बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग २७).

बनगरवाडी..

वाचले. पण मध्येच जगन्यानेच एक भानगड उपस्थित केली. आणि ती निस्तरता निस्तरता गाव टेकीला आले. बनगरवाडीपासून पाचसहा कोस लांब असे वांगी गाव होते. आमच्या साऱ्या तालुक्यात है गाव अरगट म्हणून प्रसिद्ध होते. खून, मारामाऱ्या यांबद्दल गाजलेले होते. या गावात परका माणूस जीव मुठीत धरूनच राही. शाळामास्तर, कुलकर्णी, तलाठी सगळे या गावाला बदली झाली की हादरून जायचे. वसुलीसाठी गेलेला मामलेदारसुद्धा या गावात नमून बोले. जणू काय आपण भिक्षा मागतो आहोत अशा पद्धतीने शेतसारा मागे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कामधामाच्या निमित्ताने जगन्या नेहमी वांगीला जाई. एके दिवशी दोनप्रहरी आठदहा जवान लोक वाडीत घुसले. त्यांच्या हातात कुन्हाडी होत्या, भाले होते. कोसले पटके आणि मलमली सदरे घातलेले हे जवान वाडीत घुसले आणि थेट रामोसवाड्यात गेले. भरभर त्यांनी सगळी रामोशांची खोपटे तपासली. बायाबापड्यांना दमदाटी दिली. एकादोघा रामोशांना कुऱ्हाडीच्या तुंब्याने हाणले, रामोसवाड्यात आरडाओरड सुरू झाली. पोरे भिऊन ओरडू लागली. कुत्री भुंकू लागली. रामोशांच्या भ्यालेल्या बायका पोरे उचलून धनगरांच्या आश्रयाला आल्या. मेंढके रानामाळात गेलेले, गडीमाणसे फारशी नाहीत, असा अवस्थेत हे दांडगेदुंडगे लोक खोपटे तपासू लागताच एकच गलका झाला. मी शाळेत होतो. आनंदाही होता. रामोसवाड्यात लोक शिरले म्हणताच तो घाईने उठून तिकडे गेला. वर्ग सोडून मीही गेलो. दरमान्य खोपटे धुंडून ते लोक रस्त्यावर येऊन उभे राहिले होते. आनंदा पुढे झाला आणि त्याने विचारले, “काय गडबड हाय? “त्याने ताबडतोब ओळखले की हे लोक वांगीचे आहेत.

आनंदाने असे विचारताच एक पोरगा अंगावर धावून आला आणि म्हणाला, “तू रामुशीच का! ”आणि आनंदाने होय म्हणताच हातातल्या काठीच्या दोन धोपाट्या त्याने त्याच्या पाठीवर ओढल्या . शिवी हासडून विचारले, “जगन्या रामुशी कुठाय? “दोन काठ्या सोसून आनंदा जागचा न हलता म्हणाला, “का बरं, त्येनं काय केलंय ? “आणि त्यावर पुन्हा त्या पोराने एक काठी हाणली. मग मला राहवले नाही. पुढे होऊन मी त्या पोराला धरला. विचारले, “कोण लोक आहात तुम्ही? एकाएकी गावात शिरून अशी मारामारी करताय कोण विचारणार नाही असं वाटलं काय तुम्हांला? “मी अंगानेफाटकाच होतो. पण विलक्षण धारदार असे बोलणे माझ्या तोंडून आपोआप निघाले. आणि क्षणभर त्या पोराला आपला हात सोडून घ्यायचेही भान राहिले नाही. मग बुटका आणि थोराड असा एक माणूस पुढे आला. पोराला बाजूला ओढून त्याने माझ्या छातीला छाती भिडवीत म्हटले,

” तू रे कोन इतक्या जोरावर आलायस ते ?” “मी सरकारी नोकर आहे. इथल्या शाळेचा मास्तर आहे. तुम्हाला कोण माणूस पाहिजे ते नीट विचारा. मारामारी करायला ही काही मोगलाई नाही ! “दरम्यान, मोडक्या हातात काठी घेऊन आयबू आला होता. शाळेतली चारसहा नेटक पोरंही तालमीतल्या काठ्या घेऊन आली होती. माझ्या छातीला छाती लावून उभा राहिलेला गडी इकडेतिकडे बघून थोडा सैल झाला. नाक फुगवून म्हणाला, ‘आमाला जगन्या रामुशी पायजे. ‘मी म्हणालो,” तो चारदोन दिवस झाले, गावात नाही. “कशावरनं खरं हे? “मी सांगतोय म्हणून. “बरीच रग हाय की रं शाळामास्तरा तुज्या अंगात ! “एवढ्यात कुणी एक वाडीतली म्हातारी पुढे आली. आणि त्या पटकेवाल्याच्या हनुवटीला हात लावून म्हणाली’

अरं माज्या लेकरा, गरीब रामोशावर काय कुऱ्हाड चालवतोस? छप्पन कुळीचा म्हराटा तू ! रामोशी तुज्या पायांतलं चेंडू आं? नीट बैस. उन्हाचा आलास, पानी पी. कामधाम असलं तर ह्या मास्तरास पूस. आणि मग कलकला बोलत रामोशांच्या बायका जमल्या, धनगरणी जमल्या. शिव्याशापांचा गजर त्या वांगीच्या जवानांवर झाला. मी वांगीच्या लोकांना म्हणालो, “तुम्ही तालमीत चला. तिथं तुम्हांला काय पाहिजे, तुम्ही कशासाठी आलाय, हे आपण बोलू . उगीच मारामारी करणं ही चांगल्या माणसाला शोभणारी गोष्ट नाही. “त्यांना काय वाटले कोण जाणे, “चला ”म्हणून ते चालू लागले. पोरांचा घोळका मागून येऊ लागला, बायका येऊ लागल्या, तेव्हा मला सगळ्यांना दटावावे लागले. दटावल्यावर मात्र कुणी आले नाही. मी, आनंदा, रामा आणि ते सर्व जण असे तालमीत गेलो. बसलो. “मी म्हणालो,”आता बोला. ‘त्यांपैकी एकजण म्हणाला,’ आम्ही वांगीची माणसं हाय. तुमच्या गावच्या जगन्या रामुशानं वांगीची , आमच्या जातीतली एक रंडकी बाई काढून नेलीय, त्येला बगायला आम्ही आलोय. “ही माणसे एकाएकी अशी हातघाईवर का आली याची संगती मला लागली. त्यांची चीड अगदी स्वाभाविक होती. जगन्याने असला काही उद्योग केला असेल याची पुसट कल्पनाही आम्हांला नव्हती. रामा आणि आनंदासुद्धा या बातमीने चकित झाले.

जगन्याला शिवी हासडून आनंदा म्हणाला, “घरात अन्न न्हाई खायला आन् ह्या गुलामाला रंडीबाजी सुचतीय. तुमी बिनघोरी त्याचा जीव घ्या पाटील. वाडीतलं एक मानूस तुमाला आडवं येनार न्हाई।” आनंदाने घेतलेल्या उलट्या पवित्र्याने ते लोक सरळ आले. नीट बोलू लागले. बाई रंडकी असली, तिचे कुणी नसले, तरी हा सगळ्या गावाच्या अब्रूचा प्रश्न होता. रामोशाने आमच्यातली एक बाई काढून नेली हे काळे आमच्या तोंडाला लागले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. आणि ते रास्त होते. आनंदा म्हणाला, “त्यो हितं असता तर लाथा घालीत तुमापुढं आनला असता. आमच्या हातानं आमी त्याच्या डोस्क्यात धोंडा घातला असता. हां ! “लोक म्हणाले, “जातोय कुटं ! जितं असंल तितनं आमी हुडकून काढू आन् मारू. “हां हां, अवं ते कुठं जातंय गरीब ! त्याचा दम हाय का तुमच्या म्होरं ? “मला काय बोलावे हे सुचेना. हे आडदांड लोक पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागे लागावे तसे जगन्याच्या मागे लागले होते. तडाख्यात सापडला तर त्याला ठार मारायला ते कमी करणार नव्हते. शेवटी आनंदा त्यांना म्हणाला, “सरकार, ही तुमाला जशी कमीपणाची गोष्ट हाये तशी आमा रामुशांना बी हाये. तवा तुमी माघारी जा. मी खंडुबाची आण घिऊन सांगतो की ती बाई आन् आमचा पोरगा मी आट दिवसांच्या आत उभा करतो तुमाम्होरं. मग झालं का ? ‘वांगीचे लोक विचार करू लागले. आनंदा म्हणाला, “का वं मास्तर? “ठीक आहे. जगन्यानं जर गुन्हा केला असेल.

तर, त्याला पकडून यांच्यापुढं उभं करायला काही हरकत नाही. आयबूने गावात हिंडून शिपतरभर भुईमुगाच्या शेंगा आणि बचकभर गूळ गोळा केला, आणि तो आणून वांगीच्या लोकांपुढे ठेवला. जरा वेळाने चरवी भरून चहा आणला आणि शेंगा खाऊन झालेल्या पाव्हण्यांना पितळ्यांतून पाजला. आग्रह करकरून पाजला. आनंदाचा शब्द मानून, मला जामीन ठेवून , वांगीचे लोक निघून गेले. पोचवायला म्हणून..

क्रमशः

स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading