शाहू भोसले हे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर संस्थानाचे १८९४-१९२२ दरम्यान छत्रपती व मराठी समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

जीवन:
शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व ‘शाहू’ हे नाव ठेवले. १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
कार्य:
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ ला निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाता खाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही’ असेच प्रजेला वाटते.

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. Chhatrapati Shahu Maharaj Jayanti ..
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्म निरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.
महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या, अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी पुरस्कार’ रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.
स्रोत:(गूगल)
शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बहुजन समता पत्र कडून विनम्र अभिवादन व जयंतीच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
