बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग २०).

बनगरवाडी..

एकदा सहज माझ्या मनात विचार आला की या एवढ्याशा गावात खंबीर अशी बांधलेली एखादी इमारत असावी. असावी हे ठीक होते. पण ती बांधली पाहिजे गावच्या खर्चाने. असा खर्च द्यायला ही वेडी धनगरे कबूल होतील का ? तिकडे एक म्हण होती, ‘धनगरी वेड सहा महिने जाणार नाही! ‘धनगरांच्या आडमुठ्या वृत्तीवरून ती पडली असावी. गावात इमारत असावी हे कुणाला पटले नसते. शाळा बांधावी तर शाळेसाठी जागा होती, आणि ती अपुरी पडेल असा काळ येणे नजिकच्या भविष्यात तरी शक्य दिसत नव्हते. मग इमारत कशाची? सहजच सुचले की, तालीम बांधावी. पोरांना खेळण्यासाठी, वेळप्रसंगी गावकऱ्यांना एकत्र येऊन बसण्यासाठी प्रशस्त अशी तालमीची इमारत बांधावी. संस्थानच्या राजेसाहेबांना व्यायामाची आवड होती.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या कारणामुळे शिक्षणखात्यातून किंवा खाजगीतून काही मदत होईल. या गावात मी शाळामास्तर होतो याची आठवणही राहील. रात्री घरोघरी रामोशी पाठवून मी गाव जमविले. भाकरी खाऊन तमाखू दाढेला धरलेली मंडळी घोंगड्या पांघरून जमली आणि शाळेपुढच्या पटांगणात बसली. मी जोत्यावर होतो. माझ्यापुढे कारभारी होता. रामा बनगर होता. शेकू होता. तातूबा होता. रानात काही कामधाम नसल्यामुळे सर्व जण आवर्जून आले होते. सुरुवातीला उगीचच इकडचीतिकडची चौकशी झाली. त्यात बालट्याला अजूनही जागचे हालता येत नाही, सगळ्या अंगातून सारख्या कळा येतात, असे कळले. कुणीतरी त्याला फौजदारी करायला सुचवले होते. तेव्हा तो म्हणाला होता,” फौजदारी केली आणि मारणारे मिळाले तरी माझा मार काही भरून निघत नाही.

“गोष्ट खरीच होती. मग मी मुद्द्याचा विचार सांगितला. म्हणालो, “माझी अशी इच्छा आहे की गावात एक चांगली इमारत असावी. खोपटे, आपल्या माळ्या, यांपेक्षा मजबूत अशी जागा असावी. रोज आपण सर्व जण धुळीत बसतो. पाऊसपाणी असले, फार गारठा असला, म्हणजे कोणी इथं बसायला येत नाही. कुणी शाळेचा अधिकारी आला, फौजदार शिपाई आला, की त्याला उतरायची पंचाईत होते. महारवाड्यातसुद्धा तक्क्याची इमारत असते, मग आपल्या गावात का असू नये ? म्हणून माझ्या मनात आलं आहे की एक तालीम गावात बांधावी. तुमचं म्हणणं काय आहे ?” लोकांत कुजबूज झाली. मास्तराने हे काहीतरी वेड घेतले आहे, अशी त्यांची समजूत झाली असावी.

आपसातच बोलू लागले, तेव्हा मी ओरडून म्हणालो,” आपसात बोलू नका तुम्ही. मला गाढव म्हटलं तरी चालेल , पण ते स्पष्ट म्हणा. माझ्यापाशी म्हणा. बाळा बनगर चावत चावत म्हणाला, “तालीम बांधायला कुटं पहिलवान हायेत गावात ! “शाळा सुरू करतानाही तुम्ही म्हणाला होता, कुटं पोरं आहेत गावात ? पण आता पोरं येतातच ना ? पाचपंधरा मुलं उद्या तालुक्याच्या शाळेत जातील. सातवी पास होतील ! ” कुणी म्हणाले, “कशाची होत्यात? जरा नेटक झाली की मेंढरांमागं जातील. सातवी पास होऊन तुमावाणी मास्तर थोडीच होणार ती ? आमच्यातला कुणी शिकून अंमलदार झालेला हाय का तालुक्यात ? ” म्हातारा कारभारी समजुतीने म्हणाला, “अरं , आज पहिलवान नसला कुणी, तरी पोरं खेळू लागतील. खेळता खेळता एखादं निवडलं त्यांतलं! “मी म्हणालो, “आणि समजा, नाही निवडलं तरी गावाला उपयोग नाही का इमारतीचा ? तुम्ही गजी नाचता. त्याचं सामान दाही दिशांना असतं.

ढोल एकीकडे, झांजा एकीकडे. लेझीम, बोथाटी, दांडपट्टा कुणी ना कुणी खेळतं. ते सगळं सामान तालमीत राहिलं, मोकळ्या वेळी ज्याला चांगली माहिती आहे त्यानं पोरांनाही हात शिकवले, तर काही वावगं होईल का ?“पर तालीम बांधायची म्हंजे बक्कळ पैसा लागंल. तो कुनी द्याचा ? “गावानं वर्गणी करावी. घरटी दहावीस रुपये द्यावेत! “हं, हायेत कुणापाशी ? “पुष्कळांच्यापाशी आहेत. मला ठाऊक आहे. त्यांच्यापाशी नसतील तर त्यांनी रोजगार “द्यावा. गाडीबैलं द्यावीत. आपल्या रानांतील झाडं द्यावीत. जर सगळ्या वाडीनं मनावर घेतलं तर एक दहाखणी इमारत बोलबोल म्हणता होईल. ‘ मी बोललो, पण हा विचार काही कुणाला फारसा पटला नाही. उघड विरोध करणे कुणाला जमले नाही. इमारत अर्धी राहील, उगीच सोंग होईल, असेच बहुतेकांचे मत पडले. पण मी गप्प राहिलो नाही. नाना परींनी ही गोष्ट त्यांना सांगत राहिलो.गावातले वृद्ध लोक मी पुन्हा जमवले आणि त्यांच्याशी विचारविनिमय केला.

ठिकठिकाणच्या गावांनी शाळा कशा बांधल्या आहेत, सरकारने त्यांची वाहवा कशी केली आहे, त्या गावांची नावे किती पुढे आली आहेत, हे सर्व मी त्यांना सांगितले आणि त्यांच्याकडून होकार घेतला. ही माणसे तयार झाली तेव्हा साहजिकच गाव तयार झाले. एकाने करू या म्हणताच सर्वांनी करू या म्हटले. घरटी दहादहा रुपये देण्याचे लोकांनी मानले. ज्यांची बैले होती, गाड्या होत्या, त्यांनी श्रम देण्याचे पत्करले. या चारसहा महिन्यांत इमारत उभी करायची, राजेसाहेबांना आणून तिचे उद्घाटन करायचे, हे पक्के झाले. कधीही न आलेला राजा मास्तराच्या करामतीमुळे आणि गावच्या एकजुटीने या धनगराच्या गावी येणार ही कल्पनाच लोकांना फार उत्साही करू लागली. आपल्या गावात तालीम होणार आहे आणि राजा येणार आहे हा विषय घरोघरी झाला. कित्येक दिवस सांगण्यासारखे, चघळण्यासारखे असे काही घडले नव्हते, ते लवकरच घडणार होते.

लोकांनी तत्परतेने म्हाताऱ्या कारभाऱ्यापाशी आपल्यावर बसलेली वर्गणी आणून दिली. मी मदतीसाठी सरकारात अर्ज केला. गवंडी, सुतार बघण्याचे काम सुरू झाले. कारण असले कारागीर वाडीत नव्हते. ते परगावाहून म्हणतील तो रोजगार देऊन आणणे भाग होते. लाकडाची जरुरी होती. दूर असलेल्या डोंगरातून दगड आणावे लागणार होते. त्यासाठी वडार ठरवायचे, त्यांनी तिथे दगड पाडायचे, ते गावात आपण गाड्या जुंपून आणायचे, मग गवंड्यांनी ते घडवायचे ! “घर बघावं बांधून ‘म्हणतात ते काही खोटे नाही. खेड्यात साध्या गोष्टीने अडते. इतके क्षुल्लक कारण बांधकाम लांबायला पुरते की विचारून सोय नाही. अशी जय्यत तयारी सुरू झाली, आणि मग जागा निश्चित करावी असे वाटले. माझी कल्पना होती की जागा काय, कुठेही मिळेल. पण प्रत्यक्ष बघायला गेलो तेव्हा तालमीला योग्य अशी जागा आढळेना.

गावात पण सर्वांना सोयीची पडेल अशी एकच जागा मला आढळली. पण त्या जागी पडझड झालेले एक चारखणी घर होते, आणि त्याला कुलूप होते. मनोमनी ती जागा मी नक्की केली आणि रात्री मंडळीला सांगितली. कारभारी म्हणाला,” पर ते घर दुसऱ्याचं हाय गा ! “कुणाचं ? “वाणी हुता एक परगावचा आलेला. त्यो हात होता हितं. त्यानंच हे घर बांधलं! “तो आता आहे कुठं ? विकत मागू त्याला आपण जागा.’ माझ्या या बोलण्यावर लोक हसले. कुणीसा खुलासा केला, “वाणी मेला. च्या – बिडीपायी वंस खंड झाला ! ” आणि मग मला त्या जागेच्या मालकाची हकीकत लोकांनी सांगितली. खरोखरच सद्या

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading