देवदासी आणि नग्नपूजा..
केला. मी कोण आहे , कोठून आलो , हे त्याला सांगितले . रात्रभर राहण्यासाठी , आसरा देण्याची त्याला विनंती केली . तो एकटक माझ्याकडे बघत राहिला. जागेवरून उठला . काहीच बोलला नाही . चटकन घरात गेला . एका क्षणातच त्याने घराचा दरवाजा बंद केला. मी मागे फिरलो . कोठे जावे , काही कळत नव्हते . चालून चालून खूप थकवा आला होता . भुकेने जीव व्याकूळ झाला होता. तसाच काही वेळ चालत राहिलो . कोठे कोणाचे घर उघडे दिसते का , ते पाहू लागलो . मंदिर दीड फर्लागावर होते . तेथे जायचे म्हणजे पुन्हा पायपीट , पुन्हा १९२ पायऱ्या चढणे . ही कल्पनाच नको वाटली . वाटेतच एका बंद दुकानाच्या पायरीवर काहीएक विचार न करता झोपलो . गळ्यातील शबनम बॅग डोक्याखाली ठेवली . झोप कधी लागली समजलेच नाही . रात्री बारा – एक वाजता कोणीतरी जोरजोरात ओरडून मला उठवू लागले . डोळे उघडतो तर समोर दोघेजण हातात कंदील घेऊन उभे होते . एकाच्या अंगात फक्त बंडी तर दुसऱ्याच्या अंगात काहीच नव्हते . मी उठून बसलो . पुन्हा एकदा मी कोण , कुठून आलो आहे , पत्रकार आहे वगैरे सांगू लागलो . रात्रभर पायरीवर झोपण्याची परवानगी द्या , अशी विनंती करू लागलो . मला कन्नड येत होते . ते त्यांना समजले की नाही , माहीत नाही . त्यांचे कन्नड खूपच अवघड होते . त्यांनी माझे काहीच ऐकले नाही . अगोदर आमच्या दारातून दूर जा एवढे मात्र त्यांनी ठणकावून सांगितले . मी मुकाट्याने चालू लागलो . मंदिराच्या दिशेने निघालो . वाटेत एका झाडाखाली वाळलेल्या गवताच्या वीस – पंचवीस पेंढ्या पडलेल्या दिसल्या . मी काहीएक विचार न करता त्यांतील पाच – सहा पेंढ्या अंथरल्या . राहिलेल्या पेंढ्या पायापासून छातीवर ठेवल्या व पुन्हा झोपलो . भोवताली एकही घर नाही . माणसाची चाहूल नाही . मनात कसली तरी भीती . झोप काही येत नव्हती . कधी एकदा उजाडेल , असे वाटत होते . या विचाराच्या तंद्रीतच पापण्या जड होऊ लागल्या . सकाळी सहा वाजतच जाग आली . अंगावरचे गवत बाजूला फेकले . पुन्हा स्टॅडकडे निघालो . हॉटेलात काहीतरी खावे म्हणून गेलो तर तेथे चहाशिवाय काहीच नव्हते . चार – पाच कप चहा प्यालो . बसची वाट बघत थांबलो . सोरबकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलो .
सोरबमध्ये पोहोचलो . मी उतरलेल्या लॉजसमोर दारातच पंधरा – वीस तरुण थांबले होते . सर्व कॉलेजचे विद्यार्थी असावेत , असे त्यांच्या पोशाखावरून वाटले . हॉटेलमधून चहा घेऊन ते बाहेर आले होते . आपापसात कन्नडमधून ते काहीतरी बोलत होते . हसत होते . त्यांनी दोन रांगा केल्या . हलगीवाला तरुण सर्वांत समोर झाला . त्याने जोरजोरात हलगी वाजवली . हलगी थांबवून त्याने जोरात घोषणा दिली , ‘ बेत्तले सेवे … ‘ इतरांनी आवाज दिला , ‘ निल्लले बेकू ‘ ‘ नग्नपूजा बंद झाली पाहिजे ‘ अशा घोषणा ते देऊ लागले .
मी त्यांतील एकाला जवळ बोलावले . माझा परिचय करून दिला . कोल्हापूरहून येथे नग्नपूजा विधी बघण्यासाठी आलो असल्याचे मी त्यांना सांगितले . यावर हा तरुण म्हणाला , “ आता काय बघताय नग्नपूजा . यंदा ती होऊ द्यायची नाही असे ‘ दलित संघर्ष समिती’ने ठरविले आहे . कर्नाटक सरकारनेही तसा निर्णय घेतला आहे .
” ” अहो , पण मी तर हा विधी बघण्यासाठी आलो होतो . ” मी म्हणालो .
तरुण म्हणाला , “ मग तुम्हाला बातमी पाहिजे म्हणून लोकांनी नग्नपूजा करायची काय ? आता घरी जा नाही तर आमच्याबरोबर चला – बेत्तले सेवेविरुद्ध प्रचार करायला .
” तुमचे नेते कोण आहेत ? ”
” प्रा . कृष्णपा .
” ते कोठे आहेत ? ‘
” ते काय , ते खांद्यावर शाल असलेले .
” मी प्रा . कृष्णप्पा यांच्याकडे गेलो . पुन्हा त्यांना माझ्याविषयी माहिती सांगितली . ते म्हणाले , ” नग्नपूजा होऊ नये यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू . पण ती बंद होईलच असे नाही . यात्रेला अजून चार – पाच दिवस अवकाश आहे . आम्ही तेवढ्या अवधीत या भागात सर्वत्र प्रचार – मोहीम राबवू . तुम्ही यात्रेच्या वेळीच या ना . ” प्रा . कृष्णप्पा यांनी समजावून सांगितले . पण आता कोल्हापूरला जाऊन येण्यात दोन – तीन दिवस जाणार असे मी त्यांना सांगितले . यावर ते म्हणाले , ” तुमची तयारी असेल तर तुम्ही आमच्याबरोबर फिरू शकता . आमच्याबरोबर राहू शकता . ‘ ‘ मी लागलीच हो म्हणालो . धावत जाऊन लॉजमधील माझे सर्व साहित्य घेतले . ‘ दलित संघर्ष समिती’च्या पथकात सहभागी झालो . त्यांच्याबरोबर अनेक खेड्यांत जाण्यास मिळणार होते . त्या निमित्ताने नग्नपूजेची प्रथा समजण्यास , माहिती जमण्यास आणखी मदत मिळणार होती .
धारवाड , शिमोगा , हुबळी , बंगळूर येथील ‘ दलित संघर्ष समिती’चे कार्यकर्ते नग्नपूजेविरुद्ध प्रचाराच्या मोहीमेत सहभागी झाले होते . ‘ बेत्तले सेवे ‘ नावाचे पथनाट्यही त्यांनी बसविले होते . सोरबपासून शिराळकोप्प हे २५ किलोमीटरवर असलेले गाव . त्या ठिकाणी संघर्ष समितीच्या पथकाबरोबर गेलो . तेथे पथनाट्य चालू झाले . ते चालू असतानाच लक्षमव्वागोळ पुजारी नावाची साठ वर्षांची एक वृद्ध महिला माझ्याजवळ आली . ‘ हे सर्व काय चालले आहे ? ‘ असे तिने मला विचारले . नग्नपूजेविरुद्ध मोहीम असल्याचे मी तिला सांगितले . ते ऐकून ती अवाक झाली . तिने गर्दीतून मला बाजूला नेले . स्वत : च्या मुलाची समजूत काढावी त्याप्रमाणे माझ्याशी ती बोलू लागली . ती म्हणाली , ” बाबा , तुम्ही तरणीताठी पोरं . तुम्हाला देवाधर्माचं समजायचं नाही . पण रेणुकांबा फार कडक देवी . देवीच्या विरुद्ध असं नाटक कराल तर तुमच्या जिभेत किडे पडतील . हातपाय झडतील . तुला माहीत नाही , आमच्या घराजवळच्या रकमाने नग्नपूजा करण्याचं नवस केलं होतं . पण उद्या जत्रा असताना आज ती बाळंत झाली . घरातल्या लोकांनी तिला घरातच सोडलं व सर्वजण चंद्रगुत्तीला यात्रेसाठी गेले . पण काय चमत्कार झाला माहीत आहे ? ही ओली बाळंतीण मूल घरातच टाकून चंद्रगुत्तीला धावत गेली . माझा नवराही यात्रेत गेला होता . रकमाव्वानं चंद्रगुत्तीतल्या वरदा नदीत थंडगार पाण्यात आंघोळ केली . नागवी उदंड उदंऽऽ म्हणत ती देवीकर्ड नवस फेडण्यास निघाली . वाटेत माझ्या नवऱ्यानं तिला बघितलं . तरणीसाठी , देखणी बाई बघून त्याच्या मनात पाप जागं झालं . पण तिथल्या तिथंच माझ्या नवऱ्याचं अर्ध अंग लुळं पडलं . आम्ही दहा वर्षे नग्नपूजा केली . देवीला बकरं दिलं . तेव्हा कुठं माझा नवरा नीट झाला . असा आहे बाबा देवीचा महिमा .
” लक्षमव्वा अगदी भांबावून सांगत होती . मी शांतपणे ऐकून घेतले . तोपर्यंत पथनाट्य संपले . तिचा निरोप घेऊन निघालो .
सन्नापूर या खेड्यात पथनाट्य चालू झाले तेव्हा एक जोगप्पा अचानक तेथे आला . पथनाट्य पाहून त्याच्या अंगात रेणुकांबा आली . तो मोठमोठ्याने घुमू लागला . पण
क्रमशः
स्रोत:(देवदासी आणि नग्नपूजा या उत्तम कांबळे यांच्या पुस्तकातुन)
