बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग २५).

बनगरवाडी..

घेऊन त्यांना सामोरे जायचे, असा रिवाज होता. आमच्या वाडीला पाटील नव्हता आणि कुळकर्णी नव्हता. तेव्हा सरकारस्वारी येणार म्हणून आलेला शेजारच्या गावचा पाटील लुडबुडू लागला. मी त्याला गप्प केले आणि तांबडेभडक मुंडासे आणि खळीचा वास येत असलेला कोरा गोल अंगरखा घातलेल्या आमच्या कारभाऱ्याने नारळ द्यावा असे ठरवून टाकले. वेशीशी आरत्या घेऊन काही सुवासिनी उभ्या केल्या. वरचेवर टाचा वर करून टेकावर मोटार दिसते का हे लोक पाहत होते. आवाज स्पष्ट ऐकू येत होता. वाटेवर बसविलेली रामोशांची पोरे धावतपळत आली आणि धापा टाकीत त्यांनी सांगितले, ‘आली मोटार, मावल्याआईच्या टेकापाशी आली ! “सर्वांनी टोप्या, पदके नीट केले.

अधिकाऱ्यांनी कोटाची बटणे लावून शर्ट खाली ओढले. आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या शिपायांनी शिट्या फुकल्या. सरकारची तांबडी पाटी असलेली कोरी चकचकीत गाडी वेशीत येऊन उभी राहिली. मी लगबगीने पुढे झालो. शिक्षणाधिकारी सोबत होते. सरकारांना लवून नमस्कार करताच ते म्हणाले, “हे इथले मास्तर अंगठ्यांनी भरलेले हात जोडून सरकार म्हणाले,” जय देवा! “सगळे भराभर वाकले. धनगरांनी जमिनीला हात लावून आपल्या राजाला नमस्कार केला. मग मामलेदार पुढे झाले आणि आदबशीरपणे म्हणाले, “इथून गावात रथातून यावं, असं म्हणणं आहे. ‘सरकार म्हणाले, “हो हो – जाऊ ना. हुजऱ्याने दार उघडलं. महाराज बाहेर आले. गोरापान, भव्य असा आपला राजा धनगरांनी पाहिला. त्याच्या डोक्यावर तांबडीभडक पगडी होती. अंगात खादीचा पांढराशुभ्र लांब कोट होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

खाली शुभ्र सुरवार होती. पायात तांबडाभडक जोडा होता. झगझगीत काठ असलेली उपरण्याची पट्टी त्याच्या रुंद छातीवर होती. मोठमोठे डोळे, तरतरीत नाक, शुभ्र होत चाललेल्या भरघोस मिशा असलेला राजा काठीचा आधार घेत रथाकडे चालला आणि धनगरांच्या बायका एकमेकींना म्हणाल्या, “राजा ठकला! त्येला आता काठीवर चालावं लागतंय ! “मी कारभाऱ्याला खूण केली. त्याने धीराने पुढे होऊन नारळ रुपया असलेले ताट पुढे केले. राजाने त्याला हात लावला आणि कारभाऱ्याच्या खांद्यावर एक हात ठेवून म्हटले, ‘काय पाटील, बरे आहे ना? “कारभारी आदबशीरपणे हसला आणि मान हलवीत म्हणाला, “होय जी सरकार होय जी सरकार ! “राजाने मग रथावर चढतानाही कारभाऱ्याच्या खांद्याचा आधार घेतला. रथात बसताच बैल धरून राहिलेल्या लोकांनी इशारा केला. बैल रथ ओढू लागले.

शिंगे वाजली. सनई ताशा वाजला. धनगरांनी राजाच्या नावाचा जयजयकार केला. शाळेतल्या मुलांनी ‘राजा चिरायू होवो! ‘म्हटले. पुढे आलेल्या सुवासिनींनी आरत्या ओवाळल्या. राजा गावात आला. तीसपस्तीस धनगरांची खोपटे असलेल्या या गावात राजा आला ! तालमीचे बंद दार राजाने आपल्या हाताने उघडले. पुन्हा शिगे वाजली. वाजंत्रीवाल्यांनी गजर केला. ती मोठी तालीम, हौदा, लाल माती बघून राजाला आनंद झाला. तो म्हणाला, “कुठाय तो मास्तर? ‘मी हात जोडून पुढे उभा राहिलो. “छान, छान, केलंस रे मुला हे तू ! काय नाव तुझं? “मी म्हणालो,”राजाराम विठ्ठल सौंदणीकर. “मामलेदारांनी खुलासा केला, “विठ्ठल धोंडोचा मुलगा. बारनिशी कारकून आहेत आपल्या इथं.” सरकार म्हणाले, “अस्सं! चांगलं आहे, उत्तम आहे! ज्ञानाबरोबर बलोपासना पाहिजेच ! “माझा ऊर आनंदाने भरून आला.

अंगावर झरकन काटा उठून गेला. घशात आवंढा आला. मला वाटले की आपल्या डोळ्यांना पाणी येणार. तालमीतल्या मारुतीला महाराजांनी स्वत: नारळ फोडला. आणि मग सभा सुरू झाली. मी माझे भाषण लिहून काढले होते, ते स्पष्ट शब्दात वाचून दाखवले. वाचताना माझी छाती धडधडत होती. तालमीत खेळण्याच्या निमित्ताने मुले एकत्र यावीत, खेळण्याबरोबरच त्यांना शाळेची गोडी लागावी, या उद्देशाने आम्ही तालीम बांधण्याचा हा खटाटोप केल्याचे मी सांगितले. गावकऱ्यांनी तालमीसाठी जे परिश्रम केले, जो कौतुकास्पद उत्साह, एकी दाखविली, त्याची मी प्रशंसा केली आणि श्रीमंतांनी आशीर्वाद द्यावेत असे म्हणून भाषण संपविले. मग राजेसाहेबांनी छोटेसे भाषण केले. ते म्हणाले, “माझ्या या मेंढपाळ मुलांनी या एवढ्याशा वस्तीत अशी सुंदर तालीम बांधली, हे बघून माझा ऊर आनंदाने, अभिमानाने भरून आला आहे. बलोपासना आणि ज्ञानसंवर्धन हे माझ्या संस्थानचे ध्येय आहे. संस्थानातील विद्यार्थी म्हटला की, त्याची छाती रुंद असावी, बाहू पिळदार असावेत, बुद्धी तल्लख असावी, असा माझा आग्रह आहे. तो आग्रह मी सतत बोलून दाखवीत असतो. माझे बोलणे इथल्या धनगरांपर्यंत पोचले असेल याची मला कल्पना नव्हती.

ते पोचले आहे आणि प्रत्यक्षातही उतरते आहे हे बघून मी चकित झालो आहे. तुमच्या या राजाची छाती दोन इंच जास्त फुगली आहे. जगदंबा तुम्हांला सबुद्धी देवो. तुमचे कल्याण करो. “मग मी आभार मानले. सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. मुलांनी ‘ वंदे मातरम् ‘ म्हटले आणि समारंभ संपला. महाराजांची मोटार धूळ उडवीत निघून गेली. सायकलीवरून, बैलगाड्यांतून इतर अधिकारी निघून गेले. राजा कसा दिसला, कसा बोलला, याची चर्चा घरोघर सुरू झाली. राजा निघून गेला, समारंभ संपला, तरी धनगरांचा आनंद संपला नाही. ते जागोजागी टोळकी करून मोठमोठ्याने बोलत राहिले. हा आनंद त्यांना कित्येक दिवस पुरणार होता.

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading