दिनांक २८ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील पाझर तलाव व गाव तलावांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, खासदार निलेश लंके, श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा ३ मार्चपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत ‘पाणी वाचवा आंदोलन’ छेडण्यात येईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शाम जरे यांनी दिली.
तालुक्यातील अनेक पाझर तलावांमध्ये केवळ काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे, मात्र अनधिकृत उपशामुळे हे पाणी लवकरच संपुष्टात येणार असल्याचे जरे यांनी सांगितले. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने भविष्यात मोठ्या पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, दोषींवर कारवाई व अनधिकृत उपसा बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाच्या निर्णयाला ॲड. अमोल शेळके, दिलीप वाळूंज, बालू मखरे, विलास गुंजाळ, मयूर शिंदे, सुहास होले, बाबासाहेब देवकाते आदींनी पाठिंबा दिला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





Advertise..
