दिनांक १० ऑगस्ट २०२४, आढळगाव,श्रीगोंदा:
तालुक्यातील आढळगाव येथे भरत भगवान सूर्यवंशी (वय ३३) या तरुणाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुःखद घटना शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता घडली.
भरत सूर्यवंशी हे आढळगाव येथे इलेक्ट्रिकचे काम करत असताना त्याच्या हाताला विजेचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
भरत सूर्यवंशी हे केवळ तरुण कार्यकर्ता नव्हते, तर त्यांनी त्यांच्या विचारांची चळवळ आढळगाव व पंचक्रोशीमध्ये सक्रियपणे उभी केली होती. शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार करणारे आणि तरुणांना वैचारिक परिवर्तनाकडे घेऊन जाणारे भरत हे चळवळीतील एक सच्चे कार्यकर्ता होते. त्यांनी महापुरुषांच्या विचारधारेवर काम केले आणि समाजात परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील श्रीगोंदा दौऱ्यावेळी भरत यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आढळगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते.
भरत सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी निधनाने आढळगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे अंत्यसंस्कार गव्हाणेवाडी येथे करण्यात आले, ज्यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
भरत यांच्या निधनामुळे आढळगाव व परिसरात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चळवळीतील योगदानामुळे त्यांची कायम आठवण राहील, परंतु त्यांच्या अकाली जाण्याने समाजाने एक प्रखर विचारवंत कार्यकर्ता गमावला आहे.
स्रोत:(पत्रकार जावेद इनामदार)





