बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग २१).

बनगरवाडी..

वाणी चहा – विडीपायी मेला होता! दारूपायी, बाईपायी, जुगारापायी घरादाराचा सत्यानाश झाल्याची उदाहरणे आहेत. पण चहा – विडीसारखे मामुली व्यसन करून सद्या वाणी कसा मेला? त्याचे कसे वाटोळे झाले? हा वाणी जेवतखात नसेच म्हणे. तो आपला सारखा कडक चहा करून घेई. सारखा विड्या ओढी. घरात त्याची म्हातारी होती. तिने पुष्कळ सांगून पाहिले पण पोराने ऐकले नाही. उद्योगधंदा, काहीही न करता तो तासातासाला चहा घेई आणि पाचपाच मिनिटाला विडी ओढी. बरे, हेही एकटाच बसून करी असे नाही. आसपासच्या लोकांना तो आग्रहाने बोलावून आणी. दहावीस माणसे गोळा झाली म्हणजे हंडाभर चहा करी आणि तांब्या – पितळीतून त्यांना प्यायला लावी. विड्यांची बंडले त्यांच्यापुढे फेकी. लोकांना काय, फुकट मिळाले तर ते विषसुद्धा घेतील. सद्या बोलवायचा, लोक जायचे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

चहा पिऊन, विड्या ओढून मागे त्याच्याविषयी बोलायचे, “निव्वळ भंपक हाय वाणी. अशानं भिकारी होऊन बसंल!” पण सद्याला त्याचे कधी काही वाटले नाही. तो दानशूरच झाला होता. वर्षानुवर्षे असा कार्यक्रम चालू होता. हळूहळू जवळची, बापजाद्यांनी ठेवलेली पुंजी संपली. मग सद्याने दावणीच्या सुरेख गायी मोडल्या, जमिनीतला तुकडा विकला. हळूहळू त्याचे जवळचे मोडून चहा प्यायला सुरुवात केली आणि एके दिवशी विकण्यासारखे त्याच्यापाशी काहीएक राहिले नाही. पूर्वी चांगला तालीमबाज, सशक्त असलेला वाणी पाण्याच्या पितरासारखा झाला. धुराधुराने त्याच्या छातीचे सहाणे झाले. चहाचहाने भूक मेली. खोकला, दमा झाला. म्हातारी मरून गेली. सद्या एकटा उरला.

काम करून काही मिळविण्याचे त्राण त्याच्यापाशी राहिले नाही. घराच्या पडवीत तो उगीच बसून राही आणि येणाऱ्याजाणाऱ्याला हाक मारून त्याच्याकडून विडी मागून घेई. गावातल्या म्हाताऱ्या बायका कणव येऊन त्याला गुळाचा चहा पाजत. अशा अवस्थेत सद्या काही दिवस जगला आणि एके दिवशी लूतभऱ्या कुत्र्यासारखा मरून गेला! सद्याची ही विलक्षण हकीकत मी ऐकून घेतली आणि म्हटले, “म्हणजे या जागेला आता कोणी वारस उरलेला नाही. मग तालमीसाठी ती घ्यायला गावाला काहीच हरकत नाही! “पण याही गोष्टीला कोणी तयार होईना. वाण्याची जागा कशी घ्यावी म्हणून जो तो गप राहू लागला. मी पुन्हापुन्हा सांगून पाहिले; ती जागा पाडून साफ केली म्हणजे आखणी करायला बरे पडेल असे म्हणून पाहिले, पण कुणी लक्ष देईना. मग मीच एक दिवस शाळेच्या पोरांसहित गेलो आणि त्या घराच्या ढासळत्या भिंती उलगडायला सुरुवात केली . वानरसेना कामाला लागली.

कुदळफावडी गोळा करून पोरे वाण्याचे पडके घर हलवू लागली. मास्तर हातात कुदळ घेऊन घर पाडू लागताच मग गावातील लोकही आले. पहिली कुदळ मारल्यावर सगळे पाप माझ्या माथी आले होते. पापाचा धनी मी झालो होतो, इतरांना आता धोका नव्हता. गावातली बरीच माणसे गोळा झाली आणि घर साफ झाले. चारसहा दिवस गेले आणि त्या जागी वाण्याचे घर होते याचा मागमूसही उरला नाही. मग झाडे गोळा करण्याची मोहीम सुरू झाली. गावातले दोनचार जबाबदार लोक बरोबर घेऊन मी शेतमळे हिंडू लागलो. ज्यांच्या – ज्यांच्या रानात इमारतीला योग्य असे लिंब होते त्यांनी ते, खळखळ करून का होईना, पण द्यायला सुरुवात केली. त्यात पुष्कळ वेळा चांगले नसलेले, आतून पोखरलेले झाडच मालक दाखवी, त्यावरून त्याच्याशी हुज्जत घालावी लागे. माझा जीव कावून जाई.

मी काही माझ्या घरासाठी लाकूड मागत नव्हतो. तरीपण लोकांना झाडे सोडवत नव्हती. काही खुषीने देणारेही भेटले; नाही असे नाही; पण जिकीर झाली. झाड दिले की मग माणसं नेऊन ते पाडायचे, तोडायचे, कुणाचीतरी गाडी बघायची, कुणाचेतरी बैल आणायचे, ते लाकूड आणून शाळेपाशी टाकायचे, सुताराच्या ताब्यात द्यायचे, असे चालू झाले. वेळेवर माणसे मिळायची नाहीत, गाडीबैल मिळायचे नाहीत. त्यासाठी कावणे, अजीजी करणे, दम भरणे, हेही करावे लागे. असे सगळे अति झाले म्हणजे मी कारभाऱ्याला म्हणे,

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading