दिनांक ११ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्रीगोंदा या ऐतिहासिक समताभूमीत सुफी संत शेख महंमद बाबा मठाच्या प्रांगणात दिनांक १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान नामांकित वक्त्यांच्या माध्यमातून पुरोगामी चळवळीचा इतिहास व महापुरुषांच्या गौरव विचारांचा संदेश ‘विचार प्रबोधन सप्ताहा’च्या माध्यमातून मान्यवर सर्वांसमोर व्यक्त करणार आहेत.

याबाबत ad संभाजीराव बोरुडे तसेच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शेख महंमद बाबा मठामध्ये आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकार बांधवांनी याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. बोलताना आयोजकांनी सर्व प्रशासकिय बाबींची पूर्तता केल्याचे नमूद केले. महापुरुषांच्या आणि महामानवांच्या वैचारिक जागराच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच समतावादी चळवळीतील सर्वांनी या प्रबोधनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमामध्ये राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रबोधनकार आपले विचार व्यक्त करण्यासाठी उपस्थित असणार आहेत असे त्यांनी सांगितले.
यात सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव सोनटक्के, बापूराव माने, प्रदीप खामगळ, संतोष इथापे, मच्छिंद्र (काका) सुपेकर, अनिल ठवाळ, बबन दांडेकर, सौ.अनुराधा ताई ठवाळ, दादा औटी, अनिल (महाराज) औटी, बाळासाहेब धोत्रे महाराज, वामन (भाऊ) भदे, साहेबराव रासकर, भीमराव कोथिंबिरे इत्यादी कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सक्रिय आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन संत शेख महंमद बाबा ट्रस्ट, सामाजिक ऐक्य परिषद, सावित्री फातिमा विचार मंच, फुले – शाहू – आंबेडकर विचार मंच, प्रहार संघटना तसेच संभाजी ब्रिगेडने केले आहे.
नमूद कार्यक्रमाच्या अनुषंगाने ऐतिहासिक ‘शिवजयंती उत्सव सप्ताह’ कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १२ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी ६:०० वाजता संभाजी ब्रिगेड व मराठा महासंघाचे प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रफिक सय्यद (ज्येष्ठ विचारवंत) असणार असून, व्याख्याते आर. एस. यादव (परभणी) हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून, संभाजी ब्रिगेडचे माजी श्रीगोंदा (तालुकाध्यक्ष) अरविंद कापसे हे असणार आहेत. तर, उपस्थितीमध्ये गणेश आण्णा झगडे, मच्छिंद्र चांदणे व कुमार आहेर असणार आहेत. समतावादी मानवी मूल्य मांडणाऱ्या महापुरुषांचा विचार आणि त्यांनी समाजासाठी केलेला त्याग जगासमोर यावा म्हणून, या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.
श्रीगोंद्यामध्ये मेंढराच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याची तक्रार स्थानिक प्रशासनास देत, ऍड. संभाजीराव बोरुडे यांनी आवाज उठवला होता. पोलीस प्रशासनाने संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्यानंतर तो अंधश्रद्धेचा कार्यक्रम शहरातून हद्दपार केला गेला. त्यावर त्या अंधश्रद्धाळू भक्तांनी ऍड.संभाजी बोरुडे यांच्या अंगावरून वारे गेले व त्यांना अटॅक आला असल्या बाबत बतावण्या व अफवा पसरविण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र, अशी कोणतीही दुर्घटना माझ्या बाबतीत घडली नसल्याचे बोरुडे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
गणेश फरतळे, संदीप थोरात, दिनेश मुरकुटे, नवाज शेख, प्रशांत खामकर, दिनेश पाटील हे व्याख्याते या प्रबोधन मालिकेत अनुक्रमे आपले विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता शिवजयंती सप्ताह समाप्ती कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यासाठी शंकरराव अण्णा लिंगे हे कार्यक्रम अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक म्हणून, प्रवीण दादा सोळंके, प्रमुख पाहुणे सौ. अनुराधाताई नागवडे तर, प्रमुख उपस्थितीत अण्णाराव पाटील असणार आहेत. अशी माहिती शेख महम्मद बाबा दर्गामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व आयोजकांच्या वतीने ad. संभाजीराव बोरुडे यांनी दिली आहे.
स्त्रोत:(आयोजित पत्रकार परिषद)
