बनगरवाडी.
अंधारातच उठून बसून मी कान दिला. केवळ गलक्याखेरीज काही ऐकू येईना. लांडगा आला असावा किंवा कुठे साप निघाला असावा असे मला वाटले. आणि आयबूचा अंदाज काय आहे हे बघण्यासाठी म्हणालो, ‘आयबू, गोंधळ कसला रे? “आयबू लवकर जागा झाला नाही. तेव्हा अंधारातच त्याला हलवून जागे केले. तो बावरला आणि उठून बसून “काय काय, कोण हाय ‘असे करू लागला. थोडा सावध झाला तेव्हा मी विचारले, “तुला गलगा ऐकू येतो का? चावडीपुढं माणसं जमलीत. “त्यानेही कान देऊन ऐकले. “कायतरी गोंधळ झालाय चावडीपुढं. बघून येऊ का? “मी म्हणालो, “चल, मीही येतो. ‘पांघरुणाच्या खोळी मारून आम्ही दोघेही बाहेर पडलो.

काळोख किट्ट होता, त्यातून सरावाने भराभरा गेलो. चावडीपाशी पोचलो. प्रथम दिसला त्या माणसाला मी विचारले, “ काय झालं ? गोंधळ कसला? ” तो म्हणाला, ” हुता ” दादू बालट्याला कुनीतरी हानलं. “कुणी ? “कोन तो अंधारात दिसला नाही. “गर्दीतून घुसून मी पुढे झालो. दिवा घेऊन बालट्याची म्हातारी बसली होती. “अग बया, आता काय करू? ‘अशी ओरडत होती. आणि दादू बालट्या धुळीत पालथा पडला होता. त्याचा पटका उडाला होता. अंगरखा फाटला होता. बालट्या बेदम मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा जीभ काढून धापा टाकीत होता. कारभारी, रामा बनगर दोन पायांवर बसून राहिले होते. सारखे म्हणत होते, “अरं, तू उठूनतरी बैस दादू. झालं काय? मारलं कुनी? “आणि बालट्या डोळे मिटून नुसतीच मान हलवीत होता. त्याला उठायला येत नव्हते, बोलायला येत नव्हते. मी म्हणालो, “त्याला असा धुळीत काय टाकलाय तुम्ही लोकांनी? उचलून घरात न्या, सर्वांनी माझे म्हणणे उचलून धरले, पण कोणी पुढे होऊन त्याला उचलीना. मग आनंदा रामोशी पुढे आला आणि मेलेले बकरे उचलावे तसे त्याने बालट्याला उचलले. घराकडे चालवले. पंधरावीस माणसांचा घोळका खाकरत खोकरत, काय झाले ते परस्परांना सांगत, विचारत त्याच्यामागून निघाला. बालट्याच्या घरात पोचताच घोगडे टाकून त्यावर बालट्याला घातले. त्याची म्हातारी रडतभेकतच होती. तिच्यावर डाफरून कारभारी म्हणाला,
“तू गप सुंद्रा. काय कळतंय का न्हाई। त्यो काय मेलाय व्हय गहिवर घालायला? “घरात, घराबाहेर दाटीने लोक उभे राहिले. तोडावर पाणी शिपडले, वारा घातला, तेव्हा बालट्या धापा टाकायचा थोडा गप झाला. डोळे फिरवून आजूबाजूला बघू लागला. मी म्हणालो, ‘मला ओळखलं का ? “तेव्हा त्याने काही न बोलता तोड दुसऱ्या बाजूला फिरवले. त्याच्या तोंडापाशी तोड नेऊन कारभारी म्हणाला, ‘भानावर आलास का दादू ? मी कोन हाय? “तेव्हा दादूने घुटका गिळला आणि म्हाताऱ्याचा हात आपल्या हातांनी गच धरला. “भिऊ नकोस. तुला काय होनार न्हाई. ‘असे म्हणून म्हातारा त्याचे हातपाय रगडू लागला. कुणीतरी म्हणाले, ‘ मेलो मेलो – मला मारलं गा- ‘ म्हणून आरडला तवा मी पळत घरातनं भायेर आलो. अंधारात काय दिसंना. पुढं होऊन बघतो तर कुनी तरी खाली पडून इवळतंय. मी इचारलं, ‘काय झालं, कोन हाय गा ! ‘तर ह्यो बोलला ‘मी दादू – मला मारलं ! “रामा म्हणाला, “अरं, पर कुनी, काय, कशापायी – का आपलं मारलं म्हटलं की भागलं ! “सांगणारा म्हणाला, ” देवाला डोळ.
त्यो काय मग बोलनाच, तर कळावं कसं ? “तू कुणी पळताना, लपताना न्हाई बघितलंस ! “न्हाई बा, आईची आन न्हाई. लबाड कशापायी सांगू ? “मग मारलं म्हणावं कुनी?” कुणीसे बाहेरून म्हणाले, “ह्यो काय भानामतीचा खेळ हाय ! “अर, मग पाटलाच्या वाडीला जावा की कुनीतरी पळत आन त्या व्हलराला घेऊन या. चांगला देवरुषी हाय म्हनं त्यो, कोणी जायला तयार होईना. मी – तू, मी – तू सुरू झाले. मला काही हे पटेना. थोडा आवाज चढवून मी म्हणालो, ‘भानामती नाही, काही नाही. त्याला थोडा दम खाऊ द्या, उठून बसू द्या. म्हणजे काय झालं ते कळेल. “पण पहिला कोंबडा आरवला तरी बालट्या उठून बसेना. हळूहळू गर्दी कमी झाली. लोक निघून गेले. मी, कारभारी, आयबू, रामा आणि गावातले दोघेचौघे जण मात्र बसून राहिलो. फटफटीत होऊन उजाडायच्या वेळेला बालट्याने डोळे नीट उघडले. पाणी मागितले. ते दिले. गरम चहा करून पाजला, तेव्हा त्याला अधिक हुशारी आली.
रामाने विचारले, “बरं वाटतं का दादू? ‘बालट्या क्षीण आवाजात म्हणाला, “व्हय. ‘तुला मारलं कुनी? “दम घेऊन दादू म्हणाला, “मला मारनारं दिसलं नाहीत. “किती जन होतं? “काय कळलं न्हाई. अंधारात एकदम घोंगडी अंगावर टाकली, तोंडात बोळा कोंबला आन् काठ्या घातल्या. गुरावानी मारलं रं रामा, भडव्यांनी मला! “तुजा कुनावर वहीम हाय का? “बालट्याने नकारार्थी मान हलवली आणि माझ्याकडे बघितले. उजाडून उन्हे आली, तेव्हा “बरं, पड आता’ असे सांगून कारभारी उठला. आम्ही उठलो. बाहेर पडलो. रामा म्हणाला, “या भडव्याच्या हजार भानगडी. कुनी परगावच्या मानसांनी मारलं असलं तर काय पत्त्या लागनार? “आयबू म्हणाला, “त्यो बोलत न्हाई, पर मारनारं कोन हे त्याला पक्कं माहीत हाय ! ‘कारभारी म्हणाला, “असनारच. चोराच्या वाटा चोराला ठाव्या. बरंच्या बरं, नुसता मारून सोडला. जीव घेतला असता तर कुठं बघायचं होतं? ‘घरी येताच मी आयबूला म्हटले, ‘ आयबू, बालट्याचं आणि माझंच वाकडं होतं.
उद्या त्यानं वहीम धरला तर ? “आयबू तुच्छपणे बोलला, “त्यो काय नरपुडा करतोय. बेगमी झालीय बघा त्याची. सहा महिने घोंगडं सोडत न्हाई आता तो! “आणि झालेही तसेच. आठपंधरा दिवस झाले तरी बालट्या हिंडूफिरू लागला नाही. लवकर लागेल अशी चिन्हंही दिसली नाहीत. दिवसभर तो अंथरुणात विव्हळत पडे . कुणी गेले तर काही बोलत नसे. ते बघून बघून सगळे गाव बोलू लागले, “बालट्याला भुतानं घोळसला. आता ह्यातनं तो जगत नाही!’
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
