दिनांक २६ सप्टेंबर २०२४, लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदा:
लोणी व्यंकनाथ (पारगाव सुद्रिक, श्रीगोंदा) येथे सावित्रीबाई फुले संविधान गट आणि अण्णाभाऊ साठे संविधान गट यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेसाठी छाया भोसले यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन खास अंदाजात करण्यात आले, जिथे महिलेच्या डोळ्यावर, तोंडावर आणि हातांवर बांधलेली काळी पट्टी सोडून मान्यवरांच्या हस्ते परिषदेला सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मनिषा प्रवीणकुमार नाहटा होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून लता भिसे, अशोक सब्बन, नेत्या सुवर्णा पाचपुते आणि अण्णासाहेब शेलार उपस्थित होते.
परिषदेमध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते “धूर्त शिकारी” हे नाटक, ज्यामध्ये नागेश दुर्वे आणि चेतन सुषिर यांनी हसता हसता प्रबोधन केले. सोप्या भाषेत संविधानातील समता, बंधुता, एकता आणि अधिकार यांचे महत्त्व नाटकाच्या माध्यमातून उपस्थितांपर्यंत पोहोचवले.
महिलांच्या हक्कांसाठी काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले, जे आता ग्रामपंचायतीत सादर केले जाणार आहेत. या ठरावांद्वारे महिलांना त्यांच्या हक्कांची आणि योजनांच्या लाभांची अधिकाधिक जाणीव करून देण्यात येणार आहे.
प्रमुख वक्त्या लता भिसे यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महिलांसाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी म्हटले की, “संविधान महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देते. यातून महिलांना एक नवी दृष्टी मिळते आणि त्यांना त्यांचा सन्मान, हक्क, आणि अधिकारांची जाणीव होते.” त्यांनी महिलांच्या ग्रामसभेत सक्रिय सहभागाची गरजही अधोरेखित केली.
डॉ.प्रनोतीमाई राहुलदादा जगताप यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. सुवर्णा पाचपुते यांनी महिलांना सक्षम होण्यासाठी संधी शोधण्याचे आवाहन करत आपले अनुभव नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान प्रचारक छाया भोसले यांनी केले. भोसले यांनी सांगितले की, “महिलांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी ही परिषद आयोजीत केली आहे.” सूत्रसंचालन ॲड. महेंद्र शिंदे यांनी केले, तर आभार संतोष जठार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण नगरे, संतोष ओहोळ, बाळासाहेब नाहटा, अण्णासाहेब शेलार, संदीप डांगे, संतोष भोसले यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रसंगी पंचक्रोशीतील महिलांसह पुरुषांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संपूर्ण कार्यक्रम महिलांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणारा आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतिक ठरला.
स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)






