दिनांक २३ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कुकडी धरणाच्या चालू आवर्तनातून श्रीगोंदा तालुक्यातील लहान-मोठ्या बंधाऱ्यांमध्ये व पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.

राजेंद्र म्हस्के यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले की, श्रीगोंदा तालुक्यातील भूजल पातळी खूप खोल गेली असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच गंभीर स्वरूप धारण करू शकतो. सर्व नद्या, बंधारे आणि तलाव कोरडे पडले आहेत. अशा परिस्थितीत कुकडीच्या चालू आवर्तनातून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळेल. मात्र, पुढील चार महिने उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे उभी पिके व फळबागा वाचविणे अवघड होईल.

म्हस्के यांनी यावेळी सांगितले की, चालू रोटेशनमधून पाणी सोडल्यास कुकडी लाभ क्षेत्रातील सुमारे ८० टक्के गावांना दिलासा मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळू शकेल. अन्यथा, २० वर्षांपासून जतन केलेल्या फळबागा डोळ्यांदेखत नष्ट होतील.

म्हस्के यांनी रोटेशन व्यवस्थेतील त्रुटींवरही लक्ष वेधले. सध्याच्या व्यवस्थेत कॅनलच्या टेल भागातील शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही. डीवाय चाऱ्यांची लांबी १४ ते १५ किलोमीटर असून, त्यांची क्षमता १५० ते १७५ क्युसेस आहे. मात्र, फक्त एक दिवस आणि एक रात्र पाणी सोडले जाते, त्यामुळे टेलच्या शेतकऱ्यांना पाणी पोहचत नाही. किमान ५ दिवस चारी चालवल्यास सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असे म्हस्के यांनी सांगितले.
काही गावांना वर्षानुवर्षे पाणी मिळालेले नाही:
शेडगाव, टाकळी कडेवळीत, भिंगाण, चोराचीवाडी, तसेच घोडेगाव आणि चांडगावातील काही भाग यांना वर्षानुवर्षे पाणी मिळालेले नाही. या गावांनाही पाणी मिळावे यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी भालसिंग, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे, पाटपाणी कृती समितीचे सचिव माऊली मोटे, माजी सरपंच महादेव म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

या मागणीसाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी भालसिंग, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे, पाटपाणी कृती समितीचे सचिव माऊली मोटे, माजी सरपंच महादेव म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
