देवदासी आणि नग्नपूजा..
साक्षात ‘ परमेश्वरा’शी लग्न करूनसुद्धा ज्यांच्या वाट्याला येतोय अन्याय आणि उपेक्षा अशा देवदासी निर्मिती प्रक्रिये विरुद्ध चळवळ चालवणाऱ्या, देवदासी पुनर्वसनासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व व्यक्ती व संघटनांना … उत्तम कांबळे
‘ चंद्रगुत्ती ‘ हे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सोरब तालुक्यातील एक खेडे . शिमोग्यापासून ते अंदाजे शंभर किलोमीटरवर आहे . गावात सुमारे दोन हजार लोकवस्ती . शहरी जीवनापासून दूर असलेले . झाडांच्या दाटीवाटीत वसलेले हे एक छोटे व गरीब खेडे . लोक अत्यंत मागासलेले . प्रबोधनाच्या चळवळीपासून दूरवर असलेल्या या खेड्यात पाहण्यासारखे प्रसिद्ध असे काही नाही . तरीसुद्धा वर्षातून एकदा लाखो लोक तिकडे धाव घेतात . वृत्तपत्रातून या गावाचा गाजावाजा होतो . असे आहे तरी काय या गावात ! असा प्रश्न उपस्थित झाल्यास नवल वाटायला नको . देशात सध्या कोठेही सुरू नसलेली नग्नपूजेची प्रथा या गावातील रेणुका देवीच्या भक्तांत आहे . या प्रथेमुळे हे गाव सातत्याने गाजत राहिले . अगदी अलीकडे म्हणजे १ ९ ८६ पर्यंत ही प्रथा गावात होती .
ही प्रथा का चालू झाली ? ती कोणी चालू केली ? प्रथा चालू राहावी असे म्हणणाऱ्यांचा स्वार्थ काय आहे ? ती बंद व्हावी म्हणून कोणी प्रयत्न केला ? राजकीय नेत्यांची , सरकारची , जोगम्मा व जोगप्पांची , पुजाऱ्यांची या प्रथेबाबत कोणती भूमिका होती ? या प्रथेमागची धार्मिक, आर्थिक,सामाजिक कारणे कोणती ? वगैरे गोष्टींचा शोध घेण्यासाठी ‘ सकाळ’चा बातमीदार म्हणून या ठिकाणी गेलो . नग्नपूजा सुरू होण्यापूर्वी आठ – दहा दिवस अगोदर या भागातील धार्मिक , सामाजिक व आर्थिक जीवन पाहिले . अनेक खेड्यांत फिरलो .
ज्या ठिकाणी नग्नपूजा होते त्या श्रीरेणुकांबाच्या मंदिराला सर्वप्रथम भेट दिली . गावाच्या पश्चिमेला दीड फल्गावर हे मंदिर आहे . डोंगरावर मंदिर उभारलेले दिसते . मंदिराला जाताना वाटेत देवस्थान समितीचे कार्यालय लागते . याशिवाय डोंगराच्या पायथ्याशी एक छोटी विहीर आहे . तिला ‘ पवित्र पाण्याची विहीर ‘ म्हणून ओळखले जाते . आजूबाजूला डोंगर , झाडांची गर्दी , डोंगरावर असलेले प्रचंड आकाराचे दगड असे वातारवण आहे . सुमारे १ ९ २ पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर लागते . वेड्यावाकड्या वळणावर बसविलेल्या या सर्व पायऱ्या चढताना दमछाक होते . पायऱ्या चढत असताना १५-२० फुटांवर डाव्या बाजूला अनेक छोटी छोटी मंदिरे लागतात . या मंदिराशेजारी १०-१२ फुटांवर डाव्या बाजूला मातंगीचे मंदिर तर समोर नागनाथाचे व उजव्या बाजूला परशुरामाचे मंदिर आहे . रेणुकांबाचे मंदिर म्हणजे एक गुहाच म्हणावी लागेल . जमिनीपासून हजार – दीड हजार फुटांवर डोंगरात एका गुहेत देवीची मूर्ती आहे . संपूर्ण गुहा एका अखंड अशा प्रचंड दगडात आहे . अंदाजे चाळीस ते पन्नास चौरस फुटांचा हा दगड असावा . त्याचा सुळका वरच्या बाजूला चार ते पाच फूट पुढे आलेला आहे . या सुळक्यामुळे सावली निर्माण झाली आहे . सुळक्याच्या एका भागाचा आकार अर्धचंद्राकार असा आहे . खालच्या बाजूला म्हणजे मुख्य दगडांच्या तळाशी अंदाजे पाच फूट रुंद , दोन फुट उंच व सात फूट लांब अशी गुहा आहे . ही गुहा म्हणजे या दगडाला पडलेले भगदाड . तेच देवीचे निवासस्थान . मंदिरावर असलेल्या एका प्रचंड शिळेवरच कळस बसविण्यात आला आहे . याशिवाय गुहेसमोर बांधकाम करून मंदिर प्रशस्त करण्यात आले आहे . देवीची मूर्ती पाहायची असेल तर प्रत्येकाला खाली वाकावे लागते . गुहेचा परिघ कमी असल्याने उभे राहून मूर्ती पाहिल्यास मूर्तीचा छातीखालचा भाग तेवढाच दिसतो . खाली वाकल्याशिवाय पूर्ण मूर्तीचे दर्शन घडत नाही .
हे मंदिर आठव्या शतकातील असल्याचा दावा श्रीरेणुकांबा देवस्थान समितीकडून केला जातो . तर ते चौदाव्या शतकातील असावे असे पुराणवस्तू संशोधन खात्यातर्फे सांगितले जाते . मंदिर कोणत्याही शतकातील असले तरी नग्नपूजा तेथे फार पूर्वीपासून चालत आली आहे , याबद्दल मात्र फारसे मतभेद नाहीत . मात्र देवी येथे का आली , याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या दंतकथांमध्ये मतभेद आहेत . रेणुकांबाच्या मागे एकदा दैत्य लागले . स्वत : च्या रक्षणासाठी ती धावू लागली . धावता धावता तिच्या अंगावरची सर्व वस्त्रे गळून पडली . शेवटी चंद्रगुत्तीच्या डोंगरावर गुहेत ती लपली . पुढे ती तेथेच राहिली अशी एक कथा आहे . तर परशुराम हा वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी शत्रूचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीप्रदक्षिणा घालण्यास निघाला . आपण गेल्यानंतर आपली आई सुरक्षित राहावी म्हणून त्यानेच तिला म्हणजे रेणुकांबाला या गुहेत आणून ठेवले , असे दुसरी कथा सांगते . पण देवीचे वास्तव्य या ठिकाणी कायम आहे यावर मात्र भक्तांचा विश्वास आहे . मंदिरात रेणुकांबाच्या मूर्तीच्या मुखाशेजारी शिवाचे प्रतीक समजले जाणारे लिंग आहे . कठीण परिस्थितीत या लिंगाने म्हणजे शिवानेच देवीचे रक्षण केले . मंदिरावर असलेल्या शिळेचा आकारही नागाच्या फणेसारखा आहे . याचा अर्थ देवीच्या रक्षणासाठी नागराजही होता , असे भक्त समजतात . देवीला काहीजण शिवेश्वरी तर काहीजण शक्तिमाता मानतात . जे लिंग आहे त्याला ‘ उदभव ‘ लिंग मानले जाते . अशा प्रकारचे लिंग क्वचितच आढळते , अशी भक्तांची धारणा आहे .
मंदिराशेजारीच देवस्थान समितीचा चिटणीस रत्नाकर भेटला . नग्नपूजेबद्दल त्याच्याशी थोडी चर्चा झाली . नग्नपूजा करणारे लोक पूर्ण नग्न होणार नाहीत . अंगावर लज्जारक्षणापुरते तरी वस्त्र ठेवत असावेत , असा माझा समज होता . कारण यापूर्वी नग्नपूजा मी कोठे पाहिली नव्हती . किंवा चंद्रगुत्तीशिवाय ती इतरत्र कोठे तरी होत असावी , हेही माझ्या ऐकिवात नव्हते . रत्नाकर म्हणाले , “ अहो , येथे लहान मुले , मोठी माणसं , महिला , पुरुष सर्वजण पूर्णपणे नग्न होऊन येतात . त्यांच्या अंगावर वस्त्रच काय पण साधा धागासुद्धा नसतो . तुमचा समज असेल की फक्त अडाणी लोकच नग्नपूजा करतात . पण तो साफ खोटा आहे . गेल्या वर्षी धारवाडच्या लॉ कॉलेजमधील एका प्राध्यापकाची पत्नीही नग्नपूजेसाठी आली होती . हिंदू धर्म न मानणारी ख्रिश्चन महिलाही पूजेसाठी आली होती . सर्व जाती – धर्माचे लोक देवीला नवस करतात . नग्न होतात आणि भक्तिभावाने येथे येतात . काय समजलं की नाही ? ‘ मी मान हलवूनच हो म्हणालो .
मला बोलण्याची संधी न देता रत्नाकर स्वत : च बोलत राहिला . तो म्हणाला , “ तुम्ही बातमीदार आहात म्हणून एक गोष्ट सांगतो . तुमच्या पेपरात ती छापा म्हणजे देवीचा माहिमा लोकांना समजेल . हं , तर मी काय सांगणार होतो ? आता आठवलं . हं , तर काही वर्षांपूर्वी बेतले सेवे ( नग्नपूजा किंवा नग्नसेवा ) थांबवा म्हणून एक फौजदार डोंगरावर आला . आम्ही त्याला सांगितलं , बाबा असं करू नकोस . देवीचा कोप झाला की वाईट होईल . पण तो ऐकेना . बेतले सेवेला विरोध करू लागला . इतक्यात डोंगरावरच्या मधमाशांनी त्याच्यावर जोरात हल्ला केला . त्याचा चावा घेतला . फौजदार जीव ” वाचविण्यासाठी पळू लागला . शेवटी मंदिरात येऊन आम्माच्या ( देवीच्या ) पायावर पडला . माझी चूक झाली . मला माफ कर . मीही नग्न होऊन तुझ्या पूजेला येतो , असे आळवू लागला . त्यानंतर मधमाशा निघून गेल्या . दुसऱ्या दिवशी फौजदार नग्न होऊन पूजेसाठी आला .
रत्नाकरचे बोलणे चालू असतानाच शिमोग्याहून एक मराठी कुटुंब आले . त्यातील महिला म्हणाली , “ माझ्या मुलाला चालता येत नव्हते . त्याच्या पायात जीवच नव्हता . आम्ही देवीला नवस केला . मुलगा चालता होऊ दे . नग्न होऊन तुझ्या दर्शनासाठी येऊ . मुलाच्या वजनाइतके तांदूळ ( तुलाभार ) तुला देऊ , असे सांगितले . त्यानंतर मुलगा चालू लागला . बघितला का कसा तुरूतुरू धावतोय . ” महिलेने शेजारी असलेल्या मुलाकडे बोट केले .
डोंगराच्या पाचऱ्या उतरून खाली आलो . देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर एका मोठ्या दगडावर एक अपंग , छोटी मुलगी झोपलेली दिसली . तिची उंची केवळ दोन ते अडीच फूट होती . हातपाय काडीसारखे , डोके आणि पोट भोपळ्यासारखे होते . रस्त्याने ये – जा करणारे बरेच लोक तिच्याजवळ येत . हात जोडून तिला नमस्कार करीत . पाच – दहा पैस टाकत व पुढे जात . कसातरी एखादा शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडत असे . अन्यथा तोंडातून एकसारखी लाळच गळताना दिसली . तिच्याशेजारी तिचा बाप उभा होता . त्याची नजर तिच्याशेजारी पडलेल्या पाच – दहा पैशांच्या नाण्यांकडे होती . मी त्याला बोलते केले तसा तो म्हणाला , “ साहेब , ही मुलगी दिसते दोन फूट पण ती चाळीस वर्षांची आहे . तिच्या अंगात सदैव अम्मा खेळते . तिच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द खरा ठरतो .
” पण देवीने मुलीचा रोग म्हणजे मुडदूस का नाही दूर केला ? तिला बरे का नाही केले ? या माझ्या प्रश्नावर मात्र हा गप्पच राहिला . हातानेच ‘ तुम्ही आता जा ‘ असे त्याने मला खुणावले.
यात्रेविषयी , देवाविषयी माहिती मिळत होती . नग्नपूजेशिवाय इतरही काही विधी यात्रेनिमित्त होतात , असे काही पुजाऱ्यांनी सांगितले . ते असे : १) बेवीन उडगे : लिंबाच्या पानांनीच संपूर्ण शरीर झाकून घेऊन मंदिरापर्यंत चालत जाणे . अशा भक्ताच्या अंगावर कपड्याऐवजी लिंबाचा पाला असतो . त्यानेच तो शरीर झाकून घेतो . २) गंधद उडगे : संपूर्ण अंगाला गंध लावून घेऊन जाणे ३) हुवीन उडगे : अंगावर कपड्याऐवजी फुले ठेवणे . फुलांच्या हारांनीच शरीर झाकून घेऊन देवीला जाणे . ४) दीर्घ दंडनमस्कारा : दंडवत घालत देवीला जाणे . ५) वेरलावरती : तळहातावर पेटत्या पणत्या घेऊन देवीला जाणे . ६) शस्त्रधारी सवड : जिभेत सुई टोचून घेऊन देवीला जाणे . ७) तुलाभार : स्वत : च्या वजनाइतके धान्य , कपडे , दूध , पैसे , नारळ आदी देवीला अर्पण करणे .
क्रमशः
स्रोत:(पत्रकार उत्तम कांबळे यांच्या देवदासी आणि नग्नपूजा या पुस्तकातून)
