बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग २३).

बनगरवाडी..

“मी येणार नाही. तुझं घर गावानं वाळीत टाकलंय. “पर तुजा आन गावाचा काय संबंध ! तू बाहेरचा – दिल्या टुकड्यावर काम करनारा. मी फुकट काम कर म्हणत न्हाई तुला. शेरपायली मागून घे . “तुज्या शेरपायलीची मला गरज नाही. तू जा ! ही गोष्ट जेव्हा बाळाला समजली तेव्हा तो पोरावरच डाफरला. पोराला त्याने सहा कोसांवरच्या तालुक्याला धाडले आणि तिथनं मुलाणी आणून बकरे कापले. रानात काम करायला रोजगाराने वाडीतले कोणी येईना. तेव्हा जास्त रोजगार देऊन त्याने परगावचे रोजगारी आणले. त्याच्या विहिरीला खारट पाणी होते. म्हणून बायको दोन केळ्या पाणी वाडीच्या विहिरीला न्यायची. तिला लोकांनी बंदी केली. तेव्हा बाळा रोज तीन मैलांवर जाऊन तिथल्या विहिरीचे गोडे पाणी प्यायला आणू लागला. त्याने गुरे दुसऱ्याच्या रानातून न्यायचे बंद केले. त्याची पोरे शाळेत, गावात येईनाशी झाली. बाळा बनगराने पांढरीपुढे नमते घ्यायचे साफ नाकारले ! तो चिवट माणूस आपला हेका चालवीत राहिला आणि वाडी तो किती कट काढतो याची वाट बघत राहिली.

माझा अंदाज साफ चुकला आणि तडाख्याने हाती घेतलेले तालमीचे काम मुंगीच्या गतीने पुढे सरकू लागले. इमारतीला लागणारे लाकूड जमविण्यात फार काळ गेला. खाणीतून काढून वडारांनी दगड दिले, पण ते गावात आणण्यासाठी फार आटापिटा करावा लागला. बांधकामासाठी लागणारा चुना तालुक्याहून आणणे, त्याची घाणी काढणे, खिळेमोळे जमवणे या बारीकसारीक गोष्टींनी उगीचच वेळ खाल्ला. मला कसलाच अनुभव नव्हता, त्यामुळे हा वेळ उगीच जातो आहे असे वाटून मी काम करणाऱ्या लोकांवर ओरडे; पण वाडीच्या लोकांना या गोष्टी नित्याच्या होत्या. इमारतीचे, विहिरीचे काम खेड्यात काढले की ते पुरे होणे हीच घटना महत्त्वाची. नाहीपेक्षा धडाडीने सुरू केलेली असली कामे वेळ घेऊनही अपुरी राहतात.

https://bit.ly/bspmycityshrigonda

घर बांधले जाते आणि दरवाजा राहतो. कधी खुंट्या राहतात, कधी जोते राहते. विहीर पुरी होते, पण कडे अर्धवटच राहते, दोन माचाडांपैकी एकच सुरू होते. मग बांधणाराही जरुरीपुरते झाले, आता काही अडत नाही, उरले काम पुन्हा करू, अशा विचाराने सैल पडतो. अर्धे काम पुढे कधीच पुरे होत नाही. अशी अर्धीमुर्धी कामे हरेक खेड्यात किती तरी आढळतात. वाडीच्या लोकांना हे ठाऊक होते. त्यामुळे काम झपाट्याने होत नाही याची खंत त्यांना वाटत नव्हती. रोजची आपली कामे करून ते तालमीकडे बघत होते. या व्यापात भूक, झोप याचा विचार न करता मी रखडरखड रखडलो. आठआठ दिवस दाढी नाही, वेळच्या वेळी अंघोळ नाही, जेवण नाही, असे फार घडू लागले. सुटीचा दिवस असला तरी मला घरी जाणे जमेना. चुना, घाणी, दगड, लाकूड, पायरी, कोपऱ्या, तुळया, खांब याशिवाय दुसरा विषय डोक्यात नाही. असे झाले. वाडीतल्या बैलगाड्या मोडल्या, दगड वाहून वाहून बैलगाड्या खचल्या. गवंड्यांनी केलेल्या ठोकाठोकींनी गावाचे कान किटले.

