शाळेत दलित विद्यार्थ्यावर जातीय अन्याय.? पालकाची गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार– श्रीगोंदा पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह; कार्यवाहीची मागणी..

दिनांक ९ जुलै २०२५ श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले (ता. श्रीगोंदा) येथील शिक्षिका संगिता पावटे यांच्याविरोधात गंभीर जातीयभेद व मानसिक छळाचे आरोप करत पालक सौ. आरती कुणाल शिरवाळे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “फक्त मागासवर्गीय असल्याच्या कारणावरून माझ्या मुलावर सतत अन्याय केला जात आहे आणि त्याचे मनोबल खचवले जात आहे.”

सौ. शिरवाळे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा हा इयत्ता चौथीत शिकतो असून, तो पहिल्या इयत्तेपासून शिक्षिका पावटे यांच्या वर्गातच आहे. त्या वेळेपासून त्याला जातीयतेच्या आधारावर मारहाण व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तक्रारीत असेही म्हटले आहे की, १८ ऑक्टोबर २०२४ रोजी याबाबत मुख्याध्यापक साबळे सर यांना लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली होती. मुलावर उपचारही ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे झाले असून, त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही तक्रारीस जोडले आहे.

तसेच, संयोजक समिती, मुख्याध्यापक आणि चाईल्ड लाइन यांच्याकडेही अनेकवेळा तक्रार केली गेली होती, मात्र आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

शिक्षिका पावटे मॅडम मुलास ‘जशी खान तशी माती, तुमची खान खराब आहे’, अशा जातीय दूषित विचारांची विधाने करत असल्याचा आरोप करत पालकांनी म्हटले आहे की, त्यामुळे मुलावर दलित असल्याचा ठपका लावून मानसिक त्रास दिला जात आहे.

तसेच, इतर विद्यार्थ्यांना देखील त्याच्याशी बोलण्यास मनाई करण्यात आली असून त्याला वर्गात पूर्णपणे वाळीत टाकण्यात आले आहे. वर्षभरात त्याचा अभ्यास तपासला गेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

सौ. शिरवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मी सुशिक्षित माता असून माझ्या मुलावर जातीयतेमुळे होत असलेला अन्याय पाहून महापुरुषांची आठवण येते. यामुळेच अण्णाभाऊ साठे यांनीही शाळा सोडावी लागली होती.?”

त्यांनी मागणी केली आहे की, संबंधित शिक्षकावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्वरीत कारवाई करण्यात यावी व शिक्षकास त्वरित निलंबित करण्यात यावे.

या तक्रारीमुळे शाळा व्यवस्थापन, पंचायत समिती आणि शिक्षण विभाग यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading