देवदासी आणि नग्नपूजा..
देवीची यात्रा पाच दिवस चालते . या कालावधीत हे विधी होतात .
विवस्त्र होऊन देवीला जाणे हे सर्वात कडक व्रत मानले जाते. ते केले की जीवनातील , संसारातील सर्व अडचणी दूर होतात, देवीची कृपा लवकर होते, अशी भक्तांची धारणा असल्याचे दिसते. पण एकदा का एकाने नग्नपूजा सुरू केली की या प्रथेची परंपरा त्याच्या घराण्यात पिढ्यान्पिढ्या टिकली पाहिजे, असा धार्मिक दंडक आहे . प्रथा न पाळल्यास घरावर संकटे येतात . महारोग होतो . जनावरे दगावतात . वाच्या जाते , अशा नाना प्रकारच्या अंधश्रद्धा या भागातील नागरिकांच्या मनात दिसल्या. देवीला वाहिलेला जोगप्पा किंवा जोगम्मा हे आपआपल्या गावात नग्नपूजेचा प्रसार करतात. कोणाच्या घरात ही प्रथा आहे हे त्यांना माहीत असते . गावातील मंडळी आपल्या संसारात काही अडचणी आल्यास त्यावर उपाय विचारण्यासाठी जोगम्माकडे जातात . जोगम्माच्या अंगात मग देवीचा संचार होतो . अडचणीवर मात करण्यासाठी मग ती मंडळींना पूजा करण्याचा सल्ला देते . देवीचाच तसा आदेश असल्याचे ती सांगते . तिचा म्हणजे जोगम्माचा प्रत्येक शब्द खरा असल्याची भक्तांची धारणा आहे . त्यामुळे ते नग्नपूजा करण्यास प्रवृत्त होतात . म्हैस दूध देत नसेल , विद्यार्थी उत्तीर्ण होत नसेल , मुलाला नायटा उठला , शेतात अन्नधान्य पिकत नाही ,पत्नी नांदत नाही , पती मारहाण करतो आदी दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर हमखास उत्तर म्हणून नग्नपूजाच करा , असे जोगम्मा ( देवदासी ) सांगते . त्यामुळे शेकडो , हजारो लोक , मुलेबाळे , पती – पत्नी , आई – वडील , भाऊ – बहीण , पै – पाव्हणे एकत्रित नग्नपूजा करतात . नग्नपूजा करण्याचा सल्ला देण्यामागेसुद्धा बऱ्याच प्रमाणात जोगम्माची स्वार्थी मनोवृत्ती असल्याचे दिसून आले . कारण यात्रेच्या वेळी नग्नपूजेसाठी आवश्यक असणारा धार्मिक विधी करण्याचे काम तीच करते . त्याबद्दल तिला नग्नपूजा करणाऱ्या प्रत्येकाकडून साडी – चोळी , ती नसेल तर तिच्या मोबदल्यात पैसे , दक्षिणा , तांदूळ , नारळ आदी वस्तू मिळतात . यात्रेची वेळ म्हणजे जोगम्मांच्या कमाईची वेळ असते . नग्नपूजा करणारे जेवढे जास्त तेवढी त्यांची कमाई जास्त असते . म्हणून त्या नग्नपूजेचा महिमा मुक्तकंठाने सांगताना दिसल्या .
नग्नपूजेची प्रथा चालू ठेवण्यात या भागातील आर्थिक स्थितीही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे पाहणीत आढळून आले . एक तर हा भाग डोंगरदऱ्यांचा , शेती – पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे . प्रत्येक खेड्यातील जमीन देसाई , इनामदार , गौडर आदी काही मोजक्या बड्या मंडळींच्या हातात आहे . या भागातील माणूस एक तर अत्यंत श्रीमंत तरी दिसेल अथवा अत्यंत गरीब तरी दिसेल . मध्यमवर्ग क्वचितच पाहावयाला मिळाला . दैनंदिन जीवनात गरीब वर्ग श्रीमंत वर्गावर अवलंबून आहे . श्रीमंतांच्या घरासमोर रोज रोजगारासाठी उभे राहावे लागते . त्याने दिला तर रोजगार अन्यथा उपाशी राहण्याची पाळी असे चित्र सर्रास दिसले . गरिबीच्या दुष्टचक्रात अडकलेले लोक आपल्या घरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात यावे , गरिबी दूर व्हावी , चांगले दिवस यावेत म्हणून देवीची प्रार्थना करतात . नग्नपूजा करण्याचे नवस बोलले जातात . त्याप्रमाणे नग्न होऊन देवीला जातात . कितीतरी वर्षे हे असे चालले आहे . पण गरिबांची गरिबी काही दूर झालेली नाही . ‘ लॉटरी आज नाही तर उद्या ‘ याप्रमाणे देवीवर हवाला ठेवून प्रत्येक वर्षी नग्नपूजा करून ही मंडळी जगत आहेत . नग्नपूजा करणे आर्थिकदृष्ट्या महागडे आहे . त्यासाठी पाच दिवस चंद्रगुत्तीला जाऊन राहावे लागते . त्यासाठी एस . टी . खर्च आलाच . पाच दिवसांच्या कालावधीत देवीची पूजा – अर्चा या विधीवर पैसा खर्च होतो . याशिवाय नग्नपूजेनिमित्त घरातील सर्वांना नवे कपडे घ्यावे लागतात . पूजा करून घेण्यासाठी बरोबर असलेल्या जोगम्माचा खर्चही करावा लागतो . अशा प्रकारे एखाद्याला नग्नपूजा करायची असल्यास किमान हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च होतो . इतका एकरकमी पैसा गरीब कुटुंबाकडे कधीच नसतो . मग गावातील धनदांडग्यांकडून ते दामदुप्पट व्याजाने कर्ज घेतात . यात्रेत सर्व पैसा खर्च करतात . मग वर्षभर सावकाराच्या घरात , शेतात राबून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात . सालदार नोकर म्हणून चाकरी करतात . तरीही कर्ज फिटत नाही . कसेतरी ते फिटण्याची वेळ आली , की तोपर्यंत पुन्हा यात्रा येऊन ठेपते . मग त्यासाठी पुन्हा नग्नपूजा , नग्नपूजेसाठी पुन्हा कर्ज , ते फेडण्यासाठी रात्रंदिवस पुन्हा राबणूक अशा एका विलक्षण दुष्टचक्रात अनेक कुटुंबे अडकलेली दिसली . यात्रा आली की सावकारच त्यांना नग्नपूजेची आठवण करून देतात . कारण त्यांची सावकारी चालते , त्यासाठी नग्नपूजेची चांगली मदत होते .
याशिवाय ही यात्रा म्हणजे देवस्थान समिती , पुजारी , व्यापारी आणि एस . टी . महामंडळाला पर्वणीच असते . यात्रेच्या काळात देवस्थान समितीकडे किमान दोन लाख रुपये व अनेक पोती धान्य जमा होते . पुजाऱ्याला वर्षभर जगण्याइतपत कमाई यात्रेद्वारे मिळते . सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल यात्रेच्या वेळी होते . व्यापाऱ्यांनासुद्धा भरपूर फायदा होतो . लाखो लोक यात्रेला येत असल्याने कर्नाटक एस . टी . महामंडळाचीसुद्धा चांगली कमाई होते . लिंबाचा पाला विकून , लाकडाच्या मोळ्या आणि पाणी विकून शेकडो रुपये मिळविणारे लोक असल्याचेही पाहणीत आढळले . याशिवाय ही धार्मिक प्रथा कायम टिकावी , नग्नपूजा करण्यास अनेकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एका धर्मीय संघटनेने १ ९ ८४ व १ ९ ८५ साली नग्नपूजेसाठी येणाऱ्या गरीब महिलांना १५-२० रुपयांची साडी दिली . किलोभर तांदूळ दिले . दही – भात दिला . त्यामुळे केवळ या वस्तू मिळतात म्हणून आजूबाजूच्या गावातील अनेक गरीब कुटुंबातील विशेषत : दलित कुटुंबातील – महिला नग्नपूजा करू लागल्याचेही अनेकांकडून सांगण्यात आले .
अशा प्रकारे या प्रथेविषयी विविध तऱ्हेची माहिती मिळत होती. अनेकांच्या भेटीगाठी होत होत्या . या सर्व धावपळीत रात्री आठ कधी वाजले समजले नाही. १३ मार्च १९८६ चा हा दिवस होता . संपूर्ण दिवस चंद्रगुत्तीत गेला . रात्रीचे आठ वाजले तेव्हा चंद्रगुत्तीपासून ३० किलोमीटर असलेल्या सोरब या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मी स्टँडवर आलो तेथेच एका लॉजवर मी उतरलो होतो , स्टँडवर आलो तेव्हा समजले सोरबला जाण्यासाठी आता उद्या सकाळपर्यंत बस नाही. चंद्रगुत्तीत आता राहायचे तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झाला. तेथील एस. टी. स्टँड हे काही बांधलेले नव्हते. एका झाडाखाली एस . टी . थांबत होती . या जागेलाच लोक स्टँड म्हणत . संपूर्ण गावातील घरे जवळ जवळ बंद झाली होती. जेवायचे काय आणि राहायचे कसे , या विवंचनेत मी होतो. स्टँडजवळच एक घर उघडे असल्याचे दिसले . घरासमोर एक वयोवृद्ध माणूस वारा खात बसला होता . त्याला नमस्कार
क्रमशः
स्रोत:(उत्तम कांबळे यांच्या देवदासी आणि नग्नपूजा या पुस्तकातुन)
