बनगरवाडी..
शाळा, तालीम झाडून काढी. मी दिवसदिवस झोपून राही. काही वाचीत, लिहीत बसे. मधूनच मला न सांगतासवरता आयबू कुठेतरी निघून जाई. धुळीने भरलेल्या पायांनी दमूनभागून संध्याकाळी परत येई. खाली मान घालून बसून राही. कुठे गेला होतास म्हणून विचारले, तर पाय मोकळे करायला गेलो होतो एवढेच सांगून गप्प राही. दिवस कसाबसा रेटला जाई, पण रात्र खायला उठे. अशा वेळी कधीकधी काकुबा येई आणि भिंतीला पाठ टेकून बसून राही.

खोलीत चिमणीचा मंद प्रकाश पडलेला असे. मी माझ्या विचारात, आयबू आपल्या विवंचनेत आणि काकुबा उगीच इकडेतिकडे बघत असे. तिघे तिन्हीकडे बसून राहत असू. मी विचारी, “काकुबा, रामाचा काही सांगावा ? “न्हाईबा. ” गेलेली माणसं आता परत कधी यायची ? “याची पाऊसपानी पडलं म्हंजे ! “कधी झाली तर अशीच प्रश्नोत्तरे होत. नाही म्हणजे म्हातारा बसबस बसे आणि उठून निघून जाई. मी घरून आणलेल्या भाकरीतून दोनतीन दिवसांच्या शिळ्या भाकरी आयबूला देऊ केल्या तर तो कधी घेई, कधी नको म्हणे. फार आग्रह केला तर तो बाहेर निघून जाई. मी एकटाच बसून त्या वाळल्या भाकरी खाई आणि पाणी पिऊन झोपी जाई.
“असे काही दिवस गेले आणि मग एके दिवशी मला वरिष्ठांकडून लिहून आले की वाडीची शाळा बंद करून तालुक्याच्या प्रायमरी स्कूलमध्ये दाखल व्हावे. आयबूने माझे सामानसुमान आवरले. राहत होतो ती जागा मोकळी केली. शाळेला कुलूप लावले. तालमीला कुलूप लावले. मी उभ्या – उभ्या काकुबाच्या घरी गेलो. “बाबा , मी जातो. सरकारनं मला माघारी बोलावलं आहे. “काकुबाने टक लावून माझ्याकडे बघितले. होकारार्थी मान हलवली – दोनतीन वेळा हलवली आणि तो म्हणाला, “बराय ! “म्हातारा जास्ती बोलला नाही. त्याची सून काहीच बोलली नाही. नवे माणूस बघून मेंढरे दोन तीन वेळा ओरडली आणि काकुबाचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो.
Bangarwadi – Venkatesh Madgulkar
माणूसकाणूस, गुरढोर कोणी दिसत नव्हते आणि वाडीकडे पाठ फिरवून आम्ही गाडीवाटेने परत चाललो होतो. सामानसुमान भरलेले एक ठिके आयबूने डोक्यावर आडवे घेतले होते आणि माझ्यामागून तो येत होता. काही सामान माझ्या हातात होते. मध्येच आयबू थांबला आणि डोक्यावरचे पोते सारखे करून माझ्याकडे न बघता म्हणाला, “हे गबाळं तुमच्या घरी टाकून मग मी माघारा जाईन. ‘कुठे जाणार, काय करणार, हे मी काहीच बोललो नाही. या बापड्याला आता कुठे आधार मिळेल, असा विचार मनी आला नाही. माझी सावली पुढेपुढे सरकत होती. धूळ उडत होती. आणि समोर दूरपर्यंत पसरलेल्या माळावर कुणीही दिसत नव्हते. उजाड बनगरवाडी मागे राहिली होती आणि मी परत चाललो होतो.
(या कादंबरीचा हा शेवटचा भाग संपन्न)
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन )
