बनगरवाडी.
चाले आणि मग गलगा खाली बसे. पोरे लुचताना होणारा मचमच आवाज तेवढा ऐकू येई. पोरांची धुळीने मळलेली अंगे मेंढ्या चाटत आणि पांढऱ्या घट्ट दुधाने पोरांची तोंडे माखून जात. पाराजवळ एकमेकांना भेटलेले धनगर विचारत,” जुळली का मेंढरं ? ” ” हो. तुजी गा ? ” ” जुळली ! ‘ दरम्यान धनगरणीने चार भाकऱ्या टाकलेल्या असत. मटकी – मुगाचे कोरड्यास गाडग्यामध्ये उकळत असे. मेंढरांची उस्तवारी करून मेंढका घरात जाई आणि सकाळपासून उभी असलेली त्याच्या हातातली काठी आडवी होई.
चूळ भरून तो दोन पायांवर बसे आणि अपुऱ्या उजेडात भाकरी खाऊ लागे. जेवण किंवा भोजन हा शब्द तिथे माहीत नाही. भाकरी खाणे! जेवण म्हटले की त्यात कदाचित आणखी एखाददुसरा पदार्थ येतो, तो धनगरांना ठाऊक नाही. त्याची जरुरीही नाही. ते फक्त दोन वेळा भाकरी खातात. हिरव्या भाजीच्या पाल्याशी, एका कांद्याशी, चिमूटभर चटणीशी किंवा मिठाशी! दिवसभर कष्ट करून ते फक्त भाकरी खातात! भाकरी खाल्ली की दिवसभर हिंडलेल्या मेंढक्याच्या ती हातीपायी उतरे. कांबळे घेऊन तो घराबाहेर पडे. घटकाभर चावडीपुढे बसून चार गोष्टी करी. आणि पुन्हा वाडग्याशेजारी जाऊन पडे. त्याचे इमानी कुत्रे अंगाचे वेटोळे करून पायांशी बसे. वाडग्यात मेंढरे झोपत, घरात धनगरीण लहान पोराला पुढे घेऊन झोपे आणि वाडग्याच्या दाराशी, उशाशी कुन्हाड ठेवून मेंढका झोपे.

सर्वांच्या झोपा गडद असत; पण मेंढका आणि कुत्रा सावध असे. पहाटे मेंढरे जागी होऊन धडपडत, खळाखळा मुतत, लेंड्या टाकत. भल्या सकाळी मेढका जागा होई. वाडग्यात मेंढरांचा गलगा चाललेला असे. त्यांना मोकळे करताच आवारात पुन्हा पोरे आयांच्या कासेला ढुशा मारू लागत. सकाळचा थंड वारा हुंगत मेंढ्या चित्ताने उभ्या राहून आपल्या पोरांना पाजत. वाडग्यात लेंड्यांचा खच पडलेला असे. मुताची थारोळी झालेली असत. हाती खराटा घेऊन मेंढका वाडगा स्वच्छ झाडून काढी. ते मोलाचे खत पाट्यापाट्यांनी उचलून नेहमीच्या ढिगावर टाकी. धान्याच्या ढिगासारखे लावलेले हे लेंढ्यांचे ढीग वर्षाशेवटी आसपासचे शेतकरी विकत घेऊन जात, म्हणून मेंढका हे काम नीट काळजीपूर्वक करी.
हे होईतो पोरांची पोटे दुधाने भरलेली असत. उड्या मारत, आखूड शेपट्या लुटूलुटू हलवीत, ते लोकरीचे गोळे इकडेतिकडे करीत असत. त्या सर्वांना गोळा करून मेंढका शिस्तवार कोंडून टाकी. धनगरणीने केलेली ऊनऊन भाकरी शेरडाच्या दुधात मुरगाळून सकाळची न्याहारी करी. दुपारच्या जेवणासाठी दोनचार भाकरी, मिरचू बांधून घेई आणि घोंगडे – काठी घेऊन मेंढरांना इशारा करी. रानात जाण्यासाठी आतुर झालेली मेंढरे उठत, उंच स्वरात ओरडून कोंडलेल्या पोरांना जातो असे सांगत. पोरांचा आतल्या आत गोंधळ चाले आणि मग वरचेवर मागे बघत, ओरडत, लेकुरवाळ्या मेंढ्या चालू लागत. सकाळची कोवळी उन्हे निबर होण्याअगोदर मेंढरांचे वाडगे मोकळे होत. दूरची राने तुडवीत मेंढरे घेऊन जात. ही मेंढरे गेली की, वाडीतले चैतन्य गेल्यासारखे होई. मग शेतकरी होते ते गुरेढोरे घेऊन रानात जात. लहान पोरे शेरडांमागे जात. बायाबापड्या तान्ही पोरे काखेला मारून, डाल पाटीत घालून रानात कामाला जात.
त्यांच्या मागोमाग पाळीव कुत्री जात. दुपार होई तेव्हा रहाटावर लोकर कातणाऱ्या बायकांवाचून वाडीत कोणीही दिसत नसे.,अलीकडे नियमाने १८-१२ मुले शाळेत येत होती.ज्यांना रोजगारावर जाता येत नव्हतं, शेरडांमागे जाणे जमत नव्हते, अशीच लहानलहान पोरे, पण ती येऊन शाळेत बसत होती. आणि मी त्यांना ‘ ग – म – भ – न’चे धडे गिरवायला देत होतो. दिवस उगवला, वाडग्यात कोंडलेली मेंढरे बाहेर पडली, की उघडीवाघडी पोरे शाळेत येत. तोंड न धुता, डोळे न धुता, अंगात कुडते अडकवून , डोईला तांबडा पटका गुंडाळून येत आणि शेणाने सारवलेल्या जमिनीवर एकमेकांशी भांडत बसून राहत. पाटीवर पेन्सिली कुरकुरू लागत. थुकीने पाटी पुसण्याचा सपाटा चाले. वरचेवर कुणीतरी करंगळी दाखवून बाहेर जाई. शाळेच्या पाठभितीची दगडे गाठून काही पोरे टोक येण्यासाठी पेन्सिली त्यांच्यावर घासत. अशा घासण्याने पाठभिंतीची बरीच दगडे विभूती लावल्यासारखी दिसत. पेन्सिली
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
