बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग ३४).

बनगरवाडी…

मावल्या आईने अभय दिले, पण नक्षत्रांमागून नक्षत्रे गेली आणि बनगरवाडीवर पाण्याचा टिपूस पडला नाही. तापलेल्या जमिनी निवल्या नाहीत. झाडेझुडपे वाळून कोळ झाली. भुकेल्या मेंढरांनी चगळ न् चगळ वेचले. फुफाटा फार झाला. चक्रीवादळे होऊ लागली. विहिरींचे पाणी आटले. वाडीचा हेळ आटला. चिखलाने गढूळलेले पाणी नरोट्याने खरवडूनसुद्धा घागर भरेनाशी झाली. सकाळ – दुपार लोक पाण्यासाठी हेळावर गर्दी करू लागले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

संध्याकाळच्या सुमाराला चिमणीला प्यायलासुद्धा पाणी उरेनासे झाले. रात्रभर झिरपून सकाळी थोडे पाणी होई. ते भरण्यासाठी भल्या पहाटे उठून बायका जाऊ लागल्या. कावळे जागे होण्याआधी माणसे जागी होऊन पाण्यापायी भांडू लागली. जनावरे रोड झाली. त्यांच्या भकाळ्या दिसू लागल्या आणि अंगावर अस्वलासारखे केस वाढून ती मळकट दिसू लागली. लोकर कातरल्यामुळे अगोदरच भुंडी झालेली मेंढरे अगदीच बारीक झाली. त्यांची चरबी पार वाळून गेली. छपराचे जुने, कुजके काड उपसून लोक जनावरांपुढे टाकू लागले. पाण्यापायी मेंढरे लांबलांब न्यावी लागू लागली. चिमण्या, कावळे, होले दिसेनासे झाले. भुकेने वखवखलेले रानातले उंदीर गावात आले आणि त्यांनी धुमाकूळ घातला.

धनगरांच्या घोंगड्या त्यांनी कातरल्या, पिठाच्या वासाने सुपे कातरली. दुरड्या कातरल्या. लोकांच्या तोंडावरची कळा नाहीशी झाली. त्यांच्या डोळ्यांत भूक दिसू लागली. घरातले धान्याचे साठे रोडावत, तसे रुपया – दोन – रुपये घेऊन ते बाजार गाठू लागले. मोठ्या मिनतवारीने मिळविलेले महागडे धान्य घेऊन येऊ लागले. हातांवरची पोटे होती ते लोक उपासतापास काढू लागले. रामोशांची फार हलाखी झाली. दोनदोन दिवस त्यांच्या घरांत चूल पेटेनाशी झाली. तालमीत येणारी पोरे धान्याच्या शोधासाठी दूरदूर जाऊ लागली. शाळेत येणारी पोरे अन्न मिळविण्यासाठी जवळपासच्या खेड्याच्या वाऱ्या करू लागली. तालीम ओस पडली, शाळा ओस पडली. अन्न मिळविण्यासाठी सगळे धडपडू लागले. सगळा जिल्हाच दुष्काळाच्या तडाख्यात सापडला. माणदेशच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ आला. लोक हवालदील झाले. रामा बनगराचा चेहरा काळवंडून गेला. रोज शाळेत होणारी त्याची खेप चुकू लागली . चारदोन रोज सुनके जाऊ लागले. आल्यावरही दुष्काळाशिवाय दुसरा विषय त्याच्या बोलण्यात येईनासा झाला. “त्येची अशी कथा सांगत्यात मास्तर, रामलक्षिमन देव देव करत आपलं हिंडू लागलं.

हिंडता हिंडता आपल्या भागामधी आलं. रामघाटाच्या वर दुपार झाली म्हणून भाऊभाऊ सावली बगून जेवाय बसलं आन् पाऊस आला. जोरकस आला. अन्नात पानी पडू लागलं. राम रागावला अन् एक बाण मारून त्येनं पावसाला पार बालेघाटात पिटाळला. तवाधरनं जो ह्या मानदेशात पाऊस न्हाई त्यो आजपतूर न्हाई. बगा तुमी, रामघाटाला पाऊस पडतो आन् आपल्या टकुऱ्यावरनं काळं ढग नुसतं जात्यात. जात्यात, जात्यात आन् पुन्ना पडत्यात ते बालेघाटात . ही गोष्ट खरी होती. मधली पट्टी पावसाच्या कृपादृष्टीतून नेमकी सुटत होती. खाण्याची आबाळ झाल्यामुळे मेंढरे रोडावली आणि अशक्त झालेल्या त्यांच्या शरीरांना नाना रोग झडपू लागले.

Bangarwadi – Venkatesh Madgulkar (Part 34).

देवीची साथ आली आणि मेंढरांच्या तोंडावर देवी उठल्या. ताप भरून ती जागची उठेनाशी झाली. करुण डोळ्यांनी इकडेतिकडे बघत उगीचच बसून राहू लागली. काहींना आडा भरला आणि त्यांची डोकी फिरली. वेड लागलेली ती मेंढरे स्वत : च्या अंगाभोवती फिरू लागली. आणि अशी फिरून फिरून जमिनीवर आपटू लागली. मरू लागली. काहींचे पाय लुळे पडले आणि ते ओढत ती चालू लागली. लोक म्हणू लागले, मेंढराला व्हल्याने व्हलगाडले, तांबडा व्हला त्याच्या पाठीवर बसला आणि उडताना त्याने पंखे मारली, त्यामुळे जखमी मेंढरू कमरेपासून लुळे पडले. काहींना नाकाड्या झाल्या. नाके वाहू लागली.

त्यांवर कावळे टोचा मारू लागले. गलोलीने कावळे मारून धनगर ते वाडग्यावर टांगू लागले. काहींना लाळ पडली आणि त्यांचे पाय कुजू लागले. मेंढरे लंगडू लागली. कशाला तोंड लावीनाशी झाली. ह्या सगळ्या रोगांत मेंढरू म्हणावे इतके दगावले नाही, पण काही खांडांत डरंगळण्याचा रोग शिरला आणि मेंढरे पटापट मरू लागली. हा रोग बिरा धनगराच्या खांडात शिरला. एकाएकी बसल्या जागी मेंढरांना पातळ जुलाब होऊ लागले. वाडग्यात राडेराड होऊ लागली. त्या राडेने मेंढरांची अंगे भरली. माशा घोंगावू …

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading