बनगरवाडी..
या सगळ्या समारंभात फक्त दोघे जण आले नाहीत. बाळा बनगर आणि दादू बालट्या . बाळाला राजा येणार हे समजले, बघायला चल म्हणून कोणी बोलले , तेव्हा तो म्हणाला,” माझं काम सोडून मी येत न्हाई. राजा आला असंल. तो काई माझी चूल चालवीत न्हाई ! “बालट्याचा सारखा तडफडाट चालला होता, पण त्याला उठणे अशक्य होते. कारभाऱ्याला घरी बोलावून तो म्हणाला, “ मला राजाला बगायला यायचं हाय रे. पाठकुळी घेऊन तिथपतूर चला कुनी. “पण कारभाऱ्याला भीती वाटली. हा आचरट माणूस काहीतरी बोलेल, मारल्याचे सांगेल . म्हणून त्याला कुणी येऊ दिले नाही. बालट्याने सर्वांना शिव्या घातल्या, आरडाओरडा केला. पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. समारंभ संपला आणि मग मला कुणीसे सांगितले की, आयबू तालमीवरून पडला. जबरदस्त मार लागला. त्याला ओढून खोलीत टाकला. माझ्या आनंदावर एकदम विरजण पडले.

घाबऱ्याघुबऱ्या मी घरी आलो. कडी उघडून आत गेलो. पालथा होऊन आयबू घोंगड्यावर पडला होता. माझ्या काळजाचा थरकाप झाला. राजा गावात यावा यासाठीच आयबूने आपला बळी दिला का ? मी मोठ्याने ओरडलो,’ आयबू, आयबू आहेस का ? “त्याला पालथ्याचा उताणा करून मी त्याच्या तोंडाकडे बघितले. त्याने मिटलेले डोळे उघडून थंड नजरेने पाहिले. सावकाश होणारा त्याचा उष्ण श्वास माझ्या गालांना जाणवत होता. क्षणभर उघडलेले डोळे त्याने पुन्हा मिटून घेतले, आणि तो विव्हळला. मी विचारले,’ आयबू, तुला काय झालं ? फार लागलं का ? आयबू , अरे तुला काय होतंय? “आयबूने डोळे उघडले. खोल आवाजात तो म्हणाला, “मास्तर, राजा आला का ? ” ‘अरे आला. येऊन गेलासुद्धा. तुला काय झालं? कसा पडलास ? “आयबूचा चेहरा विलक्षण दुःखी झाला. तो म्हणाला, “राजा आला आमाला बघायला न्हाई मिळाला “आणि उताण्याचा पालथा होऊन तो पुन्हा पडून राहिला.
‘राजा येऊन गेला. तालीम चालू झाली. गेले कित्येक महिने चाललेले काम पुरे झाले. तालमीच्या नादाने झाडून सगळी पोरे जमा होऊ लागली. जोर बैठका काढू लागली. झोंब्या खेळू लागली. गजीचा ढोल, लेझीमचा सरंजाम, लाठ्या, बोथाट्या, पट्टे हे सगळे साहित्य तालमीत राहू लागले. जाणती जाणती माणसेसुद्धा गमतीने तांबड्या मातीत अंगे घोळसू लागली. शाळेने चांगले बाळसे धरले.

सकाळ दुपार अशी नियमितपणे वीसएक पोरे येऊ लागली. शाळेवरून पडल्यामुळे आयबूचा एक हात मोडला होता आणि मुका मार लागला होता. हात बसविण्यासाठी आनंदाने त्यांच्यापैकी एका रामोशाला माझ्याकडे पाठवून दिले. त्याचे नाव जगन्या होते. रूपाने चांगला देखणा असलेला हा पोरगा ऐन उमेदीत आला होता. तो रोज घरी येऊन आयबूला चोळू लागला. आनंदाने मला सांगितले की, हाडे बसविण्याचे कसब जगन्या आपल्या बापाकडून शिकला. हा बाप म्हणजे वाडीतला थोर शिकारी होता. पोटावर सरपटत जाऊन तो तोड्याच्या बंदुकीने हरणे मारी. त्याने फार हरणे मारली. चार खणाला किलचा पुराव्यात एवढी हरणांची शिंगे त्याच्यापाशी होती. शेवटी म्हातारा होऊन तो धरणीला पडला, तेव्हा हरणासारखा ओरडू लागला. शेकड्यांनी हरणे मारलेला तात्याबा रामोशी हरणावाणी ओरडून मेला ! या जगन्याच्या चोळण्यामुळे आयबूच्या हाताचे सटकलेले हाड नीट बसले. ठेचलेले अंग सैल झाले आणि महिनापंधरा दिवसात तो हिंडूफिरू लागला. मुलाण्याचे पोर मरता मरता…
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
