दिनांक १९ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
शहरात दिनांक १२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेल्या “ऐतिहासिक विचार प्रबोधन सप्ताहा”चा आज समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष शंकरराव अण्णा लिंगे अध्यक्ष (अखिल भारतीय माळी महासंघ सोलापूर), प्रमुख मार्गदर्शक संदीप थोरात सर (संविधान प्रचारक दौंड) प्रमुख पाहुणे अनुराधाताई ठवाळ (उपसरपंच आढळगाव) व प्रमुख उपस्थिती ad. महेंद्र शिंदे (सरपंच डिकसळ ग्रामपंचायत तालुका कर्जत) हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ad. संभाजीराव बोरुडे यांनी केले. तर, सूत्रसंचालन मुकुंद सोनटक्के व प्रदीप खामगळ यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात बोलतांना ad. संभाजीराव बोरुडे यांनी विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्षापासून चालू असलेल्या या सप्ताहामध्ये भारत देशाचा इतिहास आणि बहुजन समाजाला माणूस म्हणून, जगण्याचा अधिकार ज्या महामानवांनी, महापुरुषांनी दिला त्यांच्या चरित्रावर कधी चिंतन झाले का ? असा सवाल या ठिकाणी बोरुडे यांनी उपस्थित केला. जर बुद्ध पासून अण्णाभाऊ पर्यंत व कबीरा पासून तुकडोजी महाराजांचे पर्यंत चिंतन झाले असते. तर, प्रत्येक गावातून कलेक्टर, तहसीलदार, प्रांत अधिकारी निर्माण झाले असते. असे ते म्हणाले. उद्याच्या भविष्यासाठी दिशादर्शक अश्या या सप्ताहाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या पुढील काळामध्ये महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अशा प्रकारचा सप्ताहांची सुरुवात करणार असल्याचे उपस्थित श्रोत्यांना सांगितले.
यानंतर आपल्या भाषणात बोलतांना संदीप थोरात यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, सत्य हे पुन्हा पुन्हा सांगावे लागते, त्यावेळेस ते सर्वसामान्यांमध्ये खरे ठरते. आज साजरी होत असलेली शिवरायांची जयंती ही घराघरात साजरी व्हावी. असे शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आहे. आज छत्रपतींची जयंती सबंध महाराष्ट्रासह देशात साजरी होणे गरजेचे आहे. मात्र, देशांमध्ये त्या पद्धतीने होताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका जातीचे नसून, सबंध मानवजातीची अस्मिता असल्याचे थोरात यांनी सांगितले. जिजाईने शिवबाला लहानपणी असे संस्कार दिले, ज्यामुळे शिवबाचे कार्य आणि कर्तुत्व आभाळाएवढे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशहाच्या दरबारी होते. तसेच, जिजाईची वडील लखुजी राजे निजामच्या दरबारी सरदार होते. अनेक संबंधित हे मोगलशाही मध्ये असतांना, अशा परिस्थितीमध्ये रयतेचे स्वराज्य निर्माण करायची संकल्पना जिजाऊच्या मनात येते आणि ती निर्माण करण्याचे नियोजन ती शिवबाला सांगते. रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी जोडावे लागतिल, असे तिने सांगितले. संतांच्या माध्यमातून समाज घडविण्याचे कार्य चालू होते. देशाची सध्या परिस्थिती अतिशय भयानक असण्याच्या कारण आपण चुकलो आहोत, आपण हुकलेला आहोत. जिजाऊ ने शिवबाला संदेश दिलता की, “तोडुनि शृंखला मुक्त कर मानवाला जिजाऊ प्रेरणा देई शिवबाला”… थोरात सरांनी या वेळी विचार व्यक्त करतांना पुढे सांगितले की, येथील माणसांच्या हातात बेड्या नसून, त्यांच्या डोक्यांना बेड्या पडल्या असल्यामुळे पहिले डोके मुक्त करावे लागतील. कारण हे वारंवार तिथे जात आहेत. तिथे जाऊन ते गुलामी करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण संघर्ष हा मुस्लिमांच्या विरोधात होता आणि त्या अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. तीची व्यवस्था केली पाहिजे अशा पद्धतीने काही लोक अपप्रचार करून, माथी भडकवण्याचे काम करत आहेत. तीच कबर किंवा समाधी बांधली कोणी ? याचेही सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. वारकऱ्यांनी निर्माण केलेल्या मार्गाने स्वराज्याचेही मार्गक्रमण मावळ्यांना व अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन शिवाजी महाराजांनी केले. संत परंपरा यामध्ये आपली वारकऱ्यांची भूमिका होती, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांची झाली. त्यातील एका मावळ्याने (म.फुलेंनी) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली होती. त्यानंतर प्रतिक्रांती झाली. त्यामुळे महाराजांची समाधी शोधावी लागली. थोरात सर पुढे म्हणाले की, क्रांती नंतर प्रतिक्रांती होत असते. उठावानंतर तर प्रति उठाव होत असतात. या संदर्भावरून “हिस्टरी रीपीटस इटसेल्फ” असे वास्तव समोर येते. संतांनी वारकरी घडवले, शिवाजी महाराजांनी मावळे, महात्मा फुलेंनी सत्यशोधक कार्यकर्ते तर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकांना संविधानाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. इतिहासातून धडा घेतला. तर, इथल्या व्यवस्थेने स्वराज्यनिर्मीती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाची संभाजी महाराजांची जीभ कापली. ही प्रतिक्रांती म्हणावी लागेल. म्हणून, व्यवस्था आम्हांला बघू, पाहू, वाचू, लिहू, बोलू, देत नव्हती. मात्र, बाबासाहेबांच्या संविधानाने फंडामेंटल राईट देऊन इथल्या सामान्य माणसांला राजा बनवले. ऍड. संभाजीराव बोरुडे यांच्या माध्यमांतून चालू असलेला हा सप्ताह महापुरुषांचा, महामानवांचा वैचारिक वारसा आपल्याला या निमित्ताने आत्मसात करण्यास मिळेल. अशी अपेक्षा संदीप थोरात यांनी त्यांच्या भाषणाच्या अनुषंगाने व्यक्त केली.
यानंतर अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकररावांना लिंगे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी या प्रसंगी महापुरुषांचे विचार व वारसा नमूद केला. त्यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश झोत टाकला. महापुरुषांचे धडे शालेय पाठ्यपुस्तक मध्ये नमूद व्हावेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकुंदराव सोनटक्के, प्रदीप खामगळ, बापू माने, संतोष इथापे, मच्छिन्द्र सुपेकर (काका) सुपेकर, अनिल ठवाळ, सौ.अनुराधाताई ठवाळ, राजेंद्र औटी, बाळासाहेब धोत्रे महाराज, वामन भाऊ भदे, साहेबराव रासकर, भीमराव कोथिंबीरे यांनी परिश्रम घेतले.
श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांमधून महिला, पुरुष कार्यकर्ते या सप्ताहास उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ, कपिल उल्हारे, अमिन भाई शेख, राजू शेख, अजीज शेख, प्रदीप खामगळ, बापू माने, संतोष इथापे, मुकुंद सोनटक्के, मच्छिंद्र काका सुपेकर, बाळासाहेब धोत्रे महाराज, वामन भाऊ भदे, सुरज घोडके, अरविंद कापसे, नाना शिंदे, सुरज शिंदे, भीमा कोथिंबीरे, राजेंद्र औटी, दिलीप औटी, बबन दांडेकर, ऍड. महेश लोणकर, बाळासाहेब आल्हाट, विक्रम आल्हाट, ऍड. प्रकाश लोंढे, केशवराव कातोरे (सर), रवि लांडगे, हनुमंत माने, भाऊ राजपूत सह शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर सामाजिक कार्यकर्ते संतोष इथापे यांनी या समारोप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर, वक्ते, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, संयोजक, आयोजकां समवेत काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि ज्या माध्यमांनी या सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या बातम्या बनवून प्रसारित केल्या. यापैकी बहुजन समता पत्र, दैनिक दिव्य मराठी, दैनिक जनप्रवास, दैनिक सिटीजन, सी न्यूज यांचे आभार मानले. तसेच, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे यात अन्नदाते, देणगीदार, श्रोते, वक्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे यावेळी त्यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने सदर कार्यक्रम संपन्न झाला. अशा पद्धतीने दिनांक १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत चाललेल्या कार्यक्रमाचा आज समारोप समारंभ संपन्न झाला.
स्त्रोत:(दिनांक 19 फेब्रुवारी 21 रोजी आयोजित विचार प्रबोधन सप्ताहाचा समारोप समारंभ)
