पॉलिहाऊस आणि जैविक तंत्रज्ञान..

सन १९८७ साली वडीलांचा अपघात झाला वडिलांना कायमचे अपंगत्व आले. संसाराचा सारा भार आईवर पडला अशा परिस्थितीत आमच्या चौघांनी भावडांचे शिक्षण पुर्ण केले. मी पदवीधर झालो. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली शेती करण्यास सुरूवात केली. काळाची गरज ओळखून पॉलिहाऊस व जैविक शेतीचे तंत्रज्ञान स्विकारले आणि चोराचीवाडी शिवारातील नऊ एकराचा मळा फुलविण्यासाठी यशस्वी झालो. यामध्ये माझ्या आईचे योगदान मोठे आहे. अशी माहिती अरविंद विठ्ठलराव कापसे यांनी दिली.

माझे वडील सन १९७२ ला बी.एस्सी. ॲग्री पास झाले त्यांनी शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. एकत्रीत कुंटूबामुळे मोठी शेती होती. माझी आई रेखाबाई, बहीणी मधुमालती, अनुराधा व राजकिशोरी, वडीलांचा अपघात झाला. चुलत्यांनी वाटुन घेतले. आमच्या कुंटूबांच्या धुरा आईच्या खांद्यावर आली. आम्ही भावंडे शाळेत जायचो. आई सायकलवर श्रीगोंद्याला बाजार हाट व शेतीला लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी येत असे. आईला होणारा त्रास वेदना डोळ्यांनी पाहत होतो. कधी कधी माझ्या डोळ्याला पाणी येत असे, पण मी पाहण्या पलिकडे काहीच करू शकत नव्हतो. पण या मधून बरच काही शिकलो होतो. सन २००५ ला बी.कॉम. झालो. माझे आरतीशी लग्न झाले. मला चंद्रनील, नक्षत्रा आणि जिजाऊ ही मुल झाली. वडीलांच्या सुचनेनुसार शेतीत करिअर करण्याचा ठाम निर्णय घेतला. नवनाथ रसाळ व मधुकर काळाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरविले पण भांडवलाची अडचण होती. बँकाच्या माध्यमातून या आडचणीवर मात केली.

साडे नऊ एकरापैकी दीड एकरावर पॉलिहाऊस, दीड एकरात गुरांचा चारा, तीन एकर लिंबोणी, आडीच एकरात को ८००५ जातीचा ऊस लागवड केली. हा उस लिंबोणीत अंतरपिक म्हणून लावला. ऊसामुळे लिंबोणीची वाढही झपाट्याने झाली. बाजारपेठेतील शेतीमालाच्या भावाचा अस्थिरपणा पाहून, अंतरपिक घेण्याचे धोरण घेतले. संपूर्ण शेती जैविक पध्दतीने करण्यासाठी गायीच्या गोमुत्रापासून जीवामृत, स्लरी तयार करण्यासाठी टँक बसविले, शेणापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे रासायनिक खते, औषधांचा विषय कमी झाला. या प्रकल्पास गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमधील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. बाजारपेठेतील टिश्यूकल्चर ऊस बियाणेची मागणी विचारात घेऊन को ८००५ जातीचे पॉलिहाऊस मध्ये ऊसाची रोपे तयार केली. ही रोपे गुजरात राज्यात विकले त्यामधून चांगले पैसे मिळाले. शेतीतुन दरवर्षी ५० लाखाचे उत्पन्न काढण्याचे टार्गेट ठेवले आहे. पण मध्यंतरी शेतीमालाच्या भावाचे गणित वजा झाले. शेती व्यवसाय अडचणीच्या उंबरठ्यावर उभा राहीला. अशा परिस्थितीत शेतीत अंतरपिकांचा फॅक्टर वापरून शेती नफ्यात ठेवण्यात यश मिळवले.

संदेश

रासायनिक युक्त खते व औषधे वापरलेला शेतीमाल शहरी भागात ग्राहक नाकारत आहेत. त्यामुळे भविष्यात बायो शेती केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तरुणांनी आरोग्य, पर्यावरणाचा विचार करून, बायो तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी शासनाने बायो शेतीला प्रोत्साहन आणि केमीकल शेतीवर निर्बंध आणण्याची गरज आहे. अरविंद कापसे,श्रीगोंदा.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
सदर माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading