बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग ३६)

बनगरवाडी..

रामा बनगर जाण्यापूर्वी मला उराउरी भेटला. म्हणाला, ‘धुळ – मोर्चापुरकडं जातो. तिकडे पाव्हने आहेत. म्हातारा याला तयार न्हाई. त्याला संबाळा ! “म्हातारा काकुबा धनगर गेला नाही. तो गावातच राहिला. पोराने खूप सांगून बघितले, “मी कशापायी येऊ ? मेंढरं घिऊन तुमी जाताय. त्यांना जगवताय. माजं आता काय व्हायलंय ? इतका आटापिटा करून जगावं असा मी आता व्हायलो न्हाई. तुमी जा. माजी माती हितंच पडंल ! “मग रामाने धान्याचा साठा ठेवला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

म्हाताऱ्याला करून घालण्यासाठी आपली बायको ठेवली. आणि मेंढरं घेऊन तो जायला निघाला तेव्हा म्हातारा म्हणाला, ” सगळी मेंढरं नेतोस, मग मी हितं काय करू ? दोन ठिऊन जा . माज्या भाकरीतली त्यांना घालून जतन करीन. निभंना झालं तर सगळीच मरून जाऊ ! “म्हाताऱ्यापाशी दोन मेंढरे ठेऊन रामा आणि त्याचा तरुण पोरगा निघून गेले. घरटी कुणी माणूस राहिले, कुणी राहिले नाही. भराभर सगळे बाहेर पडले. न रडता, न भेकता त्यांनी वाटा धरल्या. जे मूठभर शेतकरी होते ते जवळ असलेल्या धान्यामुळे तग धरून आणखी महिनाभर राहिले. पण मग तेही गेले. बाळा धनगर गेला. बैलाला घेऊन शेकू, त्याची बायको गेली. धुळा गेला. वाडीतले शेतकरीही गेले.

त्यांच्या वस्त्या बंद झाल्या. कवाडांना कुलपे लागली. बाळा बनगराच्या पाठकुळी बसून बालट्यासुद्धा गेला. जाता जाता शाळेपाशी येताच तो ओरडून म्हणाला , “मास्तर, मी चाललो. पर जगून माघारी ईन आन् तुजं बघीन. अरं, मला पक्कं माहीत हाय तू माझं हातपाय मोडलंस ! “सकाळ – संध्याकाळ हजारोंनी बाहेर पडणारी आणि पुन्हा वाडीत परत येणारी मेंढरे , मेंढके गेले, आणि वाडी भकास झाली. परत येणाऱ्या लेकुरवाळ्या मेंढ्यांचा आवाज ऐकू येईनासा झाला आणि वाडी मुकी झाली. झोपड्यांतून धूर निघेना, शाळेपुढे सभा भरेना, लेंड्यांचा, मुताचा उग्र वास येईना, आणि वाडी निर्जीव झाली. हलती – बोलती होती ती स्तब्ध, गप झाली. एक वेळ पाणी पडले नाही, एक पावसाळा दिसला नाही, आणि वाडी खलास झाली. तो रामा बनगर, तो शेकू, तो आनंदा, बालट्या आणि बाळ्या – सगळे नाहीसे झाले.

Bangarwadi – Venkatesh Madgulkar

बरेवाईट सगळे गेले. शाळा तिथेच राहिली; तालीम तिथेच राहिली; ही घरे, ही झाडे जिथल्या तिथे राहिली; आणि मंडळी निघून गेली. जोरदार वारा घोंघावत राहिला. त्या वाऱ्यामुळे उडून आलेली धूळ घरांच्या दारांवर, भिंतींवर तरुण बसली. धनगरांनी स्वच्छ सारवलेली अंगणे धुळीने, केरकचऱ्याने भरून गेली. छपरांवरील काड वाऱ्याने विस्कटले, सुटले. ते काड सर्वत्र झाले. भोकसे पडलेल्या जागी घुसून वारा चमत्कारिक आवाज करू लागला. छपरांवर टाकलेली मोडकी अवजारे खाली अंगणांत कोसळल्याचे आवाज होऊ लागले. घरांच्या बंद कवाडांवर वारा धडका मारू लागला. कवाडे धडधड, खडखड वाजू लागली. तालमीत धूळ साचली. हौद्यातल्या लाल मातीवर धुळीचा थर बसला. कोळ्यांनी जाळी केली, गजीचा ढोल उंदरांनी कुरतडला. अनेक दिवस न सारवल्यामुळे शाळा उखणली, पोपड्यांनी भरून गेली. फळ्यावर, टेबलावर, पेटीवर धूळ साचली. मारुतीच्या देवळात धूळ साचली. तांबडा मारुती धुळीने माखून निघाला. गावात कुणी दिसेनासे झाले.

अनेक दिवस, रोज संध्याकाळी येऊन लिंबाच्या टोकावर बसणारे बगळे येईनासे झाले. शाळेत गोंधळ घालणाऱ्या चिमण्या कुठे दिसेनाशा झाल्या. मांजरे इकडेतिकडे हिंडू लागली. रात्री एकमेकांवर गुरगुरून भांडू लागली. बंद घरांतून उंदरांची शिकार करू लागली. रात्री काकुबा धनगराची मेंढरे एकुटेपणामुळे ‘बें – बें’ ओरडू लागली, आणि धीट झालेला लांडगा वास हुंगीत गावातून फिरू लागला. तालमीतल्या धुळीवर, देवळातल्या धुळीवर, धनगरांच्या अंगणातल्या धुळीवर त्याची पावले उमटू लागली. सकाळच्या प्रहरी ती दोनच मेंढरे घेऊन म्हातारा काकुबा धनगर रानात जाई. भुकेलेली मेंढरे माळावरून सैरावैरा धावत, नाके वर करून उष्ण हवा हुंगत. त्यांना खाण्यासारखे रानात आता काही राहिले नव्हते. कळपातून वेगळी झाल्यामुळे ती ओरडत. काकुबा मग त्यांच्याशी बोले. नांगरलेल्या रानातून हरळीच्या मुळ्या वर येऊन पडल्या होत्या. त्या वाळल्या काशा काकुबा खोच्यात वेचून आणी आणि त्या दोन मेंढरांना घाली.

दिवसभर काशा वेचीत असा तो वणवण हिंडे. मेंढरे ओरडत त्याच्यामागे फिरत. संध्याकाळ झाली की ‘हा – हा’ करून ती दोन मेंढरे हाकारत म्हातारा गावात येई. रामाची मागे राहिलेली बायकोही सकाळच्या प्रहरी डोक्यावर मोकळी पाटी आणि कासोट्यापाशी खुरपे खोवून बाहेर जाई. परगावचे मळे पालथे घाली. सहासहा, सातसात मैलांची पायपिटी करून ती माघारी येई, तेव्हा तिच्या मोकळ्या पाटीत दोन – पाच गाजरे असत. जळणासाठी वेचलेल्या काटक्या असत. मेंढरांना खाण्यासारखे भुस्कट असे. मागामागी करून केलेली ही कमाई घेऊन ती संध्याकाळी माघारी येई आणि मग घटकाभर त्यांच्या झोपडीत लाल जाळ पेटे, काळाकरडा धूर छपरावर दिसे; क्वचित बोलणे ऐकू येई. मी अधूनमधून गावी जात होतो. झाल्या गोष्टी सरकारात कळवीत होतो. आठवड्यातून दोनचार दिवसच वाडीत काढीत होतो. दिवसभर आम्ही दोघेच गावात असू. गुडघे उभे करून त्याभोवती हाताचा वेढा देऊन आयबू कुठेतरी बसून राही. कधी मनात आले म्हणजे

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading