दिनांक २९ मे,श्रीगोंदा :
सध्या उन्हाळ्याची तीव्रता भयंकर वाढलेली असून, पिण्यासाठी पाणी, फळबाग व इतर चारा पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. दि. २५ मे २०२० पासून कुकडी डाव्या कालव्याला उन्हाळी आवर्तन सुटण्याची अपेक्षा होती. परंतु, कुकडी लाभक्षेत्रात नसणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यांना पाणी सोडण्याचे मान्य करून बंधारे भरण्यास सुरु केले आहेत. हा कुकडी डाव्या कालव्यावरील नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली कोरानाचे व संचारबंदीचे शासकीय आदेश पाळून, दिनांक १ जून २०२० पासून सकाळी १० वाजले पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरु केले जाणार असून, या उपोषणात प्रा. तुकाराम दरेकर, संदीप नागवडे आणि गणपतराव काकडे हे शेतकरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.की, मार्च – एप्रिल २०२० मध्ये कुकडीचे आवर्तन ४६ दिवस चालू होते. त्यापैकी १२ दिवस पाणी श्रीगोंदे तालुक्याला देतांना वितरिका क्रमांक १०,११,१२,१३,१४ वरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले.जलसंपदा विभागाच्या उचल पाण्याच्या परवानग्या असणाऱ्या औटेवाडी आणि घोडेगाव तलावावरील शेतकऱ्यांनी पाणी पट्टी भरण्यासाठी पैसेही गोळा केले होते. परंतु, श्रीगोंदे तालुक्याला पुरेसे पाणी मिळू शकणार नाही.याचा अंदाज घेऊन कार्यकारी अभियंता कार्यालयाने पाणी पट्टीचे पैसेही स्वीकारले नाहीत आणि पाणीही दिले नाही.उलट जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळाचा फायदा घेऊन , पाण्याचा अपव्यय रोखला नाही व ते पाणी श्रीगोंदे तालुक्याच्या माथी मारून मोकळे झाले.पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय याला कुकडीच्या श्रीगोंदा विभागातील कार्यकारी अभियंता आणि त्यांचे कर्मचारी जबाबदार आहेत.
मार्च,एप्रिल २०२० मध्ये वंचित राहिलेल्या वितरिका क्रमांक १०,११,१२,१३,१४ आणि मोहरवाडी तलाव, पारगाव तलाव ,लेंडी नाला, औटेवाडी व घोडेगाव तलावाला कर्जत आणि करमाळ्याला पाणी देण्याच्या अगोदर पाणी दिले.तरच, या भागातील फळबागा व चारा पिके वाचतील आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे होणारे नुकसान टळेल.त्यासाठी आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली प्रा. तुकाराम दरेकर, संदीप नागवडे आणि गणपराव काकडे हे चौघे शासकीय आदेश पाळून दि. १ जून २०२० रोजी सकाळी १० वाजल्यापासून श्रीगोंदा तहसील कार्यालयापुढे प्राणांतिक उपोषणास बसणार आहेत. सामाजिक अंतर पाळून अनेक शेतकरी या उपोषणाला पाठींबा देणार आहेत.
निवेदनाच्या प्रती (जलसंपदा मंत्री) ना.जयंतराव पाटील (अधीक्षक अभियंता) हेमंत धुमाळ, (पोलीस अधिक्षक, अहमदनगर)अखिलेश कुमार सिंग, श्रीगोंद्याच्या (कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता) स्वप्नील काळे, (श्रीगोंद्याचे तहसीलदार) महेंद्र माळी आणि (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव, यांना माहितीसाठी दिल्या आहेत.
