दिनांक १८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
दिवाळीच्या आनंदमयी वातावरणात किरकोळ कारणांवरून उफाळलेल्या वादामुळे श्रीगोंदा शहर हादरले. या वादात दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाली होती, ज्यात काहीजण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींपैकी एका व्यक्तीचा काल अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

शहरातील या घटनांनी निवडणूक आचारसंहितेच्या काळातील शांतता भंग केली. अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले. या वादाला चिघळण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

घटनेनंतर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समेटाचा प्रयत्न केला होता. त्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती काही प्रमाणात निवळली, मात्र गंभीर जखमी व्यक्तीच्या मृत्यूने प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

मृत्यूची नोंद श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणातील पुढील तपासातून खुन, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हायगयीने मृत्यु किंवा इतर गंभीर कलमांचा समावेश होईल, हे ठरवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

श्रीगोंदा शहरातील या दुर्दैवी घटनांनी नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली असून, दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)
