानं मारुतीची पायरी शिवली. तू चोळी देताना, आन् अंजीनं ती हसत हसत घेताना त्यानं बघितलं. हे कळताच माझं डोस्कं गेलं. पोरीला मी मारमार मारली अन् तुझ्याशी बोलणं। का “सोडलं. पर तुझ्यावर माझी पाळत व्हती. त्यावर आजपतूर मला काय वाईटवकटं दिसलं न्हाई. मग म्हनलं, एकवार खरंखोटं करावं. “खोटं आहे, साफ खोटं आहे. बालट्या नालायक माणूस आहे.

तुमची – माझी घसट त्याला बघवेना, म्हणून त्यानं हे माझ्यावर कुभांड रचलं. ‘माझा श्वास जोराने होऊ लागला. काळजाचे ठोके जलद पडू लागले. म्हाताऱ्याने पुन्हा म्हटले, “मग चोळी दिली ही गोष्ट खोटीच म्हन की! “मी चोळी दिली पण ती मोफत नाही. अंजीनं खण माझ्यापाशी दिला आणि चोळी तालुक्याहून शिवून आणायला सांगितली. मी तुमच्याशी बोललो नाही. कारण तिनं मला सांगितलं होतं – चोळी मी चोरून शिवतेय, म्हाताऱ्याला सांगू नका. पाहिजे तर तिची – माझी रुजवात घाला. असा नालायक माणूस नाही मी. कुणी काहीही सांगितलं तरी मी मुकाट ते करतो, सर्वांच्या उपयोगी पडतो, याचे उपकार तुम्ही लोक असे फेडाल याची मला कल्पना नव्हती. मला काही जरुरी नाही. नुसती शाळा बघून मला राहता येईल. पोरांना चार अक्षरं शिकवून जाता येईल.” हे मी इतके भरभर, तुटकपणे बोललो की म्हाताराही गडबडून गेला.

“हे बघ, मला खरं वाटलं म्हणून मी तुला तसं बोललो का ? तुला काय केलं का? आता माजी मलाच ती गोष्ट खरी वाटना, त्यात तू आज खुलासा केलास. बालट्या अगुदरच तुज्या वाइटावर हाय. त्यानं लेकानं बळंच काट्याचा नायटा केला. असू, तुझ्या मनात पाप न्हाई न्हवं? “मी अजूनही जोरात होतो. त्यात म्हाताऱ्याकडेच बाजू उलटली हे त्याच्या बोलण्यात, तोंडावर उमटले. तेव्हा मला जास्तीच चेव आला.’ ‘हां, अजून मला विचारा पाप आहे म्हणून! शहाण्या माणसानं तुमच्या गावात राहणं हे पाप आहे. तुम्ही लोक भल्याला गाढव कराल. बस, झाली एवढी नोकरी पुरे झाली. मी वर अर्ज करतो आणि बदली करून घेतो दुसऱ्या गावी. “असे शेवटचे बोलून मी वर आलो. कपडे घालून घराकडे आलो. म्हातारा पायरीवर किती वेळ बसला होता आणि परत उठून कधी आला ते मला कळले नाही. त्या दिवशी सर्व दिवसभर माझा राग विझला नाही.

कितीही विवेक केला तरी बालट्याचा सूड घ्यावा ही बुद्धी गेली नाही. भरगावात त्याला धरून मारावे, असे मला वाटू लागले. पण माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला ते शक्य नव्हते. काहीतरी कुभांड घालून त्याला तुरुंगात डांबावे, निदान ओळखीच्या फौजदाराकडून थोडा चोप आणि चांगला भरपूर दम द्यावा, असे वाटू लागले. मी मनाने फारच खाली गेलो.. “माझी ती वृत्ती आयबूने ओळखली. काय झाले असावे याचा त्याला अंदाज बांधता येईना, मला विचारायला मन धजेना आणि मी आपणहून काही बोलेना. तो सारखा माझ्या भोवती भोवती करत होता. आणि मी काही बोलत नव्हतो. अखेर रात्री अंधारात पडल्यापडल्याच मी आयबूला म्हणालो, ‘आयबू, बालट्यानं फार डाळ नासली गड्या! ‘दारापाशी आयबू चादर घेऊन पडला होता. तो म्हणाला, “त्याला एकवार चांगला धडा द्या मास्तर ! ” धडा देणं कठीण नाही रे, पण उगाच गावचा वाईटपणा यायचा .

आजपर्यंत चांगुलपणानं दिवस काढले. कुणाकडून हूं म्हणून घेतले नाही. “आयबूलाही ते पटले. थोडेसे समजावून सांगितले की ते त्याला चटकन पटत असे. निदान पटल्याचे तो चेहऱ्यावरून दाखवत असे . तोंडानेही बोलत असे. ‘आज काय केलं मास्तर त्यानं तुमचं? ‘तो काय करणार लावालावीवाचून ? कारभारी बोलत नव्हता त्याचं कारण बालट्या होता. “ते मी तुमच्याशी बोललोच होतो.’ मास्तरचा आणि अंजीचा वाईट संबंध आहे, असं सांगितलं म्हणे बालट्यानं म्हाताऱ्याला ! “या अनपेक्षित बातमीने आयबूच्या तोंडून एक झकास शिवी बाहेर पडली. बालट्याने खोटे नाटे असे दुसरे काहीही सांगितले असेल, पण त्याने मास्तरचा आणि अंजीचा संबंध जोडून कारभाऱ्याला सांगावे या गोष्टीचे आयबूला नवल वाटले , आणि मग रागही आला. तो म्हणाला, ‘बालट्या इतका लांब पोचल असं वाटलं न्हाई .

‘मी म्हणालो, “गावात कुणीही माझ्या वाइटावर नाही, पण बालट्या मात्र सुरुवातीपासून सापासारखा माझ्यावर डूख धरून आहे. काय करावं काही कळत नाही. बरं, तो समोरासमोर येऊन दोन हातही करीत नाही. आडून गोळ्या मारतो. ‘बोलता बोलता मला पूर्वी मी प्रथम आलो तेव्हा बालट्याने या खोलीत येऊन मला दम कसा भरला होता ते आठवले, आणि अंजीप्रकरणावरून गावाला पेटवून हा माणूस केव्हातरी मला धोपटील असे वाटले. बराच वेळ मला झोप आली नाही. आयबू घोरू लागला. त्यानंतर तिसरेचौथे दिवशी रात्री बराच वेळ चावडीसमोर बसून मी परत आलो. दार उघडले तेव्हा आयबू झोपला होता. काडी पेटवून मी अंथरूण बघितले आणि पडलो. झोपून गेलो. पहिली झोप होते न होते तोच कसल्यातरी गलबल्याने मी जागा झालो. प्रथम काही कळेना. नंतर वाटले की चावडीकडे काहीतरी गोंधळ चालला आहे.

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading