बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर.(भाग २८).

बनगरवाडी…

आम्ही गावाबाहेर गेलो. तो लोक दृष्टिआड झाले आणि आम्ही परत फिरलो तेव्हा मी विचारले, ” जगन्या मिळाला नाही तर रे, आनंदा? “आनंदा खाकरून थुकला आणि म्हणाला,” रामुशाचं बीज सांगनार न्हाई. मसनात जाऊ द्या त्येला मास्तर. मागावर जाऊन आनतो का न्हाई बगा! “भल्या पहाटे उठून आनंदा रामोशी जगन्याच्या मागावर गेला. त्याच्याबरोबर आणखी दोनतीन जवान पोरे होती. हातांत कुऱ्हाडी – काठ्या घेऊन हे तिघेचौघे हरणाच्या शिकारीसाठी जावे तसे जगन्याच्या पाठीवर गेले. वाडीच्या रामोशांची वळणे कुणीकडे होती हे आनंदाला पक्के ठाऊक होते. जगन्या इथून निघून दोन दिवस झाले आहेत, एवढ्यात अंतर काटून तो मोटारीने स्टेशनपर्यंत गेला असेल आणि मुंबईला जाणारी गाडी त्याने धरली असेल असा संभव नव्हता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कारण आपण नाहीसे झालो की पाठलाग हा होणार आणि प्रथम मोटाररस्ता, स्टेशन तपासले जाणार याची खात्री त्याला असलीच पाहिजे. साहजिकच तो शक्य तो दूर पण कुठेतरी ओळखीच्या ठिकाणी येईल. ओळखीची ठिकाणे गावोगाव होती, पण विशेष असे की दहाबारा कोसांवर असलेल्या निमरज गावी जगन्याची बहीण दिलेली होती. त्या गावच्या रोखाने आनंदा चालला. आणि दुपारीच्या जेवणवेळेला बरोबर पाहुण्याच्या दारात जाऊन हजर झाला. पाहुणे मंडळी येताच जगन्याच्या बहिणीची धांदल झाली. उसनेपासने पीठ आणून तिने ऊनऊन भाकऱ्या ठोकल्या, कोरड्यास केले आणि त्यांना भरपेट जेवू घातले. ढेकर देऊन ही मंडळी उठली आणि आनंदाने पान खाता खाता पाव्हण्यापाशी – जगन्याच्या मेव्हण्यापाशी – चौकशी केली, ‘जगन्नाथ आला होता का ? “पाव्हणा थोडा कानपला. त्याने उत्तर केले,” नाहीबा. आला नाही हिकडे ! “आनंदाला अंदाज होताच. पाव्हणा चमकला हे त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही.

त्याला कळून चुकले की जगन्या इथे येऊन गेला आहे. त्याने बाई पळवली आहे हे मेव्हण्यापाशी सांगितले आहे. आनंदा म्हणाला, ‘तुमच्यापाशी खोटं कशापायी बोलू? जगन्याने गाढवपणा केलाय. वांगीची चांगल्या घरातली बाई पळवून आणलीय. त्या गावचं शंभर मानूस भाले कुऱ्हाडी उगारून वाडीवर आलं. मी हातापाया पडून सांगटलं, ती बाई आन् जगन्या मी तुमच्या हवाली करतो. तुमी गावाला पिडा करू नका. मानसं परत गेली. न्हाईतर वाडीत दोनचार मुडदं पडत होतं. बारकावा पाव्हण्याला कळला नसावा. पाव्हण्याचा चेहरा थोडा विचारी झाला. आत जगन्याच्या बहिणीची उलघाल झाली. पण जगन्या आला होता याची कबुली न देता पाव्हणा म्हणाला,काजी ! ” “जगन्नातानी गोष्ट चुकीची केली. फार वरच्या पायरीला हात घातला.

बाई न्याला हरकत नव्हती, पर निदान आपल्या जातीतली न्याची. असू. पर मी म्हनतो, तुमी त्याला धरून काय करनार? बाईची अब्रू गेल्याली परत येनार न्हाई. तिला कुनी जातीत घेनार न्हाई. बरं, ते लोक जगन्नाताला काय करतील? मारहान करतील, जिवं मारतील ! पर इतकं करून झाली गोष्ट भरून येईल का ? ” आनंदा म्हणाला, “न्हाई, हे खरं.” मग तुमी का रगत आटवता ? राहू दे त्या दोगास्नी रंगलाल. मियाबिबी राजी तो क्या करे एका दृष्टीने पाव्हण्याचे म्हणणे बरोबर होते. पण तो ही गोष्ट अजिबात विसरला होता की, जगन्या बाईला घेऊन रंगलाल राहील, पण ती वांगीची माणसे त्याचे खोपट पेटवतील. त्याच्या घरातल्या माणसांना मारहाण करतील. एकासाठी सगळा रामोसवाडा आगीत पडेल. सगळ्या वाडीला त्रास भोगावा लागेल. त्या छोट्याशा गावाचे माणूसबळ ते किती? ही गोष्ट आनंदाने त्या रामोशाला समजावून सांगितली, पण तो कबूल होईना. मेव्हण्याचा ठावठिकाणा सांगेना. पुष्कळ घोळूनही त्याच्याकडून तलास लागेना,

तेव्हा आनंदा उठला आणि म्हणाला, “बराय, मग आम्ही बगतो काय करायचं ते. रामराम. “पाव्हणाही रामराम करून उठला. पण तेवढ्यात जगन्याची बहीण आतून बाहेर आली आणि रडकुंडीला येऊन म्हणाली, “आनंदा, जगू आला वता ! “नवरा लाल डोळे करून तिच्याकडे बघू लागला तरी तिने तोंड बंद केले नाही. “ठेसनावर गेलाय. बाईला घेऊन सांगलीला जान्याचा बेत दिसला. पर त्येच्या जिवाला नकं अपाय होऊ दिऊस तू. माझ्या गळ्याची आन हाय बग !” आनंदा म्हणाला, ” सुटली. अग, आमाला काय हायेच का न्हाई ? आमी कसं त्याला मारू दिऊ ? कवा गेला हितनं ? “ गेलाय पहाटंच. अजून गाडीत बसला नसंल. स्टेशनला मिरजेकडे जाणारी गाडी दुपारी तीन वाजता होती. घाईघाईने निरोप घेऊन, वरचेवर धीर देऊन आनंदा तिथून सुटला. खोचे खोवून वहाणा हातात घेऊन त्यांनी स्टेशनाची वाट धरली. रख्ख उन्हातून, तापल्या फुफाट्यातून ते टणक रामोशी पळू लागले. हा हा म्हणता त्यांनी तीनचार कोस जमीन मागे टाकली. आणि दूरवर रस्त्याकडेला असलेल्या वडाखाली एक बाई आणि एक गडी त्यांच्या नजरेला पडला. जगन्या टणक होता. मोटारीसारखा पळणारा होता. पण त्याच्याबरोबर असलेली गोरीपान बाई अंगाने सुटलेली होती. आधी बाईमाणूस आणि त्यात अंग जड. कितीही भीती मागे असली तरी झपाट्याने वाट कातरणे त्या दोघांना जमले नाही. जागोजाग ऊसबस करत, सावलीला विसावा घेत ती दोघेही अजून वाट आवरीत होती.

आनंदा थबकून उभा राहिला. कपाळाला हात लावून त्याने नीट हेरले आणि बरोबरच्या पोरांना म्हटले, “जगन्या त्यो. लाल पटका त्येचाच. पर आता कसं रं ? त्यो पळणार. ” पोरे म्हणाली, ” पळू द्या. सशावाणी तानून पाडतो त्याला.“ पाडता ? ” हो. आन् त्यो पळाला तर बाय हाय की ! ” तिला घिऊन काय कापायची ? जगन्या पाहिजे.’ “त्यो तरी कुटं जातोय! चल उगीच खाली बगून. “मग पोरे चोहीकडे पांगली. चारी दिशांनी त्यांनी त्या जोडप्याला मध्ये घेतले. आणि सावधपणाने रान दाबत ती जगन्याच्या दिशेने येऊ लागली. जगन्या वरचेवर सूर्याकडे बघत होता, “हं आवर, गाडी चुकंल. ‘ चालून भेंडाळलेली ती बाई आपली कोरडी जीभ तडकल्या ओठावर फिरवून म्हणत होती, ‘थांब थोडका. न्हाई तर मी मरंन. “असे चालले तोच बावरून एकाएकी जगन्या उठून उभा राहिला.

त्याने आजूबाजूला बघितले. पाठीमागे कासराभर अंतरावर आलेला आनंदा त्याने बघितला आणि बाईच्या हाताला धरून तिला ओढीत तो म्हणाला, ‘अग पळ, मानसं आली आपल्याला धरायला! “जिवाच्या कराराने ती दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून धावली. आनंदा मागून ओरडला, “जगन्या थांब, पळू नकंस ! “पण जगन्या बेभान झाला होता, बाई बेभान झाली होती. नीट रस्ता सोडून काळ्या वावरातून ती दोघे मागे न बघता धावू लागली. बाईचा पदर वाऱ्यावर फडफडत राहिला. जगन्याचा शेमला वाऱ्यावर फडफडत राहिला. दगडधोंडे, माती यांना न जुमानता ती दोघे रपाट पळत राहिली आणि आनंदा त्यांच्या मागे लागला. पळता पळता दमछाट होऊन ती बाई कोसळली. काळ्या वावरात पडली. मागे वळून…

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading