बनगरवाडी..
लवकर संपतात म्हणून पोरांचे आईबाप माझ्याकडे येऊन तक्रारी घालत. येताना तोंड धुवून यावे, पाटी पुसण्यासाठी पाण्याचा बोळा घेऊन यावे, यासाठी मी अनेकवार सांगूनही सुधारणा झाली नाही. तोड धुण्यासाठी परत घराकडे पाठविलेला मुलगा बहुधा माघारी येत नसे. पाण्याचा बोळा तासा – दोन – तासांतच वाळून जाई आणि पुन्हा पोरे पहिलीच सोपी पद्धत वापरत. शाळेतल्या अनिवार चिलटांमुळे कुणातरी मुलाचे डोळे हटकून येत. त्याच्या वासाने दुसऱ्याचे ये. दुखऱ्या डोळ्यांमुळे मुले रडत, नाचत आणि त्यांच्या आया डोळे बरे होण्यासाठी, दुधाने भिजलेले कापसाचे बोळे झोपताना मुलांच्या डोळ्यांवर ठेवत.
मावल्या आईला नवस करत. सकाळी लवकर भरलेली शाळा साडेदहा – अकराला सुटे. आरडाओरड करत, धावत, पळत धनगरांची मुले घरी जात. पुन्हा तीनला शाळा भरे आणि सहाला सुटे. डांबून ठेवल्याप्रमाणे मुले मरगळून जात, तरीही शाळेपुढे लोपाट खेळण्याची गर्दी उडे. चांदण्यारात्री हा डाव बराच वेळ चाले. रानातून परत आलेली तरणीबांड पोरेही त्यात भाग घेत. कधीकधी मलाही आत घेत. पिठासारख्या स्वच्छ चांदण्यात लोपाटाचा डाव रंगे आणि मारुतीच्या कट्ट्यावर, लिंबाच्या पारावर बसून मोठी मंडळी खेळ बघत. कधी काही नादी मंडळी लेझीमसाठी कडे धरत. हलगीचा शेडा होई. तास – दोन – तास लेझीम खळखळत. पटांगणात दगडाच्या एकदोन लहानमोठ्या गोट्या आणि नाल होते. वाढीला लागलेली पोरे यावर ताकत अजमावत.

एका हाताने तो जडशीळ नाल पुरुषभर उंच कोण उचलतो याची चढाओढ सुरू होई. डोक्याचे पटके हाताला गुंडाळून पोरे नालाचा पुरुष करीत. डोक्यावर नेऊन तो नाल जमिनीवर टाकीत. जमीन हादरे. मोठमोठ्या गोट्या दोन्ही हातांचा वेढा घालून छातीइतक्या उचलून टाकल्या जात. गावापासून दोनतीन फर्लागावर असलेल्या वस्तीवर राहत असलेल्या बिरा बनगराचा एक मुलगा सता अलीकडे शाळेत येऊ लागला होता. पूर्वीच्या मास्तराने चार अक्षरे नीट शिकवल्यामुळे जी चारसहा मुले पुढे प्रगती करीत होती त्यांत सता उजवा होता. बारातेरा वर्षांचे वय असलेले हे पोर केवढेतरी ताङमाड वाढले होते. इतर मुलांपाशी नसलेला समज त्याच्यापाशी होता. शिकण्याची आवड होती.
शाळा सुटली तरी पारावर बसून तो धडा घोकत बसे. एरवी माझ्या खोलीत येऊन हिशेब, गणिते विचारीत बसे. शिक्षणाकडे असलेला हा त्याचा कल बघून मी एकवार विचारले, ” किती शाळा शिकण्याचा विचार आहे, सता ? ” सता म्हणाला, ” पाक सातवी पास करायची ! ” ” तालुक्याला जावं लागेल. ” ‘ जाईन,” बाप शिकायचं म्हणतो का ? ” त्याचं कोण ऐकतंय ? पोरे शिकली म्हणजे त्यांचे शेतीतले लक्ष उडते, पांढरी कापडे घालून हिडायचा नाद लागतो, असे मत असलेला बिरा या पोराला शिकू देईल की नाही, याची शंका होती, तरीपण मी सताकडे विशेष लक्ष देऊ लागलो. या शाळेतून एखादा हुषार विद्यार्थी बाहेर गेला, तरी मला पुरे होते. तसा कुणी जाण्याजोगा पोरगा म्हणजे सताच होता. साहजिक तो माझा आवडता विद्यार्थी झाला. या आठबारा मुलांव्यतिरिक्त रोज शाळेत येऊ बसणारे आणखी तिघे जण होतो. आयबू मुलाणी, आनंदा रामोशी आणि रामा बनगर. हे तिघेही बहुतेक, दिवसातील काही वेळ का होईना, शाळेत येत आणि भितीला टेकून उगीच बसून राहत. काही बोलत नसत, काही करत नसत, पण येत. पोरांच्या तोंडांकडे, माझ्या तोडाकडे, बघत निवांत बसून राहत. त्यांचा काही त्रास मला होत नसे. पण उगाच इथे येऊन ही मंडळी वेळ का घालवीत असतील याचे मात्र कुतूहल वाटे. पण नंतर मला कळले की, वेळ घालवणे हाच त्यांचा त्यात प्रधान हेतू होता. मळक्या अंगाचा आणि मळक्या कपड्यांचा आयबू तर मोकळाच होता.
त्याला उद्योग करावा लागत नव्हता. कारण माणसाने उद्योग करायचा तो पोट भरण्यासाठी; पण आयबूचा तो प्रश्न सुटला होता. तो जातीने मुलाणी आहे हे कळताच वाडीच्या लोकांनी त्याला आनंदाने गावी ठेवून घेतले होते. कारण वेळप्रसंगी बकरे कापायला मुलाणी लांबून आणावा लागे, खोळंबा होई. ती आयती सोय झाली होती. एवढी सवड मिळताच भाकरीचा प्रश्न आयबूने आपणहूनच सोडवला. दुपारची वेळ झाली की तो चार घरे मागी आणि ऊनऊन भाकरी – कोरड्यास घेऊन येई कुठेही बसून खाई आणि ढेकर देई. त्याने सारा व्यापच मिटवला होता. आयबूच्या गरजा जास्त नव्हत्या, आणि गावाला चारदोन भाकरीचा तेगार नव्हता.
झोपण्याच्या जागेविषयीही त्याला अडचण नव्हती. चावडी होती, पटांगण होते, माझी खोली होती. अंथरुणा – पांघरुणाची गरज त्याला कधीच नसे. भटके कुत्रे, रानातली जनावरे जशी झोपतात, तसेच निश्चितपणे कुठल्याही जागी तो झोपू शकत असे. थंडीपावसालाही त्याने आपले अंग टणक केले होते. पस्तीस – चाळीस वयाचा आनंदा रामोशीही मोकळाच होत. तो उंचीने बुटका आणि अंगाने वाळलेला होता. दाढीची खुटरे सदोदित वाढलेली, वाढलेल्या केसांवर एक गांधीटोपी, अगात नुसता कोट आणि खाली आखूड चड्डी, अशा वेषात तो नेहमी असे. वाडीत जी रामोशांची चारदोन घरे होती त्यांपैकी हा एक. हे सारेच रामोशी कधी कसलाही उद्योग करीत नसत, तरी त्यांचे पोटपाणी चाले. खाण्याची पंचाईत उभी राहिली की आनंदा एक कांबळे खांद्यावर टाकून तिसऱ्या प्रहरी गावाबाहेर पडे. वाडीच्या आसपास, तीनचार मैलांवर दुसऱ्या गावांची राने होती. त्या रानांच्या बांधांवरून तो फिरत राही. रानात असलेल्या मालकाने विचारले. ” कुठे आनंदा ? ” तर हा म्हणे, “जातो रामा लिगाड्याच्या रानात. ” रामा लिगाड्याने विचारले, ” कुठे तयारी रे बेरडा ? तर हा रामराम घालून म्हणे, ” चाललो तुका कारंड्याच्या मळ्याकडं.
” तुका कारंड्याने विचारले,” काय आनंदा, कुठे तयारी ? ” तर आनंदा समोर हात करून म्हणे, ” जरा भोसल्याच्या शिवारातून येतो. ‘ असे फिरून फिरून तो कुठे कांदे आहेत, कुठे वांगी आहेत, कुठे ज्वारी आहे, कुठे बाजरी आहे, हे ध्यानात ठेवी; आणि रात्र झाली, मळेकरी गावात गेले, राखणदार झोपी गेले की, या रानातली चार कणसे, त्या रानातली दोन कणसे, इथल्या मूठभर मिरच्या, तिथली दोन वांगी, असे करून घोंगड्याची खोळ भरी आणि मध्यान्हरात्री वाडीला परत येई. सकाळ होईतो त्याने ती कणसे बडवून ज्वारी काढलेली असे. बायकोने दळून पीठ काढलेले असे ! वांगी लप असत ! एवढ्या मोठ्या शिवारातली चार कणसे गेल्याचे मालकाच्या काही ध्यानात येत नसे. पाखराने खाल्ले की जनावराने ओरबाडले याचा पत्ता लागत नसे. आनंदावर आळ येत नसे ! वर्षानुवर्षे त्याचा हा उद्योग चालू होता. लहान चोऱ्या हा त्या माणसाने जीवनाचा धंदा निश्चित केला होता, आणि त्यांच्या पद्धती ठरवल्या होत्या. अंगच्या कसबाने त्याचा धंदा उत्तम चालला होता. पुष्कळ वेळा बारीकसारीक चोऱ्या, आठपंधरा दिवसांनी मालकांकडे जाऊन तो कबूल करी. आपणहूनच विचारी, ” का पाटील, तुमच्या रानातली वांगी कुणी तोडली का तुमच्या माघारी, ह्या आठपंधरा दिसांत ?
“”होय रं आनंदा , कोन चोरटा सोकलाय कुनास ठावं, वटाभर वांगी गेली बग माजी ! ‘ ‘ असं ? मीच नेली वांगी . ” ” लेका, वर आणखी सांगतोयास बिनअब्रूच्या ! ” “कबूल केल्यावर चोरीचा डाग जातो मालक, अवं, द्या म्हनल्यावर कुनी काय देत न्हाई ; मग काय करावं ? किडामुंगी, राघूकावळं इतकं धान खात्यात ते काय इचारत्यात का तुमाला ? त्येस्नी जसं तुमी काय करत न्हाई तसं मलाबी करू नका. खाल्लं पाखरानं म्हना आन् जा इसरून. आनंदाचा हा स्वभाव आता सर्वांना माहीत झाला होता. कधी फावल्या वेळात तो दोन सोबती घेऊन रानात जाई आणि एखादा ससा , एखादी घोरपड मारून घेऊन येई. तोंडाला फारच आळणी आले तर एखादे परगावचे मेंढरू चोरून आणी. त्याची कापाकापी, शिजवणे, जेव.ण – सगळे परस्पर कुठेतरी रानात उरकले जाई. आनंदाचे भाईबंद असे जगत होते. आनंदा असा जगत होता.
कधीमधी मिळणारा रानातला रोजगार सोडला तर वर्षानुवर्षे त्यांचा धंदा हाच होता. रामा बनगर हा माणूस मात्र चांगला मुलेबाळे असलेला होता. वयाने तीस – पस्तिशीचा असावा. ओठावर मनगटासारख्या मिशा आणि मोठे जाबाड, यामुळे तो चांगला दांडगेश्वर दिसे. त्याच्या घरी शंभर मेंढरू होते: पण त्याची उसाभर बाप करीत होता, पोरगा करीत होता. रामाला उद्योग नव्हता. नव्हता म्हणण्यापेक्षा तो करत नव्हता. तोही शाळेत येऊन उगाच बसे. अनेक दिवस तो असा न बोलता बसत होता. शाळा सुटली की अंगावरचे कांबळे उचलून घराकडे जात होता. प्रथमप्रथम मी त्याला विचारीत असे.” काही काम आहे का ? का आला ? ” म्हणत असे. पण यावर तो राठ आवाजात म्हणे, ‘ काय न्हाई. आपला असाच आलोय. ‘अनेक दिवस शाळेत असे बसून बसून एकवार तो म्हणाला, मास्तर , माझं एक काम आहे तुझ्याकडं . ‘ शाळा सुटली होती. आनंदा, आयबू गेले होते . मी आणि रामा दोघेच शाळेत होत. कधीही न बोलणारा हा माणूस बोलला याचे मला आश्चर्य वाटले . याचे काय काम माझ्याकडे असावे याचा अंदाज लागेना . “ काय , बोला की. ” रामा लवकर बोलला नाही . खाली मान घालून त्याने काही वेळ घेतला. बोलावे का नको असे अजूनही त्याच्या मनात चालले असावे. त्याचा संकोच जाण्यासाठी मी म्हणालो, ” काय काढलंय रामभाऊ ? ‘ ‘ मग इकडे तिकडे बघून रामा म्हणाला, “ माझ्याजवळ एक बुचड्याचा रुपया आहे- ‘ बुचड्याचा रुपया म्हणजे राणीछाप रुपया . राणीने केसाचा बुचडा घातल्यासारखे चित्रात दिसे . तो सरकारने बंद केला होता . ” बरं , मग ? ” ” बंद झालाय म्हनं तो ! मला गरिबाला उगीच खोट आलीया बघ ! ” “ हो बंद झालाय खरा . आता बाजारात तो चालत नाही . ” ” तू तालुक्याला जातो – येतोस . चालला तर बघ तु.झ्या वजनानं . मेहरबानी होईल . ” “
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतून)