रस्तोरस्ती कपऱ्या झाल्या. ढलप्यांचा ढीग पडला. हेलपाटे मारून मारून, पायपीट करून करून आयबूच्या पायाला कुरपे झाली. पडेल ते काम उचलल्यामुळे त्याचे अंग झडले. मुलखाचा चुकार असलेला आनंदासुद्धा कामसू झाला. धावपळीची कामे करू लागला. तालमीच्या कामात गढल्यामुळे बापाचे घराकडे फार दुर्लक्ष होते, अशी तक्रार रामाचा पोरगा करू लागला. कारभाऱ्याच्या कुणबाव्याची आबाळ होऊ लागली. तालमीच्या कामाची झळ सर्वांना पोचली. वाडीत असे एकही घर राहिले नाही की ज्याचा संबंध या बांधकामाशी आला नाही. यात दुसरी सुगी गेली. एक वर्ष हा हा म्हणता गेले. लोकांची नांगरटीची कामे संपली. मेंढक्यांनी मेंढरे कातरली, लोकर निघाली. धनगरणीनी ती पिंजली. चातीवर, चरख्यावर कातली.

सुताचे चोबे बाजारात विकून त्याचे पैसे केले. वर्षाची लुगडी घेतली. मेंढक्यांना पटके, धोतरे, अंगरखी घेतली. कुणी लोकर सणगरांना दिली आणि जाडजाड घोंगड्या विणून घेतल्या. मेंढरांची दुसरी वेते झाली. पहिली पोरे आईला ओळखीनाशी झाली. उन्हाळा संपला. पावसाळा येऊ घातला. आणि तालमीचे बांधकाम मात्र पुरे झाले नाही. मी स्वत: वर चिडलो, दुसऱ्यांवर चिडलो. पण कामाची गती वाढली नाही. बाहेरचे लोक म्हणू लागले की हे काम आता होणार नाही. मास्तराने फुकट धनगरांना तसदी दिली, पैशाचा नास केला. मुळात आधी तालमीची गरज काय ? मूठभर लोक असलेल्या गावाला तालीम पाहिजे कशाला ? खेळणारी पोरे रानात खेळतील, वाळूत खेळतील. पहिलवान निवडून यायचा असेल तो त्यांतून येईल. तालीम नाही म्हणून तो थोडाच थांबतो ! तालमीचे हे सगळे सोंग मास्तराने आणले आहे ते पैसे खाण्यासाठी. पगारावर भागत नाही म्हणून असे काहीतरी काढून धनगरे हुलीवर घालायची आणि स्वतःच्या खिशात पैसा ओतायचा ! शेवटी कावून मी वर लिहून कळविले की, “तालमीचे काम पुरे झाले आहे. हुजुरांनी कृपाळू होऊन वाडीस भेट द्यावी. आणि तालमीचे उद्घाटन करावे.

”हे टपाल मी पोस्टात टाकले आणि वाडीतल्या मंडळीला जाहीर केले की “सरकारस्वारी या महिन्यात येणार आहे . तालीम पुरी करा किंवा त्यांना समोर जाऊन सांगा की आमची चुकी झाली, हे बांधकाम पुरे होत नाही ! “दादू बालट्या अजून अंथरुणावरच होता. त्याची बायको आणि म्हातारी देवरुषी, गंडे, ताईत करीत होत्या आणि त्याचा काही उपयोग होत नव्हता. स्वत: बालट्या स्वस्थ पडून होता. तो दोन्ही वेळा चांगले खायला देण्याविषयी ओरड करी. मी खूप खाईन, दूधतूप, साखरचपाती खाईन, बकरे, कोंबड्या खाईन आणि एके दिवशी फिरून जवान होऊन उठेन , असे त्याचे म्हणणे होते . त्याच्या आग्रहाप्रमाणे घरातील माणसे त्याला खाऊ घालीत होती; पण

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading