दिनांक ३ मार्च, श्रीगोंदा:
दलित आदिवासी बांधवांवर सवर्ण समाजाकडून होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार कारवाई होते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील प्रेरणाताई धेंडे व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी समाज कल्याण उपायुक्त देवारे साहेब, श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन सादर केले आहे. तसेच, या विविध मागण्या संदर्भातील पत्र महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनाही पाठवण्यात आले आहे.

नमूद निवेदनामध्ये जनसेवकाचे कर्तव्य, दुर्घटनेनंतर पिडीतांना येणाऱ्या अडचणी, त्यांना होणारी शासकीय मदत, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत जागृती व प्रसार, प्रचाराबाबत कार्यक्रमांचे आयोजन, वेळेत प्रकरणाची चौकशी करणे व दोषारोपपत्र नमूद कालखंडात न्यायपालिकेत दाखल करणे, दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी चोवीस तासाच्या आत भेट देणे, गंभीर घटनांमध्ये पीडितांना संरक्षण देणे, राशन, पाणी, विज अशा अत्यावश्यक गोष्टींची तात्काळ मदत देणे, फिर्यादीस विश्वासात घेऊन घटनेच्या अनुषंगाने गुन्हा नोंद करणे, जनसेवक म्हणून जिल्हा अस्पृश्यता निवारण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ते स्थानिक प्रशासनापर्यंतचे अधिकारी – कर्मचारी यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाल्यापासून ते पीडितांना मदत मिळेपर्यंतचे कर्तव्य व वेगवेगळ्या अंमलबजावणी बाबत अंतर्भाव असलेले निवेदन “नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस” व “सामाजिक न्याय विभाग” या संघटनांमार्फत प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रेरणा ताई धेंडे, दादा जाधव, पांडुरंग गडेकर, महेश नवगिरे, प्रकाश पारदासानी, इत्यादी “नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस” तर संदीप उमाप (तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस), गोरख तात्या घोडके (तालुका कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस), जितेंद्र पाटोळे, मानव जाधव, निखिल पाटोळे, आनंद ससाने, राहुल बागे, बाप्पू माने असे संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
स्रोत:(प्रशासनास सादर केलेले निवेदन)
