बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग ३३).

बनगरवाडी..

मग मावल्या आईची जत्रा आली. दरसाल ही जत्रा बनगरवाडीला होत असे. गावापासून एक मैलावर छोटेसे टेकाड होते. त्यावर रानात घालतात तशी एक साधीसुधी खोप घातलेली होती आणि त्या खोपेत मावल्या आई बसून राहिली होती. आजूबाजूला सगळा खडक आहे. फूट – दोन – फूट उंचीची तरवडाची झुडपे, एखादे नेपतीचे वाळकुंजे झाड, याशिवाय काही नाही. धनगरांच्या नवसाला पावणारी ही देवी होती. इतके दिवस ती खोपीत राहिली.

Bangarwadi – Venkatesh Madgulkar (Part 33).

लहानसे देऊळ का गावकऱ्यांनी बांधले नाही ? तसा प्रयत्न झाला होता; पण देवी पुजाऱ्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, ” देऊळ बांधू नका. मी आहे तीच आनंदात आहे. ” चांगलेचुंगले कपडे घालून सगळी वाडी त्या निर्जन जागी गोळा झाली. आजूबाजूच्या गावचीही काही भाविक मंडळी आली. एकूण शे – दीडशे माणूस जमले. पुजाऱ्याने पूजा केली. लोकांना गुलाल लावला. गावाबरोबर टकरा देत राहिलेला बाळा बनगरही जत्रेला आला. बायकापोरे घेऊन चालत आला. त्याला बघताच वाडीतल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्याला अडवा, त्याला देवीपाशी जाऊ देऊ नका, असा गोंधळ झाला. पण कुणाला न जुमानता बाळा देवीपाशी आला, पाया पडला आणि प्रसादाचा गुलाल लावण्यासाठी त्याने आपले कपाळ पुजाऱ्यापुढे केले. तेव्हा पुजारी म्हणाला, “तू पांढरीला जुमानत नाहीस. मी तुला गुलाल लावणार नाही. ”एवढा बलदंड माणूस बाळा, पण पुजाऱ्याने गुलाल लावत नाही म्हणताच तो थंड उभा राहिला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

लोकांकडे तोंड फिरवून उभा राहिला. गेले अनेक महिने त्याने फार ताप सोसला होता. गावातले कोणी त्याच्याशी बोलत नव्हते. एखाद्या महारोग्याप्रमाणे बाळा बनगरला त्यांनी दूर ठेवले होते. आज त्याचा कळस झाला. देवीचा प्रसादसुद्धा त्याला मिळाला नाही. लोकांच्या अडवणुकीला बधला नाही तो बाळा या उपेक्षेने खचला. धोतराच्या निऱ्या फराफरा फेडून त्याने गावापुढे अंथरल्या आणि मोठ्याने ओरडून तो म्हणाला, “माज्या पांडरीपुढं मी पदर पसरतो, माजी चुकी माफ करा. मला तुमच्यात घ्या. मला गुलाल लावा. तुमी माझं झाड घ्या, घर घ्या, माजा जीव सुदीक घ्या; पर मला असं लांब ढकलू नका ! “आणि त्याचा कणखर स्वर कापरा झाला. त्याच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या.

Bangarwadi – Venkatesh Madgulkar.

क्षणभर एवढा मोठा जमाव अगदी गप राहिला आणि मग तो रामाचा म्हातारा काकूबा गावाला म्हणाला, “अरे, पोर मांडीवर मुतलं, मांडी कापायची का ? लावा त्याला गुलाल ! “लोकांची कुजबूज झाली. सगळेजण “लावा ‘म्हणाले, मग पुजारी उठून गावापुढे पदर पसरून उभ्या राहिलेल्या बाळाच्या कपाळाला गुलाल चोळून म्हणाला, “मावल्याईचं चांगभलं! “मग लोकांनी ‘चांगभलं ‘गाजवलं, गुलाल उधळला, मुठी – मुठींनी उधळला. रताळी, गाजरे उधळली. तो प्रसाद शोधण्यासाठी झुंडीच्या झुंडी खाली वाकल्या. रेटारेटी, आरडाओरड झाली. व्हरलाने डफडे वाजवले, पिपाण्या फुकल्या आणि दर वर्षीप्रमाणे धुळा बनगराच्या अंगात आले. हा – हू करून तो घुमू लागला. शरीराला आळोखेपिळोखे देऊ लागला. व्हरलांनी डफड्याची घाई घेतली, तो तो धुळा जास्ती जास्ती नाचू लागला. त्याने अंगावरचे घोंगडे टाकून दिले. डोईचा पटका टाकून दिला.

उघडाबंब असा धुळा धनगर उभा राहिला आणि घुमू लागला. पुजाऱ्याने त्याच्या कपाळाला गुलाल फासला. काळ्याभोर कपाळावर तांबडाभडक गुलाल फासला. तो ओघळत नाकावर उतरला आणि तसा तो धुळा धनगर नाचू लागला.“ आई आली, आई आली ! ”असे म्हणून धनगर त्याच्याभोवती गोळा झाले. मग शेकूने विचारले, “आई, अवंदा पाऊसपानी न्हाई . काय चुकी झाली ? ‘आई घुमत म्हणाली, “ पाप फार झालं, लबाडपना बोकाळला रे ! त्येनं पाऊस गेला! “पर आई, पाऊस गेला, तर मेंढरांनी खावं काय ? आमी जगावं कसं ? “डोळे मिटल्याच आई बोलली, “माजी जत्रा नीट करा – मला निवदनारळ नीट करा…सगळं चांगलं हुईल. ‘पाऊस पडल ? “हां, पडंल. “पर आई, कवा ? मिरग निघाला, सगळ्या जगात पानी पडल, अन् वाडीवर काळा ढगसुद्धा उठला न्हाई !” ” अरं, तुमाला धडा मिळावा म्हणून असं झालं. पर आता पाऊस पडल. म्होरची नकित्रं पडत्याल.

शेकूने थोबाडीत मारून घेतल्या. ‘आई, चुकीची माफी कर! तुझी जत्रा नीट करू – निवदनारळ करू. सगळं पतकरून घेतो आमी. “असे म्हणून धुळ्याच्या पायांवर त्याने डोके टेकले. आणि मग अंगातले जाऊन धुळा गप पडला. मग लोकांनी जत्रा केली. दरसालप्रमाणे देवीपुढे बकरे मारले. आयबूने सुरी फिरवली, शेकूने देवीला रक्त वाहिले, पुढे प्रसाद ठेवला. आणि मग चिराचीर चालू झाली.

आवतीभोवती लोक जमले. पोरेठोरे गर्दी करून बघू लागली. तेव्हा आयबूने सर्वांना दटावून सांगितले, “जावा आता घरी. भाकरी घेऊन जेवायला या. “आपल्या घरच्या भाकरी घेऊन जेवायला इथे या. हो, कालवण इथे मिळेल. बनगरवाडी मेंढरे देईल – जोंधळे कुठले आणावे ? हळूहळू लोक निघून गेले. काही शेलकी मंडळी राहिली. त्यांनी चर खांदून जाळ केला. त्यावर हंडा ठेवला. दोनतीन बकऱ्यांचे मास हंड्यांतून शिजू लागले. त्याचा घमघमाट सुटला. चांदणे पडले. मशाली पेटल्या. पितळ्या – तांब्ये आणि भाकरी घेऊन धनगर आले. पंक्ती बसल्या. टेकण लावून ठेवलेल्या पितळ्यांतून ऊनऊन आणि तिखटतिखटजाळ कालवण वाढले गेले. “चांगभलं’ असा जयघोष झाला. लोक कालवण – भाकरीवर तुटून पडले, फुरफुर्र भुरके मारू लागले. त्या तिखट कालवणाने त्यांची तोंडे भाजली आणि नाकांना पाणी आले !

स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply