एकदाच संधी द्या तालुक्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही- आण्णासाहेब शेलार.. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेलार यांचे प्रतिपादन..

दिनांक १८ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

गेल्या तीस चाळीस वर्षांपासून रस्ते, वीज, कुकडीचे पाणी, घोड विसापूरचे पाणी, साकळाई योजना, एमआयडीसी, डिंभे माणिकडोह बोगदा हे प्रश्न तसेच आहेत. फक्त एकदा मला आमदारकीची संधी द्या तालुक्याचे प्रश्न सोडवून सोन केल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा येथे जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष एम डी शिंदे होते.

श्रीगोंदयाचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांना शेरा अर्पण करत बाबा महाराज चाळक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शेलार बोलत होते. पुढे बोलताना शेलार म्हणाले की मी शरद पवार, अजित पवार जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, उध्वव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, महादेव जानकर सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटून तिकिटाची मागणी केली आहे. त्यामुळे तिकीट हे १०० टक्के मिळणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी एकदा संधी मला द्या.

शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते बोलताना म्हणाले की, काष्टीची लढाई फक्त आण्णासाहेब तुमच्यामुळेच जिंकलो आहे. त्यामुळे भविष्यात ऋषिकेशला आणि मला एकत्र राजकारण करायचं असून ज्या ज्या वेळी ऋषिकेशला माझी गरज लागेल त्या त्या वेळी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ म्हणाले की, आण्णासाहेब सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष त्यांनी शाळा, रस्ते, अंगणवाडीची कामे मोठ्या प्रमाणात तालुक्यात केली. कोणत्याही पक्षाचे तिकीट मिळवा आणि विधानसभेला सामोरे जा. ४० वर्षे आमदार असताना रस्ते, वीज, पाणी, डिंभे माणिकडोह बोगदा, साकळाई योजना, एमआयडीसी प्रश्न आद्यप तसेच आहेत. मग तुम्ही आतापर्यंत काय केल..? असा सवाल आमदार पाचपुते यांचा नामोल्लेख टाळत केला.

सरपंच ऋषिकेश शेलार बोलताना म्हणाले की, कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती की, श्रीगोंदयात संपर्क कार्यालय सुरू केले पाहिजे . बेलवंडीत येणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ३६५ दिवस आम्ही कटिबद्ध असून, कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढायची असून, आता कार्यकर्त्यांनी तयारीला लागा अशी सूचना केली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच ऋषिकेश शेलार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी संदीप खेडकर, साहेबराव रासकर, शरद जमदाडे, सुभाष काळाणे, वामन बधे, ओंकार शिंदे, संतोष रोडे, कांतीलाल कोकाटे, असिफ शेख आदींनी मनोगत व्यक्त केले.

पक्ष आणि तिकीट फायनल..?

माझा पक्ष आणि तिकीट जवळपास फायनल झाले असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणा करणार आहे. जनतेच्या आग्रहास्तव तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लवकरच श्रीगोंदयात मोठा निर्धार मेळावा घेणार असल्याचे अण्णासाहेब शेलार यांनी बोलताना सांगितले.

शेलार पाचपुते एकत्र?

काष्टी येथे साजन पाचपुते यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच ऋषिकेश शेलार यांनी हजेरी लावली होती. आता ऋषिकेश शेलार यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी साजन पाचपुते यांनी हजेरी लावत मदत करण्याचा शब्द दिला असून, भविष्यात साजन आणि ऋषिकेश ही जोडी राजकारण एकत्र येण्याची शक्यता दिसून येत आहे.

स्त्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading